होळी हा सण उत्तरेत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पंजाबात उत्तर प्रदेशाप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात होळी साजरी करत नाहीत. पण पंजाबातल्या शहरांमधून आणि दिल्लीसारख्या ठिकाणी पंजाबी लोक धुळवडीच्या दिवशी गुलाल आणि रंग खेळणं आणि होळी पार्टी आयोजित करतात. बहुतांशी खेड्यांमध्ये मात्र अजूनही फक्त लहान मुलं थोडे फार रंग खेळतात, मोठे एकमेकांना शगनाचा गुलाल लावून होळी खेळतात.
होळीच्या मागे पुढे पंजाबमध्ये शीख समुदाय होला मोहोल्ला नावाचा तीन दिवसांचा सण साजरा करतात. ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये होला मोहोल्ला साजरा केला जातो. आनंदपुर साहिब गुरुद्वारामधला होला मोहोल्ला जगप्रसिद्ध आहे. या काळात गुरुद्वारांमध्ये कीर्तन आयोजित केलं जातं, ठिकठिकाणी लंगर लावले जातात. होला मोहोल्लाची खासियत म्हणजे निहंग शीखांनी काढलेली मिरवणूक. या मिरवणुकीत निळ्या रंगाच्या मोठमोठ्या पगड्या बांधलेले सरदार गुलाल उधळत तलवारबाजी, घोडेस्वारी, तिरंदाजी, लुटुपुटीच्या लढाया आणि अशा अनेक खेळांची प्रात्यक्षिके करून दाखवतात. यामधला गतका नावाचा खेळ खूप प्रसिद्ध आहे. तलवारीऐवजी काठ्या घेऊन तलवारबाजीप्रमाणे या काठ्यांनी लढाया खेळणे म्हणजे गतका. होला मोहोल्लाच्या निमित्ताने ठिकठिकाणी गतकाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याचप्रमाणे एखाद्या तलवारनृत्याप्रमाणे गतकाचे प्रात्यक्षिक पण बर्याच ठिकाणी वेगवेगळे समूह दाखवतात.
या काळात गुरुद्वारांशिवाय महाविद्यालयेसुद्धा अशा स्पर्धा आयोजित करतात. याशिवाय भांगडा, ढोल आणि गाणी असतातच होला मोहोल्लाच्या मिरवणुकांमध्ये. या काळात होणार्या लंगरसाठी लोक घरून अन्नधान्य, दूध, दही, तूप गुरुद्वारामध्ये दान करायला घेवून येतात. लंगरमध्ये कडा प्रशाद, जिलेब्या, विविध पराठे, पनीर, दाल, पकौडे, फुलके, भात, रायता, लस्सी, सरबतं असतात. शिवाय काही ठिकाणी सरदाई म्हणजे ठंडाई पण असते.
पूर्वी होळीसाठी पंजाबात गुजिया (खवा आणि सुक्यामेव्याचे सारण भरून नंतर पाकातून काढलेल्या करंज्या) आणि फराक्का बनवून ठेवल्या जात. फराक्का म्हणजे आपल्या करंजीची मोठी बहीण. यांच्या सारणात रवा, साखर आणि ड्रायप्रâुट्स घातलेले असतात आणि आकार आपल्या करंजीपेक्षा जरा जास्त मोठा असतो. हल्ली मात्र कोणी हे पदार्थ घरी बनवायच्या भानगडीत पडत नाही. मिठाईच्या दुकानांमध्ये होळीच्या १०-१५ दिवस आधीपासून गुजिया आणि फराक्का मिळायला सुरुवात होते. होळीला उत्तरेत छोटी होली किंवा जलानेवाली होली म्हणतात, तर धुळवडीला होली/होळी. दिल्लीतल्या पंजाब्यांची खासियत म्हणजे होळीच्या दिवशी गाजराची कांजी. हिवाळ्यात बाजारात काळी गाजरं असतात, त्यांची कांजी बनवण्यासाठी उन्हं यायची वाट बघायला लागतात लोक. ही कांजी थंड असते, त्यामुळे थंडी कमी झाल्याशिवाय पिता येत नाही. शिवाय कांजी किमान एखादा दिवस तरी आंबवून मग पितात. त्यासाठी थंडी कमी होऊन थोडं तरी ऊन पडणं आवश्यक असतं.
एरवी आमच्या घरी, गावात कांजी उन्हाळ्यात प्यायली जाती. होळीच्या काळात पंजाबात तरी उन्हाळा सुरू झालेलाच नसतो, म्हणून असेल कदाचित, पण आमच्या घरी या दिवसात कांजी बनवण्याची पद्धत नाही. सहसा उन्हाळा सुरू झाल्यावर, पण गाजर बाजारात असेपर्यंतच्या काळात कांजी बनवतात आमच्या घरी. कांजीमध्ये आरोग्यदायी चांगले जिवाणू असतात जे आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. या कारणामुळे हल्ली शहरांमध्ये लोक आवर्जून कांजी बनवतात.
होळीच्या म्हणजे धुळवडीच्या दिवशी दिवशी वेगवेगळे पकौडे, पुर्या, दही भल्ले आणि इतर तळलेले पदार्थ बनवले जातात. काही ठिकाणी नुसती कांजी बनवण्याऐवजी कांजी वडे बनवले जातात. याशिवाय छोले भटुरे, आलू पुरी, लस्सी हे पदार्थ असतातच. पकोडे किंवा भजे म्हणलं की आपल्याला कांदा भजी किंवा जास्तीत जास्त मिरची भजी आठवतात. पंजाबात मात्र पकौडे म्हणजे शक्यतो मिक्स पकौडे, ज्यात कांदा भजी, बटाट्याची भजी, गोबी किंवा फ्लॉवरची भजी, पालकाची भजी असतात. शिवाय स्पेशल पनीर पकौडे आणि ब्रेड पकौडे हवेच. पंजाबी पार्ट्यांमध्ये हे दोन्ही पकौडे असतातच. माझा लेक लहान असताना ज्या आंगणवाडीत जायचा तिथे प्रत्येक मुलाच्या वाढदिवसाला ब्रेड पकौडा आणि ज्युसचा पॅक मिळायचा. वाढदिवस म्हणजे ब्रेड पकौडा असं समीकरण घट्ट बसलं होतं त्याच्या डोक्यात. त्याचे वाढदिवस सुट्टीत येत असल्याने बहुतेक वेळा आजोळी महाराष्ट्रात साजरे झाले. वाढदिवसाला काय करायचे याचे उत्तर कित्येक वर्षे ब्रेड पकौडा आणि पनीर पकौडा हेच असायचे. ब्रेड पकौडा मी लग्नाआधी १-२ वेळा खाल्ला होता, पण पनीरचे पकौडे मात्र इथे आल्यावरच खाल्ले. दोन पनीरच्या तुकड्यांमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, जीरे आणि लिंबू घातलेली हिरवी चटणी भरून भज्याच्या पिठात हे तुकडे घोळवून तळून घ्यायचे. पंजाबी लोक भज्याच्या पिठात ओवा, जिरे पूड, थोडा गरम मसाला, तिखट आणि बर्याचदा किंचित हिंग घालतात. ही भजी मोहरीच्या तेलातच तळतात.
काळ्या गाजराची कांजी
साहित्य : एक किलो काळे गाजर, एक चमचा मिरे, तीन चमचे राई, एक चमचा तिखट, दोन चमचे मीठ, एक चमचा काळं मीठ, दोन लीटर पाणी.
कृती : गाजर सोलून बोटभर लांबीचे आणि पेरभर जाडीचे उभे तुकडे करावेत. गाजरामध्ये असलेला आतला पांढरा भाग काढून टाकावा. खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये मिरे आणि राई एकत्र जाडसर कुटून घ्यावी. एखाद्या मोठ्या मातीच्या भांड्यात गाजराचे तुकडे, कुटलेले मिरे-राई आणि इतर साहित्य एकत्र करावं. व्यवस्थित हलवून त्या भांड्याच्या तोंडावर कापड बांधावे. हे भांडे तीन ते चार दिवस उन्हामध्ये ठेवावे. रोज एक-दोन वेळा सगळं मिश्रण हलवून परत कपडा बांधावा. ३-४ दिवसांत कांजी प्यायला तयार होते. थोडी आंबूस, तिखट अशी चव असते कांजीची. कांजी खूप थंड असल्याने उन्हात बसून किंवा दुपारच्या वेळी प्यावी असं म्हणतात. थंडीच्या दिवसांत कांजी प्यायल्यास बाधू शकते. मातीचे भांडे नसल्यास चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये कांजी बनवता येवू शकते. पण मातीच्या भांड्यात बनवलेल्या कांजीचा स्वाद वेगळाच येतो. ही कांजी १५-२० दिवस फ्रीजमध्ये टिकू शकते. काळे गाजर न मिळाल्यास साधे गाजर आणि बीट एकत्र करून कांजी बनवता येते.
सरदाई / ठंडाई
साहित्य : दोन चमचे मगज (काकडी, भोपळा, कलिंगड आणि खरबूज यांच्या बिया), २ चमचे गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या, ३ चमचे खसखस, २ चमचे काजू, २ चमचे बदाम, १ चमचा पिस्ते, अर्धा चमचा मिरे, २ चमचे बडीशेप, १०-१२ विलायची, ५-६ चमचे साखर, तीन ग्लास दूध आणि गरजेनुसार पाणी.
कृती : सगळे ड्रायफ्रूट्स, खसखस आणि बडीसोप वेगवेगळे धुवून घ्यावेत. यानंतर साखर आणि दूध सोडून बाकी सगळं सामान ८-१० तास एकत्र पाण्यात भिजवून घ्यावे. व्यवस्थित भिजलेलं हे साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. पारंपारिकरित्या हे सगळं साहित्य कुंडी दंड्याने वाटून घेतात. कुंडी दंडा म्हणजे खलबत्ताच. यातला खल म्हणजे कुंडी ही आपल्याकडच्या सारखी दगडी किंवा मातीची असते तर दंडा म्हणजे बत्ता मात्र लाकडाचा असतो. गरजेप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून हे साहित्य गंधासारखे मऊ वाटून घ्यावे. वाटताना यात साखरही घालावी. वाटण तयार झाल्यावर त्यात तीन ग्लास दूध घालून नीट हलवून घ्यावे. हे दूध आता एखाद्या मलमलच्या कपड्यातून गाळून घ्यावे. गाळलेली सरदाई/ ठंडाई ग्लासमध्ये बर्फ घालून प्यायला घ्यावी. वर सजावटीसाठी गुलाब पाकळ्या आणि थोडे ड्रायफ्रूट्स घालावे. पण ठंडाई थंड असते, त्यामुळे उन्हाळा सुरू झाल्याशिवाय ठंडाई पीत नाहीत. शिवरात्रीच्या दिवशी मंदिरांमध्ये यात भांग घालून देतात. हे वाटण वाटताना खलबत्त्यात घोटून घोटून वाटतात म्हणून याला काहीजण घोटा पण म्हणतात.