भारताचे पहिले ऑलिंपिक पदकविजेते खाशाबा जाधव यांच्यासारखीच झळझळीत कामगिरी करणारे आणखी एक ऑलिंपिक पदकविजेते मुरलीकांत राजाराम पेटकर यांचं नाव खचितच कुणी यापूर्वी ऐकलं असावं. १९७२ साली त्यांनी केलेली अतुलनीय कामगिरी विस्मरणात गेली. तब्बल ४६ वर्षांनी सरकार दरबारी जाग येऊन मुरलीकांत यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं, पण त्यांची गोष्ट अपरिचित राहिली. या झुंजार लढवय्या खेळाडूचा संघर्ष चंदू चॅम्पियन सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक कबीर खान पडद्यावर घेऊन आले आहेत.
एक वृद्ध इसम आजवर होऊन गेलेल्या राष्ट्रपतींची तक्रार करायची अजब मागणी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो. इन्स्पेक्टर (श्रेयस तळपदे) आणि हवालदार (पुष्कराज चिरपुटकर) या म्हातारबाबाचं नेमकं म्हणणं तरी काय हे ऐकायला सुरुवात करतात. शालेय वयातील मुरलीकांतचा प्रवास आपल्या साक्षीने सुरू होतो. सांगलीतील हा लहानगा मुरली. कुस्तीवीर खाशाबा जाधव ऑलिंपिक पदक जिंकून आल्यावर त्यांना पाहायला दहा हजारांचा जनसागर उसळतो, तेव्हा ती मिरवणूक पाहून आपणही ऑलिम्पिक पदक मिळवावं असं तो ठरवतो. अंथरूण पाहून पाय पसरावेत असं मानणार्या समाजात मुरलीला खिजवयला एक नवीन नाव मिळतं, चंदू चॅम्पियन म्हणजेच कच्चा लिंबू. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुरलीकांत (कार्तिक आर्यन) कुस्तीच्या तालमीत प्रवेश करतो. पण काही कारणामुळे मुरलीकांतला गाव सोडून जावे लागते. प्रवासात त्याची भेट कर्नेल सिंह (भुवन अरोरा) या सरदारजीशी होते. दोघेही सैन्यात भरती होतात. मात्र सैन्यात कुस्तीचे ऑप्शन नसल्याने मुरलीकांत बॉक्सिंगमध्ये प्राविण्य मिळवतो. टोकियोमध्ये जगभरातील सैन्यदलांच्या स्पर्धेत मुरलीकांत रौप्यपदक मिळवतो. हे यश मिळवल्यानंतर तो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलसाठी तयारी सुरू करतो. पण १९७१च्या युद्धात मुरलीकांतला नऊ गोळ्या लागतात. आठ गोळ्या काढल्या जातात, एक गोळी शरीरात तशीच राहिलेली असल्याने तो कमरेखाली अपंग होतो. ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे त्याचे स्वप्न भंगते. आयुष्याच्या या वळणावर तो निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न करतो, पण त्यातही अयशस्वी होतो.
सैन्यात असताना बॉक्सिंगचे धडे देणारे टायगर अली (विजय राज) पुन्हा मुरलीकांतच्या जीवनात येतात आणि त्याला लढण्यास प्रवृत्त करतात. इथून मुरलीकांतच्या जीवनाला कलाटणी मिळते. त्याला स्विमिंगमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी खूप झगडावं लागतं. प्रचंड मेहनतीने तो या खेळात प्रावीण्य मिळवतो आणि १९७२च्या म्युनिक पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतो. मात्र तेथे दहशतवादी हल्ला होतो. या हल्ल्यात काय होतं? मुरलीकांत ऑलिंपिक पदक मिळविण्यात यशस्वी होतो का, त्याचं स्वप्न पूर्ण होतं का या प्रश्नांची उत्तरे सिनेमा पाहिल्यावर मिळतील.
गेल्या काही वर्षांत स्पोर्ट्स बायोपिकचं उदंड पीक आलं आहे. या सिनेमांच्या पटकथेचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे. कथेतील चढउतार ठरावीक पद्धतीने पडद्यावर दिसतात. चंदू चॅम्पियनची काही प्रमाणात अशी मांडणी असली तरी या सिनेमाच्या कथेत मुख्य व्यक्तिरेखेच्या कामगिरीचा बडेजाव आणि अनावश्यक हिरोगिरी दिसत नाही. वास्तवदर्शी शैलीत काम करताना मनोरंजनाचे मूल्य जपणं ही कबीर खान या दिग्दर्शकाची खासियत. या सिनेमातही कबीर खान ‘कला आणि मसाला’ यांचा सुरेख मेळ घालताना दिसतो. सिनेमातील आठ मिनिटं लांबीचा युद्धाचा ‘वन टेक शॉट’ उत्कंठा शिगेला पोहचवतो.
सुदीप चटर्जी यांनी चित्रित केलेली बॉक्सिंग रिंग आणि स्विमिंग पूलमधील दृश्ये खिळवून ठेवतात. मुरलीकांतचे ऑलिंपिक पदक मिळविण्याचे स्वप्न याच विषयावर सिनेमाचा संपूर्ण फोकस राहिल्याने प्रेक्षक सिनेमाशी जोडला जातो. चक दे इंडिया, धाकड, यहाँ के हम सिकंदर, अशी खेळावर आधारित सिनेमांत किती तरी उत्तम गाणी यापूर्वी आली आहेत. या तुलनेत चंदू चॅम्पियन चित्रपटाचे संगीत याच सिनेमातील ‘सत्यानाश’ गाण्यासारखं झालं आहे.
उत्तम कलाकारांची निवड हे सिनेमाचं बलस्थान आहे. स्टायलिश हिरो कार्तिक आर्यन या सिनेमात वास्तवदर्शी अभिनय करताना दिसलाय. स्वप्नाळू, भोळसटपणा, जिद्द, शौर्य, समर्पण, त्याग आणि प्रयत्नशीलता त्यानं टप्याटप्यानं दाखवली आहे. विविध वयोगटातील चंदूची शरीरयष्टी दाखवण्यासाठी घेतलेली मेहनत पडद्यावर दिसते. कोच टायगर अलीच्या भूमिकेतील कडक मिजाज प्रशिक्षक विजय राज, मित्र कर्नाल सिंहच्या भूमिकेत भुवन अरोरा आणि सिनेमातील गंभीर प्रसंगानंतर विनोदाने वातावरण हलकं फुलकं करणारा रुग्णालयातील वॉर्डबॉय राजपाल यादव यांची कामगिरी उत्तम झाली आहे. मुरलीकांतची आई हेमांगी कवी, पैलवान गणेश यादव, मुलगा आरोह वेलणकर, पुष्कराज चिरपुटकर आणि पत्रकार सोनाली कुलकर्णी या सर्व मराठमोळ्या कलाकारांनी उत्तम कामगिरी करत ‘हम किसी से कम नाही’ हे दाखवून दिलं आहे. दहा सेकंदात मोटिवेशन देणारे अनेक अनेक चॅम्पियन इन्फ्लुएन्सर समाजमाध्यमावर दिसत असतात. पण खरा चॅम्पियन कसा असतो हे पाहायला चंदू चॅम्पियन पाहायला हवा.