चित्रपटाच्या एकूण निर्मिती बजेटच्या किमान पन्नास टक्के बजेट प्रसिद्धी आणि वितरण यासाठी ठेवायला हवं. पण अनेकदा सिनेमा बनवतानाच निर्मात्याकडील बरेचसे पैसे संपून जातात. त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगली प्रसिद्धी कशी करता येईल, हे पाहावं लागतं. प्रसिद्धी करताना काय दाखवायचं नाही याचं धोरणही फार महत्त्वाचं असतं. सिनेमाचे प्लस पॉइंट ओळखून त्यातील काय दाखवायचं हे ठरवावं लागतं.
– – –
गोष्ट ऐकायला कोणालाही आवडते. पण तीच गोष्ट दृश्यस्वरूपात दिसली तर ती जास्त प्रभावीपणे पोहोचते. म्हणूनच भारतासारख्या विकसनशील देशातील जनमानसावर सिनेमाचा खूप प्रभाव आहे. सिनेमा आपलं मनोरंजन करतो. स्वप्न दाखवतो. प्रेक्षकांना चित्रपट आवडला तर तो हिट होतो आणि नाही आवडला तर फ्लॉप होतो असं साधं गणित आहे. पण अमुक सिनेमा प्रदर्शित होणार आहे, हे प्रेक्षकांना कळलंच नाही तर सिनेमा बनवण्यासाठी लागलेला पैसा आणि मेहनत वाया जाते. म्हणूनच नवीन सिनेमा येतोय याची माहिती आकर्षक पद्धतीने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सिनेमाचा प्रसिद्धीप्रमुख (पीआरओ) करत असतो.
मराठीमध्ये २५ वर्षे पीआरओ म्हणून काम करणारे गणेश गारगोटे हे या क्षेत्रातले एक आघाडीचे आणि कल्पक प्रसिद्धीपटू. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘झपाटलेला-२’, ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘फुलराणी’ अशा जवळपास चारशे मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीचे काम त्यांनी केले आहे. सर्वस्वी वेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून मराठीतील टॉपचा पीआरओ बनण्यापर्यंतचा गणेश यांचा प्रवास कसा झाला, हे विचारल्यावर गणेश म्हणाले, ‘आमच्या कुटुंबाचा सिनेमाशी संबंध होता तो फक्त चित्रपट पाहण्यापुरता. वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता, आई सरकारी कर्मचारी. आम्ही अभ्युदय नगर, काळाचौकी येथे राहायचो. लहानपणी गिरणगावातील गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव असं आजूबाजूचं मराठमोळं सांस्कृतिक वातावरण होतं. मी शाळेत असताना निबंध, हस्ताक्षर, चित्रकला स्पर्धेतही अनेक बक्षीसे मिळविली आहेत. बाबा मला नाटक, सिनेमा दाखवायला घेऊन जायचे, त्यामुळे साहजिकच कलेची आवड निर्माण झाली. १९९४ साली मी एमडी कॉलेजमधून बीएससी झालो. वडिलांना मदत करायला त्यांच्या ऑफिसमध्ये जायला लागलो. पण काही दिवसांतच ट्रान्सपोर्ट व्यवसायातील कामाची पद्धत आणि माझी विचारसरणी यात फरक आहे असं लक्षात आलं. मग, हॉटेल व्यवसाय करावा असं वाटलं. घाटकोपरला वडिलोपार्जित जागेत हॉटेल काढण्याचा निर्णय घेतला. बँकेकडून कर्ज काढून तिथे फर्निचरचे काम सुरू केलं. हॉटेलचे काम सुरू असताना एका मित्रानं सह्याद्री वाहिनीवरील एका मराठी टेलिव्हिजन मालिकेसाठी प्रसिद्धीपत्रक लिहून देण्याचं काम आणलं. मी मित्राला म्हणालो, अरे पण हे काम मी याआधी कधी केलेलं नाही. तो म्हणाला, ‘तू निबंध चांगला लिहायचास, त्यामुळे हे काम तुला नक्की जमेल.
हॉटेल अजून सुरू व्हायचं होतं. माझ्याकडे वेळ होता. मी त्या मालिकेची माहिती घेऊन प्रसिद्धीपत्रक बनवून निर्मात्यांना दिलं. ते म्हणाले, मी कोणत्याही पत्रकारांना ओळखत नाही. तेव्हा आमच्या मालिकेबद्दल वर्तमानपत्रात छापून आणण्याची जबाबदारी देखील तुम्हीच घ्या. तोपर्यंत माझा वर्तमानपत्रांशी संबंध फक्त वाचनापुरताच आला होता. वर्तमानपत्राच्या एका पानात कार्यालयीन पत्ता लिहिलेला असतो. त्या पत्त्यांवर मी ते प्रसिद्धीपत्रक घेऊन गेलो. काही दिवसांनी मालिकेची माहिती वेगवेगळ्या वर्तमानपत्रांत छापून आली. उत्सुकता निर्माण होईल अशा पद्धतीने मी केलेली मालिकेची प्रसिद्धी निर्मात्यांना आवडली. या कामाने १९९६ साली ‘पब्लिक रिलेशन्स’ या व्यवसायात माझा प्रवेश झाला. एका कामातून दुसरं असं अनेक मालिकांचं काम मला मिळत गेलं. मालिकांचा ओघ सुरू होता, पण मालिकांचं प्रसिद्धीचं काम छोट्या प्रमाणात चालायचं. सिनेमाचा पडदा व्यापून टाकणारा अभिनेता अमिताभ बच्चन माझं दैवत. मलाही माझ्या क्षेत्रात त्याच्यासारखंच लार्जर दॅन लाईफ काम करायचं होतं. त्यासाठी सिनेमा प्रसिद्धी हेच माध्यम योग्य आहे हे जाणवत होतं. त्यासाठी काही निर्मात्यांना भेटलो, पण या क्षेत्रात काही प्रस्थापित मंडळी बस्तान बसवून होती. त्यांच्यासमोर एखाद्या नवीन मुलाला संधी मिळणं कठीण होतं.
गणेश यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आणि त्यांची सिनेमा पीआरओची कारकीर्द २००२ सालापासून सुरू झाली. गणेश यांनी सुरुवातीला धंद्यातील जुन्या मळलेल्या वाटेने प्रवास केला, पण नंतर त्यांनी वेगळी वाट चोखाळली. त्यांच्या कल्पकतेला खर्या अर्थाने वाव मिळाला २००४नंतर. २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘श्वास’ सिनेमाच्या यशामुळे मरगळलेल्या मराठी सिनेसृष्टीने कात टाकली. सिनेमा बदलत होता, त्यातील तंत्र बदलत होतं आणि सिनेमाचं मार्केटिंगसुद्धा बदलत होतं. हेच लक्षात घेऊन तरूण दमाच्या उत्साही गणेश यांनी गेल्या पंचवीस वर्षात अनेक प्रयोग केले. वर्तमानपत्र ते सोशल मीडिया, विविध भारती ते एफएम रेडिओ, टेलिव्हिजन ते डिजिटल मीडिया या सर्व बदलांचे ते साक्षीदार आहेत. गेल्या पंचवीस वर्षात सिनेमाचं प्रमोशन आणि मार्केटिंग कसं बदललं. तसंच कलाकार आणि निर्मात्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून (मुंबई-पुणे-कोल्हापूर) बाहेर काढून, खेडोपाडी सिनेमा प्रमोशनसाठी नेण्यासाठी त्यांचं मन कसं वळवलं, सुरुवातीला काम करताना काय अडचणी आल्या, त्यातून मार्ग कसा काढला याबद्दल गणेश म्हणाले, ‘सुरुवातीच्या काळात माझी सर्वात मोठी समस्या होती टाइम मॅनेजमेंट. सकाळी सात वाजता पोहोचून माझ्या हॉटेलचे काम पाहणे, दुपारी निर्माते आणि पत्रकार यांच्यासोबत भेटीगाठी आणि संध्याकाळी वडिलांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय सांभाळणं अशा तीन वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना माझी त्रेधातिरपीट उडायची. तीन पायांची ही सर्कस पाहून वडील रागाने म्हणायचे, ‘तुला ट्रान्सपोर्ट व्यवसायात रस नव्हता म्हणून तू हॉटेल उघडलेस हे मी एकवेळ समजू शकतो, पण जो तू नट-नट्यांचा फोटो वर्तमानपत्रात छापायचा हा नवा धंदा उघडला आहेस, तो काही मला पसंत नाही.’ वडिलांची नाराजी स्वीकारून मी काम करत राहिलो. हॉटेल व्यवसायातील चॅलेंजेस वेगळे होते. हा व्यवसाय पूर्णपणे कामगारांवर अवलंबून आहे. कामगार न सांगता काम सोडून जायचे तेव्हा बदली माणूस शोधणं, वेगवेगळ्या लायसन्ससाठी सरकारी कार्यालयांत खेटे घालणं, अशा अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. हॉटेल व्यवसाय स्थिरस्थावर झाल्यावर मी सिनेमा क्षेत्रात स्वतःला झोकून दिलं. त्या काळात वर्तमानपत्र हेच चित्रपट प्रसिद्धीचं एकमेव माध्यम होतं. मुंबई आणि कोल्हापूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली, पत्रकारांना चित्रीकरणस्थळी फिरवून सिनेमा कसा बनत आहे याची बातमी केली की झाली सिनेमाची प्रसिद्धी, असा सोपा कारभार होता. सुरुवातीला मीही हेच केलं. पण जसजसा माझा अनुभव वाढत गेला, तसतसा मी यात बदल करत गेलो. उदा. चित्रीकरणस्थळी पत्रकार-कलाकार संवादात शूटिंगचा वेळ फुकट जायचा. त्याचा निर्मात्याला भुर्दंड पडायचा. शिवाय चित्रीकरणाच्या गदारोळात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कलाकार फारसे खुलत नसत. यात बदल करून मी शूटिंग संपल्यावर प्रत्यक्ष भेटीची किंवा फोनवर मुलाखतीची वेळ जुळवून देत असे. अशा संभाषणातून मनमोकळ्या गप्पा व्हायच्या आणि प्रत्येक पत्रकाराला त्याची ‘वेगळी’ बातमी मिळायची. सुरुवातीला हाताने प्रेस नोट लिहून सायकलोस्टाइल प्रती काढून, सोबत फोटो जोडून विविध वर्तमानपत्रांच्या ऑफिसमधे स्वतः जाऊन द्यायचो किंवा पोस्टाने पाठवायचो. फोटोला यू पिन लावावेत, स्टेपलर मारू नयेत, नाहीतर स्टेपलरचे बारीक होल वर्तमानपत्रात छापलेल्या फोटोतही दिसतात हेही कळत गेलं (आज एका क्लिकवर महाराष्ट्रातील सर्व माध्यमांना फोटो आणि बातमी पाठवता येते हा काळाचा महिमा आहे).
मग मी महाराष्ट्राचा नकाशा विकत घेऊन आलो. त्यातील सातारा, सांगली कोल्हापूर, सोलापूर अशी जिथे मराठी सिनेमा पाहिला जातो ती शहरे निवडली. मुंबईहून रात्री ९.३०ची एसटी पकडून सकाळी तिथं पोहचायचं. एसटी स्टँडवरच फ्रेश होऊन, स्थानिक वर्तमानपत्रांची कार्यालयं उघडण्याची वाट पाहायची. तिथे संबंधित पत्रकारांना भेटून ओळख करून घेण्याचं काम संध्याकाळपर्यंत चालायचं. मीटिंग संपल्यावर पुन्हा एसटी पकडून पुणे मार्गे मुंबई गाठायचा, असा प्रसिद्धीच्या राज्यव्यापी विस्ताराचा उपक्रम सुरू केला. हे करताना खूप धावपळ व्हायची. त्रास व्हायचा. पण आपलं काम जास्तीत जास्त चांगलं कसं होईल याचा ध्यास घेतला होता आणि त्यासाठी लागतील तेवढे कष्ट करण्याची माझी तयारी होती. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, खानदेशातील नाशिक, धुळे, जळगाव हा भाग आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड, बीड तसेच विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर या सर्व ठिकाणी मी फिरू लागलो. या भटकंतीमुळे मुंबई-पुण्याबाहेरील सिने पत्रकार, थिएटरमालक, वितरक यांच्यासोबत संवाद झाला. या व्यवसायातील खाचाखोचा कळत गेल्या. पुढे कामाचा व्याप वाढल्यावर सगळीकडे स्वतः पोहचणं कठीण होत गेलं. मग प्रत्येक शहरात एक प्रतिनिधी नेमू लागलो.
चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी मी कलाकारांना घेऊन विविध शहरांत प्रमोशनसाठी नेऊ लागलो. काहीजणांनी या कल्पनेचे स्वागत केलं, तर काहींना ही नसती उठाठेव वाटली. पण निमशहरी आणि ग्रामीण भागातील बॉक्स ऑफिस बुकिंग वाढलं, तेव्हा माझे प्रमोशनचे प्रयोग सफल होत आहेत, हे सगळ्यांच्या लक्षात आलं. एक तरुण मुलगा नवनवीन शक्कल लढवून सिनेमाची जास्त प्रसिद्धी करतोय आणि तेही अधिकचे पैसे न मागता, यामुळे निर्मातेही मला सपोर्ट करू लागले.
तब्बल पन्नास वर्षांनी मराठी सिनेमाला ‘श्वास’ सिनेमामुळे नॅशनल अवॉर्ड मिळणं, हा सिनेमा पाहायला लोकांनी थिएटरमध्ये गर्दी करणं हे अद्भुत होतं. मरगळ आलेली अवघी मराठी सिनेसृष्टी खडबडून जागी झाली. जिथं वर्षाला वीस-पंचवीस चित्रपट प्रदर्शित होत तिथं शंभर-सव्वाशे चित्रपट प्रदर्शित व्हायला लागले. ही वाढ फक्त संख्यात्मक नसून विषयांच्या बाबतीत आणि गुणात्मक देखील होती. २००५-०६ वर्ष माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरली. चित्रपट लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी मी घेत असलेले वâष्ट पाहून सचिन पिळगावकर यांनी ‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमाच्या प्रसिद्धीचे काम मला दिलं. महेश कोठारेंनी देखील ‘खबरदार’ सिनेमाची जबाबदारी दिली. निशिकांत कामतचा ‘डोंबिवली फास्ट’, केदार शिंदेचा ‘जत्रा’… माझी गाडी सुसाट वेगाने पुढे निघाली. माझ्याकडे येणार्या प्रत्येक सिनेमागणिक मी काहीतरी नवीन करू पाहत होतो. बॉक्स ऑफिसच्या दृष्टीनं पश्चिम महाराष्ट्र हा मराठी सिनेमाचा गड होता, पण तिथं कोणी कलाकार पोहचत नव्हते. मी चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आणि प्रदर्शित झाल्यावर, पत्रकार परिषद, मुलाखती असे कार्यक्रम आयोजित करायला लागलो. इतकचं काय, मुंबईसोबतच, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड या शहरांत कलाकारांना सोबत घेऊन ‘प्रीमियर’ आयोजित केले. प्रीमियरला त्या शहरांतील नामवंत डॉक्टर, सीए, राजकीय, सामाजिक व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून प्रीमियरचे फोटो आणि बातमी दुसर्या दिवशी स्थानिक वर्तमानपत्रात छापून आणून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करायचो.
पब्लिक रिलेशन म्हणजे फक्त वर्तमानपत्रात बातम्या छापून आणणे असा एक समज रूढ होता. तो समज मी माझ्यापुरता तरी बदलायचा प्रयत्न केला. २००७-०८ या काळात जसा मराठी सिनेमा बदलत होता, तशीच माध्यमं देखील बदलत होती. पूर्वी वर्तमानपत्रात आठवड्यातून एकदा मनोरंजन पुरवणी यायची, त्यात हिंदी-मराठी सिनेमाविषयक बातम्या, सिनेमा परीक्षण, टेलिव्हिजन मालिका, मुलाखती, कार्यक्रमाचे फोटो, लेख असं सगळं असायचं. कालांतराने इंग्रजी माध्यमातील पेज थ्री कल्चर आपल्याकडेही आलं. रोज सिनेमाच्या बातम्या छापून यायला लागल्या, कधी कधी तर पहिल्या पानावर देखील यायला लागल्या. एफएम रेडिओ सुरू झाले. २४ तास बातम्या देणारे न्यूज चॅनल्स सुरू झाले, माध्यमांची गरज ओळखून मीही चित्रपट प्रमोशनच्या वेगळ्या वाटा चोखाळून पहिल्या.
अनेक मराठी कलाकार निमशहरी भागातून मुंबईत आले आहेत. त्यांच्या आयुष्यातील पहिली गाडी, पहिलं घर या गोष्टी खूप अप्रूप असणार्या होत्या. हा आनंद आम्ही त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवला. कलाकारांच्या घरच्या गणपतीचे फोटो वर्तमानपत्रात छापणे, न्यूज चॅनल प्रतिनिधींना त्यांच्या घरी नेणे यातून सिनेरसिकांना पडद्यावर दिसणार्या कलाकारांची कुटुंबवत्सल बाजूही दिसायला लागली. सिनेमातील कलाकार काय खातात, कोणता व्यायाम करतात याबाबत रसिकांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते, हे लक्षात घेऊन एका मासिकात फिटनेस लेखमालिका सुरू केली. एक मजेशीर आठवण सांगतो… मराठीतील एका मोठ्या हिरोला मी या लेखमालेबद्दल सांगितलं, तेव्हा ते म्हणाले, ‘मी आजवर कधीही जिमचं तोंड पाहिलं नाही, मी हे करणार नाही.’ सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी हे महत्त्वाचे आहे, असं समजावून त्यांना तयार केलं. दुपारच्या गर्दी नसलेल्या वेळी एका जिममध्ये फोटो काढून घेतले. कलाकारांंच्या खाण्याच्या, फिरण्याच्या आवडी-निवडी, डायटिंग अशा लोकांना पाहायला आणि वाचायला आवडतील अशा अनेक गोष्टी विविध माध्यमांतून लोकांपर्यत पोहचवल्या.
या बदलांना आता कुठे सरावलो आहोत, असं वाटत असताना मोबाईलने मनोरंजनाची सगळी गणित उल्टीपालटी करून टाकली. संपूर्ण जगातील मनोरंजन विश्व प्रेक्षकांच्या खिशात सामावलं गेल्यामुळे, त्यांना एका ठिकाणी खिळवून ठेवणं कठीण झालं. मनोरंजन क्षेत्राची माहिती देखील अधिक मनोरंजक पद्धतीने दाखवावी लागायला लागली. ज्या माध्यमांनी हे बदल स्वीकारले नाहीत ती काळाच्या पडद्याआड गेली.
माझी पब्लिक रिलेशन्सची गाडी भरधाव वेगाने पुढे जात असताना, वाढत असताना वैयक्तिक आयुष्यात मला काही धक्के बसले. मार्च २००६मध्ये वडिलांचे आकस्मिक निधन झालं आणि घराची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर पडली. डिसेंबर २००६मध्येच माझं दीपालीसोबत लग्न झालं. घरची घडी बसवून मी पुन्हा कामाला लागलो. २००६ ते २०१५पर्यंत माझ्याकडे खूप चित्रपट आले. जवळ जवळ प्रत्येक शुक्रवारी माझा सिनेमा प्रदर्शित होत असे. त्या काळात मी सोबत काम केलेल्या अनेक तरुण निर्माते-दिग्दर्शकांनी नंतरच्या काळात सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. केदार शिंदे, आदित्य सरपोतदार, सतीश राजवाडे, गजेंद्र अहिरे ही मंडळी वेगळ्या धाटणीचे सिनेमे घेऊन आली होती.
तुमची कामाची पद्धत कशी आहे, या प्रश्नांवर गणेश म्हणाले, ‘एका वाक्यात सांगायचं तर सिनेमा लोकांपर्यत पोहोचणे हे आमचं काम आहे. एखाद्या गोष्टीची माहिती देणं आणि त्या गोष्टीकडे आकर्षित करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पब्लिसिटी, प्रमोशन तुम्हाला माहिती पुरवू शकते, पण आकर्षित करू शकत नाही. सिनेमागृहापर्यंत प्रेक्षकांना आणायचं असेल तर त्यात काहीतरी वेगळं दिसणं गरजेचं आहे. प्रेक्षक मनाने सिनेमात गुंतत नाहीत, तोपर्यंत सिनेमा पाहायला येणार नाहीत. नुसती बातमी वाचून किंवा पाहून त्यांची उत्सुकता चाळवणार नाही. तुम्हाला त्यापलीकडे जाऊन काहीतरी करायला हवं. सर्व माध्यमांचा वापर करून लोकांमध्ये सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण करणं आणि जास्तीत जास्त प्रेक्षक सिनेमा पाहायला कसे येतील हे पाहणं आमचं काम आहे. आमच्याकडे दोन प्रकारांनी काम येतं. सिनेमाचा नारळ फुटल्यापासून ते सिनेमा प्रदर्शित्ा होऊन, त्या सिनेमाने इतका गल्ला जमवला असं सांगणारं काम (नामवंत दिग्दर्शक निर्माते चित्रपट मुहूर्तापासून चर्चेत ठेवण्यासाठी ही पद्धत अवलंबतात). किंवा सिनेमा बनून पूर्ण झाला आहे आणि अमुक एका तारखेला तो प्रदर्शित करायचा आहे, तुम्ही त्याची पब्लिसिटी करा असं सांगणारा निर्माताही आमच्याकडे येतो. अशा वेळी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यत चित्रपट कसा पोहोचवता येईल, त्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरता येईल, हे निर्माता, दिग्दर्शक यांच्याशी चर्चा करून ठरवलं जातं. काही पहिलटकर निर्मात्यांच्या सिनेमाच्या विषयाला न साजेशा किंवा बजेटबाहेरील कल्पना असताता सिनेमा प्रसिद्धीच्या. अशा वेळी मी त्यांना एक उदाहरण देतो, ‘आजारी पडल्यावर आपण डॉक्टरकडे जातो, ते रोगाचे निदान करून आपल्याला औषधाची गोळी देतात. तेव्हा आपण म्हणालो, मला हा रंग आवडत नाहीत, तुम्ही मला लाल रंगाची गोळी द्या, तर डॉक्टर म्हणतील, तुम्ही तुमच्या मनाने कोणत्याही गोळ्या खाल्ल्या आणि जिवाचं काही बरं वाईट झालं, तर जबाबदारी तुमची आहे.’ ही मात्रा बहुतांश निर्मात्यांना लागू पडते आणि ते त्यांचा हट्ट सोडतात. हे सांगण्याचा हेतू मीच सर्वज्ञ आहे हा नसून जनसंपर्क क्षेत्रातील माझ्या पंचवीस वर्षाच्या अनुभवाचा फायदा नवीन निर्मात्यांना व्हावा इतकाच असतो.’
सोशल मीडिया, शेकडो टीव्ही चॅनल्स यामुळे घरबसल्या मोफत मनोरंजन उपलब्ध आहे, तसेच हातातील मोबाईलवर ओटीटी माध्यमातून जगभरातील मालिका, चित्रपट दिसतात. अशावेळी मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणणे कठीण आहे. हे करण्यासाठी तुम्ही काय करता? यावर गणेश म्हणाले, सुरुवातीला आम्ही सिनेमाची प्रसिद्धी कशी करणार आहोत याचा निर्मात्याच्या बजेटनुसार रोड मॅप ठरवतो. वर्तमानपत्र, न्यूज चॅनल, टेलिव्हिजन, यूट्युब चॅनल, सोशल मीडिया, होर्डिंग्ज, सिनेमागृहातील स्टॅन्डी, अशी प्रसिद्धीची अनेक माध्यमे आहेत. चित्रपटाच्या एकूण निर्मिती बजेटच्या किमान पन्नास टक्के बजेट प्रसिद्धी आणि वितरण यासाठी ठेवायला हवं. पण अनेकदा सिनेमा बनवतानाच निर्मात्याकडील बरेचसे पैसे संपून जातात. त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगली प्रसिद्धी कशी करता येईल, हे पाहावं लागतं. प्रसिद्धी करताना काय दाखवायचं आणि काय दाखवायचं नाही याचं धोरणही फार महत्त्वाचं असतं. ट्रेलर फसल्याने चांगला सिनेमा फ्लॉप झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही मोजकी दृश्ये आणि गाण्यातील आकर्षक भाग घेऊन ट्रेलर बनवणार्या मंडळींसोबत चर्चा करून सिनेमाचे प्लस पॉइंट ओळखून त्यातील काय दाखवायचं हे ठरवावं लागतं. संगीत चागलं असेल तर प्रसिद्धीचा झोत गाण्यांवर ठेवावा लागतो. अॅक्शन जबरदस्त असेल तर पोस्टरमध्ये त्याचा समावेश केला जातो. सिनेमाचा लुक, नावाचा फॉन्ट या बारीक-सारीक गोष्टींचा देखील खूप विचार केला जातो. ऐतिहासिक, सामाजिक, अॅक्शन अशा चित्रपटाच्या प्रकारांनुसार प्रसिद्धी संकल्पना बदलावी लागते, ‘शेर शिवराज’ सिनेमातील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील चिन्मय मांडलेकर आणि अफजलखनाच्या भूमिकेतील मुकेश ऋषी यांची भेट आम्ही त्या काळातील दृश्यनिर्मिती करून माध्यमांसमोर घडवून आणली होती. ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’ अशा ऐतिहासिक सिनेमांची प्रसिद्धी करताना गोष्ट जिथे घडली तिथे जाऊन प्रमोशन केल्याने चांगला प्रभाव पडतो. ‘उलाढाल’ सिनेमाचं नाव ऐकून हा सिनेमा आर्थिक गोष्टीवर आधारित आहे, असं वाटतं; पण हा सिनेमा चोरीला गेलेल्या एका ढालीवर आधारित आहे. त्याचं प्रमोशन करताना होर्डिंगवर, थिएटरमध्ये मोठ्या ढाली ठेवल्या होत्या. ‘दुनियादारी’ चित्रपटातील सर्व गाणी हिट झाली होती. सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही वेगवेगळ्या शहरात जाऊन या गाण्यांचा कार्यक्रम करायचो, गायकांनी गाणी गायली की त्यांच्या मागून अनपेक्षितपणे या सिनेमातील सर्व कलाकार स्टेजवर येऊन ‘जिंदगी जिंदगी’ गाणं म्हणायचे. या मल्टिस्टारर सिनेमातील कलाकारांना पाहून प्रेक्षक रोमांचित व्हायचे. अशा आठवणी प्रेक्षकांच्या मनात घर करतात. आणि याचा फायदा सिनेमा हिट व्हायला होतो.
हल्ली दर मिनिटाला नवीन माहिती आपल्यावर आदळत असते. त्यामुळे एकदा पाहिलेली किंवा ऐकलेली गोष्ट लगेच लक्षात राहात नाही. म्हणूनच विविध माध्यमांचा वापर करून सिनेमाचा ‘बझ’ क्रिएट करण्याकडे आमचा कल असतो. उदा. एका प्रेक्षकाला सकाळी वर्तमानपत्रात सिनेमाची बातमी दिसली, ऑफिसला जाताना एफएम रेडिओवर त्याच सिनेमातील कलाकारांची मुलाखत ऐकायला मिळाली, दुपारी फेसबुकवर टीझर, यूट्यूबवर ट्रेलर दिसला आणि रात्री घरी टीव्हीवर एका कार्यक्रमात सिनेमातील कलाकार दिसले, तर त्या प्रेक्षकांच्या मनात सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण होऊन तो सिनेमा पाहायला सिनेमागृहात येईल. सिनेमाच्या प्रसिद्धीत पोझिशनिंगला खूप महत्त्व आहे. योग्य ठिकाणी योग्य प्रकारे प्रमोट करणं गरजेचं आहे. सिनेमा ग्रामीण धाटणीचा असेल तर शहरांतच होर्डिंग लावून काहीच उपयोग नाही. किंवा सिनेमाचा ट्रेलर, गाणी खूप उत्तम जमली आहेत, पण ती टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहचलीच नाहीत तर उपयोग नाही. वेगवेगळ्या जत्रा, संमेलने यात मराठी माणूस जास्त संख्येने सहभागी होतो. तोच संभाव्य प्रेक्षक असेल तर तिथे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न करायला हवेत.
हे सर्व करायला बजेट हवं हे मला मान्य आहे. पण कल्पकता वापरून काही वेळा अगदी कमी खर्चात किंवा अगदी फुकटात सुद्धा प्रसिद्धी मिळू शकते. एक किस्सा सांगतो, ‘हुप्पा हुय्या’ सिनेमात एका साधारण गावरान मुलाला बजरंगबलीची दैवी शक्ती मिळते. हा सुपर पॉवर जॉनरचा सिनेमा होता. प्रमोशनसाठी आम्ही राज्यातील जागृत देवस्थानं समजल्या जाणार्या ‘अकरा मारुती’ देवळांत सिध्दार्थ जाधवला घेऊन गेलो होतो. प्रमोशन करून आम्ही दोघे पुण्याहून मुंबईला निघालो. रस्त्यात शरीरसौष्ठव स्पर्धेचे मोठे होर्डिंग्स लागले होते. एका ठिकाणी मोठा जमाव दिसला. सिद्धार्थ गाडी थांबवून म्हणाला, गणेश हा आपल्या सिनेमाचा प्रेक्षक आहे, इथे प्रमोशन करायला मिळायला हवं. मी म्हणालो, तू इथेच थांब मी काहीतरी जुगाड करतो. आयोजकांना भेटून सिनेमा प्रमोशनबद्दल बोललो तर त्यांनी त्याला सपशेल नकार दिला. मग मी म्हणालो, सिद्धार्थ जाधव तुम्हाला प्रमुख पाहुणा म्हणून चालेल का? ते म्हणाले, तो इतका मोठा स्टार आहे, तो इथे कशाला येईल. मी म्हणालो तुम्ही माईकवरून घोषणा करा, तो स्वतः चालत येईल. गाडीच्या डिकीत सिनेमा प्रमोशनची गदा ठेवली होती. घोषणा होताच सिध्दार्थ गदा खांद्यावर घेऊन प्रेक्षकांमधून स्टेजवर आला. मी बॅकग्राऊंडला ‘जय बजरंगा भीमरूपी महारूद्रा‘ हे त्या सिनेमाचे गाणं लावलं होतं. लोक या अनपेक्षित घटनेने अगदी चकित झाले होते. लाखो रुपये खर्च करून देखील पडला नसता तितका प्रभाव सिध्दार्थने अचानक घेतलेल्या एन्ट्रीने पडला. पुढे त्या विभागात ‘हुप्पा हुय्या’ला चांगलं बुकिंग मिळालं हे सांगायला नको.
२५ वर्षापूर्वीच्या तुलनेत माहिती पाठवण्याचे कष्ट संपले असले तरी मोबाईलवर २४ तास मनोरंजन उपलब्ध असल्याच्या काळात सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करून त्यांना सिनेमागृहापर्यंत आणण्याचे चॅलेंज वेगळे आहे. यासाठी काही नवीन क्लृप्त्या लढवाव्या लागतात. सुट्टीच्या काळात लोक सहकुटुंब बाहेर फिरायला निघतात. या काळात रस्त्यावर, एसटी स्टँडवर आणि रेल्वे स्टेशनवर सिनेमाची प्रसिद्धी करणं फायद्याचं ठरतं. सिनेमाचा विषय कौटुंबिक असेल तर पोस्टरवर, ट्रेलरमध्ये हिरो हिरोईनमधील शारीरिक जवळीकीचे प्रसंग दाखवू नयेत. अशी प्रसिद्धी सिनेमासाठी घातक ठरू शकते. एखादी वस्तू फक्त फॅक्टरीत बनवून चालत नाही, तर ती वेगवेगळ्या दुकानांत आकर्षक पद्धतीने विक्रीसाठी मांडावी लागते, तरच लोक ती विकत घेतात. याचप्रमाणे सिनेमा किती चांगला बनला आहे, हे जोवर प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत लोक तो पाहायला थिएटरमध्ये येणार नाहीत.
मल्टिप्लेक्स मालक त्यांच्या स्क्रीन शेअरिंगवर देतात, पहिल्या २-३ दिवसांत प्रेक्षक आले नाहीत, तर ते दुसर्या दिवशी शो कमी करतात. त्यामुळे पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी सिनेमा पाहायला गर्दी करावी अशी अपेक्षा असते. आजच्या काळात सिनेमा बनवताना चांगलं निर्मितीमूल्य, उत्तम प्रसिद्धी आणि योग्य वितरण या त्रिसूत्रीचा वापर करायला हवा, तरच तो सिनेमा निर्मात्याला पैसे मिळवून देऊ शकतो.’
गणेश यांच्याकडे काम करून/ शिकून गेलेल्या माणसांनी स्वतःची कंपनी काढली, तसेच अनेक तरुण मुले या क्षेत्रात येत आहेत, तुम्ही स्पर्धा म्हणून याकडे कसं पाहता, हे विचारल्यावर ते म्हणाले, ‘नोकरी करणार्याला स्वतःचा व्यवसाय करावंसं वाटणं स्वाभाविक आहे. माझ्याकडे काम करणार्या अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला. आज ती मंडळी जाहीरपणे माझ्याकडून हे हे शिकलो असे सांगून आभार मानतात. या गोष्टीला सेटबॅक म्हणून पाहिलं तर त्रास होतो. त्यापेक्षा ही मोठी इंडस्ट्री आहे, स्पर्धा वाढली तर तुमची गुणवत्ता देखील सुधारते, असा सकारात्मक विचार केला तर आपली प्रगती होते. पण यासाठी तुम्हाला या कामाची इत्थंभूत माहिती ठेवणं गरजेचं आहे. माझ्याकडे काम करणारी प्रियांका भोर, प्रिया सावंत, अलोक दमणकर ही तरुण पिढी वेगाने बदलणार्या तंत्रज्ञानाचा वापर लीलया करते. त्यातील कुणी एखादी गोष्ट सुचवली तर मलाच सगळं कळतंय असा पावित्रा न घेता नवीन गोष्टी शिकायला, मी नेहमीच उत्सुक असतो.’
भारतात दरवर्षी वीस भाषांमध्ये दोन हजार चित्रपट बनतात. वीस हजार कोटी रुपयांची उलाढाल दरवर्षी या व्यवसायात होते. मराठीत वर्षाला साधारण शंभर-सव्वाशे चित्रपट प्रदर्शित होतात. अनेक प्रोडक्शन हाऊसेसना हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांची प्रसिद्धी करण्यासाठी मराठी, हिंदी मराठी भाषा येणारे पीआरओ हवे असतात. गणेश गारगोटे यांच्यासारखी मेहनत घेण्याची तयारी आणि कल्पकता असेल तर कला क्षेत्राची आवड असणार्या मराठी मुलांना या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत.