दिवसभर प्रवास, शाळा, अभ्यास व नेट प्रॅक्टिस याने मी थकून जायचो. शिवाय शरीरानेही खूप बारीक होतो. रात्री आईवडील प्रेमाने माझे पाय चेपायचे. त्यांच्या त्या उबदार प्रेमाच्या स्पर्शाने सगळा ताण निघून जायचा. पुढे मी शिवाजी पार्कला काकांकडे राहायला गेलो. तेव्हा काका-काकू दोघेही असेच प्रेमाने माझे पाय चेपायचे. पायांना तेल चोळायचे.. सांगतोय क्रीडा रसिकांचा लाडका मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर…
भारताने पहिला विश्वचषक करंडक २५ जून १९८३ रोजी जिंकला. हे दूरदर्शनवर मी त्यावेळी पाहत होतो. मी त्यावेळी बांद्रा पूर्व भागातील ‘साहित्य सहवास’ या कॉलनीत राहत होतो. वेळ संध्याकाळची होती. आम्ही सारे कॉलनीतील लोक मॅच बघायला जमलो होतो. माझ्या एका मित्राच्या घरी बरीच गर्दी होती. लहान-मोठे पुरुष-बायका, साहित्यिक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, लेखक, कवी सारेजण. आणि मोहिंदरने ती होल्डिंगची अखेरची विकेट घेतली नि… एकच जल्लोष झाला! …भारताने विश्वचषक जिंकला! हा क्षण माझ्यासाठी अत्यंत स्फूर्तिदायक होता!
लहानपणापासून मला मैदानी खेळांची आवड. शाळेनंतर मी सतत मैदानातच असायचो. आमच्या ‘साहित्य सहवास’ सोसायटीत मध्यभागी एक मोठं मैदान आहे. तिथे आम्ही मित्र खेळायचो. माझ्या अंगात तर एवढी एनर्जी, उत्साह संचारायचा की रात्री आठ-नऊनंतर मित्र आपापल्या घरी गेले तरी काळोखातही मी एकटाच कॉलनीभर धाव धाव धावत भराभरा चकरा मारतच असायचो. मात्र या क्षणानंतर माझा मोठा भाऊ अजितदादा मला शिवाजी पार्कमध्ये क्रिकेटच्या नेट्समध्ये घेऊन गेला व मला त्याने आचरेकर सरांकडे सोपवलं. इथून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. माझ्यातील बाउंडलेस एनर्जीला एक योग्य दिशा मिळाली नि माझी क्रिकेटची कारकीर्द सुरू झाली.
मी बांद्रा पूर्व येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत सहावीत शिकत होतो. एके दिवशी आचरेकर सर तडक घरी आले नि वडिलांना म्हणाले, ‘याची शाळा बदला नि दादरच्या ‘शारदाश्रम’मध्ये याला घाला. मी तिथे क्रिकेटचं कोचिंग करतो. मी तुम्हाला गॅरंटी देतो हा मुलगा पुढे क्रिकेटमध्ये नाव कमावेल.’ वडिलांनी मग अर्ध्यावरच माझी शाळा बदलली नि मी मग दादरच्या कबुरतखान्याजवळील ‘शारदाश्रम’ शाळेत जाऊ लागलो.
हे साल होतं १९८४. माझा दिनक्रम खूप व्यस्त होता. मी सकाळी सहा-सातलाच वडिलांबरोबर बसने शिवाजी पार्कला निघायचो. क्रिकेट खेळायचं म्हणजे बॅट्स, पॅड्स, बॉल्स, ग्लोव्हज्, हेल्मेट हे सारं आलंच. ह्या एका लांबलचक भल्यामोठ्या ‘किट’ची बॅग शाळेच्या वह्या-पुस्तकांच्या जड बॅगेबरोबर माझ्या खांद्यावर आली. बसच्या गर्दीत हे खूप अडचणीचं होतं. पण त्या वेळी आमच्याकडे गाडी नव्हती. घरापासून ट्रेनही लांब होती. त्यामुळे बसशिवाय पर्याय नव्हता. पण ही दगदग असली तरी एकदा का मी त्या शिवाजी पार्कच्या हिरव्यागार मैदानात शिरलो नि हातात बॅट घेऊन ती २२ यार्डांची तांबूसराखाडी माती ठोकली की माझ्यातील रसायन संपूर्ण बदलूनच जायचं!
शिवाजी पार्कच्या मैदानात असलेल्या ‘श्रीगणेश मंदिरात’, जे माझं श्रद्धास्थान आहे, कधी कधी वडिलांबरोबर प्रॅक्टिस किंवा मॅचच्या आधी जायचो तेव्हा वाटायचं की हे ‘क्रिकेट’ हीच माझी देवाची पूजा आहे. इतकं माझं मन त्यात विरघळून गेलं होतं!
माझा त्यावेळी दिनक्रम असा होता… सकाळी बांद्र्याहून निघालो की आम्ही शिवाजी पार्कच्या काकांच्या घरी यायचो. तिथे मी माझं क्रिकेटचं ‘किट’ ठेवायचो. तिथून पायी चालत मी शाळेला जायचो. शिवाजी पार्कच्या ‘सेनाभवन’च्या बाजूच्या रस्त्याला असलेल्या ‘इंद्रवदन सोसायटी’त माझे काका राहायचे. आबाकाका-काकू, बाबूकाका व आजी. दुपारी घरी आलो की काकू गरम गरम जेवण वाढायची. मग थोडी विश्रांती किंवा शाळेचा होमवर्क झाला की दुपारी तीन-चारला नेट्ससाठी ‘किट’ घेऊन शिवाजी पार्कला जायचो. पावसात सर आम्हाला टेनिस चेंडूवर प्रॅक्टिस करायला सांगायचे. संध्याकाळी आई, ती पार्ल्याला एलआयसीत कामाला होती, मला न्यायला यायची. मग आम्ही दोघं बांद्र्याला घरी निघायचो. घरी भावंडांबरोबर गप्पा, जेवण नि झोप की पुन्हा तोच दिनक्रम!
दिवसभर प्रवास, शाळा, अभ्यास व नेट प्रॅक्टिस याने मी थकून जायचो. मी त्यावेळी अकरा वर्षांचा होतो. शिवाय शरीरानेही खूप बारीक होतो. रात्री आईवडील प्रेमाने माझे पाय चेपायचे. त्यांच्या त्या उबदार प्रेमाच्या स्पर्शाने सगळा ताण निघून जायचा. पुढे मी शिवाजी पार्कला काकांकडे राहायला गेलो. तेव्हा काका-काकू दोघेही असेच प्रेमाने माझे पाय चेपायचे. पायांना तेल चोळायचे.
वडिलांनी त्यावेळी विचार केला. ते कीर्ती कॉलेजात प्रोफेसर होते. ह्या लहान कोवळ्या मुलाच्या पाठीवर करिअरचं, स्वप्नांचं हे केवढं मोठं दफ्तर!… छे! हे काही योग्य नाही!
वडील मग काकांशी बोलले नि १९८५ पासून मी पुढे तीन-चार वर्षं शिवाजी पार्कला काकांच्याच घरी राहायला लागलो.
काका ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’मध्ये कामाला होते. काकू गृहिणी. त्यांना मूल नव्हतं पण आम्ही सर्व भावंडं त्यांना मुलांसारखीच! आम्हा सर्व भावंडांवर त्यांचं मुलांसारखंच प्रेम! त्यामुळे आपण घर सोडून दुसरीकडे कुठे राहतोय ही भावना मला कधी शिवलीच नाही. ही एकत्र कुटुंबपद्धती, त्यावेळी मला कळत नव्हतं, पण आता जाणवतं… ते माझ्यासाठी एक वरदान होतं… माझं भाग्यच ते!
१९८५ वर्ष चालू झालं. माझं क्रिकेटही जोरात चालू झालेलं होतं. जवळ जवळ रोजच मॅचेस असायच्या. आचरेकर सरांचं एक वैशिष्ट्य हे होतं की ते इतर अनेक कोचेससारखे फक्त नेट प्रॅक्टिस करवून घेत नसत तर ते प्रत्यक्ष दोन-चार टीम्समध्ये मॅचेस भरवीत व आम्हाला मॅचेस खेळायला लावीत. त्यामुळे प्रत्यक्ष ‘मॅच’चं टेंपरामेंट तयार व्हायला मदत व्हायची.
माझ्यावर तर सरांचा विशेष डोळा होता! माझ्याकडून ते रगडून प्रॅक्टिस करून घेत. एका मैदानावरची माझी बॅटिंग झाली की ते आपल्या स्कूटरवर मला बसवून दुसर्या मैदानावरील मॅचला न्यायचे व तिथे बॅटिंग करायला लावायचे. तिथून मग तिसर्या… कधी कधी तर मी एकाच दिवसात तीन-तीन चार-चार मॅचेस खेळलो आहे. मला वेळच नसायचा.
मी त्यावेळी सकाळी सातलाच जेवायचो! आबाकाका सकाळी कामावर निघायचे. त्यांचाही डबा बनवायचा असे. त्यामुळे काकू भल्या पहाटेच उठे नि पोळ्या करीत असे. पोळीभाजी हाच माझा ब्रेकफास्ट असे. काकू सुगरण होती. ती जेवण छानच करायची. गरम गरम चपात्यांबरोबर गरम गरम भाज्या. भेंडी, तोंडली, वांगी, पातळ अळू तर कधी काजूची उसळ, उकडीचे मोदक नि सणावारी पुरणपोळी… माझं एक होतं सर्वच भाज्या मला खूप आवडायच्या. इतकंच नाही तर त्या कशा करतात ते बघायलाही मला आवडायचं. त्यामुळे कधी कधी पोळ्या कशा लाटायच्या किंवा भाजी कशी करायची हे मी तेव्हा काकूकडून शिकायचो. मात्र दिवसभर मी क्रिकेटमध्ये खूप व्यस्त असे. इतका की घरी जेवायला यायलाही मला वेळ नसायचा. मग अशा वेळी काकूच डबा घेऊन चक्क मैदानावर यायची! मला शिवाजी पार्कचा वडापाव, भजी असं खूप आवडायचं पण खेळासाठी तंदुरुस्त राहायचं असेल तर सकस अन्न किती महत्त्वाचं असतं ते त्या वेळी मला जाणवत नव्हतं. पण काकूनं किती कष्ट घेतले होते माझ्यासाठी!
तीच गोष्ट कपड्यांची. मैदानात नुसतेच कपडे नाहीतर पॅड्स, बॅट्स, ग्लोव्हज, बॉल्स, हेल्मेट्स हे सारं लालकाळ्या मातीने बरबटून जायचं. काकू बाथरूममध्ये हे सारे धुवायची तेव्हा मातीच्या लालकाळ्या ओघळाने बाथरूम भरून जायचं. मग ते सुकण्यासाठी सगळं घरभर पसरून ठेवायचं. आमच्या दोनच खोल्या. किचन व बाहेरची खोली. त्यात मी हा सगळा पसारा करून ठेवायचो. पण काका-काकूंनी कधी तक्रार केली नाही. सुकलेल्या शर्टांना, विशेषतः शाळेत घालायच्या शर्टांना, काकू इस्त्री करायची. आबाकाकांना कसलाही त्रास झालेला मला आवडत नसे. त्यामुळे मी काकांना अजिबात कशाला हात लावू देत नसे. पण मी झोपलो की काकूला मदत म्हणून काका हळूच माझ्या शर्टांना इस्त्री करून ठेवीत.
संध्याकाळी घरी येताना पुढे पुढे मी माझ्या मित्रांनाही घेऊन येत असे. अतुल रानडे, विनोद कांबळी, राहुल गणपुळे, रिकी कुट्टी, मयूर कद्रेकर… या सर्वांची खातीरदारी काकू व त्यावेळी नुकतेच कामावरून परतलेले काका मोठ्या कौतुकाने करायचे. विनोद कांबळी तर शाळेच्या ‘हॅरिसशिल्ड’च्या फायनलला चार दिवस इथेच येऊन राहिला होता.
पुष्कळदा आचरेकर सरही घरी यायचे. त्यांच्याकडे एक कागद असायचा. त्यावर त्या दिवशी खेळताना मी केलेल्या फक्त चुकीचाच हिशोब असायचा! मी जरी शतक ठोकलेलं असलं तरी आऊट का व कसा झालास, अशी चूक केलीस तरी कशी म्हणून ते माझी चांगलीच खरडपट्टी काढायचे!
क्रिकेटमध्ये अंधश्रद्धा भरपूर असते. आमचं शिवाजी पार्कचं घर आमच्या सर्व मित्रांना खूप लकी वाटायला लागलं. मला यश मिळू लागलं आणि त्यामुळे माझ्याबरोबरीचे व माझ्यानंतर क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नवे खेळाडूही वेळ काढून आमच्या काका-काकूंच्या घरी यायला लागले. आश्चर्य म्हणजे त्या सर्वांना यश लाभलं.
माझे आबाकाका स्वभावाने खूप शांत. त्यांना चिडलेलं, रागावलेलं मी कधी पाहिलं नाही. थोडीशी मस्करी, गंमत करायला त्यांना आवडायचं. ते हिंदी चित्रपटसृष्टीचे चाहते होते. गायक महम्मद रफी तर त्यांचे देवच होते. त्यांच्या देव्हार्यात दोनच फोटो होते. एक स्वामी विवेकानंद व दुसरा महम्मद रफी! स्वामी विवेकानंदांसारखी ध्यानधारणा व प्राणायाम ते पहाटे करायचे. त्यांचा आवाजही सुरेल होता. सुटीच्या दिवसात दुपारी चार वाजता ते आपल्या गाण्यांची पोतडी उघडून कोचावर बसायचे नि एकामागोमाग एक सुंदर गाणी म्हणायचे. कधी कधी आजूबाजूचे शेजारी ते गाताना बाजूला जमायचे. पुढे कॅसेट्स व ‘टू इन वन’चा जमाना आल्यावर त्यांनी ‘टू इन वन’ विकत घेतला व त्यावर दिवसभर ते गाणी ऐकत बसत. मलाही लहानपणापासून संगीताचं खूप वेड होतं. मित्रांबरोबर मी इंग्लिश गाणी ऐकायचो. त्यामुळे मी पॉप म्युझिकचा फॅन झालो होतो. संध्याकाळी करमणूक म्हणून मला संगीत ऐकायचं असायचं. त्यामुळे ‘आपली आवड’ बाजूला सारून ‘टून इन वन’ची मालकी काका माझ्याकडे सोपवत!
आज मी जो कोणी आहे त्यात माझ्या प्रेमळ काका-काकूंचा खूप मोठा वाटा आहे. क्रिकेटच्या मॅचेस खेळून संध्याकाळी मी घरी आलो की काकू जेवण तयार ठेवीत असे. अगदीच थकलो असेन, अर्धवट झोपेत असेन तर ती चक्क जेवण भरवीत असे.
एरवी रात्रीचा माझा अजून एक उद्योग असे. बाहेरच्या खोलीत छतावरच्या पंख्याला एक जाळीदार नेट लावून त्यात सीझनचा
बॉल लटकावून ठेवीत असे नि माझ्या बॅटने तो चेंडू यथेच्छ बडवीत, टोलवीत असे. पुलचे शॉट्स, कव्हर ड्राईव्हज, स्ट्रेट ड्राईव्हज, स्क्वेअर कट, चौके, छक्के मारण्याचा सराव बेधडक करीत असे… कल्पना करा… सीझनचा तो तोंडावर येणारा टणक चेंडू चुकवीत चुकवीत काका-काकू आपापली कामं शांतपणे करीत असत! थोडीथोडकी नव्हे… चार वर्षं! बर्याचदा प्रॅक्टिस म्हणून मी काकूला गोल्फ बॉल किंवा टेबलटेनिस बाॅल मला थ्रो डाऊन्स करायला लावायचो.
१९८५ साली मी इथे राहायला आलो. शिवाजी पार्कच्या काकांच्या घरी. १९८७ साली ‘रणजी ट्रॉफी’, १९८८ साली ‘इराणी ट्रॉफी’ व नंतर १९८९ साली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानात पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघात माझी निवड झाली. या सर्व वेळी क्रिकेटची ‘किट’ बॅग मी याच घरात अजितदादाच्या मदतीने भरलेली आहे. पाकिस्तानला निघण्यापूर्वीच्या आदल्या रात्री साहित्य सहवास सोसायटीतील लोक, तसेच माझ्या ओळखीचे आणि अनेक हितचिंतक यांनी इथे एकच गर्दी केली होती!
आज हे सारं आठवतं. आजही मी व अंजली नि अधूनमधून सारा व अर्जुन आम्ही सारे शिवाजी पार्कच्या या घरी येतो. माझे काका २०१४ साली निवर्तले. आजही त्यांच्या पलंगाशेजारी त्यांच्या आवडत्या स्वामी विवेकानंदांचा दोन्ही हातांची घडी घातलेला व महम्मद रफी यांचा हसरा फोटो तसाच आहे. आजही मी येणार म्हटल्यावर काकू माझ्या आवडीचं जेवण तयार करून ठेवते. क्रिकेटमुळे आता मी जगप्रवास केला आहे आणि जगातील विविध प्रकारचे असंख्य प्रकार खाल्लेले आहेत. तसा मी जातीचा खवय्या! अर्थात फिटनेससाठी मात्र मी खूप डाएटिंग करतो. खूप कमी खातो. पण का कुणास ठाऊक काकूच्या हातचं ते जेवण बघून मला सपाटून भूक लागते आणि मी यथेच्छ जेवतो… काजूची उसळ, वांग्याचं भरीत, अळूची पातळ भाजी, उकडीचे मोदक, गरमागरम पोळ्या, वरणभात, साजूक तूप… त्या जेवणाची चव काही न्यारीच!
(रोहन प्रकाशन प्रकाशित, अरुण शेवते संपादित ‘हे बंध आठवणींचे’ या पुस्तकातून साभार)