सोमीताई म्हणजे सोशल मीडिया ताई. सगळ्या जगाला व्यापून दशांगुळे वर उरलेल्या सोशल मीडियाच्या संदर्भात जे काही प्रश्न पडतील, ते आमच्या सोमीताईंना विचारा… त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात… ‘सोमी’तज्ज्ञ आहेत ना त्या!
– – –
गळेपडू काका!
प्रश्न : डार्लिंग सोमी, सोशल मीडियावर काही कुचकट मुले मुली मला उगाच काका काका म्हणतात. असा राग येतो ना.. काय करू मी?
उत्तर : डायरेक्ट डार्लिंग? हे असे गळ्यात पडत असाल म्हणून पोरी तुम्हाला काका काका करत असणार हे नक्की. आणि एखाद्या पोरीने कोणाला काका म्हणून हाक मारली की इतर स्त्री वर्ग आपोआप त वरून ताकभात ओळखून घेतो आणि मग तुमच्या पुतणे समुदायात देखील वाढ होते. मुळात सोशल मीडियावर काही लोक थेट शिव्या द्यायला किंवा अपशब्द वापरायला घाबरतात किंवा त्यांचे संस्कार आड येतात. अशावेळी मग ते काका किंवा काकू अशा शब्दांचा वापर करतात, अशी मला कित्येक वर्ष दाट शंका होती. आता तुमच्या प्रश्नानंतर तर, काका हा शब्द आदरार्थी कमी आणि शिव्यार्थी जास्त प्रमाणात वापरला जातो, असा मला ठाम विश्वास वाटायला लागला आहे.
– अल्लड सोमी
इतिहास पुस्तकांतून जाणून घ्या!
प्रश्न : ताई, खरा इतिहास कोणता? मी अभ्यासक्रमात शिकला तो का मी सोशल मीडियावर वाचतो तो?
उत्तर : इतिहास खरा आहे का खोटा आहे, यामध्ये सामान्य माणसाने पडू नये. त्याने इतिहास वाचावा, त्यातून प्रेरणा घ्यावी, गतकाळातील चुकांमधून धडा घ्यावा आणि उज्ज्वल भविष्यकाळ घडवावा. आजकाल आपल्या देशात प्रत्येकाकडे सांगण्यासाठी एक वेगळा इतिहास आहे, त्याचे पुरावे देखील त्याच्याकडे असतात आणि खरा इतिहास तोच उजेडात आणतो आहे असा त्याचा दावा देखील असतो. प्रत्येकाचा इतिहास एकमेकांना छेद देणारा असतो. तरी तुला इतिहास अभ्यासायचा असेल, तर एखाद्या विषयावर लिहिण्यात आलेली जमतील तितकी पुस्तके वाच. इतिहास अभ्यासताना मनात कोणताही पूर्वग्रह बाळगू नको. एखाद्या घटनेवर अनेकांनी वेगवेगळी मते मांडलेली असतात. ती सर्व मते वाच, त्यांच्या अभ्यास कर आणि मग स्वत:चे असे एक मत बनव. काळा रंग कोणाला अपशकुनी वाटतो, तर तोच काळा रंग कोणाला शुभ, वाईट नजरेपासून वाचवणारा वाटतो.
इतिहासात अनेक महापुरुष, करारी, अभ्यासू स्त्रिया होऊन गेल्या. त्यावेळी परिस्थितीनुसार त्यांनी काही निर्णय घेतले. काही निर्णय योग्य ठरले, काही निर्णय चुकले देखील. मात्र या निर्णयांमागे स्वार्थ कधी नव्हता हे कायम ध्यानात ठेव. त्या सर्वांचा उद्देश देशाला पुढे नेण्याचा, महान राष्ट्र बनवण्याचा होता. त्या काळात, त्या परिस्थितीत त्यांनी घेतलेला निर्णय बरोबर का चूक हे आजच्या वर्तमानातील मापदंड लावून ठरवायचे नसते. आजच्या काळातील ड्रोन आणि पाणबुडीची गणिते मांडून पानिपतच्या युद्धाचा अभ्यास करायचा नसतो आणि हिंदुस्थानला इस्राईल समजून काश्मीर प्रश्न हाताळण्यावर मत मांडायचे नसते हे जरी लक्षात ठेवलेस तरी खूप झाले.
– बखरसम्राज्ञी सोमीदेवी
भाकडबाबांचा नाद सोडा
प्रश्न : सोमी, सोशल मीडियाच्या माध्यमातून अंधश्रद्धा फोफावत चालली आहे असे तुला वाटत नाही का?
उत्तर : लाडक्या तायडे, मला खरंतर श्रद्धा कमी होत चालली आहे असे वाटायला लागले आहे. कारण ज्यांच्यावर श्रद्धा ठेवावी अशी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत. एकेकाळी माणसे सश्रद्ध होती, ज्यांच्यावर श्रद्धा ठेवली जायची ती माणसे देखील निर्मळ होती. ही माणसे लोकांना संस्कार द्यायची, चांगल्या चालीरीती शिकवायची, समाज प्रबोधन करायची आणि अनिष्ट प्रथांवर घाव घालायची. पण काळ बदलला आशिर्वादासाठी उचलले जाणारे हात हवेतून घड्याळे आणि अलंकार काढू लागले, समाज प्रबोधन करणारे समाजाला मत कोणाला द्या ते सांगू लागले, विविध देवळांत दिसणारे पाय राजकारण्यांच्या मंचावर दिसू लागले आणि समाजाचा एक मोठा हिस्सा देखील अशा वंदनीय पावलांवर पाऊल टाकू लागला.
एकदा एखाद्याला देव मानले की मग त्या देवाचे दोष दाखवता येत नाहीत; भक्तांना राग येतो. आजकाल तर भक्त थेट रस्ते अडवणे, दगडफेक करणे इथपर्यंत मजल मारू लागला आहे. देवाची भक्ती करा सांगणारे आता थेट स्वत:लाच देव घोषित करू लागल्यावर आणखी वेगळे तरी काय घडणार? युवा पिढी ज्यांना आदर्श मानते ते देखील अशा स्वयंघोषित देवांच्या चरणी लीन होतात हे खरे आश्चर्य आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, साई बाबा ते अगदी गाडगे महाराजांपर्यत अनेकांनी समाजाला एक दिशा दिली, प्रबोधन केले. त्यांचे कार्य आजदेखील वंदनीय मानले जाते. पण या कोणालाही मोठा मठ उभारायची, संमेलने भरवण्याची आणि कार्यशाळा घेण्याची कधी गरज पडली नाही हे कोणीच लक्षात घेत नाही.
आता तर मोबाइलच्या रूपाने हातात संपूर्ण विश्व एकटवले आहे आणि स्वयंघोषित ज्ञानी लोकांचे चांगले फावले आहे. तुमच्या मोबाइल नंबरमध्ये कोणता आकडा नसावा, तुमच्या नावात कोणते अक्षर कुठे असावे आणि घरातल्या आरशाची दिशा कोणती असावी हे देखील सांगणारे आज प्रसिद्ध झाले आहेत. घरातल्या कोणत्या कोपर्याखत पाणी ठेवावे, कोणत्या कोपर्याात गॅस असावा, बाहेर पडताना कोणते पाऊल आधी बाहेर टाकावे, देवघरात काय नसावे हे सांगणारे दिसले की मला प्रचंड हसायला येते. लहानपणी आमच्या घरातला आरसा माणसाच्या बरोबर हिंडायचा. कधी या खोलीत, कधी त्या खिडकीत तर कधी थेट शेजारच्या घरात. वन रूम किचनमध्ये दिवसाला दिवस जोडत जगणार्या ला माठ इथे पाहिजे, गॅस तिथे पाहिजे, कपाट इथे पाहिजे अशी सोय परवडणार आहे का? गंधाने आणि हळदी कुंकवाने नक्की कोणाचा फोटो आहे हे देखील न समजणार्या, धुसर झालेल्या तसबिरीला हात जोडून १२ तास खस्ता खाण्यासाठी झोपडीबाहेर पडणार्याला देवघरात गजांत लक्ष्मी, श्री यंत्र आणि ११ मुखी रुद्राक्ष असली चैन परवडणार आहे का? आणि अगदी पोटाला चिमटा काढून त्याने हे केले, तर त्याची झोपडी सोन्याच्या महालात बदलणार आहे का? जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच गुण तुमचे भविष्य उज्ज्वल करणार आहेत हे लक्षात ठेवा आणि या असल्या भाकडबाबांचा नाद सोडा.
– अवतारी दानव सोमी
व्यसन नव्हे, रोग!
प्रश्न : सोशल मीडिया हे देखील एक व्यसन बनत चालले आहे का?
उत्तर : चालले आहे का? अहो बनून जमाना झाला आहे. एकेकाळी खाली मान घालून चालणारी पिढी आदर्श मानली जात असे. आज खाली मान घालून जाणारी पिढी मोबाइलग्रस्त म्हणून ओळखली जायला लागली आहे. व्यसन कोणतेही वाईटच, पण सोशल मीडियाचे व्यसन शरीर आणि मन:स्वास्थ्य अशा दोन्ही साठी हानीकारक आहे. मोबाइल घटस्फोटाचे एक प्रमुख कारण ठरू लागला आहे असे मागे एका ज्येष्ठ वकिलाने सांगितले होते. सतत हातात मोबाइल धरून बसणारे आणि एकमेकांना वेळ न देणारे नवरा बायको हे त्याचे कारण. सहज आजूबाजूला बघितले तर विनाकारण खिशातून मोबाइल काढून बघणारे हमखास दिसतात. बराच वेळ झाला कोणाचा फोन नाही, मेसेज नाही, कोणतेही नोटीफिकेशन नाही असे काही झाले की ते उगाच अस्वस्थ होतात. चिडचिड करायला लागतात. आणि मग शेवटी ते स्वत: कोणाला तरी मेसेज करतात किंवा एखादी गोष्ट फॉर्वर्ड करतात आणि मग त्यांच्या मनाला काही काळासाठी शांती मिळते.
अर्थात, या व्यसनाचे दुष्परिणाम आता लोकांना जाणवू लागले आहेत. देशाला दिशा दाखवणारा म्हणून ज्या महाराष्ट्राकडे अभिमानाने पाहिले जाते, त्या महाराष्ट्रातील काही गावांने स्वत: डिजिटल डिटॉक्स होण्याचा अर्थात काही काळासाठी मोबाइलपासून दूर राहण्याचा संकल्प सोडला आहे. संध्याकाळी घंटा वाजली की ठरावीक कालावधीसाठी गावातील प्रत्येक माणूस स्वत:ला मोबाईलपासून दूर करतो. स्त्रिया घरकामाला लागतात, मुले अभ्यासाला बसतात आणि पुरुष मंडळी ओसरीची वाट धरतात. या उपायाचा प्रचंड फायदा झाल्याचे हे लोक स्वत: सांगतात. बायकांना घरकामात मदत मिळते आहे, मुलांची टक्केवारी वाढू लागली आहे, एकदा घरी आली की मोबाइलमध्ये गुंतणारी पुरुष मंडळी आता ओसरीवर जाऊ लागली आहेत, मित्रांच्या बैठकीचे अड्डे पुन्हा रंगु लागले आहेत आणि गावातली सद्भावना जोमाने वाढू लागली आहे. स्वत:ला ’यो’ समजणारे यातून काही धडा घेतील आणि व्यसनांकडे पाठ फिरवतील ही आशा.
– आशाग्रस्त सोमी
बायकोचे फेक अकाऊंट!
प्रश्न : सोमी, काही दिवसांपूर्वी मला एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. पुढे आमचे मेसेजेसमध्ये बोलणे देखील सुरू झाले. संवाद फारच रंगायला लागले. पण आजकाल मला शंका येते आहे की ते माझ्या बायकोचे फेक अकांउंट आहे. मोठ्या चिंतेत पडलो आहे. मैत्री तर सोडवत नाही आणि भीती शांत बसू देत नाही.
उत्तर : हे राम! मला माझ्या एका मित्राची आठवण झाली. त्याने ड्रायव्हिंग स्कूलमधला कोर्स पूर्ण केला आणि एक सेकंड हँड चारचाकी विकत घेतली. ज्या दिवशी गाडी घेतली त्याच दिवशी ज्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये कोर्स पूर्ण केला होता, त्याच स्कूलच्या गाडीला मागून ठोकले. त्याचा चेहरा बघून त्या ड्रायव्हिंग स्कूलवाल्याची जी अवस्था झाली असेल, तीच तू सध्या अनुभवत असणार.
आता एक काम कर, त्या मैत्रिणीशी बोलता बोलता स्वत:च्या बायकोबद्दल छानसे स्तुतीपर काहीतरी बोल. संध्याकाळी बायको आनंदाने गुणगुणत एखादा तुझ्या आवडीचा खमंग पदार्थ बनवताना दिसली तर काय ते ओळखून घे आणि संकटाचे रूपांतर संधीत कर. ते प्रोफाइल बायकोचे असेल तर दर आठवड्याला चटकदार पदार्थ मिळवायची सोय झाली आणि नसेल तर… हॅ हॅ हॅ..
– कुशाग्र सोमी