हीकथा तीन बुटक्यांच्या बटुकदेशीची. सातासमुद्रापारची. कोणे एके काळची. त्या देशी तीन बुटके तिरस्काराने सुखनैव भांडत राहायचे. श्वानासारखे रुबाबात जगायचे. ताठ शेपटीने! बाटायण, बुटेश, बुटलेश. पैकी बाटायण हा बुटेश आणि बुटलेशचा पिता.
त्यांचा नित्यक्रम काय? रोज उठावं. हमरस्त्यांपर्यंत जावं. दिसेल त्यांच्यात दोन क्षण बसावं नि माघारी त्यातीलच कुणाची गचंडी पकडून शिव्या देत भांडू लागावं. कारणासहित वा विना कारण. दोन जळजळीत शिव्या देताच समोरला भाडभीड न ठेवता उलट हाती दोन रट्ट्यांचा प्रसाद न मागता देणार. तो गोड मानून कबूल करावा नि घर गाठावं. रात्री ज्याला कमी प्रसाद मिळाला त्यानं जास्त कण्हणार्याला दवापाणी द्यावं. हा रोजचा शिरस्ता.
पण घर चालावं कसं? उरातला श्वान चेतवावा. तो कुठल्या खुराड्याबाहेर दबा धरून बसणार. झडप घालून हाती जे कुक्कुट लागेल ते आणून मुंडी पिळून मारावं. धगधगत्या अग्नीवर कच्चंपक्कं भाजावं नि दिस ढकलावा. पण किती दिवस?
एक दिवस बाटायण बाहेर पडला कुणा भल्या माणसाच्या मागे चार पावलं चालला. तो काय आश्चर्य? त्या घटनेनं त्याचं आयुष्य बदललं. त्याला गावात मानसन्मान मिळू लागला. लोकं आदराने हाक देऊ लागले. त्यानं तो हुरळून गेला. एकाएकी आयुष्यात आलेल्या वैभवाने त्याची पावलं तिरकी पडू लागली. पण भल्या माणसाच्या कानी अजून काही पोहोचलंच नव्हतं, त्यानं त्याला खांद्यावर घेतलं. त्यामुळं मानाचं पान आणि संपत्तीचं दान आपसूक पदरात पडलं. त्यानं बाटायणचा गर्व वाढीस लागला. त्याला मर्यादेचा विसर पडला. तो दिवसेंदिवस मग्रूर बनत गेला. एकेदिवशी भल्या माणसाला ही बुटकी वाढल्या ताटात माती कालवताय, हे ध्यानी येताच. त्यानं त्यांना ताटावरून हात धरून उठवलं आणि सगळ्यांदेखत बाहेर घालवलं. हा त्याच्या स्वार्थाच्या झटक्याला पहिला फटका.
पण त्याने सुधारतील ते बुटके कसे? ते पुन्हा गल्लोगल्ली फिरून भांडणं उकरून काढायला लागले. पण ह्या वेळी त्यांना मूठभर हुजरे मिळाले, जे नित्यनेमाने त्यांची संगत ठेऊ लागले. त्यानं ते बहकले आणि कुठल्याशा कारणावरून सगळ्याच टकल्यांना शिव्या देऊ लागले. त्यांच्याशी वैर धरलं. त्यांच्याशी भांडू लागले. पण काही काळाने त्यांची गाठ एका दरबारीच्या धूर्त टकल्याशी पडली. ज्याने झटक्यात त्यांच्या कुंडलीत राहू-केतू-मंगळ-शनी घातले. त्यानं हबकून ते टकल्यांच्या गोटात गेले. बुटक्यांनी तुळतुळीत टक्कल केलं आणि स्वतःला बाटीव टकले म्हणवून घ्यायला लागले.
त्याने फरक काय पडला? त्यांचं झटक्यात गोट बदलणं, भांडणाची प्रवृत्ती बदलवू शकलं नाही. ते टकल्यांत गेल्यावर त्यांनी नकट्यांशी एकतर्फी वैर घेतलं नि त्यांच्याशी आपणहून भांडू लागली.
पण हा इतिहास ऐकवण्याचं कारण काय? तर बुटकदेशी पवित्र अग्नी प्रज्वलित करण्याची प्रथा शतकानुशतके पाळली जाते. त्याप्रीत्यर्थ अज बळी देण्याची प्रथा! त्याच प्रथेप्रमाणे त्यादिवशी तिथे धष्टपुष्ट बोकड रथात मिरवून लॉर्ड बटुक तिसर्याच्या मंदिरात आणला जातो. तोच तिथे तिघे बुटके आले. त्यांच्या सोबत काही टकले होते आणि मंदिरात सोहळ्यासाठी उपस्थित गावकरी.
‘थांबा, थांबा! हा रथ, ही पालखी या नकट्यांच्या हाती दिले कुणी?’ बुटलेश तावातावाने विचारू लागला.
‘अरे त्यासाठी लवकरच यायचं ना? बघायला?’ अचानक कुठूनतरी आवाज येतो.
‘कोण आहे रे? माझ्या मुलाला उलट बोलतो. तुला माहिती आहे का? कुणाशी बोलतोय ते?’ बाटायण अंमळ संतापाने नजर भिरभिरवतो. ‘कुक्कुटमार सोबत!’ कुठूनतरी एक टारगट पोर ओरडतं. तसे तिन्ही बुटके अंमळ संतापतात. वातावरण बिघडायचे चिन्ह दिसताच गावचे ठोक पुढे येतात.
‘अरे बाटायण मीच बोललो रे! सकाळी आला असतात तर हा भव्य सोहळा बघण्याची उत्तम संधी मिळाली असती तुम्हा तिघांना!’ वृद्ध ठोक संयतपणे समजावू बघतात.
‘अरे ठोका, आम्हाला कधी काय बघायचं हे तू शिकवणार आहेस का?’ बुटेश बापाच्या जिवावर तोरा मिरवतो.
‘बाटायण तू कितीही मोठा झालास तरी लहान असताना तुला मीच छप्पर मिळवून दिलेलं. माझ्याबाबत तुझी मुलं ही भाषा वापरतात? आणि तू गप्प ऐकतोय?’ ठोक उद्विग्नतेने विचारतात. ‘कृतघ्न औलादी अश्याच वागायच्या! त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवता?’ मागील कोपर्यातून कुणी मोठ्याने बोलतं.
‘बघा, तुम्ही असे लोकं बोलावले जे माझ्या मुलांना शिव्या घालताय. तुम्ही गप्प ऐकताय आणि वर माझ्या मुलांच्या भाषेवर आक्षेप घेताय? त्याबद्दल आधी बोला ना!’ बाटायण उलट बोंब ठोकतो. त्याबरोबर ठोक कपाळाला हात मारतो.
‘ही पालखी ह्या नकट्यांच्या हाती कुणी दिली, हे सांगणार आहे का आम्हाला?’ बुटलेश पुन्हा जुन्या प्रश्नावर येतो.
‘ही प्रथेने तेच वाहतात,’ ठोक माहिती देतात.
‘काही पण बोलता. असं कुठं लिहून ठेवलंय का? तुम्हाला नकट्यांचं लागूनचांगुन करायचंय ते सांगा. उगाच आम्हाला वेड्यांत काढू नका,’ बुटलेश कडाडतो.
‘बाबा आधी शब्द बोलायला शिक. चांगुनचांगुन काय बोलतो?’ इति ठोक.
‘माझ्या भावाच्या चुका काढायच्या नाही, सांगून ठेवतो नाहीतर फार भयानक भयानक परिणाम होतील, मी तिथं आलो तर…’ बुटेश मध्येच उडी घेतो.
‘अरे तू गेलाय कुठे? इथेच आहेस ना? भयानक भयानक काय करणार आहेस?’ कोपर्यातला धिप्पाड गडी खांद्याखालच्या बुटेशकडे रोखून बघत विचारतो, तसा तो वडिलांच्या आसर्याला पळतो.
‘बरं, ठेवली असती पालखी तशीच ती तुम्ही मिरवत आणली असती का? किमान ती उचलता येईल?’ ठोक तिखट प्रश्न करतात.
‘हे बघा. ते टकले ठरवतील. नकट्यांनी इथे लुडबुड करायचं काम नव्हतं. काय?’ बाटायण पोरांची री ओढतो.
‘बरं त्यांना इथे थांबायला सांगतो. इथून तुम्ही आत न्या. न्याल ना?’ ठोक कुत्सितपणे विचारतात.
‘आम्ही अर्धवट कामं करत नसतो,’ बुटलेश बडबडतो.
‘मग सकाळी यायचं की तुम्ही!’ ठोक त्याला सुचवतात.
‘सकाळी आम्ही पितळेचं दूध पीत असतो ना? त्यात पितळे एकवेळच दूध देतो आणि आम्ही चुर्णशिटा टाकून दूध पितो, त्यामुळे वेळ लागतोच ना? तुम्ही थोडा उशिरा करायचा ना कार्यक्रम?’ बुटलेश गाल फुगवून लाडिकपणे बोलतो.
‘मग आता काय करायचं? तुम्ही सोहळा पूर्ण…’ ठोक मूळ विषयावर येतात.
‘जे झालं ते होऊ दे! आता पुढे नकट्यांना काही करू देऊ नका.’ बुटेश धमकी देतो.
‘आता अजबळी द्यायचा आहे. आणि बळी…’ ठोक माहिती देऊ लागतात.
‘मग सगळे बळी झटक्यात द्यायचे आणि तेही टकल्यांच्या हातूनच द्यायचे इथून पुढे,’ बुटलेश उभ्या उभ्या फर्मान काढतो. ते ऐकून ठोक मानाचा सुरा लगोलग काढून बुटलेशच्या हाती देतो.
‘हे बघ, इथे पाचशे बोकड आणलेत गावकर्यांनी. तुला हवे तसे कापून ताबडतोब ज्याचे त्याला दे! सर्वांच्या घरी मित्रपरिवारासहित मेजवान्या असतात. वेळ व्हायला नको. चल मानाचा बळी इथे अग्निसमोर देऊन सुरुवात कर,’ ठोक तितक्याच घाईत निकाल लावतात.
‘पण मला हे… हे… जमत नाही,’ बुटलेश सुरा फेकत बोलतो.
‘तुम्ही त्याला बुचर समजला का? तो हे काम करत नाही.’ बाटायण मध्ये पडतो.
‘मग त्याच्या गोटातील टकल्यास सांगा,’ ठोक पर्याय सुचवतात.
‘नाही, ते सगळे इतके शाकाहारी आहेत की अळू न चिरता फदफदं करतात,’ बुटेश भावाची बाजू घेतो.
‘बाळ्या तो बोकड पाहिलास?’ ठोक त्याला सवाल करतात.
‘हो, म्हणजे बघितलाय. फार मोठा आहे ना?’ बुटेश उगाच हसत बोलतो.
‘हे बघ. हा विषय हसण्याचा नाहीय. आणि टिंगलटवाळीचा, भांडणं करण्याचा देखील नाही,’ ठोक समजावू पाहतात.
‘आम्ही कुठं भांडणं केलीत? आम्ही म्हणतो, आमच्या सोहळ्यात सगळं आम्हीच करणार. नकट्यांना इथं यायचं काम नाही. त्यात आमचे… ‘ बुटलेश आधीच्याच तोर्यात बोलू बघतो.
‘बाळ्या, सोहळे-उत्सव-कार्यक्रम आपण मनभेद, मतभेद, पंथभेद वगैरे विसरून साजरे करतो रे! का? एकोप्यासाठी! ती माणूस म्हणून आपली गरज असते. त्यात असे बालिश वाद करून त्याला गालबोट लावायचं नसतं रे!’ ठोक शक्य तितकं प्रेमाने समजावू बघतात.
‘पण…’ भुईफोड बाटायण काही बोलू बघतो.
‘बस्सं! पण नाही आणि बिन नाही. इथं लोकं ताटकळलीत. तुमच्या भांडणापायी त्यांचा खोळंबा व्हायला नको. घे रे सुरा हाती. आणि कर तयारी,’ ठोक एकाला आदेश देतात, ‘आणि बुटक्यांनो मांस-मटण कसं द्यावं, हे तुमचे चोचले असतील. पण सामान्य लोकांची फक्त ‘हवं.’ ही गरज आहे. आणि ही कोरडी सर्टिफिकेट देण्याऐवजी तुला काही द्यायचंच असेल तर मोठ्या टकल्याला विचार. पोरांना शाळेत उकडलेली अंडी पुन्हा कधी देतोय ते? काय?’ ठोकांच्या बोलण्यावर बुटके निरुत्तर होतात.