डेबिट कार्ड वापरताना फसवणूक होण्याचे विविध प्रकार आहेत, त्यामध्ये एटीएम मशीन असणार्या भागात कॅमेरा लावून फसवणूक होण्याचे प्रकार घडतात. डेबिट कार्डवर असणारी माहिती चोरण्यासाठी सायबर ठग एटीएम मशीन असणार्या भागात कॅमेरे लावतात, त्यामधून माहिती जमा करण्याचा उद्योग करतात. त्यामुळे आपण पैसे काढताना अधिक सजग राहायला हवे.
नाशिकमधल्या गंगापूर रोडच्या परिसरात संतोष राहात होता. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या संतोषला सुरुवातीपासूनच नोकरी करण्यात स्वारस्य नव्हते, त्यामुळे त्याने कॉम्प्युटर हार्डवेअरच्या सुट्या भागांची विक्री करणारा व्यवसाय सुरू केला होता. तो संगणकाच्या क्षेत्रात काम करत असला तरी सायबर फसवणुकीच्या प्रकारांबाबत अनभिज्ञ होता, त्यामुळेच तो सहजपणे सायबर गुन्ह्याला बळी पडला.
गुरुवारचा दिवस होता, मनीषच्या दुकानात दुपारपासूनच ग्राहकांची गर्दी होती. संध्याकाळी त्याला सहकुटुंब एका समारंभाला जायचे होते. त्यामुळे हातातले काम उरकून घरी जाण्याची घाई सुरू होती. संतोषला गिफ्ट आर्टिकल खरेदी करायचे होते, म्हणून त्याने लगबगीने दुकानाच्या जवळ असणारे एटीएम गाठले. पण तिथले पैसे संपले होते. तिथूनच चार किलोमीटरच्या अंतरावर त्याच बँकेचे दुसरे एटीएम होते, आपण तिथे जाऊन पैसे काढूया, असे संतोषने ठरवले. संतोष त्या एटीएम केंद्राजवळ येऊन पोहोचला, तेव्हा तिथे कुणीच नव्हते. गर्दी नसल्यामुळे त्याचे पैसे काढण्याचे काम फटाफट पूर्ण झाले. नेहमीप्रमाणे संतोषने आपले एटीएम कार्ड त्या मशीनमध्ये टाकले, कीपॅडवर पिन क्रमांक टाकला, किती रक्कम काढायची आहे ती रक्कम टाकली आणि पैसे काढले. संतोषने काही क्षणात हा सगळा व्यवहार पूर्ण केला आणि आपल्या दुचाकीवरून तो घरी आला.
कुटुंबासोबत तो समारंभाच्या ठिकाणी येऊन पोहोचला, रात्री उशिरापर्यंत तिथे कार्यक्रम सुरू होता. साडे दहा वाजण्याच्या सुमारास संतोषला खात्यामधून २० हजार रुपये गेल्याचा मेसेज आला. अर्ध्या तासाच्या अवधीत पुन्हा १५ हजार रुपये गेल्याचा मेसेज आला. हे काय सुरू आहे, आपले डेबिट कार्ड तर आपल्याकडे आहे, आपल्या खात्यामधून कोण पैसे काढतंय, हे संतोषला समजत नव्हते. त्याने तत्परता दाखवत बँकेला फोन करून डेबिट कार्ड ब्लॉक करण्याची विनंती केली. बँकेने तात्काळ संतोषचे कार्ड ब्लॉक केले, त्यामुळे पुढचे व्यवहार थांबले होते.
संतोषने आपल्या खात्यामधून पैसे काढले गेल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. आठवड्याभराने त्याला पोलीस स्टेशनमधून चौकशीसाठी फोन आला. संतोषने आपण कोणत्या एटीएममध्ये पैसे काढले, किती वाजता काढले, तेव्हा तिथे कोणी होते का, या तपशिलाची पुन्हा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिथे असणार्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने हा सगळा प्रकार कसा घडतोय, हे शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा, संतोषने ज्या एटीएम केंद्रावरून पैसे काढले होते, तिथे एटीएमच्या कीपॅडवर एक लहान, न दिसणारा कॅमेरा बसवण्यात आला होता. हा कॅमेरा मशीनवरील प्रत्येक ‘कीस्ट्रोक कॅप्चर’ करत होता. त्याने मनीषच्या कार्डची माहिती आणि त्याचा पिन या दोन्ही गोष्टी टिपल्या होत्या. सायबर चोरट्यांनी त्याचाच अवलंब करून दुसरे कार्ड तयार करून मनीषचे बँक खाते मोकळे करण्यास सुरुवात केली होती. मनीषला त्याचे मेसेज आल्यामुळे तो लगेच सजग झाला होता. पोलिसांकडे वेळीच तक्रार केल्यामुळे आणि डेबिट कार्ड ब्लॉक करण्याची प्रक्रिया लगेच केल्यामुळे तो मोठ्या आर्थिक नुकसानीपासून बचावला होता.
पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला तेव्हा बिहारमधल्या एका टोळक्याने हा उद्योग केल्याचे समोर आले होते. सायबर चोरटे हे या तंत्राचा वापर करण्यात हुशार होते, कार्डवरील माहिती घेऊन ते त्याच्या आधारे बनावट कार्ड तयार करत असत. त्याचा वापर करून बँकेच्या खात्यातून पैसे काढण्याचा उद्योग ही मंडळी सहजपणे करत असत. कॅमेरा वापरून त्यांनी माहिती घेतल्यामुळे त्यांना बँकेच्या ग्राहकाचा पिन क्रमांक सहजपणे मिळत होता, त्यामुळे त्यांचे फसवणूक करण्याचे काम सहजतेने पूर्ण होत होते.
अशी घ्या काळजी :
– एटीएम वापरण्यापूर्वी, त्याची बारकाईने तपासणी करा. एखाद्या ठिकाणी काही संशय आल्यास त्या ठिकाणी व्यवहार करण्याचे टाळा, त्याची माहिती बँकेच्या निदर्शनास आणून द्या.
– आपल्या आजूबाजूच्या परिसराची तपासणी करून मगच एटीएम केंद्रात प्रवेश करा. मशीनच्या ठिकाणी काही संशयास्पद गोष्ट आढळली तर त्याचा वापर करण्याचे टाळा. त्याची माहिती लगेचच बँकेला कळवा.
– पैसे काढत असताना तुमचा पिन झाकून ठेवा. एटीएम किंवा पॉइंट-ऑफ-सेल टर्मिनलवर तुमचा पिन एंटर करताना तुमच्या दुसर्या हाताचा वापर करा, त्यामुळे पाळत ठेवणार्या कॅमेर्यांना तुमचा पिन कॅप्चर करण्यापासून प्रतिबंधित करणे सहजशक्य होते.
– एटीएमचा वापर करताना ते शक्यतो बँक शाखांमध्ये जास्त रहदारी असलेल्या भागातीलच एटीएम निवडा. कमी गर्दी आणि वर्दळ नसणार्या भागातील एटीएमचा वापर करणे शक्यतो टाळा.
– आपल्या बँक खात्याची नियमितपणे तपासणी करा.
– बर्याच बँका व्यवहार सूचना सेवा देतात, ज्या तुम्हाला तुमच्या खात्यावरील प्रत्येक व्यवहारासाठी ईमेल किंवा एसएमएसद्वारे सूचित करतात. तुमच्या बाबतीत तसा कोणतीही असामान्य व्यवहार झाल्यास त्याची माहिती करून देण्यास मदत करू शकते. त्यामुळे त्याचा वापर करा.
– ईव्हीएम (चिप) कार्डे पारंपारिक चुंबकीय पट्टी कार्डांपेक्षा अधिक सुरक्षित असतात, कारण ती क्लोन करणे कठीण असते. तुमच्याकडे आधीपासूनच चिप कार्ड नसल्यास तुमच्या बँकेकडे चिप कार्डची विनंती करा.
– डेबिट कार्डवर दररोज पैसे काढणे आणि खरेदी मर्यादा स्थापित करण्यासाठी तुमच्या बँकेसोबत काम करा. त्यामुळे तुमचे संभाव्य धोके टाळले जाऊ शकतात.
– तुम्हाला एटीएममध्ये छेडछाड झाल्याची शंका वाटत असेल किंवा जवळपास कोणतीही संशयित व्यक्ती दिसली, तर बँक किंवा स्थानिक अधिकार्यांना ताबडतोब कळवा.
– एटीएममध्ये सतर्क राहा. एटीएम वापरण्यापूर्वी, लपविलेले कॅमेरे किंवा कार्ड स्किमिंग डिव्हाइसेससारखी कोणतीही संशयास्पद उपकरणे आपल्या परिसरात आहे का? याची तपासणी करा.
– तुमचा पिन नियमितपणे बदला. आपली जन्मतारीख किंवा सलग असणारे क्रमांक वापरण्याचे टाळा. पिन क्रमांक हे सहज अंदाज लावता येणारे नसावेत.