प्रेक्षकांना दैवी शक्तीशी जोडल्याची झलक दाखविणाऱ्या भक्तीसंगितावरील ‘स्वर्ण स्वर भारत’ ही रिअलिटी शो झी टीव्हीवर लवकरच सुरू होतोय. या कार्यक्रमातून आपला मूळ इतिहास सांगणार्या कथा, श्लोक आणि भक्तिसंगीताद्वारे प्राचीन मूल्यांचे दर्शन घडविले जाणार आहे. ‘फॅदम पिक्चर्स’ आणि ‘कैलास एंटरटेन्मेंट’ यांची संयुक्त निर्मिती असलेला हा शो भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव जगभर साजरा करणार आहे. या कार्यक्रमात नामवंत कवी डॉ. कुमार विश्वास, पद्मश्री कैलास खेर आणि पद्मश्री सुरेश वाडकर हे परीक्षक म्हणून काम पाहतील. खेर आणि वाडकर यांनी आजवर अनेक भाषांमध्ये भक्तिगीते गायली असून त्याद्वारे त्यांनी भक्तिभावाचा अनुभव घेतला आहे. देशाच्या विविध भागांतून आलेल्या गुणी गायकांना या कार्यक्रमात आपली कला सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. सूर, भाव आणि सार या निकषांवर ते यातील स्पर्धकांच्या गाण्यांचे मूल्यमापन करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेता रवी किशन करणार आहे. त्याचे वडील हे देवळात पुजारी होते आणि त्यांच्याबरोबर असतानाच बालपणी त्यांची अध्यात्माशी ओळख झाली. याबाबत बोलताना परीक्षक पद्मश्री सुरेश वाडकर म्हणाले, “स्वर्ण स्वर भारत या कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी होता येत असल्यामुळे मी थरारून गेलो आहे. या कार्यक्रमातील भक्तिगीतांद्वारे समृध्द भारतीय संस्कृतीचा वारसा जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नावीन्यपूर्ण गाणी आणि त्यांचे कथन प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. या कार्यक्रमासाठी डॉ. कुमार विश्वास आणि कैलासजी यांच्याबरोबर चित्रीकरण करताना खूप मजा आली.” हा रिअलिटी शो झी टीव्हीवर येत्या 22 जानेवारी रोजी सुरू होत असून दर शनिवार-रविवारी रात्री 8 वाजता तो दाखवला जाणार आहे.