• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे…

(संपादकीय २२-१-२०२२)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 20, 2022
in संपादकीय
0

कविवर्य सुरेश भट यांच्या या ओळी सार्थ करणार्‍या घडामोडी राष्ट्रीय राजकारणात घडत असताना हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन यावा हा एक विलक्षण योगायोग आहे. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यात काय काय केलं, याची यादी फार मोठी आहे. अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी एकहाती पालटलं. मराठी माणसाचा महाराष्ट्रातला, त्याच्या राजधानीतला आवाज बुलंद केला. मात्र, त्यांनी केलेलं एकच क्रांतिकारक कार्य निवडायचं असेल, तर जातीय राजकारणाने बुजबुजलेल्या देशात त्यांनी जातपात न पाहता, निष्ठा आणि काम पाहून सर्व जातीधर्माच्या लोकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची हिंमत दिली, त्यांना राजकारणात प्रस्थापित करून दाखवलं, सामान्य माणसाला आवाज दिला, या महान कामाचीच निवड करावी लागेल.
आपल्या देशात लोकशाही आली इंग्रजांच्या काळात, १९४७ साली स्वातंत्र्यही मिळालं, स्वतंत्र देशात निवडणुका व्हायला लागल्या. पण सत्ताधारी कोण होते? जे एकेकाळी राजे होते, सरंजामदार, जमीनदार होते, पहिल्यापासून सत्ताधारी होते त्यांच्याच हातात सत्ता एकवटली होती. ही खरे तर सरंजामशाहीच होती, फक्त लोकशाहीचा बुरखा पांघरलेली. मुंबईसारख्या अठरापगड जातीजमाती सामावून घेणार्‍या आणि जातीजमातींच्या खेड्यांत तीक्ष्ण असणार्‍या ओळखी काहीशा बोथट झालेल्या महानगरात बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना करताना आणि तिचे शिलेदार निवडताना चुकूनही जातीपातीची वास्तपुस्त केली नाही. जो कामाला भला तो आपला, असं मानून त्यांना बळ दिलं आणि राजकारणात एक चमत्कार घडवून दाखवला. कोणत्या मतदारसंघात कोणत्या जातीची किती मतं आहेत, याचा विचार न करता, लोकांच्या सेवेला धावून जातो तो सच्चा शिवसैनिकच त्यांचा प्रतिनिधी झाला पाहिजे, या विचाराने त्यांनी अगदी साध्यातल्या साध्या माणसांना उमेदवारी दिली आणि एरवी जातीपातीपलीकडे विचार न करणार्‍या मराठी समाजानेही ज्याच्या माथी शिवसेनेचा टिळा तो आपला, अशा भावनेने भरभरून मते दिली, मुंबईची सत्ता दिली, पाठोपाठ राज्याचीही सत्ता सोपवली. सोशल इंजीनियरिंगच्या नावाखाली जातीपातींची मोट बांधून, याला त्याच्या विरोधात आणि त्याला याच्या विरोधात खडा करणार्‍या मतांच्या राजकारणात बाळासाहेबांनी घडवून आणलेलं हे एक मन्वंतरच आहे. याची म्हणावी अशी चर्चा आणि अभ्यास झालेला नाही. महाराष्ट्रातील एखाद्या राजकीय अभ्यासकाने गंभीरपणे हाती घ्यावा, असा हा प्रकल्प असेल.
हा चमत्कार घडवणार्‍या मा. शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिवस देशातल्या मतपरिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर आला आहे. लोकशाही म्हणजे संसदेतील बहुमत आणि त्या जोरावर वाट्टेल ते रेटणे, असा सोपा अर्थ काढून बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुजोरीला सर्वसामान्य माणसांनी पहिल्यांदाच चाप लावला तो शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून. शेतकर्‍यांना देशद्रोही, खलिस्तानी वगैरे ठरवून, त्यांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करून जनरल डायरलाही लाजवणारी दमनशाही या लोकनियुक्त सरकारने करून पाहिली. पण, शेतकर्‍यांच्या वज्रमुठीच्या निर्धाराला साधा तडाही पडला नाही. उत्तर प्रदेशात नेसूचे फिटण्याची पाळी येईल, असे अहवाल गेल्यामुळे पंतप्रधानांनी संसदेत बहुमताच्या जोरावर रेटलेले कायदे मागे घेतले. साध्याच माणसांचा एल्गार किती भारी पडतो, हे त्यातून सगळ्या देशाला कळून चुकले.
उत्तर प्रदेशातल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकेल, इथून सुरू झालेल्या दर्पोक्तींचा प्रवास आता १०० जागा कमी झाल्या तरी सत्ता आमचीच येणार, इथपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जनतेचे साडे सहा कोटी रुपये खर्च करून पंतप्रधानांनी गंगामय्येत डुबकी लगावली आणि दिवसभराचा धार्मिक इव्हेंट करून मतं वळवण्याचा प्रयत्न केला. तो सार्थकी लागलेला दिसत नाही. बोट कितीही मोठी असली तरी एकदा तिला छोटंसं छिद्र पडलं तरी त्यातून शिरणारं पाणी त्या बोटीला बुडवल्याशिवाय राहात नाही. अशा बोटीतून उंदीर पळ काढतात. हा मजकूर लिहिला जात असेपर्यंत उत्तर प्रदेशात ज्यांनी चार वर्षं सत्ता उपभोगली, अशा तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. १६ आमदार भाजपमधून बाहेर पडले आहेत. त्यातल्या बहुतेकांनी समाजवादी पक्षाचा मार्ग पत्करलेला आहे. निवडणुका जाहीर होताच जे एक्झिट पोल घेण्यात आले, त्यात सगळ्यांनीच भाजपचेच सरकार येणार अशी ग्वाही दिलेली असताना असे का होऊ लागले असेल?
जगातल्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप, फेसबुक आणि ट्विटरवरून मॅनेज होत नाहीत, असा हा धडा आहे. भारतीय जनमानसात एकतर्फी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्याकांचं लांगूलचालन होत असल्याची भावना आणि त्याविषयी असंतोष होताच. त्याला शिवसेनेनेही वेळोवेळी उद्गार दिला होता, बाळासाहेबांनी त्यासाठी अनेक शिक्षाही भोगल्या. मात्र, त्यातून विद्वेषाची लाट निर्माण करून तिच्या आधारावर सत्तेत जाऊन विरोधी पक्षाचा, एखाद्या जातीजमातीचा, धर्माचा निर्वंश करण्याची टोकाची भाषा बोलायची, हे भारतीय जनता मान्य करत नाही. तिला विकासाची आस आहे. महागाईच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं आहे. सर्वांसोबत गुण्यागोविंदाने, सन्मानाने राहायचं आहे. त्याच विचाराने सामान्य माणसाने भाजपविजयाची लाट उसळवली होती. पण या लाटेने आता त्याच सामान्य माणसाच्या नाकातोंडात पाणी जायला लागले आहे. तो ही लाट फिरवणार, याची अटकळ बांधूनच उंदरांनी बोटीतून उड्या मारायला सुरुवात केली आहे.
दिवंगत बाळासाहेबांनी ज्यांना आवाज दिला, सत्ता दिली, त्या साध्याच माणसांचा हा एल्गार आहे… त्यांना याहून मोठे अभिवादन कोणते असणार?

Previous Post

झी टीव्हीवर ‘स्वर्ण स्वर भारत’

Next Post

बेरोजगारीच्या फे-यात हुन्नर मदतीला

Next Post

बेरोजगारीच्या फे-यात हुन्नर मदतीला

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.