हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभावाची छाप ज्यांच्या विचारावर आणि जीवनावर कायम उमटली असे असंख्य लोक मुंबई, महाराष्ट्र, देश आणि जगातही आहेत. इतर राजकारण्यांहून वेगळे असलेल्या बाळासाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अनेकांना आपले वाटले. व्यंगचित्र कलावंतापासून जनतेशी सहज संवाद साधणार्या बाळासाहेबांनी सामान्य माणसाच्या जीवनात आपुलकीचे स्थान तर मिळवलेच पण प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता आणि स्वाभिमान जागा केला. अशा अनेकांकडे असलेल्या बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचे आवाहन त्यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मार्मिक’ने केले होते. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक आठवणी…
– – –
स्वदेशीच्या कामगारांना न्याय मिळवून दिला…
मी `स्वदेशी’ या कापड गिरणीत कामाला होतो. १९९७ साली आमची गिरण डबघाईला आली. पगार वेळेवर मिळेनासा झाला. १० तारखेला होणारा पगार कधी १५ तारखेला, कधी २० तारखेला तर कधी २५ तारखेला होऊ लागला. त्यामुळे साहजिकच कामगारांच्या तोंडचे पाणी पळाले. कामगारांची उपासमार होऊ लागली. त्याचदरम्यान दै. ‘सामना’मध्ये `वाचकपत्रे’ या सदरात गिरणीच्या संदर्भात बाळासाहेबांनी लक्ष घालावे असे शीर्षक असलेले माझे पत्र प्रसिद्ध झाले. त्याकाळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते. त्यावेळी मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते आणि रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हातात होता. त्यावेळेस माझे पत्र नेमके बाळासाहेबांच्या वाचनात आले. त्यांनी विलंब न लावता लगेच मुख्यमंत्र्यांना आमच्या गिरणीला भेट देऊन चौकशी करण्यास पाठविले. त्यावेळी आमच्या गिरणीचे कामगार सेनेचे अध्यक्ष जनार्दन नाईक (दांडेकर) हे स्वत: मुख्यमंत्र्यांबरोबर गिरणीच्या व्यवस्थापनाबरोबर चर्चा करण्यास गेले. चर्चा सकारात्मक व्यवस्थित पार पाडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाहेर येऊन गिरणीच्या आवारात जमलेल्या सर्व कामगारांना चर्चेचा वृतांत सांगितला. थोडी अडचण निर्माण झाल्यामुळे पगार मागे पुढे देण्यात आला. यानंतर पगार तुम्हाला वेळेवर मिळेल, तेव्हा तुम्ही निर्धास्त रहा. असे सांगून त्यांनी कामगारांना दिलासा दिला. नंतर आम्ही `मातोश्री’वर गेलो. बाळासाहेबांची भेट घेतली. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेथे जनार्दन नाईक यांनी बाळासाहेबांना माझी ओळख करून दिली. त्यावेळेस बाळासाहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितले की काही काळजी करू नका, निर्धास्त रहा. सर्व व्यवस्थित होईल. त्यांच्या वरदहस्तामुळे मी भारावून गेलो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती आठवण मी कधीच विसरू शकत नाही. ती आठवण कायम माझ्या स्मरणात राहील.
– भालचंद्र परशुराम म्हात्रे, चुनाभट्टी
साहेबांचे प्रत्येक वाक्य हृदयाला भिडणारे
‘बाळासाहेब’ म्हणजे ‘बाळ’ नावाचा बाप माणूस. बाळासाहेबांना प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य मला मिळालं नसलं तरीही बाळासाहेबांचे विचार मात्र कोळून प्यायलो. मी लहान होतो, तेव्हापासून माझे वडील प्रत्येक रविवारी सामना आणायचे. आम्ही तो पूर्ण वाचून काढायचो. या गोष्टीमुळे वाचनाची आवड निर्माण झाली. वडिलांकडून आम्हा दोघा भावांना दर रविवारी सामना पेपर आणण्याची शिकवण मिळाली.
परिस्थिती गरीब असल्यामुळे आठवडाभर आम्ही पन्नास-पन्नास पैसे साचवून दोन रुपये जमा करायचो आणि सामना विकत घ्यायचो. बाळासाहेबांची कुठे सभा असली की सभा झाल्यावर दुसर्या. दिवशी सकाळी-सकाळीच बसस्टॉपवर सामना घ्यायला जायचो. बाळासाहेबांचं संपूर्ण भाषण पहिल्याच पानावर छापून यायचं. आम्ही ते पूर्ण वाचून काढत असताना अंगावर रोमांच उभे राहत. बाळासाहेबांचे प्रत्येक वाक्य एखाद्या बाणाप्रमाणे हृदयाला येऊन भिडत असे. यामधून जगण्याची आणि लढण्याची प्रेरणा मिळत असे. असं होत होत पुढे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक कधी बनलो देव जाणे.
‘सामना’ने आम्हाला भरपूर काही दिलं. ‘सामना’ म्हणजे ‘सर्वांसाठी सर्वकाही’. याच ‘सामना’मुळे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा प्रभाव पडल्यामुळे आम्ही दोघेही भाऊ वक्तृत्वकला शिकलो आणि वक्ते झालो. आज माझा भाऊ पाथर्डी गावचा युवा सेनेचा शहरप्रमुख आहे. खासकरून आम्ही दोघेही व्याख्याते झालो. ही सगळी बाळासाहेबांचीच कृपा.
आजसुद्धा आमच्या गावात आमची ओळख शिवसैनिक म्हणूनच आहे आणि शेवटपर्यंत राहणार. बाळासाहेबांच्या भाषणाची सर्व कात्रणे कापून एका वहीत चिकटवून जपून ठेवली आहेत. जेव्हा जेव्हा मी संकटांनी खचून जातो तेव्हा तेव्हा बाळासाहेबांच्या भाषणाची वही काढून वाचायला लागतो, मग पुन्हा लढण्याची एक उमेद तयार होते. असे बाळासाहेब पुन्हा होणे नाही.
‘किती आले, किती गेले, मराठी माणसासाठी ठाकरेच दुसरे छत्रपती’.
– भूषण अनिल नागापुरे, पाथर्डी
साहेबांचे सडेतोड विचार
मी १९६३मध्ये माझे भाचे नरेंद्र बल्लाळ यांच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत विर्लेपार्ले येथे गेलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे `मार्मिक’चे जुने अंक वाचून काढले. नंतर १९६६मध्ये मुंबईलाच ए.जी. ऑफिसला नोकरी लागली. त्यानंतर मी बाळासाहेबांची १९६६ची भव्य सभा पाहिली. त्या सभेत बाळासाहेबांनी मराठी मनाला हात घातला. त्यानंतर मी १९६६पासून जो `मार्मिक’चा वाचक झालो तो आजपर्यंत आहे.
१९८०च्या जवळपास नरेंद्र बल्लाळ यांच्या एकसष्टीला (६१) बाळासाहेबांचे भाषण ऐकले. त्यांनी बल्लाळांच्या हिंमतीची योग्य शब्दात दाद दिली. ‘मटा’मधील नोकरी सोडून बल्लाळांनी `ठाणे वैभव’ हा पेपर चालू केला. त्यावेळी मला व माझ्या सौ.ला बाळासाहेबांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. माझ्या सौ.ने बाळासाहेबांना ओवाळले. तो प्रसंग माझ्या अजून डोळ्यासमोर आहे. त्यानंतर त्यांनी बल्लाळांच्या घरी येऊन काही सूचना केल्या. त्या सूचना ऐकून मी व इतर लोक भारावून गेले.
मी खामगावला, नागपूरला व आता मिरा रोडला आतापर्यंत `मार्मिक’चा एकही अंक सोडला नाही. मी २३ वर्षांपासून `मार्मिक’चा वार्षिक वर्गणीदार आहे. मी `सामना’ही नियमित वाचत आहे. आताच्या सरकारला बाळासाहेबांचे सडेतोड विचार पटत आहेत. हे विचार त्यांनी ४० वर्षांपूर्वी व्यक्त केले होते. मराठी माणसाला प्राधान्य व मराठी पाट्या पाहिजेतच. माझी मुंबईहून नागपूरला बदली झाली त्यावेळी मी हा त्रास भोगला आहे.
– जयंत मारोतीराव भडंग
त्या दोन क्षणांमधील अविस्मरणीय नाट्य
१३ ऑगस्ट १९६०ला झालेली `मार्मिक’ची स्थापना, १९ जून १९६६ला झालेली शिवसेनेची स्थापना,
३० ऑक्टोबरचा शिवाजी पार्क पहिला मेळावा. त्यात सर्व मराठी माणसांना `जमलेल्या माझ्या तमाम बंधुनो, भगिनींनो आणि मातांनो!’ ही घातलेली साद आजही कायम मनात घर करून आहे. तेव्हापासून `मार्मिक’चा प्रत्येक वाढदिवस, शिवसेनेचे मेळावे यातून बाळासाहेबांचा आवाज मनात घर करून राहिला. त्या आवाजाला ऐकत लहानाचा मोठा झालेला, ‘मार्मिक’ आणि शिवसेनेच्या प्रत्येक स्थित्यंतराचा मी साक्षीदार आहे.
समाजकारण, राजकारण यांत शिवसेनेचा झंझावात असताना १९७८ सालच्या नगरपालिका निवडणुकीत मुंबईत सर्वात कमी, २१ नगरसेवक निवडून आले, भ्रमनिरास झाला. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देतो! आमचा रामराम घ्यावा, एवढे उद्गार जनतेने ऐकले. सर्व शिवसैनिक व्यासपीठाकडे धावले.
माझ्या डोळ्यासमोर क्षणभर काय होते आहे हेच कळत नव्हते.
प्रक्षोभ झालेल्या, आकाशाला भिडणार्या शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी आसमंत दणाणला. पुढे बसलेल्या महिला डोळ्याला पदर लावून ओक्साबोक्शी रडत होत्या. त्यांचा एकच घोष- बाळासाहेब राजीनामा मागे घ्या. व्यासपीठावर कोण आहे, कोण नाही हेच समजत नव्हतं. सर्व मैदान घोषणांनी दुमदुमत होतं. व्यासपीठ उघडं पडलं होतं. अर्धा तास परिस्थिती थंड नव्हती. शेवटी बसलेले बाळासाहेब उभे राहिले. ज्यांच्या वाणीतून मिळालेल्या प्रेरणेखातर मी स्वत: आठ फेब्रुवारीच्या दंगलीत मार खाल्ला, रक्तबंबाळ झालो, ते माझे दैवत जागृत झाले. उभे असलेले बाळासाहेब व्यासपीठावरच माईककडे सरकत होते. हळूहळू प्रक्षोभ शांत होत होता. काही सेकंदांनी बाळासाहेब माईकसमोर आले. चेहरा लांबूनसुद्धा गंभीर वाटला. साहेबांनी हात वर केले… सुमारे तीन मिनिटे टाळ्यांच्या गडगडाटात बाळासाहेब झिंदाबादच्या घोषणा… शांतता!
`जनतेच्या या प्रेमाने आमचे बळ शतपटीने वाढले आहे. हे प्रेम एकनिष्ठ असते. शपथबद्ध असते त्याची कदर करून आम्ही तमाम मराठी जनतेला तहहयात सेवेचे आश्वासन देत आहोत आणि त्याचवेळी देवतासमान असलेल्या त्या मायबाप जनतेला निरोपाचा रामराम नव्हे, तर नतमस्तक होऊन कृतज्ञतापूर्वक `रामराम’ करत आहोत. `जय महाराष्ट्र!’
माधव देशपांडे यांचे, शिवसेना एकाच पक्षात विलीन करावी हे शब्द बाळासाहेबांच्या जिव्हारी लागले होते. शाखांतून त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. त्यांना मारण्यासाठी पुष्कळ शोध शिवसैनिकांनी केला. ते मुंबईत दिसलेच नाहीत. त्यात विरोधकांनी व पत्रकारांनी गोरेगावात झालेल्या सभेवर घराणेशाहीची टीका केली. १९९२ साली ‘सामना’च्या संपादकीयामध्ये बाळासाहेबांनी मनोगत व्यक्त केले, `आम्ही कुणावरही रागावलो नाही, शिवसैनिकांवर आईसारखी माया केली, २५ वर्षांच्या कालखंडात अनेक संकटे आली. सावलीसारखी साथ देणार्या शिवसैनिकांचा त्यांच्या कुटंबियांचा निरोप घेताना जे झाले ते झाले. आम्हीच मार्ग मोकळा केला आहे. सर्वांना आमचा `जय महाराष्ट्र!’
मनोगत वाचून माझी तर घालमेल झाली. आमच्या नायगांव शिवसेना बालेकिल्ल्यात हाहाकार उडाला. आम्ही सर्व शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाण्याचे ठरले. आम्ही मातोश्रीवर गेलो. अलोट जनसागर, गर्दी वर्णन करणं कठीण, प्रक्षोभ, हाहाकार घोषणा… शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू आत्मदहन करण्याच्या घोषणा. धन्य ते शिवसैनिक, धन्य तो जनसागर.
बाळासाहेब मातोश्रीच्या बाहेर आले. एक क्षण जनता जनार्दन अवाक झाली होती. बाळासाहेबांनी नजर समोर फिरवली. तमाम जनता जनार्दनाचा भक्तिभाव व प्रक्षोभ पाहून जगातला नावाजलेला एक व्यंगचित्रकार भावुक होऊन भावनेच्या आहारी गेला. तेच होते आमचे माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. ते भावनाविवश झाले आणि उद्गारले, आपण शिवसेना सोडणार नाही! `जय महा महाराष्ट्र!’
अशा या दोन घटनांचा साक्षीदार म्हणून मी हजर होतो. गेल्या ६२ वर्षांच्या (१९६० ते २०२२) अनेक आठवणी मन:पटलावरून पुसल्या असतील, पण आई जगदंबेच्या कृपेने जे काही स्मरत होते ते मी इथे आठवले तसे लिहिले आहे. शिवसेनेच्या जडणघडणीमधील चढउतार पाहिले आहेत. सोसले आहेत. आठ फेब्रुवारीच्या दंगलीत रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस सोडून गेले. माझे साथी शिवसैनिकांनी माझा प्राण वाचवला. आज आठवणींचा व साठवणींचा लेख स्वत:च्या हाताने लिहिताना त्या ज्ञात-अज्ञात शिवसैनिक व सगेसोयरे यांचा मी ऋणी आहे. ।। जय महाराष्ट्र ।।
– मधुकर धाकू सुतार