शिवसेना चंद्रकलेप्रमाणे वाढत होती. त्यामागे बाळासाहेबांचे अथक परिश्रम, सामान्य जनतेसाठी त्यांनी केलेली कामं होती, हे मी पाहात होते. एक नि:स्वार्थी, प्रामाणिक नेते म्हणून ते माझ्याही मनावर ठसत गेले. बाळासाहेबांचे महाराष्ट्रभर चालणारे झंझावाती दौरे, त्यांची सूचक बोलकी व्यंग्यचित्रं पाहत होते. या एकाच माणसामध्ये किती कलांचे आश्रयस्थान आहे हे जाणवलं. १० पानांच्या मजकुरातून स्पष्ट होणार नाही इतकं बोधप्रद असं त्यांचं एकच कार्टून असे… ‘गागर में सागर’ म्हणतात, तशी त्यांची व्यंगचित्रं असत…
– – –
या घटनेला बरीच वर्षे झालीत. मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये माझा एक नृत्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाची संकल्पना होती ‘चौला देवी’. सभागृह तुडुंब भरलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आले होते महाराष्ट्रातील लाडके, जनमानसात लोकप्रिय असलेले नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! त्या दिवशी त्यांना मी प्रथमच प्रत्यक्ष भेटले…
कार्यक्रम संपला आणि चहापानासाठी प्रमुख पाहुणे, कार्यक्रमातील स्पर्धक, आयोजक सगळे एकत्र भेटले. आयोजकांनी माझा परिचय साहेबांशी करून दिला. त्या वेळेस बाळासाहेबांनी माझ्या क्लासिकल नृत्याची मुक्तकंठाने तारीफ केली आणि म्हणाले, फिल्मी डान्स नृत्यदिग्दर्शकाच्या इशार्यावर केला जातो, क्लासिकल डान्स मात्र शिकावा लागतो, त्यासाठी तपश्चर्या, आराधना आणि निष्ठा हवी. आपल्या देशाची ओळख आहे क्लासिकल डान्स आणि क्लासिकल संगीत… तुझ्याकडे या कला आहेत… त्यांना कधी अंतर देऊ नकोस… क्लासिकल नृत्याचा सराव करत राहा! बाळासाहेबांनी दिलेला हा आपलेपणाचा सल्ला मला त्याही वयात खूप धीराचा वाटला…
खरं म्हणजे माझ्या त्या वयात-त्या काळात बाळासाहेबांच्या हिमालयातल्या उत्तुंग कर्तृत्वाची कल्पना नव्हतीच… मी तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत नव्हतेच… मी भविष्यात कधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाईन आणि कधीतरी पुन्हा बाळासाहेबांच्या मदतीची मला गरज लागेल असं कधी स्वप्नातही वाटलं नाही. पुढे मी हिंदी फिल्म इंडस्ट्रीत आले, अभिनेत्रीच्या रूपात स्थिरस्थावर झाले. माझ्या क्लासिकल नृत्याचा रियाझ, नृत्याचे कार्यक्रम, शूटिंग्ज, मी, आई-वडील असं तिघांचं कुटुंब, माझी समाजसेवेशी निगडित कामं, आशा पारेख हॉस्पिटलची कामं, फिल्म इंडस्ट्री वेलफेयरशी संबधित कामं असे माझेही व्याप वाढत गेले. दुसरीकडे शिवसेना चंद्रकलेप्रमाणे वाढत होती. त्यामागे बाळासाहेबांचे अथक परिश्रम, सामान्य जनतेसाठी त्यांनी केलेली कामं होती, हे मी पाहात होते. एक नि:स्वार्थी, प्रामाणिक नेते म्हणून ते माझ्याही मनावर ठसत गेले. बाळासाहेबांचे महाराष्ट्रभर चालणारे झंझावाती दौरे, त्यांची सूचक बोलकी व्यंग्यचित्रं पाहत होते. या एकाच माणसामध्ये किती कलांचे आश्रयस्थान आहे हे जाणवलं. १० पानांच्या मजकुरातून स्पष्ट होणार नाही इतकं बोधप्रद असं त्यांचं एकच कार्टून असे… ‘गागर में सागर’ म्हणतात, तशी त्यांची व्यंगचित्रं असत…
बाळासाहेबांशी कधी ना कधी फिल्म इंडस्ट्रीच्या कामांसाठी मदतीसाठी भेट होत राहिली. त्यांच्या मातोश्री बंगल्याच्या
ड्रॉइंगरूममध्ये त्यांची भेट म्हणजे अनेक लोकल आणि ग्लोबल इश्युजवर मार्मिक विवेचन असे. अतिशय विद्वान, रोखठोक तरीही प्रेमळ असं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब. मुंबईच्या काँक्रिटीकरणाविषयी, बकाल वस्त्यांविषयी, वाढत्या महागाईविषयी बाळासाहेब अतिशय पोटतिडकीने बोलत. ‘व्होट बँकेसाठी बाळासाहेबांनी कधी खोटी आश्वासनं दिलीत असं घडलं नाही. आपल्या राज्यावर, राज्यातल्या नागरिकांवर निस्सीम प्रेम करणारे बाळासाहेब म्हणजे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते.
त्याच काळात सिने आर्टिस्ट असोसिएशनसाठी एका भूखंडाची आम्हाला आवश्यकता होती आणि त्यांच्या शब्दाने आमचे काम होईल याची खात्री होती. आणि त्याप्रमाणे त्यांची मदत मिळाली. माझ्याचप्रमाणे आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकांनी बाळासाहेबांची भेट घेतलीये, बाळासाहेबांनी त्यांना मदत केली नाही असं घडलं नाही. प्रत्येक भक्ताने परमेश्वराचा धावा करावा आणि ईश्वराने साक्षात दर्शन द्यावे असं रूप, प्रचिती माझ्याप्रमाणेच अनेकांना येत असे. माझ्याच आशा पारेख हॉस्पिटलमध्ये असलेल्या कर्मचार्यांनी संप केला आणि मी अनेकदा मध्यस्थी, तडजोड करण्याचा प्रयत्न करूनही संप चिघळत गेला, यात रुग्णांच्या हालांना पारावार उरला नव्हता. मी हात टेकले आणि बाळासाहेबांच्या दरबारात पोहोचले. त्यांच्याकडे मदत मागितली. तेही त्या काळात निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यग्र असावेत. त्या काळात साहेबांची मदत मिळू शकली नाही. मी निराश झाले. पुढे काय करावं हा प्रश्न अनुत्तरित राहिला. पण अवघ्या काही दिवसांत बाळासाहेबांनी फोन केला आणि माझ्या कामात काही प्रत्यक्ष मदत करू शकलो नाही याबद्दल खंत व्यक्त केली. त्यांचा तो फोन म्हणजे मला धक्का होता. बाळासाहेब ज्या उंचीवर होते, तिथे त्यांची प्रतिमा इतकी मोठी होती, अशा नामांकित राजकीय नेत्याने स्वतः फोन करून माझे काम करण्यासाठी वेळ मिळू शकला नाही, अशी खंत व्यक्त करावी, हे त्यांच्यातील विनम्रता, सौजन्य आणि घरंदाज अदब दर्शवून गेलं… अनेक सद्गुणांची खाण म्हणजे बाळासाहेब होते.
बाळासाहेबांमुळेच सिने आर्टिस्ट असोसिएशनला हक्काचा निवारा मिळाला. त्याच भूखंडावर अनेक वृद्ध, असहाय कलाकारांना घरकुल मिळणार आहे. राज्यातील अनेक लक्षावधी गरजू व्यक्तींसाठी बाळासाहेब म्हणजे मोठा आधारस्तंभ होते. आयुष्यात जेव्हा ठेच लागली, मदतीची आवश्यकता भासली, तेव्हा बाळासाहेब नेहमीच मदतीसाठी तत्पर राहिलेत. त्यांचे ऋण शब्दांच्या पलीकडे होते!