• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

न्यायमूर्ती रानडेंचं हिंदुत्व

- सचिन परब (प्रबोधन १००)

सचिन परब by सचिन परब
August 18, 2021
in प्रबोधन १००
0

प्रबोधनकारांनी न्या. महादेव गोविंद रानडेंची एक छान आठवण लिहून ठेवलीय. त्या निमित्ताने त्यांनी त्यांचं हिंदुत्वही मांडलंय. ते आपण सगळ्यांनीच वाचायला हवं.
—-

जन्म पनवेलचा आणि प्रभाव पूर्ण महाराष्ट्रभर असला तरी प्रबोधनकार तसे मुंबईचेच. वयाच्या चौथ्या वर्षापासून ते आजीबरोबर मुंबईत फेर्‍या मारत असल्याचं त्यांनी सांगितलंय. तेव्हा पनवेल मुंबईशी आतासारखं हायवेने जोडलेलं नसलं तरी समुद्रमार्गे जोडलेलं होतंच. त्यामुळे थोडं वयात येताच, ते पोटापाण्यासाठी मुंबईला चिकटलेच. वडिलांच्या मृत्यूनंतर म्हणजे १९०२पासून ते सतत मुंबईत बिर्‍हाड मांडत होते. त्यामुळे जुन्या काळातली मुंबई त्यांनी जवळून बघितलेली होती. पण त्याच्याही आधीची मुंबई त्यांना माहीत होतीच. ते मुंबईत येण्याच्या आधीची एक गोष्ट त्यांनी `जुन्या आठवणी’ या पुस्तकात सांगितलीय. मुंबईवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने ती वाचायलाच हवी.
`जुन्या आठवणी’ हे पुस्तक १९४८मध्ये प्रसिद्ध झालेलं असलं तरी ही आठवण पां. वा. गाडगीळ संपादक असलेल्या `दैनिक लोकमान्य’मध्ये २७ डिसेंबर १९४२ला पहिल्यांदा छापून आलीय. यातली घटना त्याच्याही ४५ वर्षं आधी घडलीय म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात. म्हणजेच प्रबोधनकार मुंबईत वास्तव्याला यायच्या काही आधीची. तेव्हाचा क्वीन्स रोड म्हणजे आपला मरीन ड्राइव्ह रोज संध्याकाळी मोठमोठे अधिकारी आणि व्यापारी यांच्या आकर्षक घोडागाड्यांनी गजबजलेला असे. आजच्या मुंबईकरांना विक्टोरियाच्या पलीकडे घोडागाडी माहीत नाही. पण तेव्हा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रथासारख्या ऐटबाज घोडागाड्या, त्याला जोडलेले पाच दहा हजार रुपये किमतीचे घोडे, गाडीच्या मागे जरतारी गणवेश घातलेले शिपाई उभे असत; वळण आलं की ते उतरत, घोड्यांचे लगाम हातात घेऊन गाड्या वळवत, पुन्हा धावत जाऊन गाडीच्या मागे उभे राहत. ते पाहण्यासाठी चर्चगेटपासून चौपाटीजवळच्या विल्सन कॉलेजपर्यंत हजारो लोक गर्दी करत. आज मोटारींची धामधूम केवढीही असली, तरी तो घोड्यांच्या गाड्यांचा जुना थाट नि ऐश्वर्य त्यांत मुळीच नाही, असं प्रबोधनकार लिहितात. कारण त्यांनी या घोडागाड्यांचा रूबाब स्वत: मुंबईत पाहिला होता.
क्वीन्स रोड हा त्या काळातला थोरामोठ्यांना हवा खाण्याचा एकमेव राजरस्ता होता. सोनापूर हे आजच्या मरीन लाइन्स स्टेशनला लागून असणारं हिंदूंचं स्मशान तेव्हाही होतंच. आत जळणार्‍या प्रेतांची दुर्गंधी आणि धूर या राजरस्त्यावर पोहचायचा. कारण तेव्हा आतासारखी मोठी भिंत नव्हती. फक्त एक काळ्या दगडांची छोटीशी भिंत होती. त्यामुळे वार्‍याच्या झोताने येणारा वास सहन न होऊन घोडागाड्यांनी फिरणार्‍या गोर्‍या मडमा अस्वस्थ होऊ लागल्या, काही आजारीही पडू लागल्या. त्याने मुंबईतले गोरे लोक बिथरले. त्या काळात गोर्‍यांचा विरोध करण्याची कुणाचीही हिंमत व्हायची नाही. ब्रिटिश सरकार मायबाप होतं. त्यामुळे गोरे म्हणतील पूर्व दिशा असायची. गोरे गवर्नरकडे शिष्टमंडळं आणि अर्ज घेऊन पोचले. गवर्नरने चौकशीसाठी कमिटी नेमली. गोरे भारतीयांना धमक्या देऊ लागले, बघतो तुमचं स्मशान इथे कसं राहतं ते?
मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांनी बांधलेलं सोनापूर स्मशान आता तुटणार. त्यामुळे मुंबईतल्या हिंदूंची बेइज्जती होणार, असं स्थानिकांना वाटू लागलं. प्रश्न फक्त स्मशानाचा नव्हता, आता तर तो धर्माच्या अप्रतिष्ठेचा बनला होता. त्याचा विरोध करणारे अर्ज पाठवले, तर त्याला अर्थ नव्हता. कारण ते कचर्‍याच्या डब्यात जाणार होते. गिरगावात झालेल्या सभांमधून हळूहळू असंतोष दिसू लागला. मराठी माणसाच्या सोबतच गुजराती आणि पारशीही आले. पण अशा सभांनी काहीही होणार नाही, हे सगळ्यांना माहीत होतं. त्यामुळे सगळ्यांना एक पुढारी हवा होता, ज्याचा गोर्‍या साहेबावरही प्रभाव पडेल. सगळी चर्चा एकाच नावापर्यंत पोचू लागली, रावसाहेब न्या. महादेव गोविंद रानडे. ते मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या बॅचचे ग्रॅज्युएट. मुंबई हायकोर्टात जज. सगळे त्यांना शरण गेले.
त्यावर न्या. रानडे काय म्हणाले ते प्रबोधनकारांच्याच शब्दांत वाचायला हवं, कारण त्याचा तसा इतरत्र संदर्भ शोधणं कठीणच होईल. शांत स्वभावाच्या रानडेंचीही भाषा प्रबोधनकारांच्या शाईतून पाझरताना कडक झाली असावी, `बंधूजन हो, घाबरू नका. माझे या प्रश्नाकडे पुरे लक्ष आहे. काही झाले तरी सोनापुराला मी हलवू देणार नाही. आज हे मस्तवाल गोरे आमचे सोनापूर उठविणार. उद्या म्हणतील मुंबापुरीचे देऊळ हालवा नि करा तेथे क्रिकेट ग्रौण्ड. म्हणून काय आम्ही मुकाट्याने सगळे मानायचे? ते होणार नाही.’
प्रबोधनकारांनी लिहिलंय त्यानुसार रानडे हिंदूंचे पुढारी बनून गवर्नरच्या भेटीला गेले. ते गोर्‍या लोकांनाही भेटले. त्यांनी एक मध्यममार्ग काढला. क्वीन्स रोडवर घाणेरडा धूर किंवा किटाळ येतं, त्याचा आम्ही पंधरा दिवसांत बंदोबस्त करतो. स्मशान मात्र हलवू देणार नाही. सोनापुराच्या बाहेर रानडेंनी हिंदू आणि गोरे या दोघांचीही सभा घेतली. त्यात त्यांनी उपाय सुचवला. स्मशानाची भिंत छोटी आहे त्यामुळे धूर क्वीन्स रोडवर जातो. त्यामुळे काळ्या दगडाच्या छोट्या कुसावर पांढर्‍या दगडांची सहाफुटी भिंत उभारू. लगेच वर्गणी देणारे दानशूर पुढे आले. पंधरा दिवसात सहा फुटी भिंत उभारून रानडेंनी सोनापूर वाचवलं.
ही आठवण झाल्यावर प्रबोधनकार शेवटी लिहितात, `वाचक हो, एकदा सोनापूरच्या त्या लांबलचक उंच भिंतीकडे मुद्दाम जाऊन पहा. जस्टिस रानड्यांचे ते कट्टर हिंदुत्वाचे चिरंजीव स्मारक आहे. त्या सहा फुटी कुसाने मुंबईकर हिंदूंचा स्वाभिमान जगवलेला आहे. आमची प्रतिष्ठा सांभाळलेली आहे. नाना शंकरशेटच्या कीर्तीला त्या भिंतीने उचलून धरलेले आहे. ती भिंत अहोरात्र हिंदुत्वाचा नि जस्टिस रानड्यांचा जयजयकार गर्जत असते.’
आता या लोकोपयोगी कामात हिंदुत्व कुठून आलं, असा प्रश्न आपल्याला पडू शकेल. या प्रश्नाचं उत्तर लेखाच्या सुरवातीच्या तीन पॅरेग्राफांमध्ये आहे. त्याला पहिला पॅरेग्राफ जसाच्या तसा असा आहे, `हिंदुत्वनिष्ठा नि हिंदुत्वाचा अभिमान या दोन भावना हिंदुमहासभेने आणि तात्याराव सावरकरांनी अलीकडेच जन्माला घातल्या, असा एक सार्वत्रिक भ्रम आहे. ४०-५० वर्षापूर्वी मुंबईचे गिरगांव म्हणजे हिंदुत्वाभिमानाचा जागता ज्योत बालेकिल्ला होता. तेथे दर आठवड्याला पुराणे, व्याख्याने, कीर्तने, प्रवचने, काही ना काही कार्यक्रम अखंड चालू असे. जस्टिस रानडे, डॉ. भालचंद्र भाटवडेकर, रावसाहेब विनायक कोण्डदेव ओक, बॅरिस्टर दळवी, दाजी आबाजी खरे प्रभृति पुढार्‍यांनी चालविलेल्या ‘हिंदु युनियन क्लब’ म्हणजे गिरगांव बँक रोडवर हिंदुत्वाचे एक मध्यवर्ति केंद्र असे. त्याच्या हेमंत व्याख्यानमालानी विचार-जागृतीचे कार्य चालू ठेवलेले असे. या व्याख्यानासाठी नागपूर, सोलापूर, पुणे, बेळगांव, कोल्हापुराहून मोठमोठे हिंदु पंडित येत असत. या क्लबात स्थानिक गुर्जर पुढारी नि व्यापारीसुद्धा तनमनधनाने भाग घेत.’ या वर्णनातले तात्यासाहेब सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
दुसर्‍या पॅरेग्राफमध्ये फक्त ऐकलेल्या गोष्टी नाहीत, तर त्यात प्रबोधनकारांचा छोटासा सहभागही आहे. दुसरा पॅरेग्राफही जसाच्या तसा, `त्या काळी मुंबईला क्रिश्चन मिशनचे बंड फार. बाटवाबाटवीचा व्यापारहि जोरात चाले. क्रिस्ती उपदेशक आणि हिंदुत्वाचे वक्ते यांच्यात दर रविवारी कोठे ना कोठे मोठे वादहि होत असत आणि ते वाद ऐकायला नि पाद्र्यांची हुर्यो उडवायला माझ्यासारख्या त्या वेळच्या अल्लड पोरांचा तुटवडा मुळीच पडत नसे. प्रार्थना समाजाच्या दिवाणखान्यात रानडे, भांडारकर, चंदावरकर प्रभृतींची प्रवचने दर रविवारी अखंड चालू असत. त्यांनी हिंदुत्वप्रसाराची कामगिरी काही थोडी थोडकी बजावलेली नाही. दसर्‍याच्या मिरवणुकीचा गिरगावातल्या हिंदूंचा थाट आजसुद्धा तसा पहायला मिळत नाही. पूर्वी सगळे हिंदू एका विशेष जिव्हाळ्याने भराभर एकवट जमत असत. आजला सगळ्या गोष्टी करायच्या म्हणून करायच्या म्हणून करायच्या अशा यांत्रिक धाटणीने होत असतात.’ या पॅरेग्राफात प्रबोधनकार सांगतात ती प्रार्थना समाजातली हिंदुत्व प्रसाराची व्याख्यानं रानडे-भांडारकरांनी संत तुकारामांच्या अभंगांवर केलेली प्रवचनं धर्मपर भाषणांच्या ग्रंथात वाचता येतात. आजच्या हिंदुत्ववाद्यांनी ती वाचायलाच हवीत. तेच हिंदुत्व असेल तर कुणी कितीही पुरोगामी असला, तरी त्याचा विरोध करूच शकणार नाही.
तिसरा पॅरेग्राफ जणू काही प्रबोधनकार सांगत असलेल्या हिंदुत्वाची तात्त्विक मांडणीच करतो. तोही पॅरेग्राफ जसाच्या जसा, `बॅरिस्टर दळवी म्हणून एक वृद्ध गृहस्थ असत. ते बहुधा नेहमी वत्तäयांचे आभार मानायला उठायचे. त्यांची एक दोन वाक्ये नमुन्यासाठी आठवणीने देतो. ते म्हणायचे- हिंदू निघाला सिंधूपासून. हिंदू म्हणजे सिंधू. त्याच्या पोटात सारं गडप झालं पाहिजे. बूक, टेबल, स्कूल, रोड, कोट, वगैरे इंग्रजी बाबी आम्ही पुर्‍या हिंदू करून टाकल्या. आता कोणी बुकाला पुस्तक आणि टेबलाला मेज म्हणायच्या यातायातीत पडत नाही. हिंदू हॉटेल, वा काय छान संधि बनला हा! हॉटेलही आता हिंदू बनले. जगांत जे जे आम्हाला उत्तम, उपयोगी आणि हितकारक दिसेल आढळेल ते हिंदुत्वाच्या मुलाम्याने पार आपलेसे करून टाकले पाहिजे. हिंदु हा ऑल अ‍ॅबसॉर्बण्ट (सर्वाकर्षी) असला पाहिजे. जगातल्या उत्कृष्ट गोष्टी आत्मसात करूनच हिंदूचा हा प्रचंड सिंधू आजवर जगलेला आहे आणि यावत्चंद्रदिवाकरौ असाच जगेल.’ हेच तत्त्वज्ञान प्रबोधनकारांनी १९२७च्या गणेशोत्सवात केलेल्या हिंदवी नीळकण्ठीझम या विषयावरच्या भाषणांमध्ये मांडलं होतं. त्याची झलक आपल्याला प्रबोधनकारांच्या `माझी जीवनगाथा’ या आत्मचरित्रात आणि १९३० सालातल्या प्रबोधनच्या दोन अंकांमध्ये वाचता येते.

(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)

Previous Post

स.न.वि.वि.

Next Post

मराठी माणसाची मशाल चिरायू होवो!

Next Post
मराठी माणसाची मशाल चिरायू होवो!

मराठी माणसाची मशाल चिरायू होवो!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.