१८९६पासून जागतिक ऑलिंपिक सामने भरविले जात आहेत. जगभरातील २०६ देश आज या क्रीडा संघटनेचे सभासद असून इ.स. १९०० या साली भारतात जन्मलेल्या (ब्रिटिश इंडिया) नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने, पॅरिसमध्ये भरलेल्या ऑलिंपिकमध्ये ‘भारतीय’ म्हणून सहभाग घेतला होता. धावण्याच्या शर्यतीत त्याने दोन रौप्यपदके जिंकली. इंग्रज आईबापांच्या पोटचा नॉर्मन भारतीय कसा? तो भारतात जन्मला (कोलकाता), भारतातच शिकला म्हणून! त्याने मिळवलेल्या दोन पदकांपैकी एक पदक इंग्लिश म्हणून, तर दुसरे पदक भारतीय म्हणून देण्याचे ठरले. असा या वादावर पडदा पडला! आशिया खंडातून ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारा भारत हा पहिला देश ठरला. १९२०पासून भारत (इंडिया) या नावानेच सहभाग सुरू झाला. ब्रिटिश भारतातच मेजर ध्यानचंद यांनी ऑलिंपिकची तीन सुवर्णपदके भारताला जिंकून दिली (१९२८, ३२, ३६). स्वतंत्र भारतानेही मुख्यत: हॉकीत तसेच कुस्ती, दौड, बॅडमिंटन, नेमबाजी, वजन उचलणे, टेनिस आणि आत्ता (२०२१) भालाफेक अशा मोजक्याच क्रीडाप्रकारांत पदकांची कमाई केली आहे.
भारतात गल्लोगल्लीत लोकप्रिय असलेल्या क्रिकेटला ऑलिंपिकमध्ये स्थानच नाही. ऑलिंपिक सुरू झालं तेव्हा क्रिकेटचे चार संघही नव्हते. तो खेळ लोकप्रियही नव्हता. भारतात क्रिकेटला प्रसिद्धी, पैसा, सत्ताधाऱ्यांचे पाठबळ सर्वकाही असून क्रिकेट संघटना तसा प्रयत्नही करीत नाहीत. धनाढ्य बीसीसीआयला दुय्यम स्थान मिळेल अशी शंका वाटते की ऑलिंपिक गाजविणार्या प्रमुख अमेरिका चीन, जपान, रशिया इ. देशात क्रिकेट खेळलाच जात नाही हे कारण आहे? एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण फक्त सात पदके मिळवणार्या भारतीय पदकविजेत्यांचे मनापासून अभिनंदन करताना भारताचा ऑलिंपिक संघटनेतील आवाज फार फार क्षीण आहे हे लक्षात ठेवू या.
ऑलिंपिक विजयाची क्रमवारी ठरवताना सर्वप्रथम, मिळवलेल्या सुवर्णपदकांचा विचार होतो, एकूण पदकसंख्येचा नाही. इंग्लंडने (यु.के) एकूण पदके जरी ६५ मिळवली तरी त्या देशाला क्रमांक चार मिळाला व जपानची एकूण पदके ५८ म्हणजे इंग्लंडपेक्षा सात कमी असूनही जपान तिसर्या क्रमांकावर मिरवतो, कारण जपानला २७ सुवर्णपदके मिळाली व इंग्लंडला २२. अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, कारण अमेरिकेला सर्वाधिक ३९ सुवर्ण पदके मिळाली. चीनचा क्रमांक दुसरा, कारण चीनची सुवर्णकमाई ३८ पदकांची. अमेरिकेने पुन्हा निर्विवाद नेतेपदावर शिक्कामोर्तब केले ते सुवर्ण ३९, रौप्य ४१, कांस्य ३३ अशी सर्वाधिक एकूण ११३ पदके मिळवून. अमेरिकेने तीनही पदकांवर प्रथम क्रमांक टिकवला आहे. दुसर्या क्रमांकावर अर्थातच चीन उंच व ताठ मानेने उभा आहे. ३८, ३२, १८ अशी एकूण ८८ पदके चीनने मिळवली आहेत. अमेरिका व चीनच्या मानाने जपान हा खरोखरच चिमुकला देश आहे. जपानची लोकसंख्या १२ कोटी ६५ लक्ष म्हणजे महाराष्ट्राहूनही कमी आणि पदकसंख्या २७, १४, १७. एकूण ५८. हाच धागा पकडून आपण ऑलिंपिकमधल्या पहिल्या दहा देशांची पदकसंख्या पाहिली की चित्र स्पष्ट होते. अमेरिका, चीन, जपान आपण वर पाहिलेच आहेत.
सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि एकूण या क्रमाने पदकसंख्या
इंग्लंड २२, २१, २२ (६५).
रशिया २०, २८, २३ (७१)
ऑस्ट्रेलिया १७, ७, २२ (४६)
नेदरलँड १०, १२, १४ (३६)
फ्रान्स १०, १२, ११ (३३)
जर्मनी १०, ११, १६ (३७)
इटली १०, १०, २० (४०)
वरील सर्व देश हे औद्योगिकदृष्ट्या अत्यंत प्रगत असून आर्थिकदृष्ट्याही समृद्ध आहेत. आणखी एक गमतीचा भाग असा की अमेरिका चीन जपान हे सकल घरेलू उत्पादनातही (जीडीपी) अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. त्यांनी तो क्रम सर्वाधिक सुवर्णपदकेही मिळवून टिकवला. इथे भारताची तुलना करणे क्रमप्राप्त आहे. वरील सकल उत्पादनाचा विचार करता भारत पहिल्या सहामध्ये गणला जातो. मग आपण पहिल्या सहामध्ये असण्याऐवजी ४८व्या क्रमांकावर का फेकलो गेलो? सुभेदार (लष्करातील जवान) नीरज चोप्राने ८७.५८ मीटर दूर भाला फेकूनच आपली शान राखली. नाहीतर भारत ६८व्या क्रमांकावर दिसला असता!
ऑलिंपिकच्या पदक क्रमवारीत चीन दुसर्या स्थानावर तर लोकसंख्येत पहिल्या स्थानावर. आपली लोकसंख्या चीनच्या पाठोपाठ दुसर्या स्थानावर असून (१४० कोटी) पदक क्रमवारीत भारत ४८व्या स्थानी. पदकात भारतापेक्षा खूप सरस कामगिरी करणारे अनेक देश आपल्या राज्यांपेक्षाही लहान आहेत. काही देशांची लोकसंख्या तर आपल्या जिल्ह्यांएवढीही नाही! तेही आपल्यापुढे आहेत! मुद्दा असा की आपली अफाट लोकसंख्या असूनही गुणवत्तेत आपली केविलवाणी अवस्था आहे. याचे मुख्य कारण अजूनही आपण दारिद्र्य निर्मूलनात अयशस्वी आहोत. उपाशीपोटी आणि कुपोषितांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. वय वाढते तसे नैपुण्य आपोआप वाढत नाही. अन्नपाणी, वस्त्र, निवारा, शिक्षण, वीज, आरोग्य यासह सर्व सेवासुविधा हक्काने मिळाल्याशिवाय जागतिक दर्जेदार कामगिरी करता येत नाही. या सगळ्यांचं एकत्रित मोजमाप ‘मानवी विकास निर्देशांक’ करतो. त्यात १८९ देशात भारत १३१ स्थानावर आहे. किमान ४० टक्के लहान मुले कुपोषित आहेत. वेचून वेचून १२८ सशक्त सुदृढ क्रीडापटूंना भारताने ३२व्या टोकियो ऑलिंपिकसाठी पाठवले. वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन आणि भालाफेकीत आपण एकूण फक्त सात पदके मिळवली. अशीच सात पदके मिळवणारे इराण, बेलारुस, बेल्जियम, ऑस्ट्रिया आणि अझरबैजान असे देश आहेत. यांची एकत्रित लोकसंख्या महाराष्ट्राइतकी. दर्दैवाची बाब अशी की ३४० सुवर्ण, ३३८ रौप्य, ४०२ कांस्य अशा एकूण १०८० पदकांपैकी एकालाही एकही मराठी भाषिक खेळाडू स्पर्श करू शकला नाही. महाराष्ट्र संपूर्ण भारतात एकूण जीडीपीत अव्वल असूनही ही अवस्था आहे! १९५२ फिनलंड-हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक विजेते खाशाबा जाधव अमर रहे!
मीराबाई चानू मणिपूरची, लोवलिना आसामची, पी. वी. सिंधू आंध्र प्रदेशची. बजरंग, रविकुमार हे दोन्ही मल्ल कुस्तीगीर हरियाणाचे. अर्थातच सुवर्णपदकविजेता नीरज चोप्राही हरियाणाचाच. असे म्हणतात की नीरज हा पानिपतातून (१७६१चे युद्ध) न परतलेला मावळ्यांचा वंशज. असो.
रशियाचे एकसंध संघराज्य (यूएसएसआर) टिकून होते तोपर्यंत अमेरिका-रशिया शीतयुद्धाचे प्रात्यक्षिक ऑलिंपिकमध्ये पाहायला मिळायचे. काटे की टक्कर असायची. १९९१नंतर जुन्या रशियाची १५ राष्ट्रे झाली. तरीही रशियाने २०, २८, २३ अशी ७१ पदकांची भरघोस कमाई करून पाचवा क्रमांक गाठला. ती जागा आता चीनने घेतली आहे.
२०१६ साली रिओ (ब्राझील) ऑलिंपिकमध्ये आपण ११७ जणांचा चमू १५ क्रीडा प्रकारांचा पाठवला होता. एक रौप्य व एक कांस्य अशी केवळ दोन पदके भारताने मायदेशी आणली. दोनवरून एका सुवर्णासह एकूण सात ही हुरूप वाढवणारी बाब आहे.
टोकियो ऑलिंपिकचा स्पष्ट संदेश हा की भरीव पदककमाईसाठी आर्थिक महासत्तेच्या खर्याखुर्या मार्गावरून जायला हवे. आपल्या सीमा चीन आणि पाकिस्तानला भिडलेल्या आहेत. चीनची ३८, ३२, १८ एकूण ८८ अशी कमाई. आपली १, २, ४ एकूण ७ अशी कमाई. फरक फारच मोठा आणि दूरचा आहे. आपली लोकशाही इतकी मजबूत व समृद्ध व्हायला हवी की पदकसंख्या चीनशी तुल्यबळ झाली की चीनलाही लोकशाही व्यवस्था स्वीकारावीशी वाटेल! आपल्यापेक्षा एक चतुर्थांश पाकिस्तानला (शत्रू राष्ट्राला) एकही ऑलिंपिक पदक मिळाले नाही यात धन्यता मानणे हे विकृतीचे लक्षण आहे. त्याने काहीही साध्य होणार नाही. पुढच्या पॅरिस (२०२४) ऑलिंपिकला शुभेच्छा.