स्व. बाळासाहेबांचा कुंचला म्हणजे राजकीय पुढार्यांची खुमासदार व्यंगचित्रे असा समज प्रचलित आहे… त्यांच्या काळातल्या राजकीय नेत्यांचं व्यक्तिमत्त्व हुबेहूब पकडणारी आणि त्यांच्या व्यंगांवर नेमकं बोट ठेवणारी रेषा बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उमटत असे, हे त्याचं कारण. पण सर्वसामान्य माणसांचं चित्रणही बाळासाहेब किती प्रत्ययकारी पद्धतीने करत आणि सामान्य माणसांच्या भकास आयुष्याचं कसं विरूप दर्शन घडवत, हे या व्यंगचित्रातून समजून जातं… स्वातंत्र्यदिनाचा सोहळा झाला आहे, सत्तापदस्थांनी, राजकारण्यांनी आणि जनतेनेही तो साजरा केला आहे. त्याच्या फाटक्या पताका अजूनही लोंबत आहेत आणि सफाई कर्मचारी या सोहळ्याचा कचरा साफ करत आहेत, त्यात सगळ्या मान्यवरांचे संदेश आहेत… त्या मोठमोठ्या शब्दांमधल्या, लालित्यपूर्ण, प्रासादिक संदेशांचं खरं मोल काय, ते या चित्रातून बाळासाहेबांनी लख्खपणे दाखवून दिलं आहे. यातलं कचरावेचकांचं व्यक्तिचित्रण किती सहृदयतेने केलेलं आहे, तेही पाहण्यासारखं आहे… काळ बदलला तरी फार काही बदललेलं नाही… फक्त कचरा आकर्षक झाला आहे… आता स्वातंत्र्यदिनाला लागोपाठ तीन वर्षं एक लाख कोटींच्या एकाच स्वप्नरंजक घोषणेचा शिळाच कचरा पडतो आहे…