जगात दररोज कसला ना कसला दिवस साजरा होत असतो. २३ मे हा दिवस ‘जागतिक कासव दिवस’ (वर्ल्ड टर्टल डे) म्हणून साजरा केला जातो. अमेरिकन टॉरटॉईझ रेस्क्यू (एटीआर) या संस्थेने ‘जागतिक कासव दिवस’ ही संकल्पना सर्वप्रथम रुजवली आणि आज जगभर कासवांच्या विविध प्रजातींच्या संवर्धनाच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कासव हा गंभीर प्राणी आहे आणि गंभीरतेस टीआरपी नसतो. त्यामुळे आपल्याला ‘जागतिक कासव दिवस’ माहित नसणे साहजिक आहे.
इंग्रजी भाषेत, इंग्रजांनी आपल्या डिव्हाइड अॅण्ड रूल या स्वभावधर्माला जागत कासवांमध्ये टर्टल (म्हणजे मुख्यत्वे पाण्यात राहणारे) आणि टॉरटॉईझ (म्हणजे मुख्यत्वे जमिनीवर राहणारे) अशी फूट पाडली. आपण भारतीय, जातीजातींत भेदभाव करण्याबद्दल आणि रूप, रंग, शारीरिक व्यंग यावरून एकमेकांना नावे ठेवण्याबद्दल बदनाम असलो तरीही केवळ शारीरिक वैविध्यावरून गरीब बिचार्या कासवांत भेदभाव करणे आपल्याला योग्य वाटले नाही. म्हणून आपण दोघांनाही कासवच (टर्टलला फार तर समुद्री कासव) म्हणतो.
भारतीय संस्कृतीत कासव हे बुद्धिमत्ता आणि स्थैर्याचे प्रतीक मानले गेले असून वास्तुशास्त्राप्रमाणे कासवामुळे घरात शांतता नांदते आणि सुबत्ता येते. अशी अक्षरशः फुकटात कासवाच्या पायाने घरामधे शांती आणि सुबत्ता येणार असेल, तर मी अंधश्रद्धाळू ठरण्याचा धोका पत्करायला तयार आहे. पुढील निवडणुकीत, अच्छे दिन आणण्याचे, विदेशातील काळा पैसा आणण्याचे किंवा पंधरा लाख रुपयाचे कधीच पूर्ण न करता येणारे आश्वासन देणार्या राजकीय पक्षापेक्षा, प्रत्येक घरी एकेक कासव देण्याचे आश्वासन देणार्या पक्षालाच मी मत देईन.
शास्त्रज्ञांच्या मते, कासवं वीस करोड वर्षांपासून या पृथ्वीतलावर आहेत. म्हणजे कासवांच्या तुलनेत आपण मानव या जगात अगदीच उपरे आहोत. उद्या कासवातील एखाद्या भूमीपुत्राचा स्वाभिमान जागृत झाला तर ते आपल्याला या पृथ्वीवरून घालवून द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे माणसाने कासवांशी सुलह करून राहावे हेच बरे!
आज जगात कासवांच्या ३१८हून अधिक प्रजाती आहेत, त्यापैकी कित्येक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु या आद्य भूमिपुत्रांना वाचवावे, त्यांचे संवर्धन करावे असे आपल्याला वाटत नाही आणि भिडस्त स्वभावधर्मामुळे कासवंदेखील ‘आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आम्हाला वाचवा’ असं म्हणत मेणबत्ती मोर्चे काढीत नाहीत, कुणाच्या घरासमोर हनुमान चालीसा गात नाहीत की कुठला हॅशटॅग चालवीत नाहीत.
कासवांच्या किती प्रजाती भारतात आहेत याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. तेही बरोबरच आहे म्हणा! अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यावर, आपला जीव जगविण्यासाठी अनवाणी पायांनी चालत किती माणसं गेली? त्यातील जगली किती अन मेली किती? कोरोनाचा प्रादुर्भाव नक्की किती लोकांना झाला? त्यातील जगली किती अन मेली किती? शेतकरी आंदोलनात मेलेल्या शेतकर्यांचा आकडा किती? गंगेत वाहिलेल्या शवांची संख्या किती? असा कुठलाही हिशेब ठेवण्याचा आपल्याकडे रिवाज नसल्याने, नष्ट होऊ घातलेल्या कासवांच्या प्रजातींची, त्यांच्या जगण्या-मरण्याची आपल्याला फारशी माहिती असण्याची शक्यता कमीच आहे.
पुराणकाळात समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूने घेतलेल्या कूर्मावताराची कथा आणि लहानपणी ऐकण्यात आलेली ससा-कासवाच्या शर्यतीची गोष्ट याव्यतिरिक्त भारतीयांच्या भावविश्वात कासवाला फारसे स्थान नाही. त्यातही समुद्रमंथनाच्या वेळी कूर्मावतार घेऊन मंदार पर्वत पाठीवर तोलून धरणार्या भगवान विष्णूची कथा ठाऊक असलेल्या जनतेपेक्षा ससा-कासवाच्या शर्यतीची गोष्ट ऐकून मोठे झालेल्या (किंवा लहानच राहिलेल्या) लोकांची संख्या नक्कीच मोठी आहे.
ससा आणि कासवाच्या शर्यतीची कथा कुणीतरी रचली, ती प्रचंड लोकप्रिय झाली आणि भाकडकथांना डोक्यावर घेऊन नाचण्याची सवय असणारे आपण ती खरीच मानून बसलो. या कथेपुरता कासवाच्या स्लो बट स्टेडी असण्याचा गवगवा होत असला तरी प्रत्यक्ष आयुष्यात लोकांना कासवापेक्षा सशाचं भारी कौतुक असतं. पण कासवाची आणि माझी फिलॉसॉफी सारखीच आहे. गोंडस दिसणारा, तुरुतुरु पळणारा, हिरवा पाला खाणारा, तरतरीत राहणारा ससा जेमतेम दहाबारा वर्षे जगतो. तर धावपळ न करणारं, सुस्तपणे पडून राहणारं, मिळेल ते खाणारं कासव शे-दीडशे वर्षे जगतं. मी म्हणतो, मग कशाला उगीच ती डायटिंग, व्यायाम आणि कामधंद्यासाठी उरस्फोड करा?
मी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकतो तेव्हा मला अनेक प्रश्न पडतात आणि काहीतरी उत्तरं देऊन मीच माझी समजून काढतो. ‘दुपारी बारा वाजेपर्यंत झोपून राहायला शिकविणारा’ एक कोचिंग क्लास दादरला असल्याचे माझ्या ऐकिवात आहे. पण भर शर्यतीत झोपण्याची कला सशाने कुठून आत्मसात केली असावी हे काही माझ्या ध्यानात येत नाही. कदाचित तो ससा पुण्याचा असेल आणि शर्यत असो की आणखी काही, नियमाप्रमाणे तो दुपारी एक ते चार झोपला असेल, असं मी मला समजावतो.
शांत रक्ताचा प्राणी असलेल्या आणि तासाला जेमतेम २७० मीटर इतका चालण्याचा वेग असलेल्या कासवाने सशासोबत शर्यतीचं आव्हान कसं काय स्वीकारलं असेल असा प्रश्न मला पडतो. आयुष्यात काहीच करता न आलेले बोलबच्चन लोक मोटिव्हेशनल स्पीकर बनतात आणि ‘तू ठरवलंस तर काहीही करू शकतोस’, ‘तूच आहेस तुझ्या आयुष्याचा अॅडमिन’ असं सांगून जमिनीवरून दोन बोटं वरून चालू लागतात. मला डाऊट आहे की गोष्टीतले ते कासव अशाच कुणातरी मोटिव्हेशनल स्पीकरच्या नादी लागलं असावं.
असंही असू शकते की रस्त्यात सशाला कुठेतरी मोफत वायफाय कनेक्शन मिळालं असावं. तो सोशल मीडियाच्या जंजाळात अडकला असावा आणि कासवाकडे स्मार्टफोन नसल्याने ते चालत राहिलं असावं. किंवा असंही असू शकेल की, ससा आणि कासवाच्या शर्यतीत कासवाची टीम सत्ताधारी पक्षाने किंवा त्यांच्या एखाद्या पाठिराख्याने खरेदी केली असेल आणि कासव जिंकावं म्हणून ईडीची भीती दाखवून सशाला हरायला लावलं असेल.
असं म्हणतात की पश्चिम बंगाल विधानसभेत झालेला पराभव जसा बीजेपीच्या जिव्हारी लागलाय तसाच कासवाकडून झालेला पराभव सशाच्या जिव्हारी लागलाय. आज इतकी वर्षे झाली तरी त्या पराभवाची सल सशाच्या मनातून गेली नाही. म्हणून सशाचे डोळे अजूनही लाल असतात. तो ससा मला कुठे भेटला तर ‘कोणताही विजय अंतिम नसतो आणि कोणताही पराभव जीवघेणा नसतो’ हे विन्स्टन चर्चिलचं वचन मी त्या हरलेल्या सशाला सांगेन. पुढे त्याला मी हेही सांगेन की, बाबा रे, एक छोटीशी चूक आणि त्यामुळे झालेला पराभव इतका मनाला लावून घेऊ नकोस. स्वतःला शहाणा समजणार्या आम्हा मानवांच्या हातूनही चुका होतातच. माझंच उदाहरण घे. मागील निवडणुकीत एका अशा राजकीय पक्षाला मत देण्याची घोडचूक मी केलीय की शरमेने माझ्या हाताच्या बोटाने आपले तोंड काळे करवून घेतले होते! असो.
नष्ट होत चाललेल्या कासवांच्या प्रजातींचे आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांचे संवर्धन यावर मध्यंतरी एक डॉक्युमेंट्री पाहिली. त्या डॉक्युमेंट्रीच्या शेवटी, प्रेक्षकांनी कासव संवर्धनाच्या कामासाठी निधी उभारावा असं आवाहन करण्यात आलं होतं. ते ऐकून एक मित्र बोलला की, हे सिनेमावाले दुसर्यांना निधी देण्यासाठी आवाहन करतात पण स्वतःच्या खिशात हात घालीत नाहीत. स्टीव्हन स्पीलबर्ग या दिग्दर्शकाने ‘ज्युरासिक पार्क’ हा सिनेमा बनवून लाखो डॉलर्स कमावले. या सिनेमात डायनोसॉरचा म्हणून जो आवाज वापरलेला आहे तो प्रत्यक्षात कासवांचा (समागमाच्या वेळचा) आवाज आहे. या आवाजासाठी व्हॉइसओव्हर आर्टिस्ट म्हणून कासवांचे मानधन बाजूला काढले तरी त्यातून कासव-संवर्धनाला खूप हातभार लागू शकेल.
जागतिक कासव दिनावरून आठवलं, माणसाच्या मनाच्या एकटेपणाचा नेमका शोध घेणारा, नैराश्येच्या अंधारात आलेला आशेचा किरण आणि त्याची वेळीच जाणीव होणं, किंवा ती जाणीव कुणीतरी करुन देणं याचं महत्त्व पटवून देणारा ‘कासव’ नावाचा एक नितांतसुंदर मराठी सिनेमा मध्यंतरी आला होता. एका पात्राचं मन अस्थिर असणं आणि मनाच्या अशाच अस्थिरावस्थेतून गेलेल्या दुसर्या पात्राला त्या अनुभवातून आलेलं शहाणपण अशा विरोधाभासी मनोव्यापाराला ऑलिव्ह रिडले कासवांच्या जगण्याचे संदर्भ आणि छोटे-मोठे तपशील देत एक सुंदर अनुभव या सिनेमात मांडला आहे. इथे कासव हे नैराश्यात गेलेल्या व्यक्तीचे प्रतीक आहे. कासव स्थितप्रज्ञ असते, विपरीत-प्रतिकूल परिस्थिती असेल तेव्हा ते स्वतःला आक्रसून घेत आपल्याच कोशात जातं. मानवी मन आजारी पडतं; तेव्हा तेही असंच कोशात जातं. मनाचा गोंधळ होतो, घुसमट होते, जगणं नको वाटतं. आपण हळूहळू संपत चालल्याची जाणीव होऊन नैराश्य दाटून येतं. एक अनामिक भीतीचा डोंगर मनात उभा राहतो. काहीच करावंसं वाटत नाही. त्या वेळेस माणसाला औषधोपचाराबरोबरच मायेच्या माणसांच्या सहवासाची गरज असते. आजूबाजूच्या मायेच्या माणसांनी गोंजारलं, दोन मायेचे शब्द बोलले तर मनाला हिरवी पालवी फुटते. मन सावरू शकतं. हा संदेश देत, माणूस आणि कासव याची समांतर मांडणी हा सिनेमा करतो.
संपूर्ण आयुष्य पाण्यात काढलेली कासवीण अंडी घालण्यासाठी किनार्यावर वाळूत येते आणि अंड्यांमधून पिल्लं बाहेर यायच्या आत परत पाण्यात निघूनही जाते. नुकतीच जन्माला आलेली ती छोटीछोटी पिल्लं मग धडपडत, पाय मारत, एकमेकांबरोबर असूनही एकेकटीच अशी समुद्राच्या दिशेनं प्रवास करतात. लाटांच्या थपडा खात, इतर प्राणिमात्रांपासून स्वतःचा बचाव करीत भर समुद्रात पोहोचतात. मात्र, त्या कासवीणीला समुद्रात वावरणार्या शेकडो पिल्लातील आपलं पिल्लू कुठलं ते कळत नाही. मग समुद्रातील प्रत्येक कासव-पिल्लाला ती स्वतःचं पिल्लू समजून त्याच्यावर प्रेम करते. ‘जागतिक कासव दिनाच्या निमित्ताने आपण कासवीणीकडून ‘सर्वांना आपलं म्हणण्याचा’ हा एक गुण जरी घेतला तरी खूप आहे.