शेजारी समजू शकतो, हे पाजारी काय असतं?
– अशोक परब, ठाणे
आता तुमचं नाव कसं अशोक बिशोक आहे.. तसं!
श्रीलंकेमध्ये जे अराजक माजले आहे, तसे भारतात होईल का? इथले लोक राजकीय नेत्यांचे आलिशान महाल पेटवून देतील का?
– मिलिंद गवई, रामटेक
नाही… त्यासाठी रक्त तापावं लागतं… इथे धर्माने रक्त तापतं… इतर बाह्य गोष्टी आपल्याला जीवनावश्यक नाहियेत.
सुशिक्षित माणूस आणि सुसंस्कृत माणूस यांच्यात काय फरक आहे?
– राधिका देवरे, श्रीरामपूर
हॉटेलमध्ये जाऊन मेनूकार्ड वाचून ऑर्डर सोडणारा सुशिक्षित, पण विनम्रपणे वेटरला बोलावून खायला मागवणारा सुसंस्कृत!
शोधिसी मानवा, राऊळी मंदिरी, नांदतो देव हा, आपुल्या अंतरी, हे माणसांना कळण्यासाठी काय करायला हवे?
– इब्राहिम तांबोळी, एरंडवणा
लोक जोपर्यंत हतबल, दुर्बल आहेत, तोपर्यंत किती सांगून उपयोग नाही. ते देव शोधतच राहतील… त्यातच त्यांचे सौख्य सामावले आहे.
नाटक हे लेखकाचे माध्यम आहे, दिग्दर्शकाचे माध्यम आहे की नटाचे माध्यम आहे? सिनेमाबद्दल काय सांगाल?
– आर्या जोशी, ठाकुर्ली
नाटक नटाचे माध्यम आहे, सिनेमा दिग्दर्शकाचे.
‘सारखं छातीत दुखतंय’ या नाटकापासून प्रेरणा घेऊन मी ‘सारखं पोटात गुडगुडतंय’ असं नाटक लिहायला घेतलंय… त्यात तुम्ही प्रमुख भूमिका कराल काय?
– करण चव्हाण, महाल, नागपूर
हो. तुम्ही निर्माते असाल तर नक्की.
पैसा झाला मोठा, पाऊस आला मोठा, या कवितेतून आपण लहानपणीच मुलांना फसवाफसवी करायला शिकवतो, असं नाही का वाटत?
– इरफान मोमीन, सेलू
नाही… यमक जुळवायला शिकवायला पाहिजेत… विरंगुळ्यामध्ये मज्जा असते… त्यात वास्तव घालू नका… विनोद म्हणूनच घ्या.
बायको माहेरी जाण्याची धमकी रोज देते. पण जात नाही. ती खरोखरच जावी, यासाठी काय करता येईल?
– विश्वंभर काटे, सोलापूर
तुम्ही स्वत:च का कुठे निघून जात नाही…???
ऑफिसातल्या बॉसचा खडूसपणा कमी व्हावा यासाठी काही मंत्रतंत्र, वशीकरण, जपजाप्य, इष्टदेवतेचं स्मरण, अभिषेक, नारळ, तेल वाहणं असा काही उपाय आहे का हो?
– रेवा पुराणिक, यवतमाळ
उपाय एकच… काम नीट करा… वेळेवर कामावर जा… दांड्या मारू नका… त्यासाठी खोटं तर अजिबात बोलू नका.
देवाला माणसाने घडवले आहे की देवाने माणसाला? माणसाने देवाला घडवले असेल, तर माणसाला कोणी घडवले?
– आनंद देशपांडे, सातारा
माणसाला माणसानेच घडवलं आहे… पण त्याचं श्रेय त्याने घेतलं तर कुणी आपल्याला मानणार नाही हे कळलं आणि त्याने ते कर्म अज्ञातांवर टाकले… म्हणजे देव.
हिंदी वेबसिरीजमध्ये उत्तम अभिनेते चमकत आहेत. तुमचा अफलातून अभिनय देशभरातल्या प्रेक्षकांना त्या माध्यमातून कधी पाहायला मिळेल?
– संदीप मोरे, अहमदाबाद
बोलावतील तेव्हा खरं.
लोकांच्या मोबाइलची कॉलर ट्यून ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ अशी असते आणि मुलं इंग्लिश माध्यमात शिकत असतात, त्यांना मराठी बोलता येत नाही, हे हेच पालक कौतुकाने सांगतात. अशाने मराठी टिकणार कशी?
– समीरण बोडस, आटपाडी
कशाला टिकायला पाहिजे…??? भाषा ही नेहमी संस्काराने वाढते… व्यवहारात जी भाषा असते ती टिकतेच… आणि जे नश्वर आहे ते जाणारच… तुमच्या आमच्या हातात काही नाही…