देवेंद्रजी, तुम्ही मानसिंग असाल किंवा खंडू खोपडे!
मा. देवेंद्र फडणवीसजी, मी हिंदू आहे आणि पूर्वजन्मावर माझा विश्वास असून १८५७ साली मी झाशीची राणी किंवा तात्या टोपेंच्या सैन्यात असेल, असं काहीतरी तुम्ही म्हणाल्याचं वृत्त आज वाचनात आलं. मला तुमच्या या दाव्याबाबत शंका वाटते. कारण मराठी माणसाशी, महाराष्ट्राशी द्रोह करण्याची तुमची आणि तुमच्या पक्षाची वृत्ती आहे आणि ती आजची नाही तर पूर्वीपासूनची आहे.
झाशीची राणी म्हणजे लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर या मूळ मराठी मातीतील शूर कन्या. तात्या टोपे म्हणजेच रघुनाथ पांडुरंग टोपे हेही मूळ मराठी मातीतले शूर योद्धा. तुम्ही यांच्यासोबत कसे असाल? हां.. आपल्या मागावर असलेल्या ब्रिटिशांना गुंगारा देण्यासाठी तात्या टोपेंनी ज्या आपल्या मानसिंग नावाच्या मित्राकडे मदत मागितली आणि नंतर त्यानेच ब्रिटिशांना तात्यांची खबर देऊन त्यांना अटक करवली, तो मानसिंग तुम्ही त्या जन्मात असू शकाल.
त्यापूर्वी शिवकाळातही तुम्ही असाल तर खंडूजी खोपडे किंवा चंद्रराव मोरे किंवा असेच कोणी असू शकाल. त्यानंतरच्या पेशवे काळात तुम्ही असाल (असाल म्हणजे काय..त्या काळात तर तुम्ही असायलाच हवे..!) दुसरे बाजीराव किंवा त्याच्यासोबत असाल! त्यानंतर देशस्वातंत्र्य चळवळ काळातील जर तुमचा एखादा जन्म असेल तर तो क्रांतिकारकांच्या, चळवळींच्या नेत्यांच्या खबरा.. जावू द्या… आणि या सुरु असलेल्या जन्मात तर तुम्ही भाजपचे नेते आहातच..!
– रवींद्र पोखरकर
शांतपणे काम करणारे सुभाषजी आणि मविआ सरकार!
‘महाविकास आघाडी सरकार नाकाम आहे’, असा एकांगी प्रचार सध्या अथकपणे सुरू आहे. ‘काँग्रेसने सत्तर वर्षांत फक्त पैसे खाल्ले’, असा ज्यांनी प्रचार केला, तेच लोक महाराष्ट्रात तसाच भोंगा वाजवत सध्या आवाजी प्रदूषण करत आहेत. महाविकास सरकारच्या काळात काही चुकीची कामे झाली, पण काही चांगली कामेही सुरू आहेत, एवढाच माझा मुद्दा आहे. म्हणजे एकतर्फी पद्धतीने बोलणे चुकीचे आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात ‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही योजना सध्या राबवली जात आहे. महाराष्ट्रातील सहा विभागांतील सर्व ३६ जिल्ह्यांमधून १३१ निर्यात करता येऊ शकतील, अशी उत्पादने निश्चित करण्यात आली आहेत. या उत्पादनांच्या मार्केटिंग आणि प्रचारासाठी ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’, म्हणजेच ‘ओडिओपी’ योजनेविषयी पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाविकास सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील १३१ निर्यात संभाव्य उत्पादनांची सविस्तर माहिती त्यात दिली आहे. राज्य सरकारने ‘महाराष्ट्र निर्यात प्रचालन परिषद’ स्थापना केली असून, ती राज्यात निर्यातीवर आधारित सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसह सर्वच उद्योगांना मदत करते. तसेच महाविकास आघाडी सरकारने ‘जिल्हा निर्यात प्रचालन समित्यां’ची स्थापना केली आहे. जिल्ह्याचा निर्यात कृती आराखडा निश्चित करणे, हस्तकला, कृषी आणि फलोत्पादन उत्पादनांचा प्रचार करणे, निर्यातीचा डेटाबेस तयार करणे, जिल्हास्तरावर गोदाम, शीतगृह चाचणी प्रयोगशाळा इत्यादी पायाभूत सुविधांची उपलब्धता निश्चित करणे, निर्यातदारांसाठी निर्यात कर्जाची उपलब्धता करून देणे हे काम जोरात सुरू आहे. महाराष्ट्रातून वर्षाला ६० अब्ज डॉलर्स इतकी निर्यात होते आणि पुढील काही वर्षांत शंभर अब्ज डॉलर्सवर ती नेण्याचे उद्दिष्ट आहे. निर्यातीत महाराष्ट्र देशात आघाडीवरील राज्य आहे. साखर आणि तांदूळ निर्यातीत महाराष्ट्र देशात नंबर वन आहे. राज्यात आज भाभोंपची, म्हणजेच ‘भारतीय भोंगा पक्षा’ची सत्ता असती आणि मुख्यमंत्रीपदी ‘नागपुरी भोंगा’ असता, तर त्यांनी किती ढोल बडवले असते, याची नुसती कल्पनाच करू शकतो आपण!
असो. महाविकासच्या या निर्यात कर्तृत्वाचे श्रेय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाच द्यावे लागेल. कणकवलीच्या सूक्ष्मजीवीप्रमाणे फुकाची बडबड न करता, सुभाषजी शांतपणे काम करत असतात. ‘महाभकास, महाभकास’, ‘महावसुली, महावसुली’ असे शिव्याशाप देणार्यांनी, या वास्तवाकडेही नेहमीच्या सवयीप्रमाणे जरूर कानाडोळा करावा व कडाकडा बोटे मोडावीत!
– हेमंत देसाई
…तरीही ‘अवतार’ मराठीत नाही
२०११च्या जनगणनेनुसार हिंदी ५२.८३ कोटी, बंगाली ९.७२ कोटी, मराठी ही ८.३ कोटी, तेलगू ८.११ कोटी, तमिळ ६.९ कोटी, कन्नड ४.३७ कोटी तर मल्याळम ३.४ कोटी लोकांची भाषा आहे. भारतात सर्वाधिक बोलणार्या भाषिकांच्या संख्येनुसार हिंदी प्रथम, बंगाली दुसर्या तर मराठी तिसर्या क्रमांकावर येते. तेलगू चौथ्या क्रमांकावर आणि त्यानंतर तमीळ, कन्नड, मल्याळी इ. भाषा येतात.
जगात सर्वाधिक बोलणार्या भारतीय भाषिकांच्या संख्येनुसार हिंदी तिसर्या, बंगाली ७व्या आणि मराठी १०व्या क्रमांकावर येते. त्यानंतर तेलगु १३व्या, तमीळ २०व्या आणि मल्याळी २७व्या क्रमांकावर येतात. थोडक्यात, एकूण आकडेवारीनुसार जगात काय आणि भारतात काय, मराठीचा क्रमांक हा हिंदीच्या खालोखाल असला तरीही तेलगू, तमीळ, कन्नड, मल्याळी या दाक्षिणात्य भाषांच्या वरच आहे.
तरीही… जगातील १६० भाषांमध्ये प्रदर्शित होणारा अवतार-२ हा चित्रपट भारतामध्ये मात्र हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळी या पाच भारतीय भाषांमध्येच दाखवण्यात येणार आहे. मराठीत नाही!
– आनंद भंडारे