‘आणखी एक मोहेंजो दारो’ ही ख्यातनाम चित्रपट अभ्यासक, समीक्षक अशोक राणे यांनी गिरणगाव व तिच्या संस्कृतीवर केलेली डॉक्युमेंटरी. या डॉक्युमेंटरीला उत्कृष्ट बायोग्राफिकल-ऐतिहासिक फिल्मचा २०२२चा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तिचे शोज व्हायला सुरुवात झाली तेव्हापासूनच ती बघायची होती. नुकताच तिचा एक शो प्रबोधन क्रीडाभवन, गोरेगाव येथे झाला तेव्हा ती बघायला मिळाली. अशोक राणेही तिथे उपस्थित होते.
बघून पहिलाच विचार मनात येतो हे इतकं महत्त्वाचं आणि मोठं काम झालेलं आहे याला डॉक्युमेंटरी, माहितीपट असे म्हणण्याऐवजी गिरणगावचे बायोपिक किंवा त्याचा सांस्कृतिक लेखाजोखा असे काही म्हणायला हवे. यात कुमार केतकर, शारदा साठे, अशोक हांडे, शिवाजी साटम, संदीप पेंडसे, अच्युत पालव, नाटककार-दिग्दर्शक विजय मोंडकर, विजय कदम, नारायण जाधव, लोककलांचे अभ्यासक-तज्ज्ञ प्रकाश खांडगे, डॉ. रवी बापट, अशा अनेक मान्यवर व्यक्ती बोलतात. गिरणगावातील भारतमाता टॉकिजचे कपिल भोपटकर हेही माहिती देतात. त्याचप्रमाणे गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर, प्रकाश रेड्डी हे बोलतात. अन्नपूर्णा ही आधी जेवण-चपात्या पुरवणारी कामगारांनी चालवलेली संस्था होती, तिचा आता अफाट विस्तार झालेला आहे. या संस्थेच्या प्रेमा पुरव अनेकांना माहीत असतील. त्यांनी कामाची सुरुवात गिरणी कामगार कुटुंबांतील महिलांसह केली. त्याच्या सध्याच्या संचालक डॉ. मेधा पुरव सामंत या माहितीपटात बोलतात. श्रीनिवास नार्वेकर यांनी माहितीपटाचे निवेदन केलेलं आहे ते छान आहे, मनोज मुंतशीरसारखे उगाच आवेशपूर्ण नाही किंवा कढ आणणे नाही.
मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती, ती त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी त्यांचा जावई इंग्लंडच्या युवराज याला भेट म्हणून दिली ही मुंबईची सुरुवात, ही माहिती दिली जाते. त्यांनी सात बेटे एकत्र केली त्यातून मुंबई आकाराला आली. मुंबईत साधारण १८५३मध्ये पहिली कापड गिरणी सुरू झालेली होती. कुमार केतकर सांगतात, कृष्णवर्णीयांची गुलामगिरी नष्ट करण्यावरून अमेरिकेच्या साऊथ भागात १८६१मध्ये यादवी युद्ध झाले. तो कापूस पिकवणारा भाग होता. कापसाचा पर्यायाने कापडाचा तुटवडा पडला. त्या परिस्थितीवर तोडगा म्हणून मुंबईत आणखी कापड गिरण्या सुरू झाल्या. त्यांची संख्या वाढत जाऊन अनेक गिरण्या येथे उभ्या राहिल्या, ते थेट १९८२च्या दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली संप झाला तिथपर्यंत सुरू होत्या. नंतर काय वाताहात झाली माहिती आहेच. अनेक कारणांनी ब्रिटीश राज्यकाळात कोकणवासियांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले होते, त्यामुळे मुंबईच्या गिरण्यांमध्ये काम करायला कोकणातून अनेक कामगार मोठ्या प्रमाणात आले. तसेच ते देशावरून म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागातून आले, त्याचबरोबर आंध्रातून तेलुगू कामगार आले, हिंदी भाषिक राज्यातूनही आले. इतक्या वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी संस्कृती आणि त्यातून तयार झाली गिरणगावची संस्कृती. त्या वेळेस तिथे साजरे होणारे दहीहंडी, गणेशोत्सव असे उत्सव अशी सगळी माहिती मिळत जाते. सकाळी येणारा वासुदेवही दिसतो. आपण अगदी लक्ष देऊन ऐकतो. मन भटकत नाही.
या डॉक्युमेंटरीत अनेक आठवणी काढल्या जातात. एकेका चाळीतील एकेका खोलीत दहा-दहा कामगार कसे राहायचे, रात्रीच्या पाळीचे कामगार यायचे तेव्हा सकाळच्या पाळीचे कामावर जायचे, म्हणजेच एका पाळीचे कामावर जायचे तेव्हा इतर पाळीचे कामगार ती खोली वापरायचे. ती खोलीही अगदी दहा बाय दहा किंवा थोडीशी मोठी, त्यातच मोरी आणि स्वंयपाकासाठी थोडीशी जागा. त्यातच इतके लोक कसेबसे का होईना पण अॅडजस्ट करून राहायचे. डबे बनवून देणार्या बर्याच स्त्रिया होत्या, फक्त पस्तीस रुपये महिना असा डब्याचा दर असायचा, त्यात चार चपात्या आणि दोन भाज्या असायच्या, कधी नॉन-व्हेज असायचं, इतकंसुद्धा एका स्त्रीने सांगितलं. या डबे देणार्या स्त्रियांचं काम तर दिवसभर सुरू असायचं. कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांचं तिथे वर्चस्व होतं. त्यांना मानणारे अनेक कामगार होते. एखादा कामगार तर असा असायचा त्याने या लाल बावटा युनियनच्या कामाला आयुष्य वाहिलेलं असायचं, झोकून देऊन युनियनचं काम करायचा. एका स्त्रीने सांगितलं तिचे मालक म्हणजे तिच्या नवर्याने पूर्णपणे युनियनच्या कामाला वाहून घेतलेलं होतं, गिरणीतून घरी आला की तो परत युनियनच्या कामाला जायचा. पाच मुलं होती, आमच्या मालकाला त्या मुलांची नावंदेखील माहिती नसतील, असं ती स्त्री हसत हसत म्हणाली. यात थोडी अतिशयोक्ती आहे किंवा हे अपवाद होते असे धरले तरी कामगार आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे किती लक्ष देत, स्वत: मुले उत्साहात शिकतात का, तसे वातावरण होते का, असा प्रश्न मनात येतो. गिरणगावात तेव्हा चांगल्या शाळा होत्या व चांगले शिक्षकही होते, काही मुलांनी लाभ घेतलेला असेल, पण मुलांचे शिक्षण या मुद्द्याची फार चर्चा होताना दिसत नाही म्हणून हा उल्लेख.
संपाची हकीकत खुलासेवार येते. १९८२च्या संपाच्या आधी १९७४मध्ये एक संप झाला होता, तो बेचाळीस दिवस चालला होता अशी माहिती मिळते. त्यात कामगारांना किरकोळ पगारवाढ मिळाली ती चार रुपये, आठ रुपये, बारा रुपये अशी. नंतर १९८२चा संप झाला. कामगारांनी दत्ता सामंत यांना नेतृत्व करायला लावले. हा संप अयशस्वी झाला, गिरण्या बंद पडल्या, अडीच ते तीन लाख गिरणी कामगारांनी नोकर्या गमावल्या हा इतिहास तर माहीत आहेच.
छायाचित्रण व सेट-प्रॉपर्टी यांच्या साह्याने तेव्हाचा काळ अगदी जसाच्या तसा उभा केलेला आहे याला दाद द्यावीच लागेल. यात जुनं फुटेज वापरलेलं आहे, काही प्रसंग पुन्हा जिवंत केले आहेत. अर्थातच लेखन, दिग्दर्शन, निवेदन, ध्वनी या अनेक घटकांचाही त्यात मोठा वाटा आहेच. अशोक राणे हुशार लेखक – दिग्दर्शक आहेत हे लक्षात येतं.
राणे यांनी आवर्जून सांगितलं ही डॉक्युमेंटरी बघितल्यावर लोक नोस्टाल्जिक होतात पण तो त्यांचा उद्देश नाही किंवा ते स्वतः याकडे तसे बघत नाहीत. नोस्टाल्जिक होणे म्हणजेच स्मरणरंजन होणे हे काही प्रमाणात अपरिहार्य आहे. परंतु यातून काय बोध घेता येईल? असं झालं असतं तर-तसं झालं असतं तर याला तर काही अर्थ नाही, आज जी परिस्थिती आहे तिच्यासाठी आपण यातून काय शिकणार? आज मराठी माणसाची मुंबईत वाताहत होत आहे, तो यातून काय धडे घेईल? आजचे मराठी तरुण राजकीय पक्ष व नेत्यांच्या मागे वाहात चालले आहेत काय, सण साजरे करणे यातच मग्न आहेत का यावर तर विचार जरूर होऊ शकतो. गिरणगावातील काही व्यक्ती पुढे फार मोठ्या झाल्या, सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर त्यापैकी एक. त्यांच्याबरोबरच ज्यांनी डॉक्युमेंटरीत निवेदन केलं आहे ते अशोक हांडे, शिवाजी साटम इत्यादी हे सगळे मूळ तिथलेच. पण या व्यक्तींकडे काही कलागुण होते त्या जोरावर या व्यक्ती मोठ्या झाल्या. बाकीच्या लोकांना तर शिक्षण हा एकच मार्ग आहे. त्यावेळेस शिक्षण स्वस्त होतं आणि कमी शुल्कामध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण देणार्यास शाळाही होत्या. सध्याच्या पालकांसाठी स्थिती कठीण आहे, शिक्षण महाग झालेलं आहे. त्याचसह लक्ष विचलित करणार्याल इतर गोष्टी फार वाढलेल्या आहेत. सार्वजनिक उत्सव जास्त काळ, जास्त जोरात होता आहेत व तरुण त्यात व्यस्त आहेत. माहितीपट बघून असे प्रश्न मनात येतात.
यात बोलता बोलता शिवाजी साटम म्हणाले की त्यांनी त्यांच्या लहानपणी गाडगेबाबांना अनेकवेळा बघितलेलं आहे. खरोखर तो काळ बघितलेले, त्यावेळच्या माणसांना भेटलेले लोक आहेत, तोवरच ही डॉक्युमेंटरी झाली हे महत्त्वाचं आहे. अशोक राणे व त्यांचे गोव्यातले मित्र राजेश पेडणेकर हे डॉक्युमेंटरीचे निर्माते आहेत. अशोक राणे यांचे संकलन, दिग्दर्शन आहे. नितीन साळुंखे संशोधक आणि समन्वयक आहेत. अनिकेत खंडागळे सिनेमाटोग्राफर आहेत. याची पटकथा जयंत पवार आणि अशोक राणे यांची आहे. अनेक व्यक्तींनी अशोक राणे यांना या डॉक्युमेंटरीसाठी मदत केली, त्यांची नावे शेवटी येतात.
ही डॉक्युमेंटरी बघत असताना मला जयंत पवार यांची आठवण काही ठिकाणी झाली, ती माझी वैयक्तिक भावना होती. दामोदर हॉल आणि त्याच्या बाजूच्या गौरीशंकर छितरमल या मिठाईच्या दुकानाची पाटी दिसते तेव्हा पवार यांची आठवण आली. अधांतर या पवारांच्या नाटकात या दुकानाचा उल्लेख आहे. मध्येच डॉक्युमेंटरीत भजनं म्हटली जातात तेव्हा जयंत पवार यांनी वडिलांवरती जो लेख लिहिला आहे ‘तुझ्या नादानं पाहिली रे तुझीच पंढरी’ त्याची आठवण येते. संपाविषयी जी माहिती दिली आहे तेव्हा तर त्यांची खूपच आठवण आली. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ही जयंत पवार यांची अप्रतिम दीर्घकथा. यात एका कामगाराच्या तीन पिढ्यांचे आयुष्य येते, बिटिया मिलमध्ये महिला कामगारांनी संप केला होता त्याचा उल्लेख येतो. मिल ते मॉल या स्थित्यंतरात कामगारांच्या आयुष्याची वाताहत झाली ते कळते. या कथेवर एक एपिक, अजरामर जागतिक दर्जाचा सिनेमा होऊ शकतो. हा माहितीपट बघून विश्वास येतो की या कथेवर तसा सिनेमा देऊ शकणारे अनेक कलाकार आपल्याकडे आहेत.
– उदय कुलकर्णी