अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरायचा मार्ग माहित होता, परंतु बाहेर पडायचा मार्ग ठाऊक नव्हता. तशीच अवस्था मामु एकनाथ शिंदे यांची आजमितीस झाली आहे. भाजपाने कपटनीतीने शिंदेंना त्यांंच्या चक्रव्यूहात खेचून नेले, परंतु परतीचे सर्व मार्ग ब्लॉक करून टाकले आहेत. आत्ता त्यांची अवस्था ‘सहनही होत नाही व सांगताही येत नाही’ अशी झाली आहे.
त्यांच्याबरोबर ५७ आमदारांचे भवितव्य (त्यातील १२ जणांना मंत्रीपदाची लॉटरी लागल्याने ते तूर्तास बचावले आहेत) अंध:कारमय झाले आहे. सगळ्यात वाईट अवस्था दीपक केसरकर, अब्दुल सत्तार व तानाजी सावंत यांची झाली आहे. हेच लोक एकनाथ शिंदेंची तळी सातत्याने उचलून धरत होते व उद्धव ठाकरेंवर आगपाखड करीत होते. शिंदेंच्या बंडात सामील झालेल्या १६ आमदारांत डॉ. बालाजी किणीकरही होते. ते यंदा चौथ्यांदा निवडून येऊनही त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली नाही, याउलट योगेश कदमसारख्या नवख्याची वर्णी लागली आहे.
शिंदे हे त्यांनी चोरलेल्या शिवसेनेचे नामधारी प्रमुख नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे निर्णय ते स्वतंत्र बुद्धीने घेऊ शकत नाहीत, हे वारंवार सिद्ध झाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्याच आदेशाने उमेदवार निवडावे लागले. विधानसभेच्या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. हे कमी म्हणून की काय, विधानसभेतील निकालानंतरही मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लावायची व कोणाचा पत्ता कट करायचा? याचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुख म्हणवणार्या शिंदेंना नव्हता, तर मोदी शहांनी तो निर्णय घेऊन तो शिंदेंवर थोपवला. अन्यथा तानाजी सावंत, अब्दुल सत्तार व दीपक केसरकर यांना शिंदेंनी वगळलेच नसते. शिवसेनेचा कोकणातील वाढता प्रभाव रोखण्यासाठी केसरकर यांना वगळण्यास भाग पाडून निलेश राणे यांची मंत्रीपदी वर्णी लावून भाजपास बळकटी देण्याचा प्रयत्न झाला. शिंदेंना हतबलतेने या निर्णयास संमती द्यावी लागली.
शिंदेंच्या शिवसेनेचे ५७ आमदार कसे निवडून आले हे सर्वश्रुत आहे. भाजपाची कृपादृष्टी व ईव्हीएमची किमया नसती तर २० आमदारही निवडून येणे कठीण होते. या ५७पैकी १२ जणांना मंत्री पद लाभले असले तरी ४५ आमदार नाराज झाले आहेत. शिंदेंकडे जे आमदार आकृष्ट झाले ते शिंदेंकडे अलौकिक नेतृत्व गुण होते म्हणून मुळीच नाही. त्यांच्यापेक्षा किती तरी ज्येष्ठ नेते शिंदेंच्या सेनेत आहेत, परंतु गद्दारी करण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात नसल्याने नाईलाजाने व सोयिस्कररित्या त्यांनी शिंदेंना नेतृत्व बहाल केले. एकटे केसरकरच शिंदेंपेक्षा कितीतरी ज्येष्ठ आहेत.
शिंदे यांना ईडीची नोटीस येताच त्यांचा खाजगी सचिव फरार झाला होता व नंतर आठ दिवसांतच ईडीतून वाचण्यासाठी १६ आमदार घेऊन शिंदेंनी सुरत गाठली. ईडी व अन्य कारवाईपासून वाचायचे असेल तर माझ्यासोबत या, असे आवतण देऊन ४० भयग्रस्त व नाराजांची मोट बांधली. ‘आम्हाला अदृश्य महाशक्तीचा आशीर्वाद आहे,’ असे म्हणत गुवाहाटी गाठले. तिथे कामाख्या देवीला नवस करून गोवामार्गे लपत छपत मुंबई गाठली व पुढचे काळे कृत्य केले.
मुख्यमंत्रीपद भुषवलेल्या व्यक्तीस उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागणे ही मोठी नामुष्की असते. राजकारणात याचा उपयोग पंख छाटण्यासाठी केला जातो. कोणताही स्वाभिमानी नेता अशी पदावनती स्वीकारणार नाही. परंतु गद्दारीची बीजं ज्यांनी रोवली ते दुसर्यावर विश्वास ठेऊ शकत नाहीत. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद पक्षातील एखाद्या ज्येष्ठ नेत्यास दिले असते, तर ही नामुष्की टाळता आली असती. परंतु कोणतेही विशेष अधिकार नसलेले व शोभेचे असलेले हे असंवैधानिक पद स्वीकारून शिंदेंनी एका पक्षप्रमुखपदाचा, त्या पक्षाचा (चोरलेला असला तरी) घोर अपमान केला आहे.
आत्ता पाच वर्षे देवेंद्र फडणवीसांच्या हाताखाली काम करावे लागेल, अधिकार काहीच नसतील, वरून भाजपा हायकमानच्या हुकूमाचा ताबेदार बनून रहावे लागेल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या एका माजी सैनिकाची लाचारी लांच्छनास्पद आहे. आपले आमदार फुटू नयेत व आपण अनाथ होऊ नये, ही चिंता आत्ता शिंदेंना दिवसरात्र भेडसावत असेल. हा नियतीने उगवलेला सूड आहे, उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर त्यांना ज्या वेदना झाल्या होत्या, त्याची ही अंशत: परतफेड नियती करीत असावी. यालाच इंग्रजीच ‘पोएटिक जस्टीस’, हिंदीत ‘कुदरत का कानून’ व मराठीत ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!’ असे म्हणतात. ही तर सुरुवात आहे. शिंदेंच्या सेनेचे आकाश फाटले आहे. तिला ठिगळ लावण्याचा प्रयत्न म्हणून अडीच वर्षाचे मंत्रीपद हा फॉर्म्युला आणला जात आहे.
राजकारणात कोणीही कोणासाठी थांबत नसतो, नाराजांची मोट बांधून भाजप शिंदेसेनेचे खच्चीकरण करू शकतो. कारण शिंदे सेनेतच भाजपाचे १० आमदार आहेत. शेवटी भाजपा अशी परिस्थिती निर्माण करेल की, शिंदेसेनेचे भाजपात विलिनीकरण करणे भाग पडेल. शिंदेच्या गळ्यात अपघाताने नेतृत्वाची माळ पडली आहे. ५७ आमदार, तेही स्वत:ला कोणतेही अधिकार नसताना सांभाळणे शिंदेंसाठी अशक्यप्राय बाब आहे. भाजपा फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंतच शिंदेंना गोंजारेल. नंतर मात्र त्यांना निष्प्रभ करून टाकेल व सातारा येथील दरे गावी पाठवून देईल. कारण अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर पडूच नये, हीच भाजपश्रेष्ठींची सुप्त इच्छा असावी.
– दिलीप मालवणकर