हेमिंग्वेची ‘फेअरवेल टू आर्म्स’ कादंबरी नकळत्या पौगंडावस्थेत आणि नंतर अनेकदा वाचली. मराठीत लिहिली असती तर पु. शि. रेग्यांच्या कवितेतली ‘ही आहे अगदी साधीशीच कहाणी’ ही ओळ तिच्या नावासाठी वापरली असती. ‘फेअरवेल टू आर्म्स’मधला नायक हेन्री हा हेमिंग्वेच्या इतर मर्दानी नायकांपेक्षा निराळा आहे. विजय तेंडुलकरांच्या कुठल्याशा कथेतला नायक दगडी पुतळ्यासारखा आहे आणि या पुतळ्याच्या छातीत एक नाजूक धडधडणारे ह्रदय आहे. हेन्रीमुळे तो पुतळा आठवतो. कादंबरीबद्दल असलेल्या खर्याखोट्या आख्यायिका (कादंबरीचा शेवट ३९ वेळा बदलला, वगैरे) लिहिण्यात मजा नाही. वाचकांना ते सर्व ठाऊक असेल.
हेन्री आणि कॅथरिन यांच्या अगदी साध्यासुध्या उत्कट प्रेमाची तितक्याच साध्या भाषेत सांगितलेली ही गोष्ट आहे. हेन्री हा रुग्णवाहिकेचा चालक म्हणून सैन्यात भरती झालेला रांगडा गडी आहे. तो वाचकांना मित्र समजून भडाभडा आपली प्रेमकहाणी सांगतो. तो किंवा कॅथरिन कोणीही आलंकारिक भाषेत बोलत नाहीत किंवा कथानकात मेलोड्रामा आणत नाहीत. दोघांमधल्या संवादांनी पन्नास वर्षांपूर्वी वेड लावले होते आणि ती जादू अजून शिल्लक आहे. हेन्री युद्धात जखमी होऊन रुग्णालयात दाखल होतो. कॅथरिन नावाच्या नर्सशी कोरडी ओळख होते. पण निरभ्र आकाशात अचानक ढग दाटून यावेत तसे दोघांत प्रेम दाटून येते. कॅथरिनला फर्ग्युसन नावाची प्रेमळ मैत्रीण आहे. तिला कॅथरिनची काळजी आहे. हेन्रीबद्दल संशय आहे. हेन्रीने कॅथरिनला फसवू नये, चांगले वागवावे अशी तिची तीव्र इच्छा आहे.
हेन्री कॅथरिनचे तपशीलवार वर्णन करत नाही. त्यामुळे हेन्री बनलेल्या वाचकांच्या मनात ‘आपापली कॅथरिन’ साकार होते आणि वावरते. प्रत्यक्ष आयुष्यात भेटलेल्या एखाद्या नर्समध्ये कॅथरिन शोधायचा मोह होतो. दोघातल्या प्रेमाची अभिव्यक्ती दाखवणारा सुरुवातीचा प्रसंग –
‘माझ्यावर प्रेम आहे, असं तू म्हणालास, हो नं?’
‘होय, मी खोटं बोललो. मी असं म्हणालो नव्हतो.’
‘आता तू मला कॅथरिन या नावानं हाक मारशील नं?’
‘कॅथरिन, कॅथरिन.’
ती आजारी पडल्यावर तो तिला भेटायला जातो. पण भेटता येत नाही. तो वॉर्डच्या दारातून बाहेर पडतो आणि ‘अचानक मला एकाकीपण आणि रितेपण जाणवले.’
त्याला एका दिवसासाठी शहर सोडावे लागते. निरोपाच्या वेळी ती स्वतःच्या गळ्यातला शकुनाचा ताईत काढून त्याच्या गळ्यात घालते.
त्याच्या आयुष्यातली आपण पहिली मैत्रीण नाही असे वाटून ती त्याला म्हणते, ‘तू माझा एकट्याचा आहेस. तू इतर कोणाचा नव्हतास. असलास तरी मला त्याची पर्वा नाही. मला त्या मैत्रिणींबद्दल काहीही सांगू नकोस.’
दोघांना कुठेतरी नव्या विश्वात जायचे आहे.
‘तुला कुठं जायचं आहे?’
‘कुठंही नाही.’
‘आपण कुठंतरी निघून जाऊ. कुठं? तुला काही निवड नाही?’
‘मला (तुझ्याबरोबर) कुठंही आवडेल.’
दोघे गाशा गुंडाळून आणि नियमांच्या जंजाळातून स्वतःची सुटका करून घेऊन निघतात. कॅथरिनला दिवस गेलेले आहेत. ती आजारी पडते. प्रकृती गंभीर असल्याचा डॉक्टर इशारा देतो. सीझरियनची शक्यता वर्तवतो. हेन्री स्वतःवर चरफडतो – ‘बिचारी, बिचारी, लाडकी कॅट. प्रेमाचे हेच फळ काय? हाच सापळा आहे. एकमेकांवर प्रेम केल्याबद्दल लोकांना ही अशी शिक्षा मिळते.’ हेन्री असहायपणे स्वतःशी सतत पुटपुटत राहतो की कॅथरिन नक्की बरी होईल, तिला काही होणार नाही. कॅथरिन त्याची समजूत काढून त्याला धीर देते. पण तिची प्रकृती ढासळत जाते.
‘मी आता शूर उरलेली नाही. मी मोडून पडले आहे. त्यांनी मला मोडूनतोडून टाकलंय… मला मरायचं नाहीये, तुला सोडून जायचं नाहीये…’
‘नाही, तू मरणार नाहीस. मी तुला मरू देणार नाही.’
बाळ जन्मते. मरते. तिला ठाऊक नाही.
‘आता मी कशाला भीत नाही.’
‘तुला काही हवंय का कॅट? काही आणून देऊ का?’
‘मी गेल्यावर… आपण दोघे एकत्र असताना तू जसं प्रेम केलंस तसं दुसर्या मुलीवर करू नकोस. मला उद्देशून जे प्रेमाचे शब्द बोललास ते तिला उद्देशून बोलू नकोस.’
‘कबूल.’
‘पण तू एकटा राहू नकोस. दुसर्या मुलींशी जमव.’
‘आता मला कोणीही प्रेयसी नकोच.’ यानंतर डॉक्टर हेन्रीला बाहेर नेतात. आत कॅथरिन प्राण सोडते.
– – –
अशी ही अगदी साधीशीच कहाणी वाचणार्याला गाफील करून झपाटते. नोकरीच्या काळात अनेकदा दौर्यावर असताना मी रात्री हॉटेलच्या खोलीत हिची पारायणे केली आहेत. हेन्री होऊन काल्पनिक कॅथरिनशी हे सारे संवाद केले आहेत. साहिरच्या शब्दात बोलायचे तर – ‘… इतना भी क्या कम है, कि कुछ घडियां तेरे ख्वाबों में खोकर जी लिया मैंने.’
संवेदनशील वाचकाला खर्या आयुष्यात भेटो न भेटो, या कादंबरीत एक साधीसुधी, उत्कट प्रेम करणारी कॅथरिन नक्की भेटते आणि त्याच्या आयुष्यातले काही क्षण हळवे करून जाते.