काँग्रेस हा बाळासाहेबांच्या ‘प्रेमा’चा विषय. देशात, राज्यात सत्ता काँग्रेसच्या हातात होती. त्या पक्षाची अनेक धोरणं सर्वसमावेशकतेच्या नावाखाली एकांगी होत आहेत, या विचारांतून बाळासाहेबांनी काँग्रेसला प्रसंगी कडाडून विरोध केला, काँग्रेसशी दोन हात केले. पण, तेव्हा ‘शत प्रतिशत काँग्रेस’ किंवा ‘विरोधकमुक्त भारत’ असले बालिश आणि विखारी अजेंडे नसल्याने काँग्रेसच्या अनेक नेत्यांबरोबर बाळासाहेबांचा व्यक्तिगत स्नेह होता आणि बाळासाहेबांच्या शब्दाला सत्तावर्तुळातही मान होता. तरीही त्यांनी कुंचल्याच्या आणि लेखणीच्या माध्यमातून काँग्रेसचे वाभाडे काढायलाही कमी केले नाही, त्यात मैत्री आड आली नाही. इथे १९७७ सालातल्या या मुखपृष्ठात काँग्रेसचा चौथरा दुभंगतो आहे आणि यशवंतराव चव्हाण त्याला टेपा लावून जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं दिसतंय. हे सगळं काय चाललंय, या विचाराने बिचारा काँग्रेस कार्यकर्ता संभ्रमात पडला आहे… आज उमेदवारी वडिलांना, अर्ज भरला (पक्षनेतृत्त्वाच्या गळ्यातला ताईत असलेल्या) मुलाने, तोही अपक्ष, त्याला गोंजारतायत महाराष्ट्राचे अनाजीपंत असा सगळा सावळा गोंधळ पाहून हाडाचा काँग्रेस कार्यकर्ता असाच संभ्रमित झाला असेल.