२०२४च्या ब्रिटीश निवडणुकीत मजूर पक्षाचे कीर स्टार्मर ब्रिटनचे पंतप्रधान झाले. २०१०मध्ये सत्तारूढ झालेल्या हुजूर पक्षाला ब्रिटीश मतदारांनी सत्तेतून हाकललं. मजूर पक्षाला ३४ टक्के मतं मिळाली, पण लोकसभेच्या दोन तृतियांश, ४११ जागा मिळाल्या. एक तृतियांश मतं आणि दोन तृतियांश जागा. हुजूर पक्षाला २४ टक्के मतं मिळाली, पण १२१ जागा मिळाल्या. १२ पक्ष निवडणूक लढवत होते. शिवाय काही अपक्षही होते.
अनेक पक्ष, अनेक उमेदवार निवडणुकीत असले की ७० टक्के जनतेचा विरोध असूनही सरकार स्थापन होतं. १९२४ साली म्हणजे शंभर वर्षांपूर्वी पहिल्या प्रथम रॅमसे मॅक्डोनल्ड यांचं लेबर पार्टीचं सरकार तयार झालं होतं. केवळ १९१ जागा मिळूनही अल्पसंख्य लेबर सरकार सत्तारूढ झालं, कारण बाकीचे पक्ष एकी करू शकले नव्हते.
लंडन शहरातल्या मतदारसंघातून निवडून आलेल्या स्टार्मर यांची घोषणा होती ‘परिवर्तन’, (चेंज). दीड वर्ष पंतप्रधानपदावर असलेले मावळते पंतप्रधान ऋषी सुनक हे रिचमंड या यॉर्कशायरमधल्या एका ऐतिहासिक गाव-शहरातून निवडून आले. त्यांची घोषणा होती ‘ब्रिटन महान करू’.
निवडणुकीचे ढोल वाजत होते तेव्हा सुनक यांच्या मतदारसंघातल्या एका माणसाला पत्रकारांनी विचारलं, ‘तुला कोणतं परिवर्तन हवंय?’ त्याचं उत्तर होतं, ‘मला परिवर्तन वगैरे नकोय. पण एक सांगतो. वर वर जरी सारं ठीकठाक दिसत असलं तरी खाली खळबळ आहे, जगणं कठीण झालंय.’
स्कॉटलंडमधल्या एका नर्सबाईचं मत होतं, ‘पुढारी एकजात खोटारडे असतात. त्यांना स्वार्थ महत्वाचा असतो, देश गेला खड्ड्यात. त्यांना आपले खिसे भरायचे असतात.’
निवडणूक होत असताना ब्रिटनची प्रख्यात राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था कोलमडलेली होती. डॉक्टर्स आणि नर्सेस कमी पडत होत्या, दोघंही पुरेसा पगार मिळत नाही म्हणून संपावर जात होते. कितीही गंभीर आजार असो, रोगी कित्येक महिने प्रतीक्षायादीवर ताटकळत असे. मानसिक आरोग्य वाईट स्थितीत असलेली लहान मुलं सल्ला आणि औषधोपचाराची दोन दोन वर्षं वाट पहात होती.
आरोग्य बिघडल्यानं काम न करू शकणार्या बेरोजगारांची संख्या २८ लाख होती. पोष्ट खातं संपावर गेलं होतं. तिथं लोकांचे पगार जगण्याला अपुरे ठरत होते.
घरांच्या किमती पगारवाढीच्या आठपट जास्त होत्या. म्हणजे पगार एक रुपयानं वाढला तर घराची किंमत आठ रुपयानं वाढत होती.
तेच वीज आणि तेलाच्या किमतीबाबत. दररोज घरात लागणारी वीज, थंडीत घर उबदार ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जाही आठपट महाग झाली होती. मध्यमवर्ग पार कोसळला होता.
काम नाही, घर नाही अशा अवस्थेत निराधार झालेल्या लोकांची संख्या ३८ लाख झाली होती. परिणाम? गुन्हेगारी वाढली होती. पोलीस काय करणार? गुन्हेगार सरकार तयार करत होतं, पोलिसांचं काम फक्त त्यांना पकडणं एवढंच होतं. पण पोलिसांची संख्या अपुरी होती, त्यांचं मनोधैर्य खचलं होतं, त्यांच्यातली व्यावसायिक कार्यक्षमता घसरली होती. पकडलेल्या लोकांचं ब्लॅकमेलिंग, पैसे घेऊन पकडलेल्यांना सोडणं असले प्रकार सर्रास होत होते. गोर्या नसलेल्या लोकांना डांबून ठेवणं, छळणं हा तर रोगच पोलीस खात्याला जडला होता.
चांगले वकील न्यायाधीश व्हायला जात नाहीत, कारण न्यायखात्यातही बजबजपुरी, भ्रष्टाचार शिरला आहे. अधिक न्यायाधीश नेमायला पैसे नसल्यानं न्यायाधीशांची संख्याही अपुरी. न्यायालयात खटले साचले होते आणि तुरुंग ओसंडून वाहात होते. शाळा बंद पडत होत्या. ब्रिटनमधल्या सार्वजनिक व्यवस्था कोलमडल्या होत्या, त्यांच्यावर लोकांचा विश्वास उरला नव्हता. सार्वजनिक व्यवस्था कोसळल्या याला हुजूर पक्षाचं अर्थकारण जबाबदार होतं. थॅचर युग सुरू झाल्यापासून सरकारनं सार्वजनिक व्यवस्थेवरचे खर्च आणि गुंतवणूक कमी केली होती, सार्वजनिक व्यवस्था बाजाराच्या हातात सोपवली होती. ब्रिटनची अर्थव्यवस्था थबकली होती, जीडीपीच्या वाढीचा दर मंदावला होता. कर्ज घेऊन व्यवस्था जिवंत ठेवण्याच्या नादात सरकारचा कर्जाचा बोजा इतका वाढला होता की त्या बोजाखाली वाटचाल थबकली होती. खाजगी माणसं आणि उद्योग पैसे गुंतवायला तयार नव्हते, परदेशी गुंतवणूकही मंदावली होती. ‘आमदन्नी अठन्नी खर्चा रुपय्या’ या गाण्यासारखी ब्रिटनची स्थिती होती.
हुजूर पक्ष या स्थितीला कारणीभूत होता आणि स्थिती सुधारण्याला असमर्थ होता. पक्षाची वैचारिक वाढ थांबली होती.
थॅचरवादी धोरण फसलं होतं, थॅचरवादी बाजारव्यवस्थेतल्या त्रुटी लक्षात आल्या होत्या. पण त्यातून वाट काढण्याची क्षमता असणारं एकही मनुष्य हुजूर पक्षात नव्हतं. नवी तात्विक मांडणी तरी हवी होती किंवा तात्विक मांडणी समजा हाताशी नसेल तरी व्यवहार सांभाळण्याचं कौशल्य तरी हवं होतं. दोन्हीच्या नावानं हुजूर पक्षात बोंब होती. बोरीस जॉन्सन
हा माणूस वाचाळ, खोटारडा, भ्रष्टाचारी होता, त्याची अक्कल त्याच्या घशात आणि विस्कटलेल्या केसात होती. ऋषी सुनक हा मॅनेजमेंटची प्रतिष्ठित पदवीप्राप्त असला तरी त्याला राजकारणाचा अनुभव नव्हता, तत्त्व वगैरेचा त्याचा संबंध नव्हता. सध्याच्या खूप शिकलेल्या पण समाजाशी नाळ तुटलेल्या पिढीचा तो प्रतिनिधी होता, अर्थव्यवस्था वगैरे गोष्टी त्याच्या आवाक्यातल्या नव्हत्या, चमकदार शब्द एवढंच काय ते त्याच्या हाती (तोंडी?) होतं.
ब्रेक्झिटचा घोळ होता. युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं की सारं काही ठीक होईल असा भ्रम जॉन्सन आणि कंपनीनं लोकांमध्ये निर्माण केला होता. ब्रेक्झिटही धडपणे अमलात आलं नाहीच. त्यात स्थलांतरितांच्या प्रश्नाची भर पडली. घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं अशी स्थिती होती.
त्यात भर हुजूर पक्षातली निर्नायकी. १४ वर्षात पाच पंतप्रधान म्हणजे सव्वा दोन वर्षाला एक पंतप्रधान. सुनक यांच्या आधी लिझ ट्रस दोनच महिने पंतप्रधान होत्या. सुनक यांच्या वाट्याला पंतप्रधानपद २० महिनेच आलं.
लोक हुजूर राजवटीला कंटाळले होते. मजूर पक्षाकडं ब्रिटनमधील संकटावर उपाय होते? आहेत? तसं दिसत नाही.
एका परीनं मजूर पक्षाची पाटी कोरी आहे. हुजूर पक्षातली धोरणांबाबतची स्पष्टता नाही. हुजूर पक्षातही खूप भांडणं आहेत, सत्तास्पर्धा आहे. जेरेमी कॉर्बिन अतिडावे आणि अव्यवहारी होते. त्यांना पक्ष वाढवता आला नाही. स्टार्मर वाचाळ नाहीत. मध्यममार्गी आहेत. निरलस आहेत, प्रामाणिक आहेत. पण परिवर्तनाचा नकाशा त्यांच्याजवळ नाही. पद घेताना केलेल्या भाषणात ते म्हणाले की परिस्थितीत परिवर्तन आणणं फार कष्टाचं आहे, त्याला वेळ लागेल. म्हणजे किमान १० वर्षं तरी लागतील असा त्यांचा सूर आहे. म्हणजे गंमत पाहा, त्यांना १० वर्षं सत्ता हवीय. तोवर लोकांनी वाट पहायचीय. १० वर्ष लागतील याचा अर्थ ते त्या काळात अर्थव्यवस्था ताळ्यावर आणण्याचे काही प्रयोग करतील, ते प्रयोग व्यावहारिक पातळीवरचे असतील.
स्टार्मर यांनी सांगून टाकलं आहे की तत्व वगैरेच्या किचाटतेकडे आपण जाणार नाही, आपण प्रॅक्टिकल असू. त्यामुळं बाजारवाद, समाजवाद, उदारवाद, सुधारणावाद असे शब्द ते वापरत नाहीत. लोकांचा घरांचा प्रश्न सोडवू, बेरोजगारी कमी करू, सार्वजनिक व्यवस्था आणि संस्था आपण कार्यक्षम करू, लोकांचं जगणं सुसह्य करू असं ते म्हणतात. असं म्हणताना कर कमी करू की वाढवू याबद्दल ते बोलत नाहीत. अर्थव्यवस्थेतली गुंतवणूक वाढवू असं ते म्हणतात, पण ती गुंतवणूक कशी, किती आणि कुठ्रून आणू याबद्दल ते बोललेले नाहीत. सार्वजनिक व्यवस्थेतली गुंतवणूक वाढवून त्या पुन्हा पूर्वीसारख्या करू असं ते म्हणतात, पण त्याचं गणित आणि वेळापत्रक ते मांडत नाहीत.
अर्थव्यवस्था सध्या खाली गेली आहे, अधिक खाली जाणं जवळजवळ अशक्य आहे, त्यामुळे ती सुधारण्याचीच स्वाभाविक शक्यता आहे. ते जमवण्याचा काहीतरी व्यावहारिक मार्ग ते काढतील असं दिसतंय. तात्विक, एकात्मिक अशा कोणत्याही विचारधारेची आवश्यकता नाही असं काही विचारवंतांचं म्हणणं आहे. तशी कोणताही विचारधारा आज शिल्लक दिसत नाही. जशी कशी परिस्थिती समोर येईल तिला तोंड देत जायचं ही मजूर पक्षाची किंवा एकूणच सध्याच्या राजकीय विचारांची दिशा दिसते.
ब्रेक्झिट, स्थलांतरितांचा प्रश्न, युक्रेन, गाझा, इत्यादींबाबत स्टार्मर यांची भूमिका स्पष्ट नाही. काहीही नाकारायचं नाही, काहीही स्वीकारायचं नाही, वेळोवेळी वाट काढत पुढं सरकायचं असं स्टार्मर यांचं धोरण दिसतंय. स्टार्मर यांच्या एकूण मध्यममार्गी व्यक्तिमत्वाशी ते जुळणारं आहे.
अलिकडची सरकारं निगेटिव भावनेवरच निवडून येतात. अमूक अमूक नकोय म्हणून पदरी पडणारा तमुक तमुक आम्ही स्वीकारणार अशा रीतीनं लोकशाही व्यवहाराची वाटचाल आहे. स्वीकारलेल्या तमुक तमुकची लायकी आहे की नाही याचा विचार मतदार करत नाहीत. ब्रिटनही त्याच वाटेचा वाटसरू झालाय.