काही लोक्स असतात, आपण त्यांना जमात अथवा टोळी म्हणू, अगदी आगळेवेगळे, त्यांचे वैशिष्ट्य काय, तर ‘आमच्या वेळी’ या शब्दाचे सतत उच्चारण करणे… कोणताही समारंभ, सण असो, काहीही प्रसंग- अगदी वाढदिवस, साठी शांत, लग्न किंवा मयतसुद्धा, यांचे पालुपद एकच ‘आमच्या वेळी…’!!!
असले लोक, कुठल्याही सण समारंभ, खास करून दिवाळीच्या आधी, आणि त्या काळात ऐन भरात म्हणजे फुल्ल फॉर्मात येतात. आपण सुखनैव फराळ करून दिवाळी अंक चाळायला घेतला की व्हॉट्सअपवर यांचे मेसेज सुरू… हॅशटॅग आमच्या वेळची दिवाळी, बालपणीची दिवाळी, गावाकडची दिवाळी, गेले ते दिन गेले, अशा पोस्टी उदंड पिकतात. दिवाळीची सोनपापडी जशी एकाकडून दुसर्याकडे फिरत राहते, तसेच यांचे मेसेज. त्यात फक्त प्रभू रामचंद्र अयोध्येत प्रवेशला, तेव्हा आम्ही कशी दिवाळी केली, इतकेच वर्णन करणे बाकी असते. बाकी आम्ही इतकी भावंडं, एक फटाका २५ जणांत, एक करंजी १७ जणांत, शेणाने सारवलेले अंगण, भल्या पहाटे अंघोळ, उंचावर टांगलेला आकाश कंदील, यांचे इमोशनल कढ… सर्व यथासांग. सणाच्या आनंदाच्या दिवसात यांची ही रडगाणी डोक्याला शॉट देतात राव.
बरं फक्त दिवाळीपुरते नाही, आजच्या जगातले यांना काही म्हणजे काहीच आवडत नाही. हातात अमेरिका किंवा परदेशात असलेल्या पुत्र किंवा पुत्रीने दिलेला फोन असतो यांच्या, पण हे संस्कारी दिवटे त्यावरून बोलणार काय, तर मोबाईलमुळे जग जवळ आले, पण माणसं दूर गेली. नाती पूर्वीची राहिली नाहीत. आमच्या वेळेला हाताने लिहिलेलं पत्र यायचं. त्यात किती आपुलकी असायची. अरे माणसा, त्या पत्रात कोकणातल्या भावाने शेतावर गुदस्ता झालेला खर्च सांगून, तुझ्या वाट्याला साडेपाच नारळ, दोन केरसुण्या आणि पाच आंबे आलेले आहेत. ते समक्ष येऊन, सही करून घेऊन जाणे, घर दुरुस्त करायला घेतल्याने तुम्ही इथे येऊन राहणे शक्य नाही, असे जास्त लिहिलेले असायचे, हे पण सांग की.
एकाने तर कोरोना साथीच्या वेळी, आमच्या वेळची देवी, फ्लू यांची साथ कशी होती, याचे वर्णन केले होते. जणू चापेकर बंधूंबरोबर हाच धोतर सावरत, रँडच्या गाडीमागे धावत असावा.
या लोकांची ही भूतकाळाची आठवण काढण्याची सवय पूर्ण भारतभरात दिसेल. सकाळचा हास्य क्लब किंवा चालणे या नावाखालचा गावाच्या, देशाच्या चकाट्या मारण्याचा कार्यक्रम आटोपला की हे लोक एकत्र बसून आजूबाजूच्या तरुण प्रजेवर टीका करत राहतात. बायका असतील तर, बघा बाई कसा वेळ मिळतो यांना? आमच्या वेळी दुपार कधी व्हायची कळायचे नाही, असे बोलतील आणि पुरुष… काय कपडे घालतात आजकालच्या मुली, कशा चालतात? आम्हाला बायकोबरोबर बोलायची पण भीती वाटायची, आमच्या वेळी नव्हती असली थेरं!! असे शेरे देत. बिगर मराठी असतील तर हिंदीत बोलतील. आयुष्यभर मुंबईत राहून पण यांना गायपट्टा मानसिकता सोडता आली नसते.
हे लोक हॉटेलात गेले, की उच्छाद मांडतात. किती पैसे जातात बाहेर खाल्लं तर! आमच्या वेळेला असं नव्हतं. सगळं घरी केलं जायचं, आता सांगा इतक्या पैशात घरी कितीजण जेवतील, असं बरळत बसतात आणि थोडक्यात काय घडवून आणतात तर सगळ्यांच्या डोक्याला शॉट आणि मूडचा सत्यानाश!!!!
या लोकांची नक्की मानसिकता काय असते, याचा विचार करणे मी सध्या बंद केलं आहे. पण खूपच त्रास झाला की या काकाकाकूंना एखादा टोला देतेच. आपली पण एक लिमिट असतेच ना सहन करण्याची. एक सासू माझ्याशी गप्पा मारत होती. म्हणजे काय तर तिच्या सुनेच्या तक्रारी सांगत होती. सून गरोदर होती. आता मी पण ज्येष्ठ नागरिक वयोगटात असल्याने असे लोक मला त्यांच्या गटातील समजतात. तर या सासूच्या बोलण्याचा अर्थ काय तर हल्लीच्या मुलींना ना वाकून काम करायला नको, केर काढायचा, हाताने धुणी धुवायची, दळण करायचे की कसे चटकन बाळंतपण होते. पण माझं ऐकणार कोण? आमच्या वेळेला असली थेरं नव्हती हो, आमचे हे तर माझ्याशी बोलायचे पण नाहीत. आणि आज आमचा लेक, आला की थेट बायकोकडे जातो! जणू काही याचीच एकटी बायको गरोदर. बाईच्या पोटदुखीचे रहस्य तात्काळ उलगडले. मग मी विचारलंच तिला, किती किलो दळण करायचात तुम्ही? मी पण माझ्या सुनेला देईन म्हणते हे जातं. अजून आहे का? प्लीज द्या की!
ही अशी माणसं विकतच्या फराळावर आडवा हात मारत आठवण काय काढतील? आई घरी करायची फराळ, एकटीने! आजकाल घरी काही होतच नाही.
आलिशान रिसॉर्टमध्ये राहतील, छान वाहनातून फिरतील, पण बोलणार काय? आमच्या वेळी गावाला जाणे हेच आऊटिंग होते, एसटीने कसे प्रवास केल्यागत वाटायचे, गावच्या सुट्टीची मजाच वेगळी, काय ते भवांडांसोबत आंबे खाणे, नदीत पोहणे, अंगणात बसून भुताच्या गप्पा मारणे!! आजीच्या हातच्या चुलीवरच्या स्वयंपाकाची मज्जा वेगळी.
मुद्दा काय, भूतकाळातील आठवणी काढून लोक वर्तमानातील आनंद नासवतात. असे का? हे कळत नाही. काहीही करा, काहीही द्या यांचे पालुपद एकच, ‘आमच्या वेळी’. आजकाल लग्नांत पंगती बसणे गायब झाले आहे. पण क्वचित कुठे असते आणि पंगत आहे ही खात्री करून मी जेवायला थांबते. पु. ल. देशपांडे यांनी अनेक दुर्दैवी योग लिहिलेत, त्यातील सर्वात दरिद्री योग माझ्या पाचवीला पुजलेला असतो.
त्यानुसार माझ्या बाजूला ‘आमच्या वेळी’ टोळीतला सदाविलापी मनुक्ष्य बसतो. मीठ लिंबू वाढणे सुरू झाले की त्याला कंठ फुटतो, काय पंगती असायच्या आमच्या वेळी, पैज लावून जिलेबी खायचो, काय आग्रह असायचा, मसाले भातावर वाटीने तूप पडायचे… याच्या घरी डालडा तरी असेल का, याची खात्री नाही आणि बात काय करतो, वाटी वाटी तुपाची… जणू पेशव्यांच्या पंगतीत हा हजर होता, म्याकडोनाल्डमधील बारके सॉस पाकीट खिशात घालून घरी आणतो आणि स्टार बकच्या कपात घरातील कॉफी घालून पीत फिरतो, असा हा इसम. माझ्या सगळ्या जेवणाचा बट्ट्याबोळ करून स्वतः आडवा ताव मारून बकबक गिळत होता.
माझी अशी ठाम धारणा होत राहिली आहे की जुन्या पिढीतील बहुतेक लोक नव्या पिढीवर जळतात. दूरदर्शनचा लोगो पण आवडीने पाहणारे आणि बजाज स्कूटरसाठी नंबर लावणारे लोक आजच्या पिढीला नव्या तंत्रज्ञान प्रगतीमुळे मिळणार्या सुविधा बघून कुठेतरी आपल्या आयुष्याशी तुलना करतात आणि तो राग असा काढतात. वास्तविक प्रत्येक पिढीला काही ना काही सुखे, सुधारणा मिळतच असतात. एसटी प्रवासाची मज्जा सांगणारे विसरतात की त्यांचे पूर्वज आधी चालत, मग बैलगाडीमधून प्रवास करत होते. पण भंपकपणा किंवा हिप्पोक्रसी हा बहुतेक भारतीय लोकांचा स्थायीभाव असल्याने ते कबूल न करता आपले रडगाणे पुढे करायचे. खोटे वाटते? विमाने रामराज्यात होती, महाभारतात युद्ध झाले तेव्हा अणुस्फोट केला गेला होता, माकडांनी रामसेतू बांधला, तेव्हा तंत्रज्ञान किती प्रगत होते, ताजमहाल मूळचा तेजोमहाल, आम्ही जगाला शून्य दिले (च्यायला, हे मात्र १०० टक्के खरे, कारण त्यानंतर काहीही भरीव दिलं नाहीये), असले व्हॉट्सअप संदेश आठवा.
तर मुद्दा काय की आईशप्पथ असली लोकं डोक्याला कचकचीत शॉट होतात राव. त्यामुळे मी ठरवले आहे, यांची सुरुवात झाली की आपण पण सुरू करायचे…
तुमच्या वेळी मेलेल्या माणसाला न्यायला स्वतः देव गरुडावर बसून यायचा ना?
तुमच्या वेळी म्हशी शुभ्र असायच्या ना?
तुमच्या वेळी गाई सफेद शेण द्यायच्या ना?
तुमच्या वेळी एक आंबा ५० किलोचा असायचा ना?
तुमच्या वेळी दिवाळी ६० दिवसाची असायची ना?
तुमच्या वेळी एक तीळ शंभर लोकात खाल्ला जायचा ना?
ते लोक थांबतील का माहिती नाही पण डोक्यात मात्र जाणार नाहीत. खर्रर्ररं… सांगते हो, आमच्या वेळी असे बोलले जायचे नाही हो!!!!!!