इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, ते काही खोटे नाही. दरवेळी ती एकाच प्रकारे घडते, असे नाही, पण इतिहास दणका देतोच; तरी लोक त्यातून शिकत नाहीत- खासकरून सत्तेच्या मदाने आंधळे झालेले सत्ताधारी काही शिकत नाहीत. बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेले हे अफाट व्यंगचित्र आहे १९८०च्या सालातले. १९७५ साली देशात अराजक माजण्याच्या भीतीने पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादली. अनुशासन पर्व असलेल्या आणीबाणीत काही ठिकाणी अतिउत्साही सरकारी आणि कायदा सुव्यवस्था यंत्रणांनी अतिरेक केला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने आली, कलावंत-विचारवंतांची मुस्कटदाबी झाली. देशभरात इंदिराजींविरोधात संतापाची भावना दाटली. काँग्रेसमधून बाहेर पडलेले असंतुष्ट, जनसंघ आणि समाजवादी पक्षाच्या मंडळींनी मिळून तयार केलेल्या जनता पक्ष नामक कडबोळ्याला जनतेने उचलून धरले. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली देशात प्रथमच काँग्रेसेतर सरकार सत्तेत आले. पण, जनता सरकार अंतर्विरोधांतून लवकरच कोसळणार हे स्पष्ट झाले. ज्या इंदिरा गांधींचा कायमचा नि:पात झाला, असे जनता पक्षाच्या अतिहुशार मंडळींना वाटत होते, त्यांनी राखेतून भरारी घेतली. १९८० साली त्यांची लाट आली आणि तिच्यात जनता पक्षाची अनेक राज्य सरकारे वाहून गेली… इथे बाळासाहेबांनी इंदिराजींना खवळलेल्या लाटेचे रूप काय अप्रतिम दिले आहे पाहा… काँग्रेसविषयक रोषामुळे लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या हातात देशाचा कारभार सोपवला, त्याला ९ वर्षे लोटली. मोदीप्रेमात आंधळे झालेले मोजके लोक सोडले, तर बाकीच्यांचा आता भ्रमनिरास होऊ लागला आहे. गुजरातच्या विकासाच्या बनावट कथा विकून सत्तेत पोहोचलेले मोदी विकासाच्या जागी विद्वेषाची भाषा बोलू लागले आणि त्यांनी धार्मिक विखाराला मोठा आश्रय दिला, स्वत: उत्साहाने ते हा विखार पसरवताना दिसतात… अखेर कर्नाटकाच्या जनतेने बजरंगबली बनून त्यांच्या टाळक्यात गदा हाणली आहे… आता तरी ताळ्यावर या… ही काही काँग्रेसची लाट नाही, ही खवळलेल्या जनता जनार्दनाची लाट आहे… प्लॅस्टिकच्या कचर्याप्रमाणे तुम्हाला किनार्यावर फेकून देईल!