□ मोदी हे संघाच्या मानगुटीवरील भूत – प्रकाश आंबेडकर यांची टीका.
■ भूत नव्हे, वेताळ… आता तो विक्रमाच्या डोक्याची शंभर शकलं केल्याशिवाय राहणार नाही, बाळासाहेब!
□ शेतकर्यांना हमीभाव, तरुणांना नोकर्या हव्यात, पण या देशात ऐकतो कोण? – राहुल गांधी यांचा हल्ला.
■ ऐनवेळेला हे विसरून शेतकरी आणि तरुण काही भलत्याच, बिनमहत्त्वाच्या मुद्द्यांवर मत’दान’ करून मोकळे होतात, त्याचं काय करणार, राहुलजी!
□ आताचे महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे खरे वारसदार नाहीत – मिंधे गटाचे संजय मंडलिक यांची मुक्ताफळे.
■ बरळा बरळा, आणखी बरळा, खड्ड्यात जाणारच आहात, जेवढे खोल जाल तेवढं बरं… देशासाठी!
□ आरटीआयखाली निवडणूक रोख्यांची माहिती देण्यास स्टेट बँकेचा नकार.
■ हे दिवटे तर साक्षात सर्वोच्च न्यायालयालाही माहिती द्यायला तयार नव्हते, सर्वसामान्य माणसांनी केलेल्या आरटीआयच्या पृच्छेला विचारतो कोण?
□ प्राचार्य, परीक्षाप्रमुख निवडणूक ड्युटीवर; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा वार्यावर.
■ वन नेशन, वन इलेक्शन झाल्यावर बहुदा विद्यार्थीही एक वर्षाचा ड्रॉप घेऊन जुंपले जातील याच कामाला!
□ शेतकरीच हटवणार मोदी सरकार – विश्वंभर चौधरी.
■ शेतकरी आणि जो जो कष्टकरी आहे, ज्याच्या ज्याच्या धडावर त्याचाच मेंदू आहे, जो जो व्हॉट्अप विद्यापीठातल्या कचरापट्टीत लोळत नाही, तो प्रत्येक शहाणा माणूस हेच करणार आहे.
□ इतिहासाची मोडतोड करणार्या मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस.
■ खुद्द पंतप्रधानांनी तीन वेगवेगळ्या काळांत जन्मलेल्या महापुरुषांना एकत्र आणून गप्पा मारायला लावलं होतं, तिथे त्यांच्याच ओंजळीने पाणी पिणारे कसे मागे राहतील?
□ सीएए, एनआरसी लागू होऊ देणार नाही – ममता बॅनर्जी यांचा पुनरुच्चार.
■ शहांना तरी कुठे लागू करायचा आहे? त्यांना फक्त चुनावी जुमला वापरायचा आहे. काही मंडळींना स्वत:च्या घराला आग लागल्यावर शेजारच्याच्या भिंती काजळणार, याचा आनंद अधिक होतो. त्यांची मतं मिळवण्याची आयडिया आहे ती फक्त.
□ चीनविषयी पंतप्रधानांची विधाने बुळचट, मुळमुळीत – काँग्रेसने मोदींना धारेवर धरले.
■ चीनचं नाव काढलं की टेलिप्रॉम्प्टर बंद पडतो हो त्यांचा ऐनवेळी. असे ते खूप म्हणजे खूपच धाडसी आहेत, पंजाबातून दिल्लीत गेल्यावर ‘जान बची’ म्हणून सुस्कारे सोडतात.
□ भाजपा कार्यकर्त्यांकडून शेतकर्याला धक्काबुक्की.
■ शेतकर्याचा तळतळाट तुम्हाला मातीत गाडेल रे कमलदलदलीतल्या गांडुळांनो!
□ विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबणे सत्ताधार्यांसाठी पायंडा पडेल – केजरीवाल यांचा सर्वोच्च न्यायालयात मोदींवर हल्ला.
■ ज्या दिवशी विरोधकांकडे सत्ता येईल तेव्हा तुरुंग कमी पडतील सगळ्या देशातले.
□ सरकार जबाबदारी झटकू शकत नाही – मिंध्यांच्या निष्क्रियतेवर हायकोर्टाचा तडाखा.
■ पण मिंधे झटकू शकतात… कोणीही काहीही विचारलं तर ते म्हैस या पुलंच्या कथेतल्या आर्डर्लीसारखे सांगू शकतात, आम्हाला पावर नाय!
□ मोदी राजवटीत गरीबांना पोट भरणे कठीण – सीएसडीएसच्या अहवालाने भाजप सरकारचा बुरखा फाटला.
■ गरीब फक्त शत्रू दाखवून मतं मिळवण्यापुरते जिवंत ठेवायचे आहेत; बाकी सगळा देश दोन मालकांच्या स्वाधीन केला की झोला उठाके निघाले पंचतारांकित गुहेकडे.
□ तिघांना चिरडून भाजप पदाधिकार्याच्या मुलाचे पलायन.
■ मरण असंही स्वस्तच झालंय त्यांच्या राज्यात… आणि हे तर अधिकृत यमदूत!
□ पावसाळ्याआधीच कोस्टल रोडच्या सबवेमध्ये शिरले पाणी.
■ रस्त्यांना तडेही गेले आहेत, एक पावसाळा तरी काढेल ना हा रस्ता?
□ डॉ. आंबेडकर जयंतीच्या ‘ड्राय डे’ला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार.
■ ज्यांना रोज इतकी तहान लागते त्यांनी आदल्या दिवशी करावी की व्यवस्था? वर्षातले सगळे ड्राय डे सार्वजनिकरित्या जाहीर केलेले असतात. मुळात एकही ड्राय डे ठेवू नका, नाहीतर अपवाद करू नका.
□ आयकिया कंपनीचा पाच कोटींचा दंड हायकोर्टाकडून रद्द; मिंधे सरकारला झटका.
■ आँय मिंधे मियाँ, ये तुमने काय किया?
□ धैर्यशील मोहिते-पाटील यांना भाजपची साथ सोडली.
■ बोट बुडू लागली आहे…
□ आता ईडीचे प्रयोग थांबवा – गजानन कीर्तिकर यांनी भाजपला दिला घरचा आहेर.
■ लवकर सुचलं…
□ भाजपशी युती म्हणजे गद्दारांशी युती – वंचितच्या भूमिकेवर तुषार गांधी यांची टीका.
■ म्हणूनच मग फिक्सिंगचे आरोप होतात, हे टाळायला हवं.
□ अशोक चव्हाणांच्या प्रचारसभेकडे गावकर्यांची पाठ.
■ त्यांना आता त्यांची स्वत:ची पत किती होती आणि पक्षाची पत किती होती, ते कळेल.
□ निवडून आल्यावर इलेक्टोरल बॉण्डप्रकरणी भाजप नेत्यांची चौकशी करणार – राजद नेत्या मिसा भारती यांचा मोदी सरकारवर घणाघात.
■ सगळे तुरुंगात जातील खडी फोडायला! चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग.