सध्या देशभर निवडणुकांचा माहोल आहे. पण देशात सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्यानंतर पहिल्याच दशकात कशी परिस्थिती होती, हे प्रबोधनकारांच्या एका आठवणीतून दिसून येतं. १९२६ सालच्या निवडणुकीत धनजीशेठ कूपर यांना धडा शिकवण्यासाठी प्रबोधनकारांनी आखलेली रणनीती भल्याभल्यांना आजही धक्का देऊन जाईल.
– – –
आपल्याला वाटतं राजकारण आणि निवडणुका यांचा स्तर आताआता रसातळाला गेलाय. पण राजकारण हे राजकारणच असतं. त्यात पडायचं म्हणजे हात चिखलात बरबटावेच लागतात. १९२६ सालची मुंबई इलाखा प्रांतिक कायदेमंडळाची निवडणूकही त्याला अपवाद नव्हती. देशात सार्वत्रिक निवडणुका सुरू होऊन कशीबशी पाचसहा वर्षं झाली होती. तरीही आजच्यासारखंच निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी बहुसंख्य उमेदवारांची होती. मुळात पैसे आणि दारूच्या बळावर निवडणूक जिंकणार्याला पाडायचं तर जशास तसं वागावं लागणारच होतं. तेच धनजीशेठ कूपरना पाडण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील या किंगमेकर्सनी केलं. त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नव्हता. फक्त समाजसेवेचा आव आणून स्वतःच्या तुंबड्या भरणार्या धनदांडग्या कारखानदाराला त्याची जागा दाखवून द्यायची होती. ते त्यांनी केलं, तेही अगदी त्याच्याच पद्धतीने.
कर्मवीर अण्णांनी सातारा मतदारसंघातून उभ्या असणार्या धनजीशेठ कूपरना निवडणुकीत दणका द्यायचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी प्रबोधनकारांना सोबत घेतलं. धनजीशेठच्या विरोधातले उमेदवार भास्करराव जाधव यांनीही त्यासाठी प्रबोधनकारांची भेट घेतली. प्रबोधनकारांनी काट्याने काटा काढायचं ठरवलं. भास्कररावांच्या बोलण्यातून एक मुद्दा त्यांच्या लक्षात आला होता की वाळवा परिसरात धनजीशेठचं वर्चस्व आहे. तिथे जर मतदान फोडता आलं, तर धनजीशेठ पडणार नक्की. प्रबोधनकारांनी वाळव्यावर लक्ष केंद्रित केलं. भास्कररावांच्या भेटीनंतर चार पाच दिवसांनी कर्मवीर अण्णा प्रबोधनकारांना भेटायला पुण्यात आले. तिथून दोघे निघाले ते थेट वाळव्यालाच पोचले. तिथे त्यांनी भास्कररावांच्या गटातल्या विश्वासातल्या पुढार्यांच्या गाठीभेटी घेतल्या. बैठका घेतल्या. मतदान केंद्राच्या जागा बघितल्या आणि धनजीशेठना पाडण्याची युक्ती ठरली. त्याची सगळी योजनाही तयार झाली. ती त्यांनी भास्कररावांना कळवली. त्यासाठी भास्कररावांनी पैशांची आणि इतर व्यवस्था परस्पर केली.
प्रबोधनकारांना खरंतर या फंदात पडण्याची इच्छा नव्हती. पण कर्मवीरांशी त्यांचा दोस्ताना खासच होता. शिवाय धनजीशेठचा बुरखा फाडण्याची गरज होती. त्यांना धडा शिकवण्याची गरज होती. वैयक्तिक आयुष्यात केलेल्या विश्वासघाताचे हिशेबही चुकते करायचे होते. ठाकरेच ते. विरोधकाला त्याची जागा दाखवून देण्याची एकही संधी ते सोडणार नव्हतेच. ते त्यांनी केलं. पण निवडणुकांतल्या राजकारणाविषयी त्यांना तिटकाराच होता. सातारा निवडणुकीतल्या घटनाक्रमाबद्दल त्यांनी `निवडणुका – शिसारी आणणारा खटाटोप’ असं एक स्वगतच आत्मचरित्रात मांडलं आहे. त्यातून या प्रसंगाची पार्श्वभूमी स्पष्ट होते आणि त्यांची भूमिकाही स्पष्ट होते.
तो तुकडा असा,
लोकशाही आली, जेवताना तोंडातच घास घालण्याइतपत अक्कल असणारांना मताचा अधिकार मिळाला. उमेदवारीसाठी बेअक्कलांना अक्कलकाढ्याचे कोंब फुटले, इतका स्वस्त शहाणपणाचा बाजार उफलला. निवडणुकीसाठी घरेदारे गहाण टाकणे किंवा विकण्यापर्यंत मुत्सद्देगिरीची शीग गाठण्याइतके शूर नरवीरांचे पेव फुटले. बस्स, आता काय! पृथ्वीवर स्वर्गच आला! लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालविलेले राज्य आले! हा वरवरचा देखावा कितीही बहोत बढिया दिसला, तरी निवडणुकांच्या हंगामात कसकसल्या समाजनीतिविघातक व्यसनांच्या नि लाचलुचपतीच्या बळावर निवडणुकांचे लढे लढवले जातात, याचा तपशील पाहिला का शिसारी येते. समोरच्या प्रतिस्पर्ध्याला आदळण्यासाठी संभावितपणाचे मुखवटे घालून मिरवणारे उमेदवार मतपत्रिका पेटीत पडेतोवर कसकसल्या हिकमती लढवतील, ते सांगणे नि ऐकणेही किळस आणणारे आहे. अनाहूतपणे मी या फंदात गेलो आणि त्यातील सारे प्रवाह, प्रघात नि प्रवाद पाहून इतका विटलो की कोणत्याही निवडणुकीचा उमेदवार प्रचारासाठी माझ्या उंबर्याजवळ आला की माझ्या कपाळाला आठ्या पडतात. निवडणुकांच्या अनंतमुखी जंतरमंतरांच्या चक्रव्यूहातून इच्छा, कल्पना नि हेतू किंवा स्वार्थ नसतानाही मला माझे शील सांभाळून वावरावे लागलेले आहे. परिस्थतीवर मात करण्याचा माणसाने कितीही हिय्या केला, तरी तिचा रेट्याच असा जबरदस्त असतो की त्यापुढे मोठमोठ्या शहाण्यांनाही वेड पांघरून पेडगावची यात्रा साजरी करावी लागते.
धनजीशेठ कूपर हे सातारा जिल्ह्यातल्या दारूचे मुख्य पुरवठादार होते. जिल्हाभरातले दारूचे विक्रेते आणि त्यांची दुकानं त्यांच्या मुठीत होती. तीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद होती.
सावकारीचे पैसे आणि दारू या जोरावर ते सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका ओळीने जिंकत आले होते. त्यात नगर परिषदेपासून थेट लेजिस्लेटिव काऊंन्सिलच्या निवडणुकाही होत्या. त्यामुळे प्रबोधनकारांनी याच दारूच्या नशेत त्यांना बुडवण्याचं ठरवलं. प्रबोधनकारांनी रणनीती आखली. त्यानुसार सगळी तयारी झाली.
प्रबोधनकार आणि कर्मवीर अण्णा दोघेही मतदानाच्या आदल्या दिवशी वाळव्याला जाऊन आले. तिथल्या भास्करराव जाधवांच्या कार्यकर्त्यांना काय करायचं ते तपशीलवार सांगितलं. नाटकातली पात्रं शिकवून तयार केली. नेपथ्यही तयार झालं. मतदान केंद्रापासून थोड्याच अंतरावर एका रिकाम्या झोपडीत दारूचा रांजण भरून ठेवला होता. जिल्ह्यातली दारू धनजीशेठच्या ताब्यात होती. त्याच्याकडून दारू घेतली असती तर संशय आला असता, म्हणून थेट ट्रेनने मुंबईहून दारू मागविली होती, असा संदर्भ कर्मवीर अण्णांच्या एका आठवणीत आलेला आहे.
मतदानाचा दिवस आला. तेव्हा आतासारखा सगळ्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. विशिष्ट जमिनीची मालकी, शिक्षण, मालमत्ता अशा अटी असायच्या. त्यामुळे प्रत्येक पंचक्रोशीत ठराविकच मतदार असायचे. आतासारखी गावोगाव मतदान केंद्रंही नसत. लांबलांबच्या गावाहून मतदार येत ते एकत्रच. गावातला पुढारी त्यांना गोळा करून आणत असे. कूपरचे मतदार कोण हे भास्कररावांच्या कार्यकर्त्यांना माहीत होतंच. शिवाय ते धनजीशेठच्या नावाने घोषणा देत आणि भजन करतच येत होते. त्यांना बघताच ठरल्याप्रमाणे भास्कररावांचे काही कार्यकर्ते आपल्या कामाला लागत.
एक कार्यकर्ता जाऊन मतदारांच्या पुढार्याला भेटायचा आणि सांगायचा, खानबहादुरांनी `व्यवस्था केली आहे. तिकडे सगळ्यांना घेऊन चला. दोन दोन तीन तीन…` अशा गुप्त सूचना कानात द्यायची. व्यवस्थेचं नाव ऐकताच चेहरे खुलाचचे. मग झोपडीत मतदारांच्या टोळ्या आनंदाने यायच्या. त्यांना तितक्याच आनंदाने दारू पाजली जायची. आकंठ पिऊन तर्रर्र होऊनच मतदार मंडळी बूथजवळ पोचायची. तिथे दुसरा कार्यकर्ता तयार असायचा. तो त्यांना बूथवर घेऊन जायचा आणि सांगायचा, आत गेल्यावर कूपर बिपर काही बोलायचं नाही. फक्त हत्तीपुढे तीन खुणा करून परतायचं. लक्षात ठेवा हत्ती. मतदार आधीच तर्हाठ असायचा. सांगितलं तसं गुमान करायचा. स्वतः विचार करायची त्याची क्षमताच संपलेली असायची. हत्तीपुढे तीन खुणा करून परतायचा.
दिवसभरात असे साधारण साडेतीनशे मतदार हत्तीवर खुणा करून परतले. वाळव्याच्या बाबतीत धनजीशेठ निश्चिंत होते. त्यामुळे संध्याकाळी मतदान संपत आल्यानंतर मोटारीने वाळव्याच्या मतदान केंद्रावर पोचले. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांना सामोरे गेले. धनजीशेठने विचारलं, मतदान झालं का व्यवस्थित?
मतदारांचे पुढारी त्यांना सांगू लागले, बिनचूक काम झालं आहे. तुम्ही व्यवस्था उत्तम ठेवली होती. सगळे लोक खुष आहेत. सगळ्यांनी हत्तीपुढे तीन तीन खुणा केल्या आहेत. आता जाधवरावाला म्हणावं, बस ल्येका हात चोळीत. त्यावर धनजीशेठ दचकले. त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला, व्यवस्था? कसली व्यवस्था? कोणी केली व्यवस्था? हत्ती जाधवरावाचा आहे आणि घोडा माझा. धनजीशेठ रागाने लालबुंद झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना तास तास तासलं, हा काय गोंधळ? तुम्ही काय करत होतात? मग त्यांच्या डोक्यात ट्युब पेटली. त्यांनी विचारलं. भाऊराव पाटील आला होता काय? कोणी पाहिला काय? खास हे त्याचेच काम. पण हे त्रांगडे रचायला ठाकरेच येऊन गेले असणार. हे पाटलाचे डोके नव्हे.
धनजीशेठची भीती खरी ठरली. निवडणुकीचा निकाल लागला. धनजीशेठ पडले आणि ब्राह्मणेतर पक्षातून भास्करराव जाधव पुन्हा एकदा आमदार बनले. खरंतर सातारा मतदारसंघात ब्राह्मणांची संख्या ब्राह्मणेतरांच्या संख्येपेक्षा खूपच कमी, पण ब्राह्मणेतरांमधल्या भांडणामुळे ब्राह्मणांपैकी रावबहाद्दूर काळे आणि नानासाहेब देशपांडे हे दोघे निवडून आले. पण कायदेमंडळात ब्राह्मणेतर पक्षाचे १२ जण निवडून आले होते.
स्वराज्य पक्षाला १०, प्रतिसहकार पक्षाला ७, प्रतिसहकारवाद्यांचा पाठिंबा असलेले १२, इंडियन नॅशनल पार्टीचे २ असे आमदार निवडून आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सोलंकी यांना दलितांचे तर सी. के. बोले आणि एस. सी. जोशी यांना कामगारांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले. अत्यंत महत्त्वाच्या अशा या कॉन्सिलमध्ये धनजीशेठ मात्र नव्हते.
निकाल जाहीर झाल्यानंतर कर्मवीर अण्णांनी शांत राहायला हवं होतं. पण तसे शांत बसले असते, तर ते भाऊराव पाटील कसले? त्यांनी थेट धनजीशेठच्या सातारा शहरातल्या हंटवर्थ बंगल्यावर जाऊन जोरात विचारलं, खानबहादूर, भाऊ पाटलाचा रामराम घ्यावा म्हटलं.
असे होते कर्मवीर अण्णा.
धनजीशेठनी पुढे कर्मवीर अण्णांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. रयत शिक्षण संस्थेच्या कामात त्यांना मदत केली. सरकार दरबारी संस्थेला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण कर्मवीर काही केल्या त्यांच्या पकडीत येत नव्हते. कर्मवीर अण्णांनी विरोधकांना एकत्र आणून डिस्ट्रिक्ट बोर्डाच्या निवडणुकीत म्हणजे आताच्या जिल्हा परिषदेत कूपर पार्टीच्या उमेदवाराला दोनदा पाडलं.
तीन वर्षांनी आलेली पुढची कॉन्सिलची निवडणूक मात्र धनजीशेठ जिंकले. त्यात कर्मवीर अण्णांनी खोडा घातला नाही. प्रबोधनकार तर तेव्हा आपल्याच व्यापात अडकले होते. त्यानंतर दशकभर धनजीशेठ मुंबई इलाख्याच्या पातळीवर महसूलमंत्री, अर्थमंत्री अशी मोठी पदं भूषवत राहिले. त्यात १९३५च्या नव्या कायद्यानुसार मुंबईच्या गवर्नरने बिगर काँग्रेसी सदस्यांचं मंत्रिमंडळ नेमलं होतं. त्याचे प्रमुख म्हणून धनजीशा कूपर यांची नेमणूक केली होती. त्या अर्थाने ध्ानजीशेठ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले. तेव्हा मुख्यमंत्री असा शब्द प्रचलित नव्हता. तेव्हा त्यांना मुंबई इलाख्याचे पंतप्रधान म्हटलं गेलं.
मात्र या सगळ्या वाटचालीत प्रबोधनकारांचा धनजीशेठशी कधी संबंध आला का? त्यांच्याशी त्यांचे संबंध कसे राहिले? याविषयी कोणतीही नोंद आढळत नाही. फक्त प्रबोधनकारांच्या काही लेखांमध्ये आणि आत्मचरित्रामध्येच धनजीशेठचा उल्लेख आहे. तोही कटुतेने भरलेला आहे. ते स्वाभाविकच होतं.