• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

गुडघ्याला बाशिंग

- विजय कापडी

विजय कपाडी by विजय कपाडी
November 24, 2021
in दिवाळी 21 धमाका
0

आमच्या (चांडाळ नसलेल्या) चौकडीतला एकुलता सोटभैरव म्हणजेच बायकोपोरे नसलेला सदस्य; सखाराम तुकाराम म्हात्रे म्हणजे सख्या म्हात्रे. या सख्या म्हात्रेच्या डोक्यात म्हणा वा डोसक्यात केव्हा काय येईल ते त्याचे त्यालाच सांगता यायचं नाही आणि डोक्यात आलेला विचार आम्हा तिघांना म्हणजे मधू साठे, सदू परब, आणि पदू साळवी ऐकवायला त्याला आवडतं. मागं एकदा सख्या म्हात्रे एव्हरेस्टवर चढाई करण्याच्या तयारीला लागला होता. वयाच्या सत्तावन्नाच्या वर्षी एकदम एव्हरेस्टला गवसणी घालायला जाणं कसं धोक्याचं असू शकतं हे त्याला सविस्तर सांगतासांगता आम्हा तिघांच्याही दातांच्या कण्या झाल्या. तेव्हा कुठं त्यानं एव्हरेस्ट चढायला घेण्याचं तूर्तास पुढं ढकललं होतं.
आणि परवाच्या दिवशी पाहतो तर त्यानं आमच्या नेहमीच्या बैठकीच्या स्थळी, म्हणजेच सार्वजनिक बागेत आल्या आल्याच जाहीर करून टाकलं की, तो यंदाच्या वर्षी स्वत:ला लग्नबंधनात अडकवून घेणार. वयाच्या अठावन्नाव्या वर्षी म्हणजेच नोकरीच्या सेवानिवृत्तीला अवघी दोनच वर्षे उरलेली असताना तो म्हणत होता की, त्याला लग्नाच्या मांडवाखालून जायचं आहे आणि हे सगळं सांगताना त्यानं चेहरा इतका म्हणून गंभीर केला की, त्याच्या प्रस्तावावर एरवी फुटू पाहणारं हसू आम्हाला प्रयत्नपूर्वक दाबावं लागलं. त्याच्या इतकाच गंभीर भाव चेहर्‍यावर पसरवून आम्ही तो म्हणत असलेलं पुढचं ऐकू लागलो.
आपल्या लग्नप्रस्तावाची सुरुवात त्यानं आधी आम्हा तिघांवरही स्वार्थीपणाचा आरोप करून केली. तावातावानं तो म्हणाला, ‘‘तुम्ही तिघे स्वत:ला माझे जीवश्चकंठश्च मित्र म्हणवता, पण एक नंबरचे स्वार्थी आहात स्वत: वयाच्या ऐन पंचविशीतच लग्न करून मोकळे झालात. तुम्हाला झालेली ‘पोरंटोरं’ आता स्वकमाईसुद्धा करू लागलीत. पण माझं काय? आज या घडीस म्हणजे वयाच्या अठ्ठावण्णाव्या वर्षीदेखील मी सडाफटिंगच राहिलोय. तुम्ही स्वत:च्या लग्नानंतरच्या संसारात इतके मग्न झालात की, माझं लग्न व्हायचं राहिलंय याचासुद्धा तुम्हाला विसर पडावा ना? आजच्या या दिवसीय सायंकाळच्या साडेसहाच्या डोक्याला मी माझं लग्न न होण्याचं खापर तुम्हा तिघांच्याही डोक्यावर फोडू इच्छितो. पण त्याचबरोबर तुम्हाला एक सवलतही देईल म्हणतो. मी आता लग्न करू पाहतोय म्हटल्यावर ते यशस्वीरीत्या तडीस नेण्याच्या बाबतीत मला तुमच्याच मदतीचा हात हवाय. नाहीतरी तुमच्याशिवाय माझं आहे तरी कोण? स्वत:चं लग्न स्वत:च जुळवायला घेणं हे माझ्यासारख्या या क्षेत्रातल्या अनुनभवी माणसाला काहीसं कठीणच जाणार आणि म्हणूनच मी माझ्या लग्नप्रकल्पाची नदीत सोडलेली होडी सुखरूपरीत्या पैलतीरावर नेऊन सोडणं आता तुमच्याच हातात आहे. मग काय? लागणार ना कामाला? हा पाहा तुमचा जानी दोस्त सख्या म्हात्रे गुडघ्याला बाशिंग बांधूनच उभा आहे!!’’
आणि एवढं सगळं एका दमात सांगून सख्या म्हात्रे केविलवाणी मुद्रा करून आम्हा तिघांकडं आळीपाळीनं पाहू लागला. आम्हा तिघांच्याही मनात एकाच वेळी विचार आला. काय बरं म्हणावं आमच्या सख्याच्या वेडेपणाला? अठ्ठावन्न हे काय लग्नाचं जोखड मनोवर घ्यायचं वय आहे होय? पण लगोलग हेही लक्षात आलं की लग्नाला वय नसतं. वयाची साठी, सत्तरीच नव्हे तर काही वेळा नव्वदी देखील उलटून गेल्यावर लग्न करणार्‍या नरपुंगवांविषयी आपण वर्तमानपत्रात वाचतोच की. या पार्श्वभूमीवर आमच्या सख्याचं वय होतं अठ्ठावन्न. अवघं अठ्ठावन्न! आम्ही तिघांनीही एकमेकांकडं पाहिलं आणि नेत्रपल्लवी करून जाहीरच केलं, ‘आधी लगीन सख्याचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यानंतरच! त्याआधी क्षणभर आम्हाला वाटूनही गेलं की, सख्या आमची फिरकी ताणतोय की काय? नाही म्हटलं तरी त्याला तशी सवय आहे. गंभीर मुद्रेनं आम्हाला काहीतरी ऐकवायचं आणि त्यावर त्याच्या इतकंच गंभीर होऊन विचार करू लागलो की, फुक्कन हसायचं. पण नाही. आज स्वत:च्या लग्नाच्या बाबतीत सख्या खरोखरच गंभीर दिसला. आज चुकूनही आमच्या पैकी कुणाला हसू आलं असतं तर सख्यानं उर्वरित आयुष्यात त्याचं तोंडही पाहणार नाही असं जाहीर केलं असतं.
सख्याच्या निर्णयाबद्दल त्याचं अभिनंदन करण्यासाठी खाकरून घसा मोकळा करून मधू साठे म्हणाला, ‘‘सख्या, तू काहीसा उशिरा का होईना, पण लग्न करू इच्छितोस हे चांगलंच म्हणायला हवं. त्यासाठी आम्ही तिघांच्याही मन:पूर्वक अभिनंदनास तू पात्र आहेस. आम्ही तिघेही तुला निश्चितच मदत करू. नव्हे केलीच असं समज. आमच्या या कामाची सुरुवात या क्षणापासूनच होत आहे. म्हणजे या विषयाला साजेसं काही प्रश्न तुझ्यासमोर उपस्थित करणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न म्हणजे मुलीविषयी वा आता बाईविषयीच म्हणावं लागेल. तर तुझ्या अपेक्षा काय असतील?’’
सख्या सहज सुरात म्हणाला, ‘‘खरं सांगायचं तर फारशा अपेक्षाबिपेक्षा काहीच नाहीत. हां… मात्र तिचं बाईमाणूस असणं गरजेचं आहे. कारण हायकोर्टानं संमती दिलीय म्हणून काही मी कोणत्याही बाप्याशी म्हणजेच पुरुषाशी लग्न करू इच्छित नाही! अ‍ॅण्ड दॅट इज फायनल. पुरुषाशी लग्न करण्यात कितीही फायदे असले तरी ते मला नकोत!’’
सख्याच्या लग्नाच्या चर्चेला गती देण्यासाठी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणं चार दोन इंग्रजी शब्द उच्चारून सदू परब म्हणाला, ‘‘इटस् ओके. नो इश्यू. ठीक आहे. बाईशीच लग्न करण्याचा तुझा विचार स्तुत्यच म्हणायला हवा. पण बाईच्या दिसण्याबिसण्याविषयी वा मुख्य म्हणजे तिच्या वयाविषयी तुझ्या अटी असतीलच की.’’
सख्या समजूतदार सुरात म्हणाला, ‘‘काय आहे. दिसणं म्हणजेच एखादीच रूप, वर्ण वगैरे काही तिच्या हातात नसतं. जेनेटिक्स म्हणजेच जैव शास्त्रानुसार तिच्या आईबाबाकडून तिला जो चेहरा मिळालाय तोच घेऊन ती वावरत असणार. त्यामुळे तिच्या दिसण्याच्या बाबतीत मी असं काही म्हणू शकत नाही की, तिचा चेहरा त्या आलिया भट वा त्या पदुकोण बाईसारखा सुंदरच हवा.’’ आणि दिसण्याच्या मुद्याला काट मारून सख्या पुढं म्हणाला, ‘‘वयाबद्दल म्हणशील तर माझ्या वयाच्या जरास अलीकडचं… चोपन्न-पंचावन्न चालेल. पण पलीकडचं म्हणजे साठी उलटलेली वगैरे नको… काय बरोबर आहे ना मी काय म्हणतोय ते?’’
त्याचा शेवटचा प्रश्न आम्हा तिघांकरता होता. त्यामुळे आम्ही माना डोलावून सहमती दर्शविली आणि त्याचा उत्साह वाढला. कारण लगेच सख्या पुढचं सांगू लागला, ‘‘हा… एक बाबतीत मात्र मी काहीसा आग्रही आहे. म्हणजे अगदी उत्तम नसला तरी बर्‍यापैकी सैपाक करणं तिला जमलं पाहिजे. इतकी वर्षं स्वत:साठी सैपाक करून करून मी ज्याम वैतागलो आहे. स्वत:च्या हातांनी शिजवलेलं अन्न खाण्यापेक्षा एखाद्या बाईच्या नाजूक हातांनी तयार झालेलं अन्न पोटात जावं असं मला वाटू लागलंय.’’
आणि हे सांगताना स्वत:च्या ओठांवरून जीभ फिरवत आणि मिटकी मारत सख्या पुढं म्हणाला, ‘‘पण एक महत्त्वाचं म्हणजे तिला जवळचे तर सोडच पण दूरचेसुद्धा नातेवाईक असता कामा नयेत. लग्नानंतर ही नातेवाईक मंडळी आमच्या नुकत्याच सुरू झालेल्या संसारात फारच धुडगूस घालू शकतात. असं मी ऐकून आहे. तुमचाही तोच अनुभव असेल.’’
सख्याला मध्येच अडवून मी म्हणालो, ‘‘अरे, पण नातेवाईक अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावून येतात. त्यामुळे सरसकट नातेवाईकच नकोत असं म्हणणं गैर ठरू शकतं.’’
सख्या म्हणाला, ‘‘असं आहे होय? ठीक आहे. एखाद्दुसरा नातेवाईक चालेल, पण नातेवाईकांची फौज नको रे बाबा. मुळात अगदीच कमी नातेवाईक असतील तर ते मुलीचं अ‍ॅडिशनल क्वालिफिकेशन ठरू शकतं आणि हो तिला कुठलंही वाद्य वाजवण्याची आवड नसावी. म्हणजे लग्न झाल्या झाल्या तिचं तंबोरा वा विचित्रवीणा सारखं विचित्र नाव असलेलं वाद्य वाजवायला घेतलं तर ते मला चालणार नाही. अरे, ही वाद्यं बिघडली तर दुरुस्तीचा खर्च खूप असतो म्हणे…’’
‘‘अरे, असं कसं म्हणतोस. मंजुळ वाद्य वाजत राहिलं तर घरात प्रसन्न वातावरणनिर्मिती व्हायला मदत होते. आपण असा मध्यम मार्ग सुचवू म्हणजे तुला न आवडणारा तंबोरा वा विचित्रवीणा वाजवण्याऐवजी तिनं जलतरंग वाजवावं. ते फार स्वस्तात पडेल. म्हणजे स्वयंपाकघरातल्या कपबशा वापरून जलतरंग वाजवण्याचा आनंद मिळू शकतो. थोडक्यात, जलतरंगाला तुझी हरकत नसावी… काय?’’
सख्या काहीशी नाखुशी व्यक्त करत म्हणाला, ‘‘ठीक आहे… तू म्हणतोस तसं पण मला घरात शांतता हवी. आणि शांतता म्हणजे शांतता. सध्याची स्मशानशांतता नकोय. तिच्या बांगड्यांची किणकिण व पैजणांचं रूमझूम… रूमझूम चालेल! आणि एक सांगायचं राहिलंच. तिला वाचनाची आवड असता कामा नये. म्हणजे मी काहीतरी महत्त्वाचं सांगू पाहत असताना तिनं वर्तमानपत्र वा पुस्तक तोंडासमोर धरलेलं मी खपवून घेणार नाही. आधीच सांगतोय.’’
‘‘अरे, पण वाचनानं ज्ञानात भर पडते. चार लोकांत वावरताना कुठल्याही विषयावर आपलं मत मांडण्याचे धैर्य येतं. तू वाचनाला नकार देऊच नकोस. वाचनाने चारचौघांत छाप उमटवण्यात मदत मिळते!’’
‘‘ठीक आहे. पण वाचनाबरोबरच तिला लेखनाची म्हणजे कविता रचण्याची वा कथा-कादंबरी लिहायला घेण्याची सवय असता कामा नये! तिच्या कविता ‘मी’ ऐकणारच नाही. अगदीच आग्रह झाला तर ऐकेन आणि या कानातून त्या कानानं सोडून देईन. छोटी कथा एकवेळ चालेल पण कादंबरी नकोच. खूप पानं लिहावी लागतात म्हणे…’’
‘‘अरे, पण बायको साहित्यिक असेल तर काहीच न करता समाजात तुला मान मिळेल ना…’’ मधू साठेनं बायको साहित्यिक असण्याचा फायदा सांगितला.
‘‘मान गेला उडत! अरे, या सगळ्या गोष्टी सुखी संसाराच्या आड येतात असं मी कुठंतरी वाचलंय… का ऐकलंही असेल… आणि एक सांगायचं तर राहिलंच. नाटक, सिनेमा वा टीव्हीवरच्या न संपणार्‍या मालिका पाहण्याचं वेड तिला असता कामा नये. काय आहे… मालिका पाहणारे संबंध दिवसभर त्याच विचारात असतात. त्यांच्यावरच चर्चा करू इच्छितात. ते मला नाही आवडत… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला पिण्याचं म्हणजेच मद्य पिण्याचं व्यसन असता कामा नये. म्हणजे कधी तरी सटीसहामाशी एखादा पेगसुद्धा नको! आय हेट ड्रिंक्स यू सी… तुम्हाला माहीत आहे ते…’’
सख्याला पुढं बोलू न देता मी म्हणालो, ‘‘काहीतरीच बोलू नकोस. बाई माणसाला मद्याचं व्यसन कसं बरं असेल? हे असले शौक आम्हा पुरुषांचे… अर्थात तू यापासून सोवळा आहेस त्याला तसंच कारण आहे. तुला कुठलं आलंय संसाराचं टेन्शन? आणि बाईमाणसाच्या असल्या व्यसनाबद्दल म्हणशील तर एखादी बाई ग्लास आणि बाटली घेऊन बसलेली माझ्या तरी पाहण्यात नाही… काय रे, सदू आणि मधू… तुमच्या पाहण्यात आलीय का अशी बाई?’’ मी सदू आणि मधूची साक्ष काढली.
दोघांनीही नंदीबैलासारख्या माना हलवून नकार दर्शविला.
यावर सख्या आत्मविश्वासपूर्ण सुरात म्हणाला, ‘‘अरे, सध्या समाजात जे बदल होत आहेत ते तुमच्या गावीही नाहीत असंच मी म्हणेन. माझी नजर चौफेर फिरते… माझं अनुभवविश्व अधिक व्यापक आणि विस्तारलेलं आहे… अलीकडेच माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाला मुलगी दाखवण्यात आली, सध्याच्या चालू पद्धतीप्रमाणं मुला-मुलीच्या जवळच्या वा दूरच्या नातेवाईकांच्या सोबतीशिवाय फक्त मुलगा आणि मुलगी यांनीच एका रेस्टॉरंटमध्ये भेटायचं ठरलं. तिथं त्या दोघांत जो संवाद झाला तो त्या मुलानं आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केला आणि मलाही ‘सेंड’ केला. तो तुम्ही ऐका म्हणजे…’’ असं म्हणून त्यानं खिशातून आपला मोबाईल काढला आणि आपल्या समोर ठेवून सुरू केला…
आम्ही तिघेही लक्षपूर्वक ऐकू लागलो… आमच्या कानावर पडलेले त्या दोघांचे संवाद असे होते:
तो : मी गरम चहा मागवणार आहे. तुझ्यासाठी गरम चहा कॉफी?
ती : छ्या… चहा-कॉफी तर नेहमीची. तू तुझ्यासाठी गरम चहा मागवू पाहतोस तर माझ्यासाठी चिल्ड बिअर मागव.
तो : (मोठ्या आवाजात) काय? चिल्ड बिअर?
ती : हो… पहिल्याच भेटीत हॉट ड्रिंक्स नको… चिल्ड बिअर पुरेशी आहे.
तो : म्हणजे तू दारू पितेस?
ती : छी: छी:.. दारू काय म्हणतोस? समाजातील खालच्या वर्गातले दारू पितात. आम्ही उच्चभ्रू मंडळी मद्य सेवन एन्जॉय करतो!!
तो : तू दारू… नव्हे मद्य घेतेस हे तुझ्या आईबाबांना चालतं?
ती : सगळ्याच गोष्टी त्यांना सांगूनच करायला हव्या असं कुठं आहे? कुकुलं बाळ आहोत का आपण? तू देखील मद्य घेत असशीलच. पहिल्याच भेटीत मद्य घेतलं तर माझं मत वाईट होईल म्हणून गरम चहा मागवलास ना? तू पण शेअर कर ना चिल्ड बिअर.. नो प्रॉब्लॅम…
सख्यानं मोबाईल स्विचऑफ करून खिशात ठेवला आणि म्हणाला, ‘‘तर सध्या हे सगळं असं चाललंय… त्यामुळे आधीच सांगितलेलं बरं… मला मद्य घेणारी म्हणा वा पिणारी चालणार नाही! आणि आणखीन एक म्हणजे तिला सामाजिक कार्याची आवड असता कामा नये. किंवा ‘ती’ गावातल्या महिला मंडळाची वा भिशी मंडळाची सभासद नसावी. या सगळ्या लक्ष घातलं की, संसारातलं लक्ष उडतं असं माझं निरीक्षण आहे. इतरांच्या घरात जे चालतं ते माझ्याही घरात चाललेलं नकोय मला…
‘‘बरं बुवा… आणखी काही राहिलंय का? असेल तर तेही सांग…’’ सदू म्हणाला.
सख्या म्हणाला, ‘‘हो… तसं महत्त्वाचं सगळं सांगून झालंय. म्हणजे म्हणतात पहा… हत्ती गेला आणि शेपूट राहिलं म्हणून तसंच. हं… तर ती शेजारणीसोबत गप्पा मारण्यात स्वत:चा संसार विसरणारी नसावी. काय असतं, बहुतेकांच्या शेजारपणी चोवीस तास मोकळ्याच असतात. पण म्हणून काही आपणही त्यांना साथ द्यायला नकोय… म्हणजे नहीं चलेगा आणि आता हे बहुधा शेवटचंच. पण खूप खूप महत्त्वाचं, ती उधळ्या स्वभावाची म्हणा वा वृत्तीची नसावी. तिनं संसार काटकसरीनंच करायला हवा. म्हणजे त्यामुळे होईल काय तर वर्षअखेर थोडी बचत होईल. त्या बचतीतूनच आपल्याला तिच्यासाठी सोन्याचे दागिने करायचे आहेत. मी ऐकून आहे की, दागिना म्हटला की, बायकांची कळी खुलते. त्या प्रसन्न दिसू लागतात. उत्तम दर्जाच्या सुखी संसारासाठी आणखी काय हवं असत ते तुम्ही सांगावं. कारण तुम्ही अनुभवी आहात. माझं ज्ञान म्हणजे इकडून तिकडून जमवलेल्या माहितीवर आधारलेलं आहे… आणखी काय बरं राहिलं?’’ असं म्हणत सख्या डोकं खाजवू लागला आणि डोक्यात भक्कन प्रकाश पडल्याप्रमाणं ओरडला, ‘‘अरे बापरे हे सांगायचं राहिलंच की.’’
‘‘काय ते?’’ आम्ही तिघांनीही एकाच आवाजात विचारलं.
सख्या म्हणाला, ‘‘मोबाईल रे… सध्या सगळीकडं थैमान घालणारा मोबाईल! तर या मोबाईलच्या आहारी तिनं बिलकुल जाता कामा नये. आता माझ्याकडंही मोबाईल आहे. पण मी तो केवळ पूर्वीच्या फोनसारखाच वापरतो. केवळ दुसर्‍याशी संपर्क साधण्याचं साधन हाच एकमेव उपयोग… बाकीचं तुमचं ते व्हॉटस्अप, यूट्यूब, फेसबुक इत्यादी कटकटी नाहीतच. तर मोबाईलच्या वापराबाबत तिनं माझा आदर्श ठेवावा… तर मित्रहो, मला काय काय चालणार नाही ते सगळं मी ऐकवलं. आणखीही काही राहिलं असेल तर सांगेन. पण नंतर. आता तुम्ही कामाला लागायचं. माझ्या करता बायको शोधायला घेताना तुमच्या सोईसाठी चार दोन टिप्स ऐकवतो. मला सांगा तुमच्या नात्यागोत्यात वा पाहण्यात वा तुम्ही नोकरी करत असलेल्या ठिकाणी लग्नाशिवाय दिवस काढणारी कुणी तरी असेलच की. लगेच एकमेकांकडं पाहत, ओठ दुमडून नकार ऐकवू नका. जरा आठवून… स्मृतीला ताण देऊन पहा… कुणी ना कुणी असेलच आता मी जसा लग्नाविना राहिलोय तशीच तीही- जी कोण असेल ती, राहिली असेलच की. आम्हा दोघांनाही एकमेकांसमोर आणून उभं करणं एवढंच काम तुमचं असणार आहे आणि हे करताना मी नुकत्याच ऐकवलेल्या अटींचा विसर पडू देऊ नका… अर्थात मी केवळ तुमच्याच प्रयत्नांवर विसंबून राहणार नाही. माझ्या बाजूनं प्रयत्न चालूच असतील. पण अपेक्षित यश अद्याप हुलकावण्या देते आहे. म्हणूनच तुम्हा तिघांची मदत घ्यावी म्हणतोय. तसं गाणंच आहे बघा… एक से दो भले… दो से भले चार… मंझिल अपनी दूर है… रस्ता करना पार… मंझिल म्हणजे माझं होऊ पाहणारं लग्न! काय येतंय काय ध्यानात? आणि तुमच्यात एकमेकांत संपर्क असू दे. नाहीतर प्रत्येक जण एक या हिशोबानं तीन मुली माझ्यासमोर उभ्या ठाकतील. असं व्हायला नकोय. कुणी आणलेल्या मुलीशी लग्न करावं? हा पेच नकोय मला. मला करायचंय ते एकटीशीच लग्न. तीन तीन लग्नं करायला घ्यायचं हे माझं वय नव्हे. चला तर मग लागा कामाला…’’ सख्यानं आपल्या लग्नप्रस्तावाचा समारोप केला आणि तो सहेतुक नजरेनं आमच्याकडं आळीपाळीनं पाहू लागला. आम्हा तिघांचंही एकमेकांकडं पाहून झालं.
काहीतरी महत्त्वाचं आठवल्यागत मधू म्हणाला, ‘‘अरे, पण आधी एक सांग. वर्तमानपत्रांत वधु-वरांच्या जाहिराती छापल्या जातात. आपण ‘वधू पाहिजे’ अशी एक जाहिरात देऊन पाहू या का?’’
सख्या नाक फेंदारून म्हणाला, ‘‘जाहिरात? खरं सांगायचं तर अशा जाहिरातींवर माझा विश्वास नाही. अरे, जाहिरात ही कुठल्या तरी वस्तूची असते. हाडामांसाच्या माणसांची कशी असेल? शिवाय जाहिरात म्हणजे नसलेल्या गुणांचा गुणाकार आणि अंगी असलेल्या अवगुणांचा भागाकार. मला नाहीच जमायचं असल्या जाहिरातींच्या मागं…’’
सदू म्हणाला, ‘‘ओके… नो प्रॉब्लेम… मी म्हणतो, तू गावातल्या भटजीबोवाकडं चौकशी केलीस का? या भटजीबोवांचं अनेकांच्या घरी येणं जाणं असतं. त्यांच्याकडं विचारणा केली तर ते तुला योग्य अशी वधू सुचवू शकतील… काय बरोबर ना… मी काय म्हणतो ते…’’ सदूनं आमची साक्ष काढली.
सख्या सदूच्या भटजीबोवाला उडवत म्हणाला, ‘‘तुम्ही तिघे खंबीरपणे माझ्या मागं उभे असताना मी भटजीबोवाची मदत का म्हणून घेऊ? नको… नकोच ते त्याच्याकडं जाणं…’’
मी म्हणालो, ‘‘ठीक आहे. विवाहमंडळाची मदत घेऊ या का? त्यांच्याकडच्या जाडजूड रजिस्टरमध्ये सगळ्यांची सगळी माहिती नोंदवलेली असते. ते रजिस्टर डोळ्याखालून घातलं तर मनासारखी वधू मिळू शकेल.’’
सख्या हात उडवून ताड्दिशी म्हणाला, ‘‘हॅ… विवाहमंडळाचं काय सांगू नकोस. तिथं गेल्यावर त्यांच्या नाना प्रकारच्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं द्यावी लागतात. आता मला सांग… इतकी वर्षं बिन लग्नाचा मी का राहिलो, या त्यांच्या खवचट प्रश्नाचं उत्तर मी काय देणार? त्यामुळे विवाह-मंडळाकडं जाणं नको आणि त्यांच्याकडच्या जाडजूड रजिस्टरमध्ये डोकावून पाहणं नको!’’
मधू म्हणाला, ‘‘राहिलं… विवाह मंडळाकडची चौकशी कॅन्सल… हां… याक्षणी ताजं ताजं आठवलं. अरे, आपल्याकडं मधून मधून वधुवरांचे मेळावे भरवले जातात. अशा मेळाव्यात तुला हवी तशी बायको मिळून जाईल, असं मला वाटतं…’’
‘‘तुझ्या वाटण्याला वाटाण्याच्या अक्षता! अरे, ते मला एकटा पाहून विचारतील. तुमचा मुलगा वा मुलगी कुठं आहे? आणि मी जर म्हणालो की, मी माझ्यासाठी वधू शोधू पाहतोय, तर ते म्हणतील, तुमचे पालक कुठं आहेत? मला सांग. या वयात मी माझ्या स्वर्गवासी पालकांना त्यांच्यासमोर कसा उभा करणार?’’
‘‘तर मग आपण असं करू… ‘विलक्षण’ शहाणपणाचा आव आणत मधू म्हणाला, ‘‘आपणच एक मध्यमवयीन वधुवरांचा मेळावा आयोजित करू… चुटकीसरशी मिळून जाईल तुला मनपसंत वधू…’’
तितक्याच विलक्षण वैतागलेल्या सुरात सख्या म्हणाला, ‘‘अरे, पण तुझ्या मेळाव्याला माझ्यासारखेच लग्नाची बस चुकलेले वधुवर यायला हवेत ना? उगाच सभागृह भाड्यानं घ्यावं लागेल, त्याआधी वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी लागेल… आणि माझ्याशिवाय कुणी आलाच नाही तर, सभागृहाचं भाडं जाहिरातीचे पैसे कोण देणार? नको… हे मेळावे-बिळावे नकोतच.’’ आणि मग आम्हा तिघांकडं रोखून पहात सख्या पुढं म्हणाला, ‘‘हे बघा. तुम्हाला माझ्यासाठी वधू आणणं जमणार नसेल तर आत्ताच सांगा. मी दुसरी काही व्यवस्था होऊ शकते का ते पाहीन… अरे, तुम्ही तिघे घरचेच म्हणून तर तुमची मदत घेऊ पाहतोय ना मी… आणि तुम्ही मला बाहेरच्या संस्थांची मदत घ्यायला सुचवताहात. हे असं सुचवणं शोभतं का तुम्हाला… आणि आपल्या इतक्या वर्षांच्या मैत्रीला?’’
मी आश्वासक सुरात म्हणालो, ‘‘सख्या… मित्रा… तसं काही नाही. तुझ्या वधूचा शोध लावण्यासाठी आम्ही तिघेही आपापल्या एका पायावर उभे आहोत, असंच समज. सगळी सगळी जबाबदारी आम्ही या क्षणापासून आमच्या रुंद खांद्यावर घेतलेली आहे! झालं तुझं समाधान…?’’
मख्खपणे सख्या म्हणाला, ‘‘माझं समाधान तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही माझ्यासमोर माझी वधू उभी कराल… चला लागा कामाला. पण त्याआधी थोडी पोटपूजा करू या…’’
आणि मग अशा प्रकारच्या मेंदूला ताण देणार्‍या बैठकीनंतर लागलेल्या भुकेचं शमन करण्यासाठी, नेहमीच्या पद्धतीप्रमाणं, बागेशेजारच्या कॉफी-हाऊसमध्ये गेलो. तिथल्या ताज्या आणि गरम पदार्थांवर आडवा हात मारला. बिल देणं हे सख्याचं कर्तव्यच होतं. ते त्यानं पूर्ण केलं आणि खर्‍या अर्थानं बैठक आटोपल्याचं समाधान आम्हा चौघांच्याही चेहर्‍यावर पसरलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेऊन तिथून फुटू पाहणार तेवढ्यात सख्या म्हणाला, ‘‘मित्रहो, शेवटचं एक सांगायचं राहिलंय… ऐका.. मी आपल्याकडच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणं, वाजतगाजत, थाटामाटात, नातेवाईकांच्या गर्दीत आणि जेवणावळी उठवत, लग्न मुळीच करणार नाही. माझं लग्न रजिस्ट्रारच्या ऑफिसात संपन्न होईल… तुम्हा तिघांना आणि वहिनीमंडळींना आमंत्रण असेलच. लग्नानंतर दुपारचं जेवण हॉटेलात घ्यायचं आणि आपापल्या घराच्या दिशेनं चालू पडायचं. बस्स एवढंच. आता आपली पुढची भेट मोजून तीस दिवसांनंतर… मधल्या काळात माझ्यासाठी बायको शोधण्याचं काम प्रामाणिकपणानं करायचं… अच्छा तर मग.. अब लेते हैं एक ब्रेक और मिलते हैं… इसी जगह प्ार… एक महिने के बाद…’’
आणि आम्ही आपापल्या घराच्या दिशेनं निघालो.
दरम्यान, सख्यानं दिलेल्या महिन्याच्या मुदतीचे तीस दिवस कधी संपले ते कळलेच नाही. मधल्या काळात, सख्याच्या मैत्रीला जागून इतकी वर्षं कुठंतरी लपून बसलेल्या त्याच्या बायकोचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या प्रयत्नात आमच्या बायकाही सामील झाल्या. ‘‘अय्या, म्हणजे सख्याभावोजीना लग्नाचं महत्त्व अखेर कळलं तर’’, असं म्हणत त्यांनीही या शोधमोहिमेत सक्रीय भाग घेण्यासाठी कमरेला पदर खोचला. पण आम्हा सगळ्यांचेच प्रयत्न ओमफस् झाले. ‘‘नाहीतरी सख्याभावोजींच्या अटी फारच जाचक आणि अशक्य कोटीतल्या… अशा अटी असतील तर त्याना बायको मिळेल कशी?’’ असेही उद्गार त्यांनी आम्हाला ऐकवले.
आणि अखेर सख्याला तोंड देण्याचा दिवस उगवला. रिकाम्या हातांनी आणि शरमिंद्या चेहर्‍यानं आम्ही तिघे बागेतल्या नेहमीच्या जागी उपस्थित झालो आणि सख्याची वाट पाहू लागलो. तब्बल अर्धा तास वाट पहायला लावून सख्या उगवला. त्याच्या अंगप्रत्यंगात उत्साह सळसळलेला दिसला… आनंदी आनंद गडे-इकडे तिकडे चोहिकडे. म्हणजे सख्यानं स्वत:च बायकोचा शोध लावला तर. सख्याच्या लग्नाचं, इतकी वर्षं वाट पहायला लावणारं घोडं अखेर गंगेत न्हाणार तर. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही… मोठ्या उत्सुकतेनं आम्ही सख्याकडं पाहू लागलो.
आम्हा तिघांकडं आळीपाळीनं पाहून झाल्यावर सख्या म्हणाला, ‘‘मित्रहो… लवकरच म्हणजे चारपाच महिन्यात आपल्याकडं विधानसभेच्या आमदार पदासाठी पोटनिवडणूक होणार आहे; तुम्ही पेपरांत वाचलंच असेल. पण सत्ताधारी पक्षाच्या जवळजवळ दहा कार्यकर्त्यांनी या जागेसाठी आपली निवड व्हावी आणि तिकिट मिळावं म्हणून प्रयत्न सुरू केलेत. आता यापैकी कुणा एकाची निवड करायची असल्यामुळे इतर नऊजण नाराज होणार म्हणून पक्षाच्या हायकमांडनं, यापैकी कुणालाच तिकीट न देता बाहेरच्या माणसाला तिकीट द्यायचं ठरवलंय… आणि कळवण्यास आनंद होतोय की, तो माणूस असणार आहे मी!!… असे तोंडाचा ‘आ’ वासून माझ्याकडं पाहू नका… आता तुम्हाला माझ्या प्रचारकार्यासाठी कसून मेहनत करायची आहे. कारण माझ्या प्रचारमोहिमेचे तीन मजबूत खांब म्हणून मी तुमचीच निवड केलेली आहे… हो! हो! तुमच्या चेहर्‍यावरची चलबिचल माझ्या लक्षात आलेली आहे. माझ्याकरता बायको शोधण्याच्या कामात दारूण अपयश आलंय ना तुम्हाला? मला कल्पना होतीच… पण तो मुद्दा मी सध्या बाजूला ठेवतो आहे… आता सगळं लक्ष केंद्रित करायचं ते माझ्या प्रचारकामाकडं… मित्रानो, एकदा का मी निवडून आलो आणि मी निवडून येणारच.. तुमचं बळ आहे माझ्या पाठीशी. मग का नाही निवडून येणार शिवाय सत्ताधारी पक्षाचा मी उमेदवार आहे त्यामुळे ती चिंता नकोच आणि मी निवडून आलो रे आलो आणि मी ‘सिंगल’ आहे हे कळल्यावर कुठल्याही प्रयत्नाविणा, मला हवी तशी बायको मिळणारच… बघालच तुम्ही… चला, तर मग लागा माझ्या प्रचाराच्या कामाला…’’
…आमची बैठक अवघ्या काही मिनिटांतच आटोपली आणि नेहमीप्रमाणं बैठकीची सांगता करण्यासाठी आम्ही सख्यासोबत बागेशेजारच्या कॉफी हाऊसच्या दिशेनं ऐटीत चालायला लागलो!

Previous Post

करोना! फिरो… ना!

Next Post

मी ग्रूप सोडतो त्याची गोष्ट!

Related Posts

अन कॉमन मॅन!
दिवाळी 21 धमाका

अन कॉमन मॅन!

December 1, 2021
दिवाळी 21 धमाका

आम्ही V/S प्रेसिडेंट शी जिनपिंग

December 1, 2021
दिवाळी 21 धमाका

मला लागली ईडीची उचकी!

November 24, 2021
दिवाळी 21 धमाका

धाडस?

November 24, 2021
Next Post

मी ग्रूप सोडतो त्याची गोष्ट!

पावडर

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.