वाचकहो,
‘मार्मिक’च्या दिवाळी अंकानंतर या अंकापासून नियमित अंक पुन्हा सुरू होतो आहे… पण, तोही दिवाळीनंतरची दिवाळी साजरी करणारा… म्हणजे काय, ते समजून घेण्याआधी सर्वप्रथम दिवाळी अंकाला आपण सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. ‘मार्मिक’च्या दिवाळी अंकात नेहमी खुमासदार, खुसखुशीत कथा असतात, या यंदा कशा नाहीत, असा प्रश्न वाचकांना पडला होता… त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आज आली आहे… ‘मार्मिक’चा हा अंक दिवाळी कथा-फराळ विशेषांक आहे… दिवाळीनंतरही आपली दिवाळी सुरूच आहे…
…आसपास तरी वेगळे काय सुरू आहे?
…गेल्या वर्षीच्या कोरोनाच्या सावटाखाली साजर्या झालेल्या अंध:कारमय दिवाळीच्या तुलनेत यंदाची दिवाळी थोडी उत्साहपूर्ण होती, देशाचं, राज्याचं आर्थिक गाडं रुळावर येत असल्याची चाहूल हळुहळू लागते आहे, मात्र इंधनांचे सतत वाढते दर हा त्यातला मोठा अडथळा आहे. बस हो गयी महंगाई की मार, अशा घोषणा आजचे सत्ताधीश देत होते, तेव्हा खुल्या बाजारात दुप्पट दराने मिळणारं इंधन तेव्हाचं सरकार अर्थकारणाची घडी विस्कटू नये म्हणून निम्म्या दराने विकत होतं… आज त्याच्या निम्म्या दराने आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणारं इंधन चौपट किंमतीला विकून कोरोनाकाळातल्या आर्थिक नुकसानीची पठाणी भरपाई करण्याचा उद्योग केंद्रात सुरू आहे. या दरवाढीमध्ये राज्य सरकारांचा केवढा मोठा वाटा आहे, सर्वसामान्य माणसांचा एवढा पुळका असेल तर आधी आपले कर कमी करा, असा शहाजोग सल्ला भारतीय जनता पक्षाचे राज्यद्रोही नेते आणि त्यांची समाजमाध्यमी पिलावळ देत असते. यांना वर दिल्लीत कोणी हिंग लावून विचारत असेल तर इतक्याच बाणेदारपणे त्यांनी जीएसटी संकलनातला राज्यांचा वाटा बर्या बोलाने देऊन टाका, असं आपल्या आकांना ठणकावून सांगावं… त्यांनी टिचकीने उडवून दिलं की इथे मलबार हिल परिसरात जाऊन राज्य सरकारच्या शिफारसीवर ठराविक मुदतीत शिक्कामोर्तब करणं हे तुमचं काम आहे, हे तिथल्या महामहीमांना सांगून पाहावं… दिल्लीतल्या सरकारच्या या दंडेलशाहीमुळेच तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या सरकारला केंद्र सरकार म्हणायला नकार दिला आहे. ते सेंट्रल गव्हर्न्मेंट नाही, तर संघराज्य सरकार आहे, युनियन गव्हर्न्मेंट आहे, याचं भान दिल्लीतले सत्ताधीश वेगाने विसरत चालले आहेत आणि आपल्या पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यांना शत्रूराष्ट्र कल्पून त्यांच्याविरोधात केंद्रीय यंत्रणा कामाला लावल्या जात आहेत…
अशा यंत्रणांपैकी एका यंत्रणेतील सुपारीबाजी, खंडणीबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी बेडरपणे उघडकीला आणली आहे… ज्याच्यापाशी अंमली पदार्थ सापडल्याची नोंद नाही, ज्याने ते सेवन केल्याची नोंद नाही, अशा आर्यन खानला कोठडीत ठेवण्याचा पराक्रम या यंत्रणेने करून दाखवला… त्याचवेळी गुजरातेतल्या बंदरांमध्ये हजारो कोटींचे अंमली पदार्थ उतरतात… या काळ्या धंद्यांचे कर्तेकरविते कोण आहेत, याचा शोध घेण्याची गरज या चमकोंनाही वाटत नाही आणि इतर केंद्रीय यंत्रणांनाही वाटत नाही, यात सगळे काही आले… नवाब मलिक एकामागोमाग एक अॅटमबाँब फोडत असताना राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी आपण हायड्रोजन बाँब फोडणार असल्याचा दावा केला आणि लहान मुलांच्या हातातल्या किरकोळ आपटीबारांच्या योग्यतेचा एक फटाका फोडला… मलिकांनी त्यातलीही हवा काढून घेतली तेव्हा त्यांनी ‘डुकराबरोबर कुस्ती’ खेळत नाही, असे आपल्या उज्वल आणि थोर कर्दमप्रेमी पक्षीय संस्कृतीला साजेसे पळपुटे उद्गार काढले आणि आणखी हसे करून घेतले… इतर कोणी असली भाषा वापरली असती तर यांची समाजमाध्यमांवरची पाळीव प्रजा ‘वराह अवताराची टिंगल खपवून घेणार नाही’ असल्या गमजा करत धावून गेली असती…
ऐन दिवाळीच्या आगेमागे ही आतषबाजी सुरू असताना भक्तगणांचा सरासरी बुद्ध्यांकही फार मोठा वाटेल, अशी बौद्धिक संपदा लाभलेल्या, पद्मश्री पुरस्काराची लाज तो मिळताक्षणी घालवणार्या कंगना रणोतने भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालंच नाही, तेव्हा मिळाली ती भीक होती आणि स्वातंत्र्य २०१४ साली मोदी सरकार निवडून आलं तेव्हा मिळालं अशी मुक्ताफळं उधळली… हा मलाना क्रीमच्या सेवनाचा असर आहे, असं नवाब मलिक म्हणालेले आहेतच… एनसीबीने यांचे पुरवठादार कोण आहेत, त्याचाही शोध घ्यायला हरकत नाही… बाकी काही नाही, तरी आपल्याला ज्यासाठी नेमलंय ते काम केल्याचा आनंद तरी मिळेल…
…भारतीय समाजातला एकोपा विस्कटून टाकणार्या या अस्वस्थकारी घडामोडी आसपास घडत आहेत… हे फटाके आता दिवाळीनंतरही वाजत राहणार आहेत आणि उत्तर प्रदेशातील निवडणूक जवळ येईल तसतसे धार्मिक तेढ पसरवण्याचे धंदे, दंगली, जाळपोळ, भावना दुखावून हिंसा वगैरे हुकमी खेळ खेळले जाणार आहेतच… त्या सगळ्या गदारोळात मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्रात ही कीड वाढू न देण्यासाठी महाविकास आघाडीला डोळ्यांत तेल घालून सावध राहावे लागणार आहे… ‘मार्मिक’ही या रणधुमाळीत उतरेलच…
…पण, त्याआधी यावेळच्या खास कथा विशेषांकात अव्वल लेखकांनी लिहिलेल्या विविधरंगी कथांचा आस्वाद घेऊन दिवाळीनंतरची दिवाळी साजरी करू या… ताजे टवटवीत होऊ या आणि मग ‘हर हर महादेव’ म्हणत नव्या जोशाने पुन्हा रणमैदानात उतरायला सज्ज होऊ या…