□ मॅचफिक्सिंगने महाराष्ट्र अस्वस्थ, लोकांत संताप.
■ आता ही भुसभुशीत खेळपट्टी उखडून टाकण्याची वेळ आली आहे… नुसती अस्वस्थता काय कामाची?
□ नाशिकमध्ये पोलिसांची दडपशाही; शेतकरी नेत्यांना नजरवैâदेत ठेवले.
■ ज्यांना विरोधाचा, निषेधाचा एकही सूर ऐकायचा नसतो, असे एककल्ली आणि आत्ममग्न राज्यकर्ते लाभल्याची ही चिन्हे आहेत. कैदेतच पडायचं नसेल, तर वेळेत दडपशहांना उचलून फेकले पाहिजे.
□ राष्ट्रवादी आमदार अपात्रता उलटतपासणी २० जानेवारीपासून
■ तिच्यात काय होणार, हे सगळ्यांना माहिती आहे. कशाला चौकशीचे फार्स? निकाल लावून टाका.
□ फडणवीसांसमोरच गंगापुरात खोक्यांची पळवापळवी.
■ वेगवान सरकारच्या गतिमान कारभारावरचा प्रगाढ विश्वासच लोकांनी व्यक्त केला.
□ बिटकॉइन घोटाळेबाजाचा फडणवीसांसोबत सेल्फी.
■ आता पक्षात प्रवेश कधी करतो ते पाहायचे?
□ पंतप्रधानांच्या दौर्यामुळे दगडखाणी, मिक्सर प्लँटवर बंदी; नवी मुंबई परिसरातील शेकडो इमारतींची बांधकामे ठप्प.
■ आसपास राहणार्या नागरिकांना, तुमच्या खर्या मालकांना या बांधकामांच्या माध्यमातून रोज धूळ चारताना लाजा नाहीत वाटत?
□ मोदींच्या सभेसाठी दोन हजार महिला आणण्याचे ठाणे महापालिकेला टार्गेट.
■ नाहीतर लोक आपणहून जाणार आहेत का तिथे ‘मी माझा’च्या प्रयोगाला गर्दी करायला?
□ दुरुस्तीसाठी पावणेतीन कोटींची उधळपट्टी; तरीही उरण-पनवेल मार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात.
■ कंत्राटदार खूष आहेत, ते पाहा ना; सतत काय नकारात्मक विचार करता?
□ मिस्टर गद्दार… पक्ष, चिन्ह पळवलं, अजून काय हवंय? – उपजिल्हाप्रमुख घाडीगावकर यांचा मिंध्यांना सवाल.
■ त्यांना हवंय लोकांचं प्रेम आणि त्यांचा विश्वास; तो मात्र त्यांना कधीच लाभणार नाही.
□ बिले न भरल्याने पालघर जिल्ह्यातील पोलिसांचे फोन कापले.
■ केवढी ही नामुष्की! पोलिसांनो, आत्मनिर्भर बना!
□ अपूर्ण राम मंदिराचे उद्घाटन करणे चुकीचे – चार शंकराचार्यांचा सोहळ्यावर बहिष्कार.
■ मुळात मंदिर आहे मोदींच्या अहंकाराचे. जिथे खुद्द प्रभू श्रीराम हेच निवडणूक प्रचारातले निमित्त बनले आहेत, तिथे शंकराचार्यांना विचारतो कोण?
□ मणिपूरच्या राम मंदिरातही शिवसेना आरती करणार, मोदी तेथे येणार का? – संजय राऊत यांचा सवाल.
■ फारच अवघड प्रश्न विचारता बुवा तुम्ही राऊत साहेब! निवडणूक जिंकण्यासाठी उपयोगी पडणार आहे का ते?
□ महाराष्ट्रातील भाजपची घराणेशाही एकदा बघा – अंबादास दानवे यांचे जोरदार प्रत्युत्तर.
■ त्यांना आपलं झाकून ठेवून दुसर्याचं मात्र वाकून वाकून बघण्याची सनातन सवय आहे अंबादासजी!
□ पंतप्रधान मोदींचा घराणेशाहीवर हल्ला; भाजप व महायुतीतील राजकारण्यांची कोंडी.
■ मंचावर अजितदादा, आणि फडणवीस बसलेले असताना मोदी घराणेशाही, भ्रष्टाचार वगैरे विषयांवर कीर्तन करतात, तेव्हा ते एक वेगळंच मनोरंजन म्हणून पाहायचं… सिरियसली कोण घेतो?
□ दिघा रेल्वे स्टेशनचे शिवसैनिकांनीच केले उद्घाटन.
■ शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना डावलून सोहळे कराल, तर शिवसेना करेक्ट कार्यक्रम करून दाखवणारच ना!
□ मिंधे गटाला वाचवण्याचा नार्वेकरांचा खटाटोप; पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
■ आलेली स्क्रिप्ट वाचून दाखवायची यापेक्षा वेगळं काही अपेक्षित होतं का त्यांच्याकडून?
□ कोरोना महासंकटातही ट्रान्स हार्बर उभा राहिला हे गौरवास्पद – मोदींकडून महाविकास आघाडीचे अप्रत्यक्ष कौतुक.
■ प्रत्यक्ष कौतुक करायला अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखं उदार, उदात्त व्यक्तिमत्त्व लागतं आणि तशी दानत लागते.
□ न्यायालयाच्या दणक्याने मिंधे सरकारचे डोके आले ठिकाणावर; महाविकास आघाडीच्या काळातील पर्यटन योजनांवरील स्थगिती उठवली.
■ न्यायालयाचं एक मंत्रालय पीठ काढण्याची गरज आहे आता. दणके तरी किती द्यायचे रोज?
□ स्वच्छतेत मुंबईचा दर्जा घसरला.
■ भामट्यांच्या हातात तिच्या चाव्या पडल्या आहेत. ते तिजोरी स्वच्छ करायला आलेत, मुंबई नव्हे.
□ गृहमंत्री फडणवीसांच्या नागपुरात ५० लाखांचा गांजा जप्त.
■ अरेरे, आता अनेकांचे भाषण करण्याचे वांधे होणार.
□ कांदे रस्त्यावर फेकून मोदींच्या दौर्याला शेतकर्यांचा विरोध.
■ कांदे फेकून देण्यापेक्षा फेकून मारण्याची कला शिकावी लागेल आता शेतकर्यांना.
□ भाजपच्या इव्हेंटकडे जनतेची पाठ.
■ इकडून तिकडून गोळा करून पढवून आणलेली जनता तिथे गोळा होते. जनतेला पोटही आहेच ना!