• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

दीर्घायुषींची माहिती देणारं लाँगेव्हिटी म्युझियम

- पुस्तकांच्या पानांतून

Nitin Phanse by Nitin Phanse
August 17, 2023
in पुस्तकाचं पान
0

ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश प्रधान हे गेली अनेक वर्षे सपत्नीक जगभ्रमंती करत आहेत. पत्नी जयंती यांच्या सोबतीने ते स्वत: प्रवासाचं नियोजन करून भटकतात, त्यामुळे टिपिकल टुरिस्टी पर्यटनस्थळांच्या पलीकडचं जग त्यांना पाहायला मिळतं, खानपान अनुभवायला मिळतं. रोहन प्रकाशनाने त्यांच्या या भ्रमंतीवर आधारित पुस्तकमालिका प्रकाशित केली आहे. त्यातल्या एका पुस्तकातील अझरबैझानच्या एका आगळ्यावेगळ्या म्युझियमची ही भटकंती.
– – –

अझरबैजानच्या दक्षिणेकडे, इराणच्या सीमेनजिक असलेलं ‘लेरिक’ शहर दीर्घायुषी लोकांसाठी सा‍र्‍या जगात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे तेथील दीर्घायुषी लोकांची संपूर्ण माहिती, वयाचे पुरावे देणारं ‘लाँगेव्हिटी म्युझियम’ गावात उभारण्यात आलं असून अशा प्रकारचं ते जगातलं एकमेव व अत्यंत दुर्मीळ म्युझियम मानण्यात येतं. त्यामुळेच ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये त्याची नोंद झाली आहे.
या शहरात जाऊन ते म्युझियम पाहावं आणि शक्य झालं तर गावकर्‍यांशी गप्पा माराव्या असा कार्यक्रम आखला.
अल्बोर्झ पर्वतराजीमध्ये टॅलिश डोंगराच्या विळख्यात लेरिक हे ८५,००० लोकवस्तीचं गाव वसलं आहे. गावाकडे जाण्याचा रस्ता संपूर्ण डोंगरातून, दर्‍याखो‍र्‍यांतून आहे. दुतर्फा मधून मधून घनदाट झाडी, उत्कृष्ट लँडस्केप यामुळे शहरात प्रवेश करण्यापूर्वीच आपण त्या परिसराच्या प्रेमात पडतो.
कॉकेशस भागात वयाची नव्वदी, शंभरी गाठलेले बरेच जण आहेत. पण लेरिकमध्ये १२०, १४० अगदी आयुष्याची १५० वर्षं पूर्ण झालेल्यांचेही वाढदिवस साजरे झाले आहेत आणि आजही होत असतात. जगातील अनेक आरोग्यतज्ज्ञांनी या शहराला आवर्जून भेटी दिल्या आणि तेथील दीर्घायुषी लोकांची नोंद कागदपत्रांत करून ठेवली आहे.
सर्वप्रथम ते आगळं वेगळं म्युझियम पाहायला गेलो. हे म्युझियम म्हणजे अगदी छोटी एक मजली इमारत. बाहेर अझरबैजानी भाषेत म्युझियमच्या नावाचा बोर्ड होता. ही इमारत २०१०मध्ये बांधण्यात आली. दोन मोठ्या दालनांत हे म्युझियम थाटण्यात आलं असून त्यात शंभरी ओलांडलेल्या पन्नासपेक्षाही अधिक व्यक्तींचे फोटो, २००० कागदपत्रं, चित्रं, पुरावे मांडले आहेत.
या म्युझियमची देखभाल करायला साठ वर्षांची महिला आहे. त्या सर्व म्युझियम दाखवतात. अर्थात, भाषेची अडचण होतीच. पण तोडकंमोडकं इंग्रजी बोलणारा आमच्या गाडीचा ड्रायव्हर दुभाषाचं काम करत होता. त्याखेरीज फोटोंच्या खाली लिहिलेल्या जन्म-मृत्यूच्या तारखा या इंग्रजीत होत्या. त्यामुळे तशी अडचण येत नव्हती.
लेरिकमध्ये दीर्घायुष्याचा आत्तापर्यंतचा विक्रम केला, मुसलोमोव्ह सिराली फझीअली यांनी. ते एकूण १६८ वर्षं जगले. त्यांचा जन्म १८०५ सालचा व १९७३मध्ये त्यांना मृत्यू आला. इथे टोपी घातलेला व लांब दाढी असलेला त्यांचा फोटो असून त्याच्या खाली त्यांची जन्मतारीख व मृत्यू तारीख लिहिलेली आहे. पुराव्यासाठी पासपोर्टमधील दिनांक व मृत्यूनंतर थडग्यावरील तारीख दिसते. अर्थात, त्या काळी अझरबैजानच्या ग्रामीण भागांत जन्माची नोंद अधिकृतरीत्या केली जात नसे. त्यामुळे त्यांची जन्मतारीख निश्चित पुराव्यानिशी पडताळून पाहणं शक्य नाही. पण मुसलोमोव्ह यांची उच्चपदस्थ व्यक्तींमध्ये बरीच उठबस असायची. बडे राजकीय नेते त्यांचे मित्र होते. व्हिएतनामचे नेते हो ची मिन्ह यांचे त्यांना आलेलं पत्र त्यांच्या फोटोजवळ ठेवलं आहे. त्यात हो ची मिन्ह यांनी पत्राची सुरुवात ‘प्रिय ग्रँडपा’ अशी केली आहे.
इव्होझोव्ह महंमद बगीर हे १५० वर्षं जगले. त्यांचा जन्म १८०९चा व मृत्यू १९५९मध्ये झाला. त्यांचा कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय होता. तिथे अगदी त्या काळातील व ५९-६०मधील अशा दोन्ही इस्त्र्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यावरून एका व्यक्तीने आपल्या आयुष्यात तंत्रज्ञानाची किती स्थित्यंतरे पाहिली, हे समजून येतं. कुलियेव्हा काफरकुझी यांच्या १३४ वर्षांच्या आयुष्याची नोंद आढळते. त्यांचा जन्म १८७०मधला व मृत्यूचं साल २००४. अनेक जणांचे फोटो, पुरावे म्युझियममध्ये दिसतात. १०३ वर्षांचं आयुष्य जगलेल्या महंमद खान आबासोव्ह यांचं त्यांच्या पणतवा बरोबरचं छायाचित्र आहे.
आम्ही १७ सप्टेंबर २०१९ला या म्युझियमला भेट दिली. त्याच्या दहा दिवस आधी गावातील एका दीर्घायुषी बाईचं निधन झालं. तिचं वय १४५ वर्षं होतं. तिचा फोटो, संबंधित पुरावे, तिची काही वैशिष्ट्यं लवकरच म्युझियममध्ये लावण्यात येतील, असं म्युझियम दाखवणा‍र्‍या महिलेने सांगितलं. हा सर्व भाग प्रदीर्घ काळ कम्युनिस्ट राजवटीखाली होता. दीर्घायुषी लोकांचा सन्मान वगैरे करण्याचा महोत्सव कम्युनिस्ट पक्षातर्पेâ फार पूर्वीपासून साजरा करण्यात येत असे. त्याचं मोठं छायाचित्र म्युझियममध्ये ठेवलं असून ते एकदम लक्ष वेधून घेतं. इथे लिहिलेल्या माहितीनुसार पूर्वीच्या काळी या भागात शंभरी ओलांडलेले निदान ५०० स्त्री-पुरुष होते. आता परिस्थिती बदलली. तरी आजही गावातील निदान ३५-४० जणांनी शतक महोत्सव साजरा केला असून, ते अतिशय सुदृढ, निरोगी, उत्तम आयुष्य जगत आहेत.
‘दीर्घायुषी लोकांचं म्युझियम’ हे असं अगदी आगळंवेगळं म्हणावं लागेल. ‘या सम हेच’ म्युझियम पाहण्यासाठी प्रवेश शुल्क नाही. तुम्ही कितीही वेळ ते म्युझियम पाहू शकता आणि म्युझियमची देखभाल करणा‍र्‍या बाई, सर्व माहिती अत्यंत कळकळीने देतात. त्यांना त्यांच्या लेरिक गावाबद्दल वाटणारा अभिमान त्यातून दिसून येतो. म्युझियम पाहून झाल्यानंतर त्यांचा निरोप घेताना, तुम्ही आयुष्याची शंभरी निश्चित ओलांडणार, अशा त्यांना शुभेच्छा दिल्या, तेव्हा ‘निश्चितच’, असं त्यांनी त्यांच्या स्थानिक भाषेत दिलेलं उत्तर त्यांचा आत्मविश्वासच दाखवत होतं.

पुस्तकाचं नाव : भटकंती आगळ्या-वेगळ्या देशांची
लेखकाचं नाव : जयप्रकाश प्रधान
पृष्ठ : १६८ किंमत : रु. २६०
प्रकाशन : रोहन प्रकाशन

दीर्घायुष्यामागचं गुपित काय असावं?

म्युझियममधील कागदपत्रं, त्या बाईंनी दिलेली माहिती आणि गावात काही वृद्धांशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर लेरिकवासियांच्या दीर्घायुष्यामागचं गुपित बर्‍याच प्रमाणात उलगडलं. सर्वप्रथम माहिती घेतली ती हे लोक काय खातात? तर त्यांच्या जेवणात चिकन, अंडी असतात. पण मीट (अन्य प्राण्यांचं मांस, रेड मीट) ते टाळतात. सेंद्रीय भाज्या खाण्यावर त्यांचा भर असतो. ते शेळीचं दूध व ताक पितात. जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ खाणं पसंत करतात. येथील झर्‍याचं पाणी अतिशय स्वच्छ असतं. हर्बल चहा पिणं त्यांना आवडतं.
इथे कोणीही आजारी पडत नाही; पण आजार झालाच तर औषधं न घेता, नैसर्गिक उपायांवरच संपूर्ण भर दिला जातो. या सर्वाला साथ म्हणजे, अतिशय शुद्ध हवा आणि चालण्याचा जबरदस्त व्यायाम. यांमुळे लेरिकवासियांचं शरीर तंदुरुस्त राहण्यास मोठं साहाय्य होतं. येथील लोकांना प्रदूषित हवा कशी असते, याची कल्पनाच नाही. अगदी शंभरी ओलांडलेले स्त्री-पुरुषही तीन-चार किमीचा चढ रोज अगदी सहज चढतात व उतरतात, असं येथील हॉटेलमध्ये भेटलेल्या एका नव्वदीच्या माणसानं सांगितलं. भाषेच्या अडचणीमुळे त्याच्याशी चांगला संवाद साधता येत नव्हता, पण त्याचं बोलणं थोडं समजून घेता येत होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथील लोकांची साधी राहणी व दैनंदिन जीवनातील नियमितपणा. ताणतणावाचं जीवन त्यांना माहितीच नाही. उद्याचा फार विचार ते करत नाहीत.
त्यांच्या काही सवयीही लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास साहाय्य होतं. उदा. येथील बहुसंख्य नागरिक मऊ गादीवर न झोपता सरळ जमिनीवर पातळ चादर घालून त्यावर झोपणं पसंत करतात. पाठीला चांगला व्यायाम होण्यासाठी ही पद्धत फायद्याची असते. रम्य निसर्ग आणि अतिशय प्रसन्न वातावरण, यात जास्तीत जास्त सुदृढ आयुष्य जगण्याची मोठी उमेद त्यांना मिळते. त्यांच्या दीर्घायुष्याचं हेच खरं गुपित आहे.

Previous Post

सुडाग्नीपेक्षा कारुण्यच श्रेष्ठ!

Next Post

परतफेड!

Next Post

परतफेड!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.