गेल्या काही दिवसांत स्टुअर्ट ब्रॉड, मोईन अली आणि मनोज तिवारी हे तीन क्रिकेटपटू त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयांमुळे चर्चेत आले. ब्रॉडने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला, मोईननं कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला, तर मनोजनं अल्पावधीत निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. ज्या समाजात आपण मोठं होतो, त्याचं दायित्व सांभाळणार्या या क्रिकेटपटूंच्या तीन लघुक्रिकेटकथा.
– – –
लघुक्रिकेटकथा क्र. १
कुटुंब रंगलंय खेळात आणि…
‘‘मला आता इतरांवर आणखी ओझं द्यायचं नाही, म्हणूनच मी माझं आयुष्य संपवत आहे!..’ हेच अखेरचं वाक्य लिहून मिशेल ऊर्फ मिशे ब्रॉडनं आपल्या जीवनयात्रेपुढे पूर्णविराम दिला. मेंदूसंदर्भातील मोटर-
न्यूरॉन नावाच्या गंभीर आजारानं ती ग्रासली होती. गोल्फच्या अनेक जागतिक स्पर्धा यशस्वी करण्यात तिचा हातखंडा. पण या आजाराशी तिनं १६ महिने झुंज दिली. अखेरच्या कालखंडात तिची वाचाही गेली. हे अबोल आयुष्य जगतानाही ती हिंमत हरली नाही. ती अनेक लोकांना ई-मेल आणि पत्र पाठवायची. परंतु व्हीलचेअरवरचं जगणं आणि कुटुंबावरचं ओझं तिला कमी करायचं होतं. शेवटी ती इतकी गांजली की स्वत:वरच औषधी गोळ्यांचा अतिरिक्त भडिमार करून तिनं आत्महत्या केली. तिला ६ जुलै २०१०ला इंग्लंडमधील क्वीन्स मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. ७ जुलैला पहाटे मिशेची प्राणज्योत मालवली. ब्रॉड कुटुंबियांवर आभाळ कोसळलं. आयसीसीनं त्वरेनं सामनाधिकारी आणि आंतरराष्ट्रीय पंच ख्रिस ब्रॉड यांना दीर्घ रजा दिली.
आता निर्णय घेण्याची वेळ होती इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि संघाची सांख्यिकीतज्ज्ञ गेम्मा ब्रॉड या बहीण-भावांची. कारण या घटनेच्या दुसर्याच दिवशी म्हणजे ८ मार्चला ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडचा बांगलादेशाबरोबर पहिला एकदिवसीय सामना होता. स्टुअर्ट आणि गेम्मा ब्रॉड यांनी परतण्यापेक्षा राष्ट्राची सेवा करण्याचीच भूमिका स्वीकारली. वडील ख्रिस यांनीही स्टुअर्ट आणि गेम्माला पाठिंबा दिला. ‘‘तुम्ही आपली कामं अर्धवट टाकून घरी येऊ नका’,’ असा आदेश ख्रिस यांनी आपल्या मुलांना दिला. स्टुअर्ट बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खेळला. इंग्लंडच्या वेगवान त्रिकुटानं बांगलादेशच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. ब्रॉडच्या खात्यावर होते ४३ धावांत दोन बळी.
मिशे ही खरं तर स्टुअर्टची सावत्र आई. पण या क्रीडापटूंच्या कुटुंबामध्ये सारेच गुण्यागोविंदानं राहात होते. त्यामुळेच स्टुअर्ट आणि गेम्मा यांना तिच्याविषयी आस्था होती. मिशेचा मृत्यूशी लढा सर्वांनीच पाहिला होता. मग या ब्रॉड कुटुंबियांनी मोटर-न्यूरॉन रोगाशी झुंजणार्या पीडितांसाठी काहीतरी करायचं ठरवलं. मिशे जिवंत असतानाच ब्रॉड कुटुंबियांचं हे कार्य सुरू झालं होतं. ब्रॉड कुटुंबियांनी मोटर-न्यूरॉनग्रस्त रुग्णांसाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं.
याचप्रमाणे मोटर-न्यूरॉनग्रस्तांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करण्याचं कार्यही ब्रॉड कुटुंबीय ‘द ब्रॉड अपील (फॉर द माइंड असोसिएशन)’ अथकपणे करीत आहे. त्यामुळेच क्रीडा क्षेत्रातील ‘ब्रॉड’ विचारांचं हे कुटुंब लक्षात राहतं!
लघुक्रिकेटकथा क्र. २
धाडसाचं कारण…
‘सेव्ह गाझा’ (गाझा वाचवा) आणि ‘फ्री पॅलेस्टाइन’ (पॅलेस्टाइन मुक्त करा) असं लिहिलेले रिस्टबँड्स घालून क्षेत्ररक्षण करणारा तो सहा फुटांचा आणि मानेच्या खालपर्यंत रेंगाळणारी दाढी जोपासणारा इंग्लिश खेळाडू सर्वांचं लक्ष वेधत होता… तारीख होती… २८ जुलै २०१४. साऊदम्पटनला भारत-इंग्लंड यांच्यातील तिसर्या कसोटीचा तो दुसरा दिवस. गाझा पट्टीवर सलग तिसर्या आठवड्यात इस्रायलने हवाई हल्ले केले होते. त्यात ११००हून अधिक पॅलेस्टाइन नागरिक ठार झाले होते, तर हजारो बेघर. म्हणूनच त्याने हे धाडसी पाऊल उचललं होतं. सामनाधिकारी डेव्हिड बून आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदसुद्धा त्याच्या या कृत्यावर नाराज होते. ‘आयसीसी’च्या नियमानुसार राजकीय, धार्मिक किंवा वर्णभेदात्मक कोणताही संदेश देणारा गणवेश अथवा साहित्य सामन्यात परिधान करायला मनाई आहे. त्यामुळे त्या क्रिकेटपटूला तंबी देण्यात आली.
हा मोईन अली. त्याच्या कृत्यामुळे समाजमाध्यमावर तीव्र पडसाद उमटले. काहींनी त्याच्यावर ‘बिन लादेन’ अशी गलिच्छ शेरेबाजीसुद्धा केली. मोईननं गाझा वाचवण्यासाठी हाक का दिली होती? तिथल्या नागरिकांना खंबीरपणे पाठिंबा देण्यासाठी. उम्माह वेल्फेअर ट्रस्ट ही सामाजिक संस्था गाझामधील बेघर नागरिकांसाठी कार्य करते. त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्यानं हे पाऊल उचललं होतं. त्या दोन रिस्ट बँड्सच्या लिलावातून ५०० युरोचा निधी या संस्थेला मिळाला.
गाझामधील नागरिकांची परिस्थिती पाहून त्याला अतिशय दु:ख झालं होतं. मात्र त्याविषयी मानवतावादी कृती केल्यामुळे इतकं मोठं वादळ उठेल, याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. परंतु, या कठीण कालखंडात इंग्लंड क्रिकेट मंडळ त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहिलं. याच कसोटीत पुढे ‘हेल्प फॉर हिरोज’ (शूरवीरांच्या मदतीसाठी) अशी वाक्यं रेखाटलेल्या जर्सीज इंग्लिश संघानं परिधान केल्या आणि पहिल्या महायुद्धाच्या शतकपूर्तीनिमित्त दोन्ही संघांनी दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी श्रद्धांजलीसुद्धा अर्पण केली. मोईनच्या रिस्टबँड्सविषयीचे गैरसमज दूर झाले. सामनाधिकारी बून यांनीसुद्धा आपला निर्णय बदलला होता. अखेरच्या दिवशी भारताचा दुसरा डाव १७८ धावांत कोसळला आणि इंग्लंडनं सामना जिंकला. यात मोईननं फिरकीच्या बळावर सहा बळी घेत सिंहाचा वाटा उचलला होता.
‘‘मुस्लिम धर्म शांती आणि सद्भावनेचा संदेश देतो. क्रिकेटच्या पलीकडे आयुष्य हे खूप महत्त्वाचं असतं. मानवता ही मला अतिशय महत्त्वाची वाटते,’’ असे मोईनचे विचार आहेत. मोईन ‘स्ट्रीट चान्स’ या क्रिकेट-सामाजिक कार्यात सामील होऊन आठवड्यातून एकदा इंग्लंडमधील मागास भागात जाऊन मोफत क्रिकेट प्रशिक्षणाचे धडे देतो. क्रिकेट फाऊंडेशन आणि बारक्ले स्पेसेस फॉर स्पोर्ट्स यांच्याकडून हा उपक्रम चालवला जातो. काही वर्षांपूर्वी मोईन ‘ऑर्फन्स इन नीड’ या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेचा जागतिक सदिच्छादूत झाला. निधी संकलनाच्या उद्देशाने आपल्या बॅटवर तो या संस्थेचा लोगोसुद्धा बाळगतो. मानवतेचा मार्ग जपणारा आणि धर्माचा अचूक अर्थ समजणारा मोईन आता निवृत्तीनंतर समाजासाठी अधिक वेळ देऊ शकेल.
लघुक्रिकेटकथा क्र. ३
‘छोटा दादा’चं बंगाली स्वप्न…
‘‘बंगालला रणजी करंडक जिंकून देण्यासाठी मी आणखी एक हंगाम प्रथम श्रेणी क्रिकेट खेळेन,’’ हे जाहीर करून पाच दिवसांत मनोज तिवारीनं आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. मनोज हा आक्रमक फलंदाज. पण त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द २०१५मध्येच संपुष्टात आली होती. २००८मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार्या मनोजच्या वाट्याला सात वर्षांत १२ एकदिवसीय आणि ३ ट्वेन्टी-२० असे एकूण १५ सामनेच आले. पण त्याचा संघर्ष सर्वांनी पाहिला. यंदाच्या फेब्रुवारीत मनोजच्या नेतृत्वाखाली बंगालने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. परंतु सौराष्ट्राने त्याचं विजयाचं स्वप्न साकार होऊ दिलं नाही.
अंतिम सामन्याच्या दुसर्या डावातील बंगालला वाचवण्यासाठी केलेली मनोजची झुंजार खेळी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. बंगालने याआधीचं रणजी जेतेपद सुमारे ३४ वर्षांपूर्वी पटकावलं आहे. म्हणूनच माजी कर्णधार सौरव गांगुलीचे बंधू आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी मनोजला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन बंगालचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी आणखी एक प्रयत्न कर, अशी गळ घातली.
३७ वर्षांचा मनोज हा पश्चिम बंगालचा क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुद्धा आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेत दोन वर्षांपूर्वी त्यानं हावडा येथील शिबपूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ३२ हजारांहून अधिक मताधिक्यानं भाजपच्या उमेदवाराला नामोहरम केलं. आमदारकी मिळाल्यानंतरही तो देशांतर्गत क्रिकेट खेळतोय. ममतादीदींप्रमाणे गरीबांची सेवा करायचं व्रत त्यानं स्वीकारलंय. म्हणून तो आता ‘छोटा दादा’ म्हणून ओळखला जातो. हा छोटा दादा मोठं बंगाली स्वप्न साकारेल का?