भव्य असा त्या हॉलमध्ये आठ खुर्च्यांवर आठ लोक अगदी गंभीरपणे बसलेले होते. प्रत्येकाच्या चेहर्यावर वेगवेगळे भाव दिसून येत होते. कोणाच्या चेहर्यावर कठोर, कोणाच्या सहानुभूतीचे तर कोणी कोर्या चेहर्याने बसलेले होते. मानाच्या आणि मधल्या खुर्चीत बसलेली ६०-६५च्या वयोमानाची व्यक्ती मात्र अत्यंत दुःखी चेहर्याने सगळ्यांकडे मोठ्या आशेने बघत होती. खुर्चीत बसलेली ती व्यक्ती होती सुप्रसिद्ध उद्योजक बाबासाहेब जांभेकर आणि त्यांच्याशेजारी दु:ख, चिंता, विषाद अशा झरझर बदलत असलेल्या भावनांचे चेहरे घेऊन बसले होते, ते बाबासाहेबांची सावली म्हणून ओळखले जाणारे आप्पा पवार. इतकी वर्षे कष्टाने आणि अपार मेहनतीने उभारलेला हा उद्योगसमूहाचा डोलारा कोसळणार की तगणार हे आज ठरणार होते.
‘बाबासाहेब, मला वाटते तुम्ही आमचे म्हणणे ऐकावे. प्रकृतीला ह्या वयात इतका त्रास देणे बरे नाही. तुम्ही आता कंपनीचा कारभार कोणा एकाच्या हातात सोपवावा आणि मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारावी,’ मदन जोंधळे शांत पण करारी आवाजात बोलले.
बाबासाहेबांनी अत्यंत संतापाने मदनकडे पाहिले आणि त्याची नजर खाली झुकली. अरे या मदनला कामावर ठेवलं, तेव्हा अवघ्या २० वर्षाचं पोरगं होतं. ह्याला शिकवला, तयार केला, बोर्ड मेंबर बनवला, भविष्यात कधी काळी आपली गादी चालवेल असा विचार देखील केला होता. पण ती गादी तो आपल्या कर्तबगारीने मिळवेल असं वाटलं होतं. ह्या लांडग्यांच्या कळपासोबत तो गादी हिसकवायचा विचार करेल असं कधी वाटलं देखील नव्हतं.
‘सिंह म्हातारा झाला की जवान नर त्याची जागा घेणार ह्यात विशेष काही नाही मदन, पण मी अजून म्हातारा झालेलो नाही. गेली ४० वर्षे आयुष्यातला क्षण अन् क्षण मी ह्या साम्राज्यासाठी खर्ची घातला आहे. एक प्रोजेक्ट तोट्यात गेले म्हणून आज तुम्ही मला जाब विचारायला निघाला आहात,’ बाबासाहेब कडाडले.
‘माफ करा बाबासाहेब, पण तो तोटा ९०० कोटी रुपयांचा आहे. त्याचा परिणाम आपल्या इतर प्रोजेक्टवर देखील होत आहे आणि होत राहणार आहे. या एका अपयशाने नव्या सरकारने देखील आपल्याला पुढील काम द्यायला टाळाटाळ सुरू केली आहे. फायनान्सर धास्तावले आहेत, बँका घाबरल्या आहेत, सगळे चित्र बदलत चालले आहे,’ फायनान्सच्या दळवीने आपली बाजू मांडली.
‘बाबासाहेब, कधी नाही ते प्रोजेक्ट तोट्यात निघायला लागले आहेत, गेल्या आठवड्यात साखर कारखान्याच्या बांधकामात स्लॅब कोसळला, कधी नाही ते बँकेचे दोन हप्ते चुकले, बिलं बनवून पुढे पाठवली आहेत, पण त्यांची वसुली होत नाहीये. कामगारांची दादागिरी, साईटवर वारंवार होणार्या चोर्या.. हे असं आधी कधीच घडलं नव्हतं. सांगताना वाईट वाटतंय, पण तुमचा दरारा आणि पकड दोन्ही संपत चालले आहेत. कंपनीला आता ह्या सगळ्यातून बाहेर काढायचे असेल, तर बोर्डाला काही एक ठाम निर्णय घेणे भाग आहे,’ अॅडव्होकेट बन्सल जरा रागातच बोलले.
‘ह्या कंपनीचा मोठा हिस्सा माझ्याकडे आहे हे विसरू नका बन्सल,’ बाबासाहेब पुन्हा कडाडले.
‘भ्रमात आहात तुम्ही बाबासाहेब…’ मदन पुन्हा गरजला.
‘आपण एकदा शांतपणे ह्यावर विचार करायला हवाय बाबासाहेब. वाटलं तर तुम्ही काही दिवसांसाठी थोडी हवापालट करून या, तोवर सगळा कारभार मी चोख सांभाळेन आपल्या आशीर्वादाने…’ विनम्र आवाजात आप्पा म्हणाले आणि एका क्षणात सगळा खेळ बाबासाहेबांच्या लक्षात आला. घर फिरले की, घराचे वासे देखील फिरतात हेच खरं!
‘तू… तू…’ संतापाने थरथरणार्या बाबासाहेबांच्या तोंडून एवढेच शब्द बाहेर पडले आणि ते खुर्चीतून खाली कोसळले.
– – –
‘कसा आहे म्हातारा,’ मदनने आयसीयूमध्ये डोकावत विचारलं.
‘चिवट आहे साला! प्राण काय सोडायला तयार नाही,’ आप्पा संतापाने म्हणाले.
‘मला वाटते आप्पा, हीच योग्य वेळ आहे तुम्ही कारभार ताब्यात घ्यायची.’
‘चुकतोयस तू मदन. सध्या सगळी सहानुभूती बाबासाहेबांकडे आहे. अशावेळी आपण काही करायचे ठरवले तर आपली साथ कोणीच देणार नाही. मुख्य म्हणजे कंपनीचा एक मोठा हिस्सा आजही बाबासाहेबांच्या ताब्यात आहे हे लक्षात ठेवायला हवं.’
‘खिक! अहो तो हिस्सा तर त्यांनी झुंजारच्या नावावर ठेवला आहे आणि गेली २० वर्षे झुंजार बेपत्ता आहे. जिवंत आहे की मेला ते पण कोणाला माहिती नाही. कायद्याने आपण त्या हिश्शाचे काय करू शकतो, हे वकीलसाहेबांना विचारायला हवे.’
‘हम्म… हा झुंजार या सगळ्या त्रांगड्याची खरी किल्ली आह..’ खेदाने मान डोलवत आप्पा वदले आणि आयसीयूकडे पाठ फिरवत मनाशी काहीतरी निश्चय करत त्यांनी बाहेरचा मार्ग धरला. त्यांच्या चेहर्यावर त्यावेळी जे काही बेरकी भाव उमटले होते, ते पाहून मदन चांगलाच विचारात पडला होता.
– – –
‘डॉक्टर, बाबासाहेबांना आज डिस्चार्ज मिळणार आहे ना? तुम्ही बिल आणि सगळी कागदपत्रे तयार ठेवली आहेत ना? नंतर उगाच गोंधळ नको.’
‘आप्पा, अहो काही काळजी करू नका. बाबासाहेबांचे बिल भरलेदेखील गेले आहे. आणि त्यांना नेण्यासाठी संध्याकाळी एयर अॅम्ब्युलन्स देखील बुक करण्यात आली आहे.’
‘काय?’ आप्पा आणि मदनला चांगलाच धक्का बसला.
‘कोणी केलं हे सगळं?’
‘अमेरिकेवरून थेट पेमेंट झालं आहे सगळ्याचं. आणि आपण येईतो बाबासाहेबांना हलवू नका असे देखील सांगण्यात आलं आहे.’
‘थेट अमेरिकेहून? आणि बिल भरणारा संध्याकाळी इथे पोहोचतोय? कोण आहे कोण तो,’ मदनने एका दमात तीन प्रश्न विचारून टाकले.
‘पूर्ण नाव नाही सांगितले, फक्त ‘जेजे’ येवढेच सांगितले फोनवर.’
‘जेजे?’ मदन गोंधळात पडला.
‘झुंजार जांभेकर…’ थरथरत्या आवाजात आप्पा म्हणाले आणि धप्पकन् शेजारच्या खुर्चीत बसले. मदन भूत पाहिल्यागत चेहरा करून मागच्या भिंतीला टेकला.
– – –
संध्याकाळी सर्वजण आतुरतेने ज्याची वाट पाहत होते तो ‘जेजे’ आलिशान गाडीतून हॉस्पिटलमध्ये शिरला आणि त्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने सारेच भारावले. २६ वर्षाचा तो ऐटबाज तरुण अत्यंत आत्मविश्वासाने वावरत होता. त्याच्या चेहर्यावरचे हास्य, बोलण्यातील नम्रता सगळ्यांना सुखावून गेली.
‘बाबासाहेब तुमची खात्री आहे की हा आपला..’ आप्पांचे बोलणे अर्धवट थांबवत बाबासाहेब हलकेच थोडे उशीवर सरकले.
‘आप्पा, आलाय तो खरा का खोटा मला देखील आता सांगता येणार नाही. पण झुंजार जिवंत आहे ह्या नुसत्या बातमीने मी अशा गंभीर अवस्थेत देखील झपाट्याने सावरलो आहे. मला जणू एक नवी ऊर्जा मिळाली आहे. चार दिवस मला त्याच्यासोबत आनंदाने घालवू दे. मग भलेही तो कोणी बहुरूपी का असेना. इतकी वर्षं उराशी बाळगलेले स्वप्न मला सत्यात उतरवू दे,’ बोलता बोलता बाबासाहेबांना ढास लागली आणि झुंजार तत्परतेने पाणी घ्यायला धावला, त्याचवेळी आप्पा देखील धावले आणि दोघांचे हात धडकता धडकता वाचले.
‘आप्पाकाका तुमचे सर्वस्व असलेली निळ्या खड्याची अंगठी कुठे आहे,’ त्यांच्या उजव्या हाताकडे बघत झुंजारने आश्चर्याने विचारलं आणि आप्पांच्या हातातला पेला खण्कन् जमिनीवर आदळला. पुढच्या क्षणी ते धावत रूमबाहेर पडले आणि मदन त्यांच्यामागे धावला.
‘आप्पा.. आप्पा अहो झाले काय?’
‘मदन, काही विचारू नकोस. पहिल्यांदा गाडीचा एसी फुल कर आणि गाडी बंगल्याकडे घे…’
गाडी बंगल्यात शिरली आणि दार उघडून आप्पा त्यांच्या लायब्ररीकडे धावले. मागे मदनही आलाच.
‘मदन दार लावून घे,’ आप्पांच्या स्वरात त्यावेळी प्रचंड भीती दाटलेली होती. त्यांनी घाईघाईने तिथल्या कपाटामागे लपवलेल्या तिजोरीतून एक छोटी काळ्या रंगाची वही काढली आणि तिजोरीतलाच दुसरा मोबाईल चालू करून त्या डायरीतला एक नंबर फिरवला.
‘लाखा… नमस्कार चमत्कार नंतर! देवी आई माळगंगेची शपथ घेऊन सांग, ‘झुंजार जिवंत आहे? लाखा… आवाज बसला का कान फुटलेत कुत्र्या? उत्तर दे!’ उत्तरादाखल आधी पलीकडून एक नि:श्वास सोडला गेला आणि ‘लाखा आता ह्या जगात नाही’ असे पाच मोजक्या शब्दात उत्तर मिळाले आणि बाबासाहेब अवसान गळाल्यासारखे खालच्या गालिच्यावर कोसळले.
‘आप्पा.. आप्पा.. काय होतंय तुम्हाला? त्यांच्या तोंडावर पाणी मारता मारता मदन विचारता झाला. भानावर आलेल्या आप्पांनी मदनचा हात घट्ट हातात धरला. ते अक्षरश: थरथरत होते.
‘मदन, मी आजवर हे सत्य कोणाशी बोललो नाही, पण तू माझा होणारा जावई आहेस, म्हणून तुला सांगतोय. १८ वर्षांपूर्वी झुंजारला मारण्याची सुपारी मी लाखाला दिली होती. त्याला शिक्षणासाठी म्हणून लांब ठेवावे आणि हळूहळू सगळा कारभार ताब्यात घ्यावा अशी माझी योजना होता. पण आईविना पोर म्हणून बाबासाहेबांचा त्याच्यावर जरा जास्तच जीव. ते काही त्याला आपल्यापासून दूर करेनात. उलट एक मोठा हिस्सा त्यांनी झुंजारच्या नावावर करून टाकला. मग माझ्यापुढे काही इलाजच उरला नाही. पोराला संपवले की बाप पूर्ण खचेल असे मला वाटले होते, पण झुंजार बेपत्ता झाला आणि बाबासाहेब त्या दु:खात अजून दुप्पट ताकदीने कामाला जुंपले गेले. आयुष्याचा सगळा राग जणू ते सतत काम करून स्वत:वर काढत होते. त्या दु:खाने, रागाने ते इतके कणखर बनले की त्यांना मागे टाकणे मला पुन्हा शक्य झाले नाही की त्यांचा काटा काढणे देखील शक्य झाले नाही. दोन वर्षापूर्वी तू माझ्या हाताखाली आलास आणि माझ्या इच्छेला पुन्हा धुमारे फुटले. पण पुन्हा एकदा झुंजारमुळे मला अपयश पाहावे लागणार…’
‘चिंता करू नका आप्पा. आधी तुम्ही एकटे होतात, आता आपण दोघे आहोत,’ बोलता बोलता मदनने त्यांचे दोन्ही खांदे दाबले. आप्पा विषण्णपणे फक्त हसले. आप्पांना शांत करून मदन बाहेर पडला आणि आप्पांच्या मुलीला, रचनाला धडकता धडकता वाचला.
‘अरे मदन, तू आप्पांच्या स्टडीमध्ये काय करतो आहेस?’
‘एक महत्त्वाचं काम होतं, त्यासाठी आलो होतो.’
‘अरे पण तुम्ही बाबाकाकांना आणायला जाणार होता ना?’
‘गेलो होतो पण आमची फारशी गरज पडली नाही.’
‘म्हणजे?’
‘त्यांचा मुलगा झुंजार परत आलाय म्हणे. मुलगा कसला तोतया आहे, तोतया..’
‘झुंजार परत आलाय,’ रचनाने फक्त आनंदाने उडी मारायची बाकी ठेवली होती.
‘तुला काय झाले येवढे खूश व्हायला?’
‘ते तुला नाही कळणार. अरे आई नसलेली पोरं आम्ही. आम्हीच एकमेकांना आईची माया देत होतो. पण देवाला ते बघवले नाही अन् एक दिवस..’ बोलता बोलता रचनाचा स्वर रडवेला झाला, ‘पण ते मरो.. आता तो आलाय ना? मी आत्ता त्याला भेटून येते..’ मदनने तिला थांबवण्याचा आत ती हॉलबाहेर पळाली देखील.
– – –
‘बाबासाहेबांच्या खुर्चीत बसलेला झुंजार काही वेगळाच दिसत होता. क्षणभर त्याला त्या खुर्चीत पाहून आप्पांना त्याचा विलक्षण हेवा वाटला, पण त्यांनी तो चेहर्यावर येऊन दिला नाही.
‘बसा आप्पा.. मला जरा आपल्या युनियन लीडरशी चर्चा करायची होती. तुम्ही बरोबर असाल तर उपयोगच होईल, म्हणून तुम्हाला बोलावणं धाडलं.’
‘पण असं परस्पर..’
‘हे सगळं बाबासाहेबांच्या लेखी परवानगीनेच चाललं आहे आप्पासाहेब,’ आप्पांचे वाक्य अर्धवट तोडत अॅडव्होकेट बन्सल म्हणाले आणि वार्याची दिशा बदलत असल्याचे आप्पांच्या लक्षात आलं. ते शांत बसून राहिले. पाच मिनिटांत केबिनचा दरवाजा उघडून युनियन लीडर बळवंत आणि त्याचे दोन साथीदार आत आले.
‘युनियन लीडरने स्वत: आधी शिस्त पाळायला हवी,’ शांतपणे झुंजार म्हणाला.
‘म्हणजे?’ मग्रुरीच्या स्वरात बळवंतने विचारले.
‘मालक-नोकर असा भेदभाव माझ्या वडिलांनी कधी केला नाही आणि मला देखील तो कधी करावासा वाटणार नाही. पण कोणाच्याही केबिनमध्ये शिरताना नॉक करावे, परवानगी घ्यावी असा एक शिष्टाचार असतो,’ झुंजार पुन्हा एकदा शांत स्वरात म्हणाला आणि हे पाणी काही वेगळे आहे हे बळवंतच्या लक्षात आले. तरीही आपला ताठा कायम ठेवत तो एका खुर्चीवर विसावला.
‘युनियनच्या मागण्या मी वाचल्या. दिवाळीत डबल बोनस आणि दोन महिन्यांपूर्वी पगारवाढ देऊन सुद्धा पुन्हा पगारवाढीची मागणी अयोग्य आहे. सध्या कंपनी काही अडचणींमधून जात आहे, तरी कामगारांच्या कुठल्याही मोबदल्यावर कंपनीने त्याचा परिणाम होऊ दिलेला नाही. अशावेळी हा असहकार पुकारणे कामगारांना योग्य वाटते का?’
‘तो कामगारांचा अधिकार आहे,’ पुन्हा मग्रुरीच्या स्वरात बळवंत बोलला.
‘साईटवर चोर्या करणे, पळवलेला माल केसुमल शेठला विकणे, सिमेंटची पोती परस्पर पळवून विकणे हे देखील कामगारांचे अधिकार आहेत?’ झुंजारचा शांत स्वर अजूनही कायम होता. शांतपणे त्यांनी समोरचा मोबाईल उचलला आणि कोणाला तरी फोन लावला, ‘नमस्कार साहेब. हो हो.. माझ्यासमोरच बसला आहे. टाकतो स्पीकरवर..’ झुंजारने फोन स्पीकरवर लावला आणि पलीकडून एक करारी आवाज घुमला, ‘बळवंत पुन्हा मला तक्रार यायला नकोय. सगळे फालतू धंदे बंद करायचे!’ तो आवाज ऐकला आणि बळवंतचा चेहरा घामाने डबडबला. ‘हो..’ कसातरी शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडला आणि पांढर्याफटक चेहर्याने त्याने झुंजारचा निरोप घेतला.
‘ज्या पक्षाची ही सेना आहे, तिचा जिल्हाध्यक्ष होता फोनवर. मित्र आहे माझा,’ झुंजार स्मितहास्य करत म्हणाला, ‘पण मला असे वाटते आहे काका की बळवंतचे एकट्याचे हे धाडस नाही. त्याला कोणाची तरी आतल्याची फूस असावी. मदनबद्दल तुमचं काय मत आहे?’ आप्पांच्या डोळ्यांत नजर रोखत झुंजारने विचारले आणि आप्पांच्या मानेवरून घामाची एक धार खालच्या दिशेला सरकली.
‘चांगला.. चांगला मुलगा आहे तो. प्रामाणिक आहे.’
‘आणि तुमचे स्वत:बद्दल काय मत आहे आप्पा?’ आप्पांसमोर दोन फायली फेकत झुंजारने करारी आवाजात विचारले.
‘काय म्हणायचं आहे तुला? आणि हे काय आहे?’
‘अकाउंट्स डिपार्टमेंटच्या दळवीने दाबलेल्या हिशेबाच्या फायली आहेत आप्पा. तीनशेचे सिमेंट चारशेने आणि सहा हजाराची वाळू दहा हजाराने खरेदी केल्यावर कोणती कंपनी फायद्यात चालेल?’
‘मी तातडीने ह्या प्रकरणात लक्ष घालतो,’ घाईघाईने उठत आप्पा म्हणाले.
‘ठीक आहे आप्पा.. तुम्ही दु:ख बाजूला सारून कंपनीसाठी आज आपला वेळ देताय हे खरंच कौतुकास्पद आहे.’
‘दु:ख? कसले दु:ख?’
‘तुमचा मित्र लाखा गेल्याचं कळलं, म्हणून म्हणालो,’ मिश्किल आवाजात झुंजार म्हणाला आणि आप्पांच्या भोवती संपूर्ण केबिन फिरत असल्याचा भास त्यांना झाला. क्षणात वेडेवाकडे होत ते खाली कोसळले.
– – –
अर्धांगवायूच्या झटक्याने पूर्णपणे लुळी पडलेली डावी बाजू उगाचच हालवून बघायचा प्रयत्न आप्पा करत होते आणि पुन्हा पुन्हा निराश होत होते. तेवढ्यात त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला बाबासाहेब आणि बन्सल आले. थोडा वेळ चर्चा करून ते निघणार तोच आत असलेल्या रचनाने त्यांना रडत रडत मिठी मारली.
‘त्यांच्या ह्या अवस्थेला मी कारणीभूत आहे ना बाबाकाका?’
‘नाही बेटा, त्याच्या पापाचे फळ त्याला मिळाले आहे. तू फक्त साधन ठरलीस एवढेच.’
‘म्हणजे?’ तोतर्या स्वरात आप्पांनी आश्चर्याने विचारले.
‘आप्पा तुम्ही आणि मदन कंपनी ताब्यात घेण्याचे प्रयत्न करत आहात, याची चाहूल मला लागली होती. त्या मूर्ख मदनने एकदा दारूच्या नशेत तो कंपनीचा मालक होणार आहे असं मला बोलून दाखवलं होतं. पण त्याला तुमची साथ असेल असं मला वाटलं नव्हतं. पण मी तुम्हा दोघांवर पाळत ठेवली आणि हळूहळू सगळं समोर येत गेलं. तुम्हाला धडा शिकवण्यासाठी काय करता येईल, त्याचा आम्ही विचार सुरू केला आणि त्याचवेळी माझा अमेरिकेचा मित्र सुकांत सुट्टीसाठी इथे येत असल्याचं त्याने मला कळवलं आणि त्याला झुंजार म्हणून उभं करायचं मी ठरवलं. मी बाबाकाकांना देखील त्यात सामील करून घेतले. कंपनीतले सगळे तुमच्या बाजूने असल्याने आणि कोणताही पुरावा नसल्याने आम्ही थेट काही करू शकत नव्हतो. त्यामुळे मग बाबाकाकांनी आजाराचं नाटक केलं आणि झुंजारने एंट्री घेतली. मी माझ्या वडिलांविरुद्ध हे करते आहे, त्याचे शेवटपर्यंत मला कुठेतरी वैषम्य वाटत होते, पण त्या दिवशी तुम्ही मदनला लाखाचा किस्सा सांगितलात आणि तुमचा काळा चेहरा माझ्यासमोर आला… मदन तर आत गेलाच आहे आणि आता तुमची पाळी आहे,’ रचनाने मनात साचलेले सर्व एका दमात बाहेर काढले आणि ती त्वेषाने बाहेर निघून गेली. आप्पा निष्प्राण डोळ्यांनी ती गेली त्या दिशेने बघत राहिले…