• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

चरित्र कर्मवीरांचं, नोटीस प्रबोधनकारांना

- सचिन परब (प्रबोधन-१००)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 18, 2025
in प्रबोधन १००
0

कर्मवीर भाऊराव पाटील प्रबोधनकारांना गुरूच मानत. कर्मवीरांनी बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी उभारलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीच्या सुरवातीच्या दिवसांत प्रबोधनकारांचंही महत्त्वाचं योगदान होतं. याचसाठी त्यांनी प्रबोधनमधून कर्मवीरांचं थोडक्यात चरित्र लिहिलं.
– – –

जुलै १९२६ ला प्रबोधन मासिकाच्या पाचव्या वर्षाचा पहिला अंक प्रकाशित झाला, तेव्हा प्रबोधनकार बॉम्बे क्रॉनिकल`च्या बदनामी खटल्यातून नुकतेच बाहेर पडले होते. या अंकाच्या पहिल्याच लेखात प्रबोधनकारांनी या खटल्यासाठी १ रुपयापासून १०० रुपयांपर्यत आर्थिक मदत करणार्‍या अकरा जणांची यादी दिली आहे. यात मुंबईपासून अकोल्यापर्यंत आणि धुळ्यापासून दाभोळपर्यंतची नावं आहेत. विनाकारण कोर्टकचेरीच्या धक्क्यांत अडकल्याचा राग प्रबोधनकारांनी `कज्जेदलालांचे राजकारण आणि राजकारणांतले कज्जेदलाल तसंच राजकारण आणि मुत्सद्देगिरी या दोन लागोपाठच्या अंकांतल्या लेखांतून सूत्रबद्ध पद्धतीने मांडलेला आहे.
पण त्याचवेळेस कायद्याने सामाजिक कुप्रथांवर घाव घालण्याची आवश्यकताही त्यांनी एका स्फुटात मांडलेली दिसते. कोल्हापूर संस्थानाने बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू केल्याच्या निमित्ताने प्रबोधनकारांनी आणखीही पाच कायदे करण्याची सूचना केली आहे. ते कायदे असे आहेत, हुंडेबाजी प्रतिबंधक कायदा, विधवा केशवपन प्रतिबंधक कायदा, विधवा पुनर्विवाह प्रतिबंधक कायदा, विधुर–कुमारी विवाह प्रतिबंधक कायदा आणि निपुत्रिक श्रीमंतांनी अनाथ बालकाश्रमातील मुलांनाच दत्तक घेण्याचा सक्तीचा कायदा. या स्फुटलेखात शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांचं कौतुक करणार्‍या प्रबोधनकारांना लवकरच कोल्हापूर संस्थानाच्या नाराजीचा सामना करावा लागला. त्यासाठी कारणीभूत होतं प्रबोधनकारांनी लिहिलेलं कर्मवीर भाऊराव पाटील यांचं चरित्र.
ऑगस्ट १९२६च्या अंकात प्रबोधनकारांनी सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्पपरिचय या नावाने सविस्तर लेख लिहिला आहे. हे कर्मवीर अण्णांविषयीचं पहिलंच चरित्रपर लेखन आहे, तेही त्यांच्या गुरूतुल्य मित्राने लिहिलेलं. त्यामुळे त्याचं महत्त्व फार आहे. कर्मवीरांचं कार्य महाराष्ट्रासमोर येऊन त्यांना मदत व्हावी, हाच या लेखामागचा उद्देश होता. जीवनगाथेत या लेखाविषयी प्रबोधनकार लिहितात, अस्पृश्यांची मुले जमा करून त्यांच्या शिक्षणाची नि उदरनिर्वाहाची सोय लावण्याचे ते एकांडे शिलेदारीचे कर्म त्या काळी जवळजवळ लोकअमान्य किंवा विक्षिप्तपणाच्या सदरातच मोडत असे. हा लोकाग्रह खोडण्यासाठी त्या कार्याच्या महत्त्वाची जाहिरातबाजी अवश्य होती. अर्थात भाऊराव हा कोण, त्याला या कार्याचे विशेष वेड लागण्याचे कारण ते काय, इत्यादि तपशिलांचा वृत्तपत्रांतून सर्वत्र पुकारा होणे अगत्याचे होते. महाराष्ट्राच्या वृत्तपत्रांतून हमेशा पांढरपेशा नि त्यातल्या त्यात बामण मंडळीचा घौशा गाजत असायचा. बामणेतरादी मागास वर्गाच्या कामगिरीला त्यात स्थान नसायचे. मा‍झ्या हातात तेव्हा प्रबोधन मासिक आणि लोकहितवादी साप्ताहिक होते. त्यातून भाऊरावाच्या कार्याचा डंका पिटण्याचे कार्य मी हाती घेतले.
कर्मवीरांच्या कामाची प्रसिद्धी होण्याचा प्रबोधनकारांचा हेतू राहिला बाजूला आणि ते एका वेगळ्याच अडचणीत सापडले. या लेखात कर्मवीरांची कौटुंबिक पार्श्वभूमी, जडणघडण, तरुणपणीच अस्पृश्य मुलांना शिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था करणं याची माहिती होतीच. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातल्या कुप्रसिद्ध डांबर प्रकरणाचाही उल्लेख होता. अर्थातच हा प्रसंग कर्मवीरांचा प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी सांगितला गेला होता. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू आढळत नाही. पण त्यामुळे कोल्हापुरात काय घडलं हे प्रबोधनकारांच्याच शब्दांत सांगायचं तर, …कोल्हापुरी राजकारणी क्षेत्रातही बरीच गडबड उडाली. करवीर दरबार आणि मुंबई सरकारात काहीतरी पत्रापत्री अथवा तारातारी झाली. विस्मरणाची जाडजूड खरपुडी बाजलेल्या गळवावरीच खपली त्या चरित्र प्रकाशनाने साहजिकच ओरखडून काढल्यामुळे संबंधितांची झोप उडणे क्रमप्राप्तच होते.
त्यामुळे प्रबोधनकारांना पुण्याचे जिल्हा मॅजिस्ट्रेट बॉल यांची नोटीस आली. कर्मवीरांच्या चरित्रात प्रबोधनकारांनी छत्रपती शाहू महाराजांची निंदा केल्याबद्दल या नोटिसीत जाब विचारला होता. विजयी मराठा`चे संपादक श्रीपतराव शिंदे, `मजूर’ साप्ताहिकाचे रामचंद्र नारायण लाड या ब्राह्मणेतरी संपादकांना वेगळ्या प्रकरणांमध्ये अशाच नोटिसा यापूर्वी गेलेल्या होत्या. त्यामुळे काहीतरी कारण काढून आपल्यालाही त्रास दिला जाईल, याची कल्पना प्रबोधनकारांना होतीच आणि ते त्यासाठी तयार होतेच.
पण ज्या प्रकरणाचा उल्लेख केला म्हणून प्रबोधनकारांना नोटीस देण्यात आली, ते प्रकरण होतं तरी काय, हे आधी समजून घ्यायला हवं. ज्येष्ठ इतिहासलेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे या पुस्तकात कर्मवीरांचे विद्यार्थी प्राचार्य पी. जी. पाटील यांचा लेख छापला आहे. त्यात छत्रपती शाहू आणि कर्मवीर अण्णा ही गुरूशिष्यांची अलौकिक जोडी असल्याची मांडणी केली आहे. त्या अंगाने या लेखात हे प्रकरण उलगडून सांगितलं आहे. त्यानुसार १४ फेब्रुवारी १९१४ला रात्री उशिरा बादशाह सातवे एडवर्ड आणि महाराणी अलेक्झांड्रा यांच्या पुतळ्याला कुणीतरी डांबर फासल्याचं सकाळी लक्षात आलं. ब्रिटिश सरकारने रामकृष्ण पागे नावाच्या एका गुप्तचर अधिकार्‍याला त्याचा शोध घेण्यासाठी कोल्हापूरला पाठवलं. पण त्याला कोणताही पुरावा मिळत नव्हता. या काळात कोल्हापूर दरबारात भास्करराव जाधव, महादेवराव डोंगरे आणि आण्णासाहेब लठ्ठे या सत्यशोधकांचा एक गट प्रभावी होता. तर त्याला बदनाम करण्यासाठी गायकवाड-निटवे यांचा गट होता. या गटाने आण्णासाहेब लठ्ठेंना या प्रकरणात गुंतवण्याचं ठरवलं. त्यासाठी खोटे पुरावेही तयार करण्यात आले. पण दरबारातल्या सर्वोच्च पदांवर काम करणार्‍या दिवाण सर रघुनाथराव सबनीस आणि रेसिडण्ट कर्नल वुडहाऊस यांनी लठ्ठेंना सावध करून कोल्हापूरच्या बाहेर जाण्यास सांगितलं. पुढे लठ्ठे बेळगावात गेले. तिथे प्रसिद्ध वकील झाले.
पूर्वी कर्मवीर विद्यार्थी म्हणून कोल्हापूरच्या जैन हॉस्टेलमध्ये राहत होते. तेव्हा शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी सुरू केलेल्या मिस क्लार्क हॉस्टेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले होते. तिथून हॉस्टेलला परतल्यावर जेवणाआधी कर्मवीरांनी आंघोळ करावी, असा आदेश हॉस्टेलचे सुपरिटेंडंट असणार्‍या आण्णासाहेब लठ्ठेंनी दिले होते. पण ते आदेश न जुमानता कर्मवीरांनी स्वयंपाकघराची खिडकी तोडून गुपचूप जेवण केलं. त्यामुळे लठ्ठेंनी कर्मवीरांना हॉस्टेलमधून काढून टाकलं. प्रबोधनकारांनी कर्मवीरांना हॉस्टेलमधून काढण्याचं या प्रसंगासोबतच आणखी एक कारण सांगितलं आहे. जैन धर्माच्या समजुतीनुसार हॉस्टेलमध्ये संध्याकाळी दाढी करू नये असा नियम होता. तोही कर्मवीरांनी तोडला. त्यासाठीचा दंडही भरण्यास नकार दिला. त्यामुळे लठ्ठेंनी त्यांना काढलं, असं प्रबोधनकार सांगतात. ते काहीही असो, पण या दोघांतलं हे भांडण कर्मवीरांचे नातेवाईक कल्लाप्पा निटवे यांना माहीत होतं. ते कोल्हापूर दरबारातले लठ्ठे यांचे कट्टर विरोधक होते. प्रबोधनकार त्यांचा उल्लेख ‘क’ असा करतात.
निटवेंनी कर्मवीरांना पत्र पाठवून लठ्ठेंच्या विरोधात खोटी साक्ष देण्यासाठी कोल्हापुरात बोलावून घेतलं. पण कर्मवीरांनी स्पष्टच सांगितलं की मी मेलो तरी खोटी साक्ष देणार नाही. मग निटवेंनी त्यांना खोट्या केसमध्ये अडकवून पोलिसांच्या ताब्यात दिलं. खोटी साक्ष द्यावी म्हणून पोलिसांनी त्यांचा सहा महिने अतोनात छळ केला. प्रबोधनकारांनीही या छळाचं अंगावर काटा आणणारं वर्णन केलं आहे. त्याला कंटाळून कर्मवीरांनी दोनदा आत्महत्येचाही प्रयत्न केला. पण ते त्यातून वाचले. शाहू महाराजांच्या समजावणीलाही ते बधले नाहीत. कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांना कर्मवीरांना सोडावं लागलं. ते पुन्हा सातार्‍यात आले आणि तब्येत सुधारताच आपल्या शिक्षणप्रसाराच्या कामाला नव्या जोमाने लागले. तसंच लठ्ठेही पुढे निर्दोष सुटले. पुढच्या काळात शाहू महाराजांनी लठ्ठेंना पत्र पाठवून माफी मागितली. दरबारच्या काही लोकांनी आपली दिशाभूल केल्याचं स्पष्टपणे कबूल केलं. पण कर्मवीर आणि लठ्ठे दोघेही शाहू महाराज असेपर्यंत कोल्हापुरात कधी आले नाहीत. अर्थात दोघांचाही महाराजांविषयीचा आदर कधीच कमी झाला नाही. लठ्ठे तर शाहू महाराजांच्या नंतर कोल्हापूर दरबारचे दिवाण झाले. इथे कर्मवीरांनी सातार्‍यात शाहू महाराजांच्या नावाने बोर्डिंग सुरू केलं.
हा सगळा घटनाक्रम कर्मवीरांच्या चरित्राचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे प्रबोधनकारांना तो नोंदवणं आवश्यकच होतं. ते करताना त्यांनी शाहू महाराजांचा कुठेही अनादर होऊ दिला नाही. पण डॉ. य. दि. फडके सांगतात त्याप्रमाणे, प्रबोधनकार इतिहासाचे अभ्यासक होते. शाहू छत्रपतींबाबत त्यांच्या मनात अपार आदर होता. तरीही, या प्रकरणातील सत्याला सामोरे जाताना ठाकर्‍यांनी कोणाचा मुलाहिजा ठेवला नाही. त्यांनी आडवळणाने किंवा गुळमुळीत शब्दांत न लिहिता रोखठोकपणे लिहिले.
हे प्रकरण थेट ब्रिटिश सत्तेच्या अपमानाशी जोडलेलं असल्यामुळे आणि ब्रिटिशांनी पाठवलेला अधिकारी तपास करत असल्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नसावा, ही अडचण प्रबोधनकारांनी समजून घ्यायला हवी होती. पण छत्रपती शाहू महाराजांच्या हयातीतच त्यांना रोखठोक सुनावण्यास मागे न पाहणार्‍या प्रबोधनकारांना असला मवाळपणा मान्यच नव्हता.
त्यांनी या लेखात थेटच लिहिलं, भाऊरावची अटक केवळ पोलिसी प्रेरणेनेच होती असे नव्हे, तर त्याची सुत्रे खुद्दांकडूनच हालत होती. वाटेल ती उलाढाल करून डांबर प्रकरणात लठ्ठ्यांना लोळविण्याचा महाराजांचा निश्चय होऊन बसला होता. मग त्याच्या मागे पोलिसांची कानटोचणी असो, नाहीतर लठ्ठ्यांच्या हितशत्रूंची हातलावणी असो. भाऊरावाला जामिनावर सोडविण्याचा काही मित्रांनी प्रयत्न केला. पण अर्ज नामंजूर झाला. इतकेच नव्हे तर तसा प्रयत्न करणारांना `याद राखून ठेवा या त्र्याक्षरी पदवीचे धमकीदान झाले.`
प्रबोधनकार हा चरित्रवजा लेख लिहिताना कोल्हापूरचे दिवाण असणार्‍या आण्णासाहेब लठ्ठेंवरही घसरलेले दिसतात. ते लिहितात, जीव गेला तरी खोटे कर्म करणार नाही, या वृत्तीने भाऊरावाने हे एवढे भयंकर क्लेश ज्या आण्णासाहेब लठ्ठ्यांसाठी भोगले त्यांना प्रत्यक्ष त्रास किती झाला आणि डांबर प्रकरणात त्यांना हकनाक लटकविण्यात शाहू महाराजांचा डाव कोणता होता, इत्यादी माहिती लठ्ठेच सांगतील तेव्हा जगाला कळेल. त्यांनी शाहू महाराज्ाांचे चरित्र उत्तम तपशिलांनी कितीही रंगविलेले असले तरी शाहू महाराजांच्या राजधानीने खुद्द आण्णासाहेबांचे चरित्र मात्र फार बहारीच्या कुतूहलाने रंगविलेले आहे, यात मुळीच शंका नाही. एका काळी ज्यांना राजद्रोहाचा शिक्का ठोकून रसातळाला नेण्यासाठी ज्या रियासतीच्या राजकारणाने आपले जंगजंग पछाडले व एकदा प्रत्यक्ष अटकही केली होती, त्याच रियासतीच्या कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम दिवाणगिरीवर त्यांचीच अचानक नेमणूक झालेली पाहून, करणीच्या काळापेक्षा काळाचीच करणी अगाध खरी असा कोणाच्याही तोंडून उद्गार निघेल.
ही काळाची करणी खरंच अगाध होती. पण त्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरित्राचा फक्त पहिलाच भाग प्रसिद्ध झाला. ब्रिटिश सरकारने त्याच्या दुसर्‍या भागावर बंदीच घातली. त्यामुळे प्रबोधनकार त्याचा पुढचा भाग कधीच लिहू शकले नाहीत आणि कर्मवीरांचं चरित्र येण्यासाठी महाराष्ट्राला पुढची काही दशकं वाट बघावी लागली.

Previous Post

डावा हात xxवर ठेवून उजव्यांना सलाम!

Next Post

वार्‍या हातीं माप चाले सज्जनाचे।

Next Post

वार्‍या हातीं माप चाले सज्जनाचे।

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.