एखादी गोष्ट नेहमीप्रमाणे सहजगत्या मिळणार नाही असं कळलं की तिची तहान जास्त लागते. कधी कधी ही तहान घसाच नव्हे तर खिसाही कोरडा करणारी ठरते. त्यासाठी ऑनलाइन मद्य मागवताना खबरदारी बाळगलीच पाहिजे. मुळात ऑनलाइन दारू मागवताना सीओडी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी याच ऑप्शनवर ठाम राहा.
—-
गेल्या महिन्यातली गोष्ट.
मंदारला लॉकडाऊन काळात मद्याचा आस्वाद घेण्याची लहर आली आणि त्याने ऑनलाइन दारू मागवायचं ठरवलं. जवळच्या नेहमीच्या वाइन शॉपचा नंबर त्याच्याकडे नव्हता. तो चटकन ऑनलाइन शोधू या, असा विचार त्याने केला. गुगलवर सर्च दिला. तिथे त्याला दुकानाचा पत्ता, फोटो, संबंधितांचे फोन नंबर अशी सगळी माहिती मिळाली. गुगलवर आहे म्हणजे ही अधिकृत माहिती आहे, खुद्द दुकानदारानेच ती पुरवली आहे, अशी त्याची समजूत होती. त्याने त्या नंबरवर कॉल केला, ऑर्डर सांगितली. समोरच्या माणसाने पटापट किंमती सांगितल्या. अमुक रेंजमध्ये कोणती वाइन चांगली आहे, ते सांगितलं. तिची किंमत सांगितली. २५३० रुपयांचं बिल होतंय म्हटल्यावर आपके लिए ३० रुपये का डिस्काऊंट दे देते है, २५०० रुपयेच द्या, असंही सांगितलं. डिलिव्हरी अवघ्या अर्ध्या तासात होणार होती. आता पेमेंट कसं करायचं? त्या माणसाने सांगितलं, काही नाही, एक क्यूआर कोड पाठवतो, तो स्कॅन करा. पैसे इकडे जमा होताच डिलिव्हरीसाठी माणूस रवाना होईल. तासाभरानंतरची मौजमजा मंदारच्या डोळ्यांसमोर नाचायला लागली. त्याने व्हॉट्सअॅपवर आलेला क्यूआर कोड काही विचार न करता आपल्या पेमेंट गेटवे अॅपमधून स्कॅन केला आणि खात्यातून अडीच हजार रुपये नाहीत तर तब्बल अडीच लाख रुपये खटॅककन काढले गेले. हे काय होतंय हे कळल्यावर त्याने ताबडतोब बँकेला आणि पेमेंट गेटवेला फोन केला. पण, त्याने स्वेच्छेने पेमेंट केलं होतं, ते पलीकडच्या खात्यात जमा झालं होतं. त्याच्याकडून पुढच्या प्रक्रिया होण्याच्या आत ते खातं रिकामं होणार आणि तपास तिथवर पोहोचेपर्यंत बंद होऊन जाणार, हे उघड होतं… सुन्न अवस्थेत मंदार जवळच्या पोलिस स्टेशनकडे निघाला…
मंदारच्या तुलनेत मुकुंदा नशीबवान म्हणायचा… त्याने याच पद्धतीने शोधून काढलेल्या दुकानदाराने त्याला व्हॉट्सअॅपवर पेटीएम वापरकर्त्याची लिंक पाठवली. याने १६०० रुपये भरले. स्क्रीनशॉट पाठवला. डिलिव्हरी कधी मिळेल, अशी विचारणा केली. त्या माणसाने फोन करायला सांगितलं. म्हणाला, आता मी एक कोड पाठवतो. तो स्कॅन करा. मुकुंदा थोडा सजग होता. तो म्हणाला, हा काय प्रकार आहे? माझं पेमेंट तुझ्याकडे पोहोचलंय, आता माल पाठव. समोरचा माणूस म्हणाला नाही, आमची ही सिस्टम आहे. असं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय डिलिव्हरी होणार नाही. मुकुंदा म्हणाला, ही सिस्टम मला मान्य नाही. माझे पैसे परत कर. मला माल नको. समोरचा माणूस म्हणाला, ठीक आहे. देतो तुला पैसे. अमुक नंबरवर पेच्या ऑप्शनमध्ये जाऊन मी सांगतो ती रक्कम टाक. पुन्हा याने विचारलं, पैसे सरळ रिफंड कर. ही काय सिस्टम आहे? त्यावर त्याने उदाहरण म्हणून एका दुसर्या यूपीआय वापरकर्त्याच्या खात्यात १० रुपये पाठवायला सांगितले. तो अटेम्प्ट फेल झाला असं सिस्टमने सांगितलं आणि १० रुपये परत आले. मग तो माणूस म्हणाला, बघ, येतात की नाही पैसे. आता मी सांगतो तिथे पेमेंटच्या लिंकवर जा, तिथे १९९१ रुपयांचा आकडा टाक आणि खाली नोट असं लिहिलेलं असतं तिथे १६०० रुपयांचा आकडा टाक. एव्हाना मुकुंदाच्या लक्षात आलं होतं की आपण गंडलो आहोत. तो म्हणाला, तू माझेच दहा रुपये बंद खात्यातून परत आणून दाखवण्याची जादू करून दाखवलीस म्हणून आता मी परत फसेन आणि आणखी १९९१ रुपये तुझ्या घशात घालेन, असं तुला कसं वाटलं? आपलं खरं स्वरूप याला कळलं हे समजताच तो ‘विक्रेता’ त्याच्या मूळ रंगात आला आणि अर्वाच्य शिवीगाळ करत त्याने फोन बंद करून टाकला… मुकुंदाने बँकेला, पेमेंट गेटवेला फोन केले आणि नंतर सायबर क्राइमचा सर्च देऊन शोध घेतला आणि केंद्रीय गृहखात्याच्या वेबसाइटवरचा कम्प्लेंट फॉर्म भरू लागला…
—-
कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन आला की अनेकांची अनेक प्रकारची धावपळ होते. त्यात मद्यप्रेमींची धावपळ असते स्टॉक करून ठेवण्याची. आता वाइन शॉप पुढे कधी उघडतील ते सांगता येणं कठीण असतं. मधल्या काळात चोरट्या मार्गाने दारू मिळवणं कठीणही असतं, महागडंही असतं आणि आपल्याला दिल्या जाणार्या बाटलीत त्याच कंपनीचं तेच पेय आहे का, याची खात्री नसते. त्यात एखादी गोष्ट नेहमीप्रमाणे सहजगत्या मिळणार नाही, असं कळलं की तिची तहान जास्त लागते. कधी कधी ही तहान घसाच नव्हे तर खिसाही कोरडा करणारी ठरते. त्यासाठी ऑनलाइन मद्य मागवताना खबरदारी बाळगलीच पाहिजे.
पहिल्या लॉकडाऊनमध्ये मद्यावरच्या कडक निर्बंधांमुळे राज्य सरकारांचा महसूल आटला. त्यामुळे लॉकडाऊन उठवताना टीकेचे प्रहार झेलून या सरकारांनी मद्यविक्री खुली केली आणि तिच्यातून भरपूर महसूल मिळवला. त्यासाठी एक सिस्टम तयार करण्यात आली होती. तीच कोरोनाच्या दुसर्या लाटेतही वापरली गेली. मद्यदुकानांबाहेर त्यांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरांचे बोर्ड लावले गेले. त्या पिरसरातल्या ग्राहकांनी आपली ऑर्डर त्या क्रमांकावर नोंदवायची आणि ती ऑनलाइन ऑर्डर घरपोच होणार, तिच्याबरोबर एक दिवसाचा मद्यसेवन परवानाही दिला जातो. स्पिरिटझोन, लिव्हिंग लिक्विड्स या मद्यदुकानमालिकांनी वेबसाइटवरून मद्य बुक करण्याची पद्धत सुरू केली. या सगळ्यांच्या मद्यविक्रीत एक महत्त्वाची खबरदारी घेतली जात आहे… कुठेही आधी पेमेंट करा आणि मग दारू मिळेल, अशी व्यवस्था नाही. तुम्ही ऑर्डर द्या, ती तुमचीच ऑर्डर आहे की नाही, याची खातरजमा करून डिलिव्हरी पर्सन तुमच्याकडे येणार आणि डिलिव्हरी दिल्यावर पेमेंट केलं जाणार अशी सिस्टम आहे. काही ठिकाणी लोक दुकानाच्या बाहेर थांबतात, ऑर्डर देतात, ती बाहेर आणून दिली जाते. तेव्हाच पैसे दिले जातात. मात्र, अनेकांना ही सिस्टम माहिती नसते. त्याचा फायदा ऑनलाइन लुटारू घेत आहेत आणि लॉकडाऊनच्या काळात मद्यासाठी तहानलेल्या मद्यप्रेमींची ऑनलाइन लुबाडणूक करणं हा एक मोठा प्रâॉड पोलिसांसाठी आणि सायबर पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत चालला आहे. हे चोरटे फक्त दारूची किंमतच लुबाडून थांबत नाहीत, ते अनेकदा सगळं अकाउंट साफ करतात. ऑनलाइन व्यवहारावर अतिविश्वास ठेवल्यामुळे अलीकडच्या काळात असे प्रकार वाढीस लागलेले दिसत आहेत.
अशी फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
पिंपरी चिंचवडचे सायबर शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. संजय तुंगार सांगतात, इंटरनेटवरच्या जाहिरातींपासून सावध राहिलं पाहिजे. या जाहिरातींच्या विश्वासार्हतेची कोणतीही हमी नसते. ऑनलाइन पद्धतीने लिलाव करून वेबसाइटवर काही जाहिराती झळकत असतात. त्यांची विभागणी सहा प्रकारांत होते, सर्च, डिस्प्ले, शॉपिंग, विडिओ, अॅप आणि स्मार्ट अॅड. दारूची खरेदी करणारी मंडळी ऑनलाइन खरेदी करण्यासाठी जेव्हा इंटरनेटवर वाइन शॉप असा सर्च करतात, त्या वेळेस त्यांना भरपूर नावे दिसतात. अनेकजण पहिल्या नावांपैकी एक दोन निवडतात आणि तिथे फोन करून मागणी नोंदवतात. मात्र, हे करताना असताना किती जण त्या पत्त्यांची, दुकानाची शहानिशा करतात? आपण ज्या ठिकाणी फोनवर बोलतो आहोत, तो दुकानातला कर्मचारी आहे की मालक आहे, याची खातरजमा करतात का? अनेकदा डिस्काऊंटचं प्रलोभन दाखवलं जातं. डिलिव्हरीला पैसे देताना पूर्ण द्यावे लागतील, ऑनलाइन भरलेत तर दहावीस टक्के डिस्काऊन्ट देतो, या आमिषाला लोक सहज बळी पडतात. गोड बोलण्यात गुंतवून ती व्यक्ती विश्वास संपादन करते आणि बकरा कितीला कापला जाईल याचा अंदाज घेते. ऑनलाइन दारूच्या खरेदीत तरूण, वयस्कर, मध्यमवयीन व्यक्तींबरोबरच अगदी लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकार्यांचीही फसवणूक झालेली आहे, असेही डॉ. तुंगार म्हणाले.
हे करू नका!
– मुळात ऑनलाइन दारू मागवताना सीओडी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी याच ऑप्शनवर ठाम राहा.
– फ्लिपकार्ट, अमेझॉन, बिग बास्केट, डी मार्ट, स्टार क्विक यांच्यासारख्या खात्रीलायक दुकानांव्यतिरिक्त कुठूनही, काहीही खरेदी करताना सीओडी आहे का, हेच तपासा.
– फेसबुकवरच्या जाहिरातदारांची जबाबदारी फेसबुक घेत नाही. तुमची फसवणूक होऊन तुम्ही त्या जाहिरातदाराची तक्रार करेपर्यंत आणि फेसबुकने काही कारवाई (म्हणजे फक्त पेज बंद करण्याची कारवाई) करेपर्यंत त्या पेजने लाखोंचा गंडा घातलेला असतो.
– कायदेशीर कारवाई करण्याच्या भानगडीत हे कोणतेच सोशल मीडिया मध्यस्थ पडत आणि अडकत नाहीत.
– आपल्याला मद्यदुकानाचा फोन नंबर कुठूनही मिळालेला असला तरी कोणताही व्यवहार करण्याआधी तो शक्यतो ट्रूकॉलरवर तपासून घ्या. आपल्या फोनमध्ये ट्रूकॉलर असलेच पाहिजे.
– आधी फसलेल्या माणसाने स्कॅम म्हणून नमूद केलेले असेल तर तात्काळ व्यवहार बंद करा, तो नंबर ब्लॉक करा.
– अनेकदा ट्रूकॉलरवर वेगळ्या राज्यातले नाव येते, तेव्हा अशा दुकानातले कामगार असतात परराज्यांतले, असा विचार करून आपण दुर्लक्ष करतो. ही रॅकेट राजस्थान, बिहार, झारखंड, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, आसाममधूनच चालवली जातात.
– फोनवर बोलणारी व्यक्ती त्याच दुकानातली आहे का, याची खातरजमा करून घ्या. त्यात संदिग्धता वाटली तर व्यवहार करू नका.
– प्रत्यक्ष डिलिव्हरीच्या वेळी जास्त रक्कम भरावी लागेल आणि ऑनलाइन दहावीस टक्क्यांची सूट असा प्रकार वाईन वगळता कोणत्याही मद्याच्या बाबतीत संभवतच नाही. त्यामुळे तिला भुलू नका.
डॉ. तुंगार बजावतात की, ऑनलाइन पेमेंट करणार असाल तर कोणताही क्यूआर कोड स्कॅन करू नका. कोणतेही अॅप डाउनलोड करू नका. समोरच्याने पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. मोबाइलवर आलेला ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड कुणालाही देऊ नका. डेबिट, क्रेडिट कार्डची कोणतीही माहिती देऊ नका. समोरचा माणूस फार विश्वासात घेऊन बोलत असतो, विश्वास ठेवायला सांगत असतो आणि सावज अलगद जाळ्यात ओढत असतो.
फसवणुकीसाठी वापरला जाणारा फोन एकाच्या नावावर असतो आणि वापरणारा भलताच असतो. मोठी फसवणूक करून झाली की सिमकार्ड फेकून द्यायचे, नवा नंबर, नवा फोन वापरायचा, असा त्यांचा फंडा असतो.
नंबर कसे चालू राहतात यांचे?
डॉ. तुंगार सांगतात की ऑनलाइन फसवणुकीतून दिवसाला करोडो रुपयांचा गंडा घातला जातो. कॉल सेंटर चालवली ज्ाातात झोपडपट्ट्यांमध्ये. पण सरकारने हे प्रकार रोखण्यासाठी कडक आणि सक्षम कायदे केलेले नाहीत. बँका आणि मोबाइलला कंपन्या हे यातले कच्चे दुवे आहेत. बँकांमध्ये अशा व्यक्तींची खाती बिनबोभाट चालू राहतात, ग्राहकाचे पैसे एखाद्या खात्यात चुकीने जमा झाले, तर ते परत घेण्याच्या दृष्टीने सुरक्षेचे कायदेच कमकुवत आहेत आणि मोबाइल कंपन्या फसवणूक करणार्यांच्या मोबाइलची सेवा ताबडतोब खंडित करण्याचा उपाय योजत नाहीत. पोलिसांनी कळवल्यानंतरही या सेवा सुरू राहतात. आणखी नवे लोक फसत जातात.
सायबर कायद्यात सुधारणा करून तो अधिक तगडा करायला हवा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी, यावरही डॉ. तुंगार भर देतात. पण, सध्या तरी त्या दिशेने काही घडताना दिसत नाही. बँका, मोबाइल कंपन्या, ईपेमेंटची वॉलेट या सगळ्यांनी सगळी जबाबदारी ग्राहकाच्या गळ्यात घातली आहे. त्यामुळे, ग्राहकाने सावध राहावे आणि माहिती नसलेल्या ठिकाणी ऑनलाइन पेमेंटच करायचे असेल तर ते डिलिव्हरीच्या वेळी माल ताब्यात घेतल्यावर एक्झिक्युटिव्ह समोरासमोर देईल त्या लिंकवरूनच करावे.
– सुधीर साबळे
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)