आमच्या गावातबी देहानं गवात असनारे लय गावकरी हायत. म्हंजे ते नॉन रेशिडेन्शीयल शहरीच असतेत. काहीबी खुटूक झालं का ते शहरात जातेत. म्हंजे ते शह्यरात जान्याचा चानसच शोधत रायतेत. आता गावातबी काही गोठी भेटतेतच, म्हंजे शहरातबी नाही भेटन अस्या गोठी गावात भेटतेत.
—-
एकदा का तुमी गावाचे असले; म्हंजे तुमची नाळ गावात गाडली गेली असली का मंग गाव तुमची पाठ काही सोडत नाही. भुकेनं पोट पाठीले लागलं का मान्स गाव पाठीले घालून शहराकडं जातेत. पोट त कसं पाठीलेच लागून रायते. मान्सायच्या भुका वाढतच जातेत. काही भुका अन् गरजा निसर्गाच्या बाहेरच्या असतेत अन् मग गावात काही भागत नाही, मंग मान्स शहराकडं जातेत. नाहीत गावात दोन टायम जेवाले, रहाले छत, झाडायची सावली, शुद्ध हवा या अगदी पह्यल्यापह्यल्या गरजा भागतेतच. आता गावातबी शिक्षन असते अन् आजारी पडलं मरनाचन का मंग शह्यराकडं जान्यासाटी सुदे रस्तेबी रायतेत… तरीबी मान्सायले विस्तीर्न शेतायच्या ऐवजी मोठे हॉल लागते, अल्लादिनच्या गुहेवानी सर्वच असलेले मॉल लागते, प्रेमानं बोलना-या. जवडच्या मान्सायच्या ऐवजी दूरून बोलनारे कोरडे मान्स पाह्यजेन रायते अन् मंग त्यायच्यासंग जोडून रहाले मंग इंटरनेट लागते. आता त असं हाय का श्वास नाही घेता आला त चालन; पन इंटरनेट लागतेच… या सार्यासाटी शहर जवळ करतेत मान्स.
आमच्या गावातबी देहानं गवात असनारे लय गावकरी हायत. म्हंजे ते नॉन रेशिडेन्शीयल शहरीच असतेत. काहीबी खुटूक झालं का ते शहरात जातेत. म्हंजे ते शह्यरात जान्याचा चानसच शोधत रायतेत. आता गावातबी काही गोठी भेटतेतच, म्हंजे शहरातबी नाही भेटन अस्या गोठी गावात भेटतेत. गावात एक टपरी रायते. ते म्हंजे कल्पवृक्षावानी रायते. तठी काहीबी भेटू शकते. अगदी ब्रँडेड बीयरपासून रेबॅनच्या गॉगलवरी सर्वच. सिगारेटाचे त नावनाव उंची ब्रँड एक टायजम शहरात नाही भेटन पन आमच्या गावच्या टपरीवर भेटते. आता गावची हे टपरी ‘जिओ दिलसे’ म्हनत जगाशी कनेक्ट झाली हाय (फकस्त गावाशी कनेक्शन राहीलं नाही). म्हंजे कपरीवर बसेल अर्धउच्चशिक्षित तरुन रक्त युट्यूब चाहिनेलवर का का पाहून उसळ्या मारत असते. इंटरनेटवर जगाचं नॉलेज भेटते, असा त्याहिचा समज झालेला हाय अन् हे पिढीच्या पिढीच ज्ञानेश्वर मावलीचा हात सोडून बिल गेटस् अन् मार्क झुकेरबर्गच्या पंथाले लागले हायत. नॉलेजसाठी दर सेकंदाले ते पैसे ‘पेड’ करतेत. या टपरीवर बसनार्या यले बाकी काहीच नको असते, फक्त पॅक पाह्यजेन असते. चोविस तास अनइंटरप्टेड अंबानीचा पॅक अन् सांजले बसाच लागते त मंग तो तसा पॅक लागते. आता गावात पोरगा तरुन झाला हे ओळखाचं असन तो बसा लागला का, हे पहा लागते. आधीच्या टायमाले वयात आल्यावर पोरीच बसे, आता गावाकडचे पोरं रोजच सांजेले बसू लागले हायत. नाही बसले त मंग त्यायले झंडू फुटतेत, झडत्या येतेत. हातपाय थरथर कापतेत त्याहीचे, टिरनेटचा अन् ह्या पॅक संपला का टपरी विद्यापीठाच्या या विद्यार्थ्यायचे हाल असेच होतेत.
त सांगाचा मतलब ह्याच का या टपरीवर सर्वच भेटते. कोंच्याबी मोबाईल कंपनीचा रीचार्ज मारून भेटते अन् जगात कुठीबी किरकेटची मॅच सुरू असली त आमच्या गावच्या टपरीवरच्या टिव्हीवर दिसते. बरं, या टपरी विद्यापीठार विद्वानायची कमी नाही. त्यायले सर्वच ग्यान हाय. अगदी उच्चप्रतीचं, शुद्ध देसी घी वानी ग्यान त्यायले हाय. तेच्यात किरकेट अन् राजकारन याच्याबाबत त त्याहिचा हात कोनीच नाही पकडत. म्हंजे त्याहीन किरकेटची बॅट हातात पकडनं दूरच जवळून पाह्यलेली नसते अन् तरीबी थे मॅच सुरू असतानी कोहली आऊट झाला लवकर का, ‘आजकाल विराट कोहली ऑक्रॉस दी बॅट खेलते त्याच्यापायी त्याचे रन नाही होत हाय..!’ अशी रीची बेनॉ नाहीत सुनिल गावसकरवानी चेहरा करून हे लोक सांगतेत. राजकारनाच्या बाबत त यायचा इंटेलिजन्स खूपच तगडा हाय. म्हनजे टपरीश्वराधीश असलेला आमचा परकास हाय ना तो सकाळी सकाळी तुमाले बातमी देते, ‘राज अन् उद्धव एकत्र येनार हाय!’ आता परकासनं इतक्या कॉन्फीडन्सनं (आत्मविश्वास ह्या शब्द जरा लुज वाटते) हे बातमी दिलेली रायते का, जसं त्याच्या घरीच त्याच्या बापानं या दोघायले एकत्र बसवलं न सांगलं का, भांडनं बंद करा न या एकत्र… मंग परकासच सांगते अगदी आतली गोठ सांगल्यावानी, ‘काल राती अडीच-तीनच्या दरम्यान राजसाहेब सोत कार चालवत उद्धव सायबाले भेटले.’ हे सानगत असताना आमचा परकास विथ प्रूफ बोलत असते. राजसाहेबाची गाडी नेव्ही ब्लू रंगाची होती अन् तिचा नंबर अमूक तमूक होता, हेबी तो सांगते. रातीले ममईपासून आठवडी बाजार १३०० किलोमिटर दूर अंतरावर असेल आमच्या गावात त्याच्या छप्परफाड घरातच ह्या झोपला होता अन् तरीबी याले साऊथ बाँबेतल्या घडामोडी इतक्या एकदम सपष्ट कस्या दिसल्या बा, असा सवाल आपल्याले पडू द्याचा नसते. काहूनका आमच्या गावच्या टपरीवर असे सर्वज्ञ म्हनतेत तसे लोक हायत. जगाचा इस्वास बसनार नाही; पन असा एकच परकास आमच्या गावात हाय असं नाही. आमच्याच गावात परकासच्या नस्लचे लय लोक हायत अन् गावच्या गाव अस्या परकासी आत्म्यायनं समृद्ध झालेले हायत… ‘मोदीनं आता योगी आदित्यनाथचे पंख कापले हायत. दोन दिवसात उत्तर प्रदेसचा सीएम तो अमका तमका होनार हाय…’, असं टपरीनंदेश्वर जगू आबानं मले सांगून टाकलं होतं. महादेवाच्या मंदिरासमोर जसा नंदी भक्तभावानं बसेल रायते अन् भक्त मंग येता-जातानी त्यालेबी फुलं वाह्यते तसा जगू आबा टपरीसमोर बसेल असते. म्हून म्या त्याले टपरीनंदेश्वर म्हनत असतो. गावाचं अन् देसाचंबी भविष्य असेल तरने पोरं, ‘हात अगरबत्ती, पैर मोमबत्ती अन् छाती कापराच्या वड्या’ हे वर्नन त्यायच्याबाबत अॅ प्रोप्रेट हाय ना भाऊ! त हे पोरं टपरीवर येतानी अन् कई कई घरी जातानी जगू आबाले सिगारेट, चहा, कई कोकाकोला असं काही देवून जात असते. सकाळच्या टायमाले कोनी गरम पालकवडा नाही त आलुबोंडा अन वरून एक च्याचा कट जगू आबाले देवून जात असते. तसा तो एकलाच हाय. पाच साल पयले त्याची एकुलती एक बायकोबी मेली. तवापासून आबा एकलाच हाय. त तोबी मले इतकी आतली मायती देत होता…
त टपरी असूनबी गावातले लोक काही ना काही कारन कहाडून शहरात जाते. म्हंजे एक रुप्याची डिस्प्रीन नाहीत कॅलपॉलची गोयी आनाची म्हूनबी तीनकशे रुपे खर्च करून हे शहरात जातेत. अवघा दिवस येन्या-जान्यात अन् मंग शहरात गेल्यावर तिथल्या ओम थिएटरमंध एखांदा पिक्चर पाह्यन्याचा कारेकरम करून हे लोक गावात येतेत (नाविलाजानं). म्हंजे आमचा नंदू हायना तो त्याच्या मायसाटी अमृतांजन आनासाटी शहरात जाते. त्याले म्हनलं, टपरीवर भेटतेना आपल्या अमृतांजन. त थो म्हने का, टपरीवरचं नाहीच आंगी लागत बुडीच्या. तालुक्याले बाबूभायच्या दुकानात जसं भेटते ना बाबू तसं नाहीच भेटत ना कुठीच… आता नंद्याच्या बुडीले अमृतांजनचं अॅडिक्शन हाय.
एकडाव तो निंघाला होता शहराकडं त मी गेलतो गावात अन् तालुक्याले जावून सांजेले वापस जानारच होतो त त्याले म्हनलं का, ‘नंद्या, मी आनून देतो ना अमृतांजन बुडीचं तुह्या. तुहा खर्च वाचन…’ त तो म्हने, ‘नाही ना दादा, तू एखांद्या डाव गावाकडं येतं न तुले असा तरास द्याचा का?’
‘आता तेच्यात कहाचा तरास? मी जातच हाव…’ म्या म्हनलं.
‘नाही, आपन कोनाले आपलं काम सांगत नाही… आपले कामं आफून कराव. माह्या बुड्याले नोतंच आवडत ना थे!’ नंद्या म्हने.
ह्या इळभर बाजेवर बसून रायते अन् येनार-जानार कोनालेबी ह्या टपरीवरून बिडीकाडी आनाले सांगते. एकडाव त त्यानं त्याले लहानपनी सिकवलेल्या गुर्जीलेच तमाखूची पुडी आनाले सांगलं होतं! आता मातर शह्यरात जाचंच असल्यानं त्याचा स्वाभिमान जागा झाला होता.
हे असे आत्म्यानं शहरी झालेल्यायची गावात संख्या खूप हाय. थे काहीतबी कारन कहाडून रोज सकायी शहरात जातेत अन् सांजच्याले वापस येतेत. गावाच्या बाह्यरं ढाबा लागला हाय आता. गावानं प्रगती केल्याचं लक्षन. ढाबा होता, त्याचं रेस्टॉरंट झालं अन् मंग त्याले बारचं लायसन आलं… हे काही आपोआप होत नसते. गावाचा रामरतन बोरुले या जयस्वाल. आमदाराचा मानूस. म्हंजे आमदार बदलतेत; पन त्याचा मानूस या जस्वालच रायते. म्हंजे या आमदाराचा बाप आमदार होता तवाबी रामरतनचा बाप आमदाराचा खास मानूस होता अन् आता बेटा आमदार झाला, त्याच्या आधी दुसर्याच पार्टीचा मानूस आमदार होता त त्याचाबी खास मानूस या रामरतनच होता… म्हंजे आमदार मुंबईवरून आला त ‘प्रथम नगरागमन प्रसंगी’ कोन रेल्वे स्टेशनवर जात असीन त रामरतनच जाते. ‘अपून तो शिंदे साहेब के लीए कुच्च भी कर सकते है…’ असं तो शिंदे साहेबांच्या टायमाले म्हन्ते अन् तोडसाम आमदार झाल्यावरबी रेल्वे स्टेशनवर हाच राहाते अन् ‘तोडसाम साहब अपनी जान है’ असं म्हनते. आमादाराचं इलेक्शन मॅनेजमेंट ह्याच करते. पेपरात आमदाराच्या बर्थ डे ले ह्याच पेपरात जायरात देते…
त त्याच्यापाई त्याचा बार- रेस्टॉरंट झाला. मंग शहरातून वापस येतानी यस्टी अठीच थांबते अन् गावचे हे शह्यरात जाएल लोक अठीच श्रमपरिहारासाठी थांबतेत. गावाचा असा विस्तार झालेला हाय…
सांजेले हे रेस्टॉरंट सजलेलं रायते… गावाची गरामपंचायत आता ए ग्रेड म्हनतेत तसी झालेली हाय. सरपंच कोन होईन थे रामरतन ठरवते. असे रामरतन गावोगावी हायत. गावखेड्यात दारूच महापूर झाला आला हाय म्हनतेत ना ते याच्याचसाटी. गावातले अधरशिक्षन घेऊन साहेब झालेले तरने पोरं रामरतनसाटी काम करतेत. मोर्चा, बंद अन् आमदाराचा प्रचार… मंग गावातले चांगले मान्स गाव सोडून शहरात गेले. शाळेच्या पांडे मास्तरनं शहरात फ्लॅट घेतला. त्यायचा लेक म्हने अमेरिकेत गेला. पाटलानं शहरात आदी बंगला बांधला. पोरायले सिकवाले ठिवलं अन् मंग मंगल कार्यालय कहाडलं. पाटीलबी आता शहरातच रायते. गावात नोकरकीले याव लागते थे कोनीच गावात राह्यत नाही… गावात चार- पाच एक्कर कोरडवाहू शेतीवाले रायतेत. चांगले सिकले पोरं शहरात फॅक्टरीत नोकरी करतेत, कईकई गावाकडं येते. गाव आता सुनंसुनं झालेलं असते… तरीबी गाव गावच हाय. पुना कई जुने दिवस येतीन, याची वाट पाह्यत असते… कारन गावातून गेलेल्या सुद्या लोकायचे नावं गावाच्या मतदारयादीतच हायत अन् ते मतदानाले का होईन गावात येतेत!
– श्याम पेठकर
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक, संपादक व सामाजिक कार्यकर्ते आहेत)