आज दिनांक बारा जून रोजी अतिशय जड अंत:करणाने आम्ही हा लेख लिहीत आहोत. अंत:करण जड असायचे एक कारण काही वर्षापूर्वी याच दिवशी आपले सर्वांचे लाडके पु. ल. देशपांडे आपल्याला सोडून गेले हे आहे; पण अंत:करण अधिकच जड व्हायचे कारण म्हणजे स्व. पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर आमचा एकही फोटो नाही, त्यांनी आम्हाला पाठवलेले एकही पत्र किंवा पोस्टकार्ड नाही. असे फोटो समाजमाध्यमावर टाकल्याविना थोर लोकांना आदरांजली वाहता येत नाही, असा आमचा अनुभव आहे. आमचे अंत:करण जड व्हायचे खरे कारण हे आहे. वास्तवात पुलंनी आमची ही भावी अडचण वेळीच ओळखायला हवी होती आणि आमच्यासोबत एखादा फोटो काढून ठेवायला हवा होता. निदान आम्हाला एखादे पत्र… असो. गतं नं शोच्यम! आमच्यामागे सतराशे साठ कामे लागलेली असतात. त्यामुळे आमच्या ध्यानात नाही राहात अशा गोष्टी. पण या निमित्ताने आम्ही समस्त थोर स्त्री-पुरुषांना अशी नम्र विनंती करतो की त्यांनी या बाबतीत असा आळस न करता त्वरित आमच्यासोबत एक फोटो काढून ठेवावा. कारण हे समस्त थोर लोक एक दिवस स्वर्गवासी होणार आहेत. असो.
या निमित्ताने थोर असणार्या किंवा होऊ घातलेल्या (किंवा होऊ इच्छिणार्या) समस्त लोकांसाठी आम्ही एक सूचनावली (खरे तर आज्ञावलीच, पण असो) येथे देत आहोत. तिचा सर्व माजी, आजी (नको, नको लेखाची सुरवात पुलंच्या नावाने केली म्हणून ‘पाजी’ चा तिय्या साधणारा विनोद नको) तसेच भावी थोर लोकांनी या सूचनावलीचा अभ्यास करावा आणि त्यानुसार वर्तन ठेवावे.
१. आम्ही स्वत: एक थोर स्त्री-पुरुष नोंदणी सेवा सुरू करत आहोत, तेव्हा अशा समस्त आजी, माजी आणि भावी थोर स्त्री-पुरुषांनी तिथे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क रु. १०००/- ‘जी पे’ने भरावेत.
२. आमच्याकडील आजी, माजी आणि भावी थोर स्त्री पुरुष नोंदणी रजिस्टरमध्ये नोंद करण्यासाठी वर सांगितलेल्या रु. १००० प्रवेश फीबरोबरच तीन नोंदणीकृत थोर स्त्री अथवा पुरुषांचे शिफारसपत्र जोडणे आवश्यक आहे. हे शिफारस करणारे स्त्री-पुरुष आमच्याकडे नोंदणीकृत असणे अगत्याचे आहे (काही थोर स्त्री पुरुष अशी शिफारसपत्रे ५०० रुपयांच्या किरकोळ किमतीत देत असल्याचे आमच्या ध्यानात आले आहे. तेव्हा या बाबतीतले दरपत्रक देखील आम्ही लवकरच जारी करणार आहोत).
३. आजी, माजी आणि भावी थोर स्त्री-पुरुषांनी रोज किमान तीन सुवचने प्रसूत (का प्रसृत, का काय म्हणतात ते) करणे आवश्यक आहे. अशा सुवचनांची डायरी मेंटेन करणे आवश्यक असून दर सोमवारी मागील आठवड्यातील सर्व सुवचने ईमेलद्वारा आमच्याकडे नोंदवावी लागतील. (यात सलग दोन आठवडे हयगय केल्यास नोंदणी रद्द होऊ शकते.)
४. सर्व इच्छुक नॉन-थोर रसिकांनी आमच्याकडून प्रति सुवचन रु. ५ या दराने हव्या त्या थोर स्त्री अथवा पुरुषाची हवी ती सुवचने घ्यावीत आणि समाजमाध्यमावर टाकावीत (एकाच वेळी १० पेक्षा जास्त सुवचने घेतल्यास दोन सुवचने मोफत दिली जातील. तसेच एकरकमी पंचवीस सुवचने घेतल्यास पाच सुवचने मोफत दिली जातील तसेच तुमच्या पसंतीच्या हयात थोर स्त्री/पुरुषासमवेत एक फोटो मोफत काढून दिला जाईल). कोणाही आजी, माजी अथवा भावी थोर स्त्री अथवा पुरुषाने परस्पर आपली सुवचने वापरायला दिल्याचे आढळल्यास त्याची नोंदणी आपोआप रद्दबातल ठरवली जाईल आणि अशी रद्द झालेली नोदणी पुनर्जीवित करायची असल्यास रु. ५००० दंड भरावा लागेल. तीन वेळा नोंदणी रद्द झाल्यास त्या थोर स्त्री-पुरुषाची नोंदणी कायमची रद्द करण्यात येईल.
५. ज्या आजी, माजी आणि भावी थोर स्त्री-पुरुषांना आपल्या फोटोवर मिम करून पाहिजे असेल त्याने आमच्याशी स्वतंत्र संपर्क साधावा (टीप : मिम म्हणजे तुमच्या फोटोवर भलतेच काहीतरी लिहिलेले टाकून आचरट ते वाह्यात या रेंजमधला कोणताही विनोद तयार करणे). अशा मिममुळे त्या थोर स्त्री अथवा पुरुषाचे महत्व कमी होण्याऐवजी वाढते असा आजवरचा अनुभव आहे. ही योजना नव्यानेच सुरू करत आहोत तेव्हा आजपासून सहा महिने केवळ सतराशे पन्नास रुपयात असे मिम तयार करून दिले जाईल. तुमच्यावर केलेल्या मिमचे वितरण मात्र तुम्हीच करायचे आहे. मीम्सवर चाहत्यांच्या भावना दुखावल्या तर होणारे आरोप तसेच कायदेशीर खटले वगैरे गोष्टींची जबाबदारी संबंधित थोर स्त्री अथवा पुरुषावर राहील याची नोंद घ्यावी. आम्ही असे मीम्स केवळ एक ‘प्रोफेशनल सेवा’ (व्यावसायिक सर्व्हिस) या नात्याने देतो, एरवी आमच्यावर काही जबाबदारी नाही याची नोंद घ्यावी.
६. आता मुख्य मुद्दा फोटोचा. आमचेकडे नोंदणीकृत थोर स्त्री-पुरुषासमवेत फोटो काढून देण्याची व्यवस्था सोमवार ते शुक्रवार स. १०.०० ते दु.१.३० पर्यंत आमच्या कार्यालयात असेल. त्यासाठी ज्याच्याबरोबर फोटो काढायचा त्याचे नाव आमच्या कार्यालयात नोंदवावे. फोटो काढण्याची फी रु. १२००/- (महत्वाची सूचना : पुरुष चाहत्याला थोर स्त्रीबरोबर फोटो काढायचा असल्यास तीन नोंदणीकृत थोर स्त्रियांचे ‘नॉट मी टू’ सर्टिफिकेट आणणे आवश्यक आहे). दोनपेक्षा जास्त थोर स्त्री-पुरुषांसमवेत ग्रुप फोटो काढायचा असल्यास २५ टक्के सवलत मिळेल.
खरे तर या केवळ काही मोजक्या सूचना आहेत. इच्छुक रसिक आणि नोंदणी करू पाहणार्या थोर स्त्री-पुरुषांनी आमचे पूर्ण माहितीपत्रक वाचून संपर्क करावा ही विनंती. लॉकडाऊनच्या काळात नोकरी-धंदा बोंबलला त्यामुळे कुणीही उठतो आणि काहीही व्यवसाय सुरू करतो या प्रकाराअंतर्गत आम्ही हा ‘थोर स्त्री पुरुष नोंदणी’चा व्यवसाय सुरू केला असे आमचे काही जळाऊ हितशत्रू म्हणतात. पण आम्ही तिकडे दुर्लक्ष करतो. कारण आम्हाला आमच्या या कार्याची महती पटलेली आहे. त्यासाठी आम्ही काहीही सहन करू. म्हणतात ना, जया अंगी थोरपण, तया यातना कठीण. असो.
– संजय भास्कर जोशी
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक आहेत)