अशी आहे ग्रहस्थिती
चंद्र सिंहेत नंतर कन्येत. सप्ताहाच्या अखेरीस वृश्चिकेत. केतू- वृश्चिकेत. शनि-प्लूटो वक्री मकरेत, गुरु वक्री कुंभेत नेपच्यूनसह, बुध वक्री, राहू वृषभेत, रवी-शुक्र मिथुनेत, मंगळ कर्केत, हर्षल मेषेत.
१९ ते २२ दरम्यान गुरू स्तंभी. २१ जून रोजी निर्जला एकादशी. २४ जून रोजी वटपौर्णिमा
——–
मेष – या आठवड्यात संमिश्र अनुभव येईल. शनि आणि मंगळाच्या समसप्तक योगामुळे सुखसौख्यात बाधा येण्याचे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे योग्य खबरदारी घ्या. चार दिवस गुरू स्तंभी राहणार असल्यामुळे ध्यानधारणेत जास्त वेळ द्या. भविष्यात त्याचा चांगला फायदा मिळेल. एखाद्या ठिकाणी नवीन गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर विचारपूर्वक निर्णय घ्या.
वृषभ – आयुष्यात बदल होण्यास सुरुवात होणार आहे, त्याचा प्रारंभ या आठवड्यापासून होईल. राशीत परिवर्तन योग जमून येत असल्यामुळे आता नव्या संकल्पना सुचतील. कालांतराने त्याचे रूपांतर चांगल्या व्यवसायात होऊ शकते. त्यामुळे नवीन कल्पना सुचली तर ती लगेच पुढे न्या, फायद्यात राहाल. कला, संगीत अशा गोष्टींमध्ये मन रमवाल. सुखस्थानावर गुरूची दृष्टी आहे, त्यामुळे आठवडा अविस्मरणीय जाईल.
मिथुन – अनेक दिवसांपासून परदेशात किंवा देशात कुठेतरी फिरायला जाण्याचे डोक्यात असेल तर त्याला आता गती मिळेल. लॉकडाऊन आता उघडला आहे, त्यामुळे फिरायला जाण्याचा प्लॅन आखू शकाल. येन केन प्रकारेण कौटुंबिक कारणासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे थोडी चिडचिड होऊ शकते.
कर्क – नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी प्रवास करावा लागू शकतो. त्यात योग्य काळजी घ्या. व्यवसायातील मंडळी विस्तार करण्याचा विचार करत असतील तर बिनधास्त गो अहेड. त्याबाबतच्या चर्चा सफल होतील. अनपेक्षित लाभ होण्याचे योग आहेत. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह – या आठवड्यात पतप्रतिष्ठा वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. अनपेक्षित लाभ मिळण्याचे योग जमून येत आहेत. घरात बोलताना काळजी घ्या, चतुर्थातील केतू कौटुंबिक सुखात अडथळा आणण्याचे काम करेल; त्यामुळे सावध राहा आणि गोड बोलून वेळ मारून न्या.
कन्या – आरोग्याबाबतची एखादी चिंता सतावेल. दवाखान्यावर पैसे खर्च होऊ शकतात, त्यामुळे किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कुणाला उसने पैसे देऊ नका. प्रवासात खिसा पाकीट सांभाळा. कामाच्या ठिकाणी अधिक सजग राहा, अन्यथा एखादी चूक खूपच महागात पडू शकते.
तूळ – वडिलोपार्जित व्यापार, प्रॉपर्टी यामधून चांगला अनपेक्षित लाभ मिळण्याचे योग आहेत. नोकरी, व्यवसायात काम करताना घाई करू नका. चुकून निर्माण झालेला एखादा अडथळा महागात पडू शकतो. कोरोना आता काही काळासाठी दूर गेला असला तरी आरोग्याच्या किरकोळ तक्रारीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक – नातेवाईकांपासून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी, समाजात, पारिवारिक कार्यक्रमात मानसन्मान मिळण्याचे योग आहेत. त्यामधून एखाद्या पदाची माळ गळ्यात पडू शकते. पैसे खर्च करताना काळजी घ्या. वायफळ खर्च करण्याचा मोह प्रकर्षाने टाळा.
धनू – शुभकार्यासाठी उत्तम काळ आहे, त्यामुळे घरात एखादे धार्मिक कार्य होऊ शकते. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कुटुंबासाठी वेळ द्याल. कामाच्या निमित्ताने छोटे प्रवास होऊ शकतात. वाहन चालवताना खबरदारी घ्या आणि वेगावर नियंत्रण ठेवा.
मकर – कुठे प्रेमप्रकरण सुरू असेल तर काही कारणामुळे टोकाचे मतभेद निर्माण होतील, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामधून वादविवादाला तोंड फुटू शकते. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवा.
कुंभ – येत्या आठवडा आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगला आहे. आनंद द्विगुणित होईल, असे अनुभव या काळात येतील. नवीन व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर थोडा विचार करून निर्णय घ्या. कारण सध्या साडेसातीचा काळ सुरू आहे. महिलांना चांगले अनुभव येतील.
मीन – कामात लक्ष असू द्या. एखादी छोटी चूक खूप महागात पडू शकते. त्यामुळे काळजी घ्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा पोटाच्या विकारांना निमंत्रण मिळू शकते. आध्यात्मिक कार्यक्रमासाठी वेळ द्याल, त्यात मन रमल्यामुळे आठवडा आनंदात जाईल.