• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

उडीदमेथी आणि कैरीची तंबळी

(चला खाऊ या - जुई कुलकर्णी)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
June 17, 2021
in चला खाऊया!
0

कैरीचा आस्वाद घेण्याचा जून हा एकच महिना राहिलाय आता. सहसा जुलैपासून कैरी दिसेनाशी होते. पावसाळ्यात कैरी खावीशीही वाटत नाही. कैरीचे त-हेत-हेचे पदार्थ अनेकदा करून झाले असले तरी नुकतेच कैरीचे दोन नवीन पदार्थ करून पाहिले. या दोन्ही रेसिपी पारंपरिक आहेत, रूचकर आहेत, यांना फारसं साहित्य लागत नाही आणि त्या झटकन होणा-या आहेत.
सारस्वत स्वयंपाकात उडीदमेथी केली जाते. मुळात हा माशाचा- बांगड्याचा रस्सा असं म्हणता येईल. पण कैरीच्या दिवसात कैरीची उडीदमेथी केली जाते. उडीद डाळ आणि कैरीची आमटी असंही म्हणता येईल आणि सोबत मेथीचा फ्लेवर आहे. उडीदमेथी आणि सोबत आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदळाचा भात अगर तांदळाची भाकरी हे काँबिनेशन जबरदस्त चविष्ट लागतं.

उडीदमेथी

साहित्य :
कैरीची सालं काढून केलेले जाडसर उभे तुकडे- १ वाटी,
ओलं खोबरं १ वाटी
लाल सुक्या मिरच्या चार
दोन चार मिरीचे दाणे
मेथी दाणे दोन टीस्पून
उडीद डाळ तीन टेबलस्पून
गूळ एक टेबलस्पून
मीठ चवीनुसार, तिखट
कढीपत्ता, खोबरेल तेल
आणि फोडणीचं साहित्य

कृती :
कढईत एक टेबलस्पून खोबरेल तेल घालून तापवून मोहरी, जिरं, हिंग, हळद, कढीपत्ता आणि एक टीस्पून मेथी दाणे आणि एक टेबलस्पून उडीद डाळ घालून परतायचं. खोबरेल तेलानं उत्तम स्वाद येतो. ते तेल नसल्यास किंवा आवडत नसल्यास इतर कुठलंही तेल चालेल.
या फोडणीत कैरीच्या फोडी घालून परतून घ्यायच्या. झाकण घालून वाफेवर शिजत ठेवायच्या.

वाटण :
ओलं खोबरं एक वाटी, चार लाल सुक्या मिरच्या, मीठ, दोन टेबलस्पून उडीद डाळ, मेथी दाणे एक टीस्पून, दोनचार मिरीचे दाणे हे सगळं थोडसं पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्यायचं. बारीक वाटलं गेलं पाहिजे.
कढईत वाफेवर शिजलेल्या कैरीत हे वाटण घालायचं. गूळ १ टेबलस्पून घालायचा, कैरी आंबट असेल तर चवीनुसार वाढवायचा. मीठ वाटणात आहे हे लक्षात ठेवून चवीनुसार घालायचं. अजून तिखट हवं असल्यास लाल तिखट वरून घालायचं.
उडीदमेथी खळाखळा उकळून घ्यायची. गार होईल तसं नारळाचा रस दाट होत जातो.
…

कैरीची तंबळी

तंबळी हा प्रकार फेसबुकवर एका उडपी रेसिपीज पेजवर समजला. एका मैत्रीणीनंही तर्‍हेतर्‍हेच्या तंबळीचे प्रकार पोस्ट केले. तंबळी हा पोटाला आणि मनाला शांतवणारा कालवणाचा प्रकार आहे. सौम्यपणा हा याचा गुण आहे. तंबळी म्हणजे एकप्रकारे कढीच. पण तंबळीत अनेक प्रकारचा भाजीपाला ओल्या नारळासोबत वाटून ते मिश्रण ताकाला लावून वरून नारळाच्या तेलातील फोडणी देतात. तंबळी गारच असते. ती गरम करत नाहीत. तंबळी सहसा दुपारच्या जेवणात भाताबरोबर कालवून खाल्ली जाते आणि प्यायली जाते. तंबळीचे अनेक प्रकार असतात. कढीपत्ता, ब्राह्मी, आवळ्याची पानं, मेथी, समुद्रमेथी, पेरूची पानं, ओव्याची पानं, कांदा अशा अनेक भाज्या वाटून तंबळी करतात.
तंबळीच्या दुसर्‍या पद्धतीत तुपावर/ खोबरेल तेलात पानं, नारळासोबत जराशी परतून घेऊन मग वाटून घेतात आणि ताकाला/ दह्याचा ते मिश्रण लावून वरून फोडणी देतात.

साहित्य :
अर्धी वाटी कैरीचे तुकडे साल काढून
अर्धी वाटी खवलेला ओला नारळ
चार वाट्या गोड ताक (कैरीची तंबळी करताना शक्यतो गोड ताक असावं कारण कैरी आंबट असते)
एक मिरची, नखभर आलं
मीठ, साखर चवीनुसार
खोबरेल तेल, फोडणीचं साहित्य

कृती :
अर्धी वाटी कैरीचे तुकडे, ओलं खोबरं, मिरची, साखर, मीठ, आलं सगळं मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं. पातेल्यात चार वाट्या ताक घ्यायचं. त्यात हे मिश्रण घालून नीट ढवळून घ्यायचं. एक टेबलस्पून खोबरेल तेलात मोहरी, जिरं, हिंग, हळद अशी फोडणी करून ती या मिश्रणावर ओतायची. फोडणीत कढीपत्ता घालू शकतो. पण मग त्याची चव ठळक येते.

कढीपत्ता तंबळी :

भरपूर ताजा कढीपत्ता आणतो तेव्हा ही तंबळी करावी. आपणसहसा कढीपत्ता फोडणीत घालतो पण पदार्थ खाताना तो बाजूलाच काढून टाकला जातो. कढीपत्ता पोटात जाण्यासाठी हा पदार्थ उत्तम आहे.

साहित्य :
एक वाटी कढीपत्ता (ताजी पानं)
एक हिरवी मिरची, मीठ
दोन टेबलस्पून ओलं खोबरं,
तीन वाट्या ताक,
खोबरेल तेल,
फोडणीचं साहित्य.

कृती :
एक टीस्पून नारळाच्या तेलात थोडंसं जिरं, एक हिरवी मिरची, वाटीभर कढीपत्ता, दोन टीस्पून ओलं खोबरं पाच मिनिटं परतून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घ्या. दोन तीन वाट्या ताकात चवीनुसार मीठ घाला. त्यात वरचं वाटण घाला. एक टीस्पून नारळाच्या तेलाची फोडणी करा. ती वरून या ताकात ओता. कढीपत्ता तंबळी तयार.

ओव्याची तंबळी :

ओव्याची म्हणजे इंडियन बोरेज या वनस्पतीची पानं वापरून तंबळी करतात. हे झुडूप आजकाल बर्‍याच घरांमध्ये दारोदारी लावलेले असते. ते सहज भरपूर फोफावते. पानं जाड असतात. ही पानं औषधी आहेत आणि याची तंबळीही छान होते.

साहित्य :
अर्धी वाटी ओव्याची पानं
अर्धी वाटी ओला नारळ
२ टीस्पून तूप
चिंचेचा कोळ १ टेबलस्पून
दही एक वाटी
साखर मीठ चवीनुसार
फोडणीचे साहित्य

कृती :
१ टीस्पून तुपावर स्वच्छ धुतलेली ओव्याची पानं परतून घ्यायची.
गार झाल्यावर मिक्सरमधून ओलं खोबरं, दही, परतलेली पानं, मीठ, साखर वाटून घ्यायचं. या मिश्रणात हवं तितकं पाणी घालून पातळ करायचं. चिंच कोळ घालायचा. वरून मोहरी जिरं हिंग हळद याची फोडणी करून घालायची.
याच्या फोडणीत कढीपत्ता नको; कारण ओव्याचा स्वाद प्रामुख्यानं हवा.

– जुई कुलकर्णी

(लेखिकेला पारंपरिक अन्नपदार्थांविषयी उत्सुकता आहे आणि पाककलेत रुची आहे.)

Previous Post

अमर प्रेम : पिक्चर फॉर क्लास नॉट फॉर मास

Next Post

भविष्यवाणी – १७ ते २४ जून २०२१

Next Post

भविष्यवाणी - १७ ते २४ जून २०२१

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.