काल साउथ अंबाझरी रोडवरून ड्राइव्ह करत साईटवर जात होतो. वाटेत दीक्षाभूमीसमोर चित्रकला महाविद्यालयाच्या बाजूला एक (सायकल) रिक्षेवाला रिक्षा बाजूला उभी करून रस्त्यावर दोन्ही हातांची ओंजळ करून भीक मागण्याच्या अविर्भावात उभा होता. आपल्याच विचारात असल्याने हे काहीतरी ‘अनयुज्वल’ दृश्य एवढंच मेंदूत रजिस्टर झालं, मग थोडे पुढे गेल्यावर या दृश्याचा अर्थ मनात उमगला. लगेच पुढच्या डिव्हायडरवरून यू-टर्न करून गाडी वळवली. परतीच्या काळात- ही भीक मागण्याची आता काही वेगळी स्टाइल दिसते, सध्या रिक्षा रिकाम्याच असतात, त्यातली एक घेऊन भीक मागण्याची पद्धत सुरू झाली असावी, असा ‘अँटी’ विचार मनात आला. पण भिकारीही असला तरी थोडी मदत करण्याने तुझं काय जातं, असं मी मनाला फटकारलं.
गाडी रिक्षाच्या मागे आल्यावर त्यावर नाव, पत्ता असं सगळं पाहून हा माणूस ‘जेन्यूइन’ आहे हे लक्षात येऊन मनात थोडा लाजलो. बाजूची काच उघडून त्याच्या हातात पैसे देऊन पुढे जावं असंच मनात होतं. पण ऐन वेळेवर याचा ‘एक्झॅक्टली प्रॉब्लेम’ काय आहे ते समजून घ्यावं, त्याच्याशी संवाद साधावा असं वाटून रिक्षाच्या थोडी समोर गाडी थांबवून उतरून त्याच्याकडे गेलो. खिशातून पाचशेची नोट काढून देत त्याला ‘तकलीफ क्या है तुमको?’ विचारलं.
त्याने सांगितलं, ‘४८ वर्षांपासून रिक्षा चालवतो आहे, कधी दारू, मटण यांना शिवलोही नाही. पण आज ही वेळ आली. घरी मुली, बायको उपाशी आहे. धंदा काहीच नाही, काय करू?’ मी हबकलो. ४८ वर्षं मेहनतीने, स्वाभिमानाने पोट भरलेल्या माणसाने दोन्ही हातांची ओंजळ करून रस्त्यावर असं उभं राहण्याचा हा निर्णय कसा घेतला असेल, तो क्षण कसा असेल ही कल्पनाच माझ्यासाठी असह्य होती. घरी उपाशी मुली आणि बायको; आजही रिकाम्या हातांनी घरी जाऊन त्यांचं उपाशी तोंड पाहणयची कल्पनाच असह्य झाल्याने स्वाभिमानाला ‘कॉम्प्रोमाईझ’ करून त्याने हा निर्णय घेतला असेल. असा प्रसंग आयुष्यात येण्यापेक्षा मृत्यू परवडला असे तेव्हा त्याच्या मनात एकदा तरी नक्कीच आलं असेल. पण मुलींचा चेहरा डोळ्यापुढे येऊन मृत्युने स्वतःची सुटका करून घेण्यापेक्षा दोन्ही हातांची अशी ओंजळ करून रस्त्यावर उभं राहणं त्याच्याकडून झालं असेल, हे माझ्या लक्षात आलं.
मला पुन्हा स्वत:ची लाज वाटली. पाकिटात पाच-पाचशेच्या नोटा खचाखच भरलेल्या असताना तू फक्त एकच नोट दिलीस? पाकिट काढून मी पुन्हा दुसरी नोट दिली. तिसर्या नोटेकडेही हात जात होता, पण मनात विचार आला, आता गरजेपेक्षा जास्ती पैसे देऊन याला इतर मोहात पाडायला नको. त्यापेक्षा याला आपला नंबर देऊ आणि काहीही मदत लागली तर फोन कर, असे सांगू. नंबर लिहून घ्यायला त्याच्याकडे काहीच नव्हतं. माझ्या खिशात पेन होता पण कागद नव्हता.
माझी गाडी रस्त्यात उभी, दार उघडं आणि रस्त्यामधे असा ‘सीन’ पाहून त्या रस्त्याने जाणारा आणखीन एक गाडी थांबवून बाजूला येऊन उभा राहिला होता. आमचं संभाषण ऐकून त्याने पण १०० रुपयाची नोट काढून त्या रिक्षेवाल्याला दिली. रस्त्याच्या त्याच बाजूला एक काळ्या काचांची गाडी एसी लावून निवांतपणे विसावत होती. तिची एक काळी काच खाली झाली आणि एक तरूण त्यातून डोकावू लागला. त्या दोघांनाही मी कागद आहे का विचारलं, दोघांजवळही तो नव्हता. काळ्या काचेच्या गाडीवाल्याने काही ‘पेपर नॅपकिन’ गाडीतून काढून माझ्या हातात दिले. पण त्यावर मला लिहिता येईना.
तेवढ्यात बाजूला येऊन गाडी थांबवलेल्या त्या माणसाने रिक्षेवाल्याला म्हटलं, ‘चप्पल क्यों नही है तुम्हारे पैर में? ये सामने सुभाष नगर चौक मे मेरी दुकान है, वहाँ पे आईये. मैं आपको चप्पल देता हूँ.’ या वाक्याने मला एकदम लहानपणी वणीच्या मे महिन्याच्या ऐन रखरखीत दुपारी घडलेला एक प्रसंग आठवला. माझे आजोबा एका वेड्याला पायातली चप्पल काढून देऊन तापलेल्या डांबरी रस्त्यावरून अनवाणी घरी परत आले होते. आई त्यांना रागावून म्हणाली होती, घरापर्यंत त्याला सोबत आणून मग चप्पल काढून का नाही दिली? अनवाणी पायांनी एवढ्या उन्हात चालत का आले? एवढी साधी गोष्ट आपल्या लक्षात कशी नाही आली म्हणून ओशाळलेला त्यांचा भाबडा चेहेरा डोळ्यासमोर आला. आजोबा आणि बाबांची तीव्र आठवण आली आणि गलबलल्यासारखं झालं. एका ‘रिफ्लेक्स रिएक्शन’ने मी लगेच पायातले जोडे काढून त्याला दिले आणि ‘ये पहन लो आप’ म्हटलं. तो ‘नको नको’ म्हणायला लागला. बाजूचे दोघं पण ‘आप फिर कैसे जाओगे’? म्हणू लागले. मी म्हणालो, ‘मेरे पास तो गाडी है, मुझे कोई प्रॉब्लेम नहीं.’ नंतर तो रिक्षेवाला ते शूज घ्यायला नको-नकोच म्हणत होता. तेव्हा मला अचानकच एकदम भडभडून रडूच आलं. ‘माझ्यावर उपकार कर आणि हे जोडे घे,’ असं हात जोडून त्याला म्हणत मीही रडू लागलो. बाजूचे दोघेही भांबावून गेले.
गेल्या दहा वर्षात मी अगदी जवळचे मित्र, बायको वा आप्तांजवळही कधी रडलो नसेन. बारा वर्षांपूर्वी बाबा गेले तेव्हा त्यानंतरच्या दोन-तीन वर्षात असा काहीदा रडलो असेन. आणि आज मी असा परक्यांसमोर, भर रस्त्यात रडत होतो. गेले महिनाभरापासून आजूबाजूला सतत अशीच परिस्थिती पाहिल्याने, तिचा सततचा ताण आल्याने आपलं मन आता थकलं आहे हे मला लक्षात आलं. मनात संवेदनशीलता असणं चांगलंच असतं पण त्याला असा हुळहुळेपणा येणे हे रोगाचं, त्याच्या अशक्त होण्याचचं लक्षण आहे. आपलं मन आतून आता कमजोर झालेलं आहे हे मला कळलं आणि मी लगेच मग सावध झालो. थोडं रिलॅक्सेशन, रिक्रिएशन घेऊन मनाला नर्चर, न्यूट्रियेट करणं आता आपल्याला भागच हे मला लक्षात आलं.
पण माझा असा स्फोट होण्याने तिथलं वातावरण आता एकदमच भावुक होऊन गेलं होतं. बाजूला येऊन गाडी थांबलेल्या त्या माणसांनी ‘हॉस्पिटलों पे हम लोग इतने पैसे उछाल रहे हैं, उससे अच्छा तो आप ले लो’ असं म्हणत पाकीट काढून त्यातली शोधत शेवटची २००ची नोटही त्या रिक्षेवाल्याच्या हातात ठेवली. ‘मेरी माँ अॅडमिट है, हॉस्पिटल में, अभी एक लाख रुपये वहा भरके आया. लूट रहे है वो साले’ असं तो मला सांगायला लागला. तोही खूप नेन्सिटिव्ह झाला होता. तो दुसरा तरूणही सेन्सिटिव्ह झाला. त्याच्या पायातली चप्पल काढून ‘ये आप ले लिजिए’ असं म्हणत रिक्षेवाल्याकडे सरकवली आणि माझ्या हातातली पेन घेऊन त्याच्या गाडीतल्या ‘टिश्यू पेपर’वर माझं नाव आणि नंबर लिहून तो त्या रिक्षेवाल्याला दिला. या सगळ्या ‘सीन’ने, काळ्या काचेच्या गाडीच्या इतर काचा खाली आल्या आणि आतल्या दोन मुली पण आमच्याकडे बघायला लागल्या.
त्या रिक्षेवाल्याने नंतर आम्हाला त्याचे सोललेले पाय दाखवले आणि ‘इसलिये चप्पल-जूते मैं पहन ही नहीं सकता’ असं समजावलं. त्याने मला पुन्हा भडभडून आलं. पण आता मी सावध होतो. त्यामुळे ते बाहेर पडलं नाही. मग त्या दोघांची ओळख करून घेणे, नंबरची देवाण-घेवाण इत्यादी करून मी परत कारमध्ये बसलो. नंतरच्या ड्राइव्हमध्ये मनात विचारांचा कल्लोळ होता. या एका माणसाच्या घरी आज अन्न शिजेल, पण आपल्या गावात अजून असे कितीतरी स्वाभिमानी कष्टकरी असतील, राज्यात त्यापेक्षा जास्त, आपल्या देशात तर कितीतरी जास्त- या विचारांनी मन खचवून टाकणारा विषाद मनभर पसरला. मागच्या वर्षीचं, याच वेळेचं ‘२०२० में २० लाख करोड’ हे पेंढा भरलेलं घोषणाबाज पॅकेज आठवून चीड आली. गेल्या वर्षभरात या रिक्षेवाल्या खंडारेसारख्या एरवी बुलंद असलेल्या अनेक कष्टकर्यांचे असे खंडहर ‘खंडारे’ झाले असतील याचा विषाद आणि मनीष गुप्ता, आतिश या तिथे भेटलेल्या दोघांसारखे लोकही समाजात आहेत, याचा मनाला आधार अशा संमिश्र भावनेत मग साईटवर पोहोचलो.