माहिती-तंत्रज्ञानाच्या खेळातील अनेक बुद्धिभेद करणारे घटक आणि राजकीय पक्षांचे घातक मानसिकता पोसणारे नेते आणि त्यांचे ट्रोल या सर्वांनी केवळ देशातील नव्हे तर जगातील लोकशाहीच्या मूल्यांना घट्ट असा विळखा घातला आहे. त्यातून ही लोकशाही बाहेर आणण्याचे मोठे आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे.
—-
आपली अनेक दृकश्राव्य माध्यमे आणि समाज माध्यमे ही गेल्या काही वर्षात, काही राजकीय पक्षांच्या केवळ प्रचारासाठी नाही; तर विरोधी विचारांच्या आणि विरोधी पक्षांच्या व्यक्तींवर, संस्थांवर विखारी टीका करण्यासाठी वापरली जात आहेत. ही विखारी टीका अधिक टोकदार करण्यासाठी या काही राजकीय पक्षांनी ट्रोल यंत्रणाही उभी केली आहे. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याप्रमाणे समाजमाध्यमातून या लोकांनी प्रचंड गैरसमज निर्माण करणे, इतिहासाची मोडतोड, फोटोशॉपमध्ये जाऊन फोटो मॉर्फिंग करून काही विचित्र आणि अनाकलनीय अशा विकृत समजुतींना जन्म देण्याचे काम सुरू केले आहे. यात प्रामुख्याने भारताची स्वातंत्र्य चळवळ, भारताचे पहिले पंतप्रधान, त्यांचे सारे कुटुंब, ज्या मूल्यांवर आधारित स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली, त्या मूल्यांची मोडतोड असे अनेक विकृत असे काम ट्रोल टोळीकडून सुरू आहे. ही टोळी भारताचे सहिष्णू आणि एकात्म समाजमानस कसे दुभंगेल असा जाणीवपूर्वक प्रयत्न करते आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात या सर्वांचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर आपली तरूण पिढी, विद्यार्थीवर्ग आणि सर्वसामान्य जनमानसावर होतो आहे.
कला, साहित्य, संस्कृती यांच्या विकासात जो समाज समाधान मानतो आणि स्वत:ला उन्नत करून घेतो; अशा समाजात भारतीय समाज नक्कीच आहे. या समाजातील कला-संस्कृतीच्या प्रेरणा खूप प्राचीन आहेत. गौरवशाली इतिहास त्यामागे आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीने भारत नावाच्या एका स्वतंत्र देशाची आणि सहिष्णू अशा लोकशाही राष्ट्राची निर्मिती केली; तोच का हा आपला देश, असा प्रश्न अनेकदा अशा काही घटना घडल्या की, केवळ माझ्याच नव्हे तर अनेक सुजाण नागरिकांच्या मनात निर्माण होत असणार!
भारताची संसदीय लोकशाही ही आता एका प्रमुख सत्ताधारी पक्षाच्या प्रभावाखाली आणि दडपणाखाली कारभार करते आहे. त्यामुळे दुसरा कोणताही विचार किंवा मतभेद याबाबतीत जी सहिष्णुता असायला हवी. या बाबतीत लोकशाहीतील जे नेते असतात त्या सर्वांनीच सहिष्णू वर्तणुकीचा वस्तुपाठ देणे गरजेचे असते.
राजकीय व्यंगचित्रांच्या संदर्भात हे एक उदाहरण पहा.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते होते. त्या काळातील एक राजकीय व्यंगचित्रकार केशव शंकर पिल्ले उर्फ शंकर यांचा लौकिक सुरू झाला होता. हिंदुस्तान टाइम्समध्ये त्यांची राजकीय व्यंगचित्रे प्रसिद्ध होत होती. पंडित नेहरूवरील त्यांची काही हजार व्यंगचित्रे प्रसिद्ध आहेत. भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक अशी शंकर यांची ओळख नोंदली गेली आहे. शंकर यांची व्यंगचित्रे बघून नेहरूंना नेहमीच आनंद व्हायचा आणि आणि जेव्हा जेव्हा त्यांची कधी भेट होत असे तेव्हा नेहरू या व्यंगचित्रकाराला सांगायचे, ‘शंकर डोंट स्पेयर मी!’ याचा अर्थ काय घ्यायचा? शंकर यांची व्यंगचित्रे नेहरूंना आवडायची आणि आणि त्याबाबत आपला संतोष ते त्यांना कळवायचे. भारताच्या लोकशाहीतील हा एक खूप चांगला असा भाग आहे की, तिच्यामध्ये लोकप्रियतेच्या आणि सत्तेच्या शिखरावर असलेले नेहरू स्वत:चे व्यंगचित्र देखील खुल्या मनाने स्वीकारू शकतात, त्याला दाद देऊ शकतात! नेहरूंनी हा एक वस्तुपाठ निर्माण करून ठेवला आहे.
शंकरचे नेहरुंबद्दल एक व्यंगचित्र मला खूप आवडले होते. या व्यंगचित्राच्या वरच्या बाजूला आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये नेहरूंची वाहवा सुरू आहे आणि खालच्या बाजूला काँग्रेस पक्षातील सावळा गोंधळ सुरू आहे, असे सूचित केले होते. इतका मोठा नेता असूनही शंकर यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराला ते सांगतात की, मलाही तू तुझ्या कुंचल्याच्या फटकार्यातून सोडू नकोस म्हणून! हे सहिष्णू वर्तन आपल्या लोकशाहीचे बळ आहे आणि ते आपण जर टिकवले नाही तर मग मात्र…
आज देशाच्या व राज्याच्या नेत्यांनी, नागरिकांना, समाजातील विविध वर्गांना समोर येऊन पुन्हा एकदा संयम सहिष्णुता वर्तनातून आणि कारभाराच्या शैलीतून एक वस्तुपाठ म्हणून समोर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजमाध्यमातील विखार कसा दूर करायचा हे तर एक मोठे आव्हान आपल्यासमोर ठरले आहे. कारण माहिती-तंत्रज्ञानाच्या खेळातील अनेक बुद्धिभेद करणारे घटक आणि राजकीय पक्षांचे घातक मानसिकता पोसणारे नेते आणि त्यांचे ट्रोल या सर्वांनी केवळ देशातील नव्हे तर जगातील लोकशाहीच्या मूल्यांना घट्ट असा विळखा घातला आहे. त्यातून ही लोकशाही बाहेर आणण्याचे मोठे आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे.
फाळणीच्या काळात एका प्रार्थनासभेत गांधीजी म्हणाले होते, ‘आय प्रे फॉर न्यू इंडिया.’ खरोखर पुन्हा एकदा नव्या भारतासाठी आपण प्रार्थना करण्यासाठी तरी एकत्र एकत्र येऊयात. भारत स्वतंत्र झाला तेव्हा याच कामासाठी नेहरू यांच्याकडे देशाची सूत्रे सोपवली होती. नेहरूंनी सतत हा नवा भारत निर्माण करण्याचा ध्यास घेतला होता… आजही त्यांनी निर्माण केलेल्या विविध संस्था आणि विज्ञान प्रयोगशाळा यांनी देशाला पुढे नेण्याचा ध्यास सोडलेला नाही… त्यामागे त्यांनी त्यांच्या वर्तनातून घालून दिलेल्या सहिष्णू उमदेपणाच्या परंपरेचा मोठा वाटा आहे.
– अरूण खोरे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)