राजगिरा हा पदार्थ आपण नेहमीच उपासाच्या दिवशी हमखास खातो. तसंच राजगिरा ही पालेभाजी म्हणूनही खाल्ली जाते. पण राजगिरा हे डायट इंडस्ट्रीत आता नवीन सुपरफूड म्हणून पुढे आलं आहे. राजगिरा अनेक रीतींनी गुणकारी आहे. राजगिरा आणि क्विनोआ एकाच फॅमिलीतले समजले जातात. राजगिर्याला ‘अमरांथ’ (Amaranth) म्हणतात. हा ग्रीक शब्द आहे. ज्याचा अर्थ आहे- infaded, म्हणजे कधीच न विटणारा. त्याअर्थी राजगिरा अमर आहे.
राजगिराला हिंदीत रामदाना म्हणतात. तसंच चौलाईही म्हणतात. उत्तर भारतातही उपासाचा पदार्थ म्हणून रामदाना धरला जातो.
राजगिरा अतिशय गुणी आहे. हा ताकद देणारा पदार्थ आहे. राजगिर्यात भरपूर कॅल्शियम असतं. हाडं मजबूत होण्यासाठी राजगिरा उपयोगी असतो. त्यात भरपूर प्रोटिन्स असतात, भरपूर फायबर असतं, आर्यन असतं. राजगिरा ग्लूटेन फ्री आहे. वजन कमी करण्यासाठी आणि हिमोग्लोबीनची कमतरता असणार्यांना राजगिरा वरदान आहे. राजगिर्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम असतं. तसंच व्हिटॅमिन-सी असतं. राजगिरा हे खरं तर धान्य नसून बिया आहेत. राजगिरा सहज आणि भरभरून उगवतो. राजगिर्यानं केस गळणं कमी होतं. राजगिर्यानं त्वचेचं आरोग्य सुधारतं. हाय ब्लडप्रेशर आणि हाय कॉलेस्ट्रॉलसाठी राजगिरा उपयोगी आहे. पण राजगिर्याचा ग्लायसेमिक इंडेक्स मात्र जास्त आहे. त्यामुळे डायबेटिक पेशन्ट याचा मर्यादित प्रमाणातच वापर करु शकतात किंवा सोबत एखादा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ घेऊन मिश्रण करून वापरू शकतात.
आपल्याकडे उपासाला जे पदार्थ चालतात ते बहुतांशी मूळचे परदेशी आहेत. राजगिराही मूळचा दक्षिण अमेरिकेतला असं समजलंय. राजगिरा भारतात आला आफ्रिकेतून. तो दक्षिण अमेरिकेतील अॅझ्टेक लोकांचा आवडता होता. त्यांच्या पूजाविधीतही त्याला मानाचं स्थान होतं. त्यामुळे नंतर आलेल्या स्पॅनिश राज्यकर्त्यांनी राजगिर्यावर बंदी घातली. राजगिरा अजूनही दक्षिण अमेरिकेतील ‘डे ऑफ दी डेड’ या पितरांच्या उत्सवात वापरला जातो. अमरांथ कुकीज केल्या जातात. राजगिर्यातले उत्तम गुणधर्म या प्राचीन खाद्यपदार्थाला इतकं महत्वाचं स्थान देतात हेच खरं; मग देश अथवा संस्कृती कुठलीही असो. भारतात तरी राजगिर्याचा संबंध उपवासाशी जोडलेला आहे. उपासाच्या दिवशी रामाचं नाव तोंडी यावं म्हणूनही कदाचित उपासाच्या या पदार्थाला रामदाना असं नाव दिलं गेलं असेल.
आता सुपरफूड म्हणून डायटच्या जगातही राजगिरा मानाच्या स्थानावर आहे.त्यामुळेच केवळ उपासला राजगिरा लाडू, वडी खाण्यापलीकडे त्याचे अजून काय उपयोग करता येतील ते बघूया. शहरात तरी राजगिर्याचं पीठ तयार मिळतं. पण तसं न मिळाल्यास किराणा दुकानातून राजगिरा आणून तो नीट धुवून (बरेचदा अशा राजगिर्यात माती असते), नीट सुकवून त्याचं मिक्सरमधून पीठ करता येतं. राजगिरा लाह्याही सहज मिळतात. राजगिरा बिया स्वरूपात तीनास एक या प्रमाणात (राजगिरा एक वाटी आणि पाणी तीन वाटी) पाण्यात शिजवून घेऊन, फ्रीजमधे स्टोअर करून वापरल्यास तो अनेक पदार्थात चटकन वापरता येईल.
राजगिरा पिठाचे उपासाचे फुलके
साहित्य : दोन वाट्या राजगिरा पीठ, चवीनुसार मीठ, पाऊण कप कोमट पाणी, तूप एक टीस्पून.
कृती : १) एका बाऊलमधे राजगिरा पीठ घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे.
२) कोमट पाणी हळुहळू मिसळून घेत राजगिरा पीठ मळून घ्यावे. एकदम पाणी घालू नये.
३) ग्लूटेन फ्री असले तरी राजगिरा पीठ चिकट असते. नीट मळून घेऊन तुपाचा हात लावून दहा मिनिटे ठेवावे.
४) कोरडे राजगिरा पीठ लावून फुलके लाटून मध्यम आचेवर भाजावेत.
या फुलक्यांसोबत उपासाची कुठलीही भाजी आणि भगर आमटी हा बेत उत्तम पोटभरीचा, पौष्टिक आणि तरीही पथ्यकर आहे.
राजगिरा पिठाचे पराठे
साहित्य : एक कप राजगिरा पीठ, एक वाटी लाल भोपळा किसून, एक टीस्पून हिरवी मिरचीचा ठेचा, मीठ, कोथिंबीर बारीक चिरून, जिरेपूड एक टीस्पून.
कृती : १) बाऊलमधे एक वाटी किसलेला लाल भोपळ्यात सगळे मसाले, मीठ, कोथिंबीर घालावी.
२) राजगिरा पीठ घालावे. पाणी लागेल तसे थोडे थोडे घालून पिठ मळून घ्यावे. एकदम पाणी घालू नये.
३) पराठे लाटून मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावेत.
भोपळ्याव्यतिरिक्त दुसरी कुठलीही भाजी तुम्ही वापरू शकता. भोपळ्यात असलेलं बिटा कॅरोटीन शरीराला आवश्यक असतं. भोपळ्यानं एक नैसर्गिक गोडूस चवही येते.
सॅलड बाऊल
साहित्य : १) दोन वाट्या शिजवून घेतलेले राजगिरा दाणे
२) एक मध्यम काकडी बारीक चिरलेली
३) एक टीस्पून आलं, मिरची, कोथिंबीरीचा पातळसर ठेचा
४) एक वाटी ताजं दही, जिरेपूड, लाल तिखट, मीठ, चिमूटभर साखर घालून फेटून घ्यावं.
५) एक टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे, एक टीस्पून चिरलेले अक्रोड, एक टीस्पून चिरलेले बदाम.
६) एक टेबलस्पून डाळिंबाचे दाणे, एक टेबलस्पून सफरचंदाच्या फोडी.
(उपलब्धतेनुसार कुठलीही फळं घेता येतील.पण सफरचंद आणि डाळिंब डायटसाठी उत्तम म्हणून ती घेतली आहेत.)
कृती : १) तीनास एक या प्रमाणात पाण्यात राजगिरा दाणे शिजवून थंड करून घ्यायचे.
२) एक मोठा सॅलड बाऊल घेऊन त्यात सगळ्यात खाली हा दोन वाट्या शिजलेला राजगिरा मुदीसारखा ठेवायचा.
३) बाजूने बारीक चिरलेली काकडी लावायचाr.
४) तिखट, मीठ, जिरेपूड साखर घातलेले फेटून घेतलेले दही वरून घालायचे.
५) वरून आलं, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा पातळसर ठेचा घालायचा.
६) सफरचंद फोडी आणि डाळिंबाचे दाणे घालायचे.
७) सगळ्यात वर भाजलेले शेंगदाणे, अक्रोड, बदाम घालून बाऊल सजवायचा.
हा सॅलड बाऊल पोटभर होतो. अनेक पौष्टिक पदार्थांनी हा सजलेला आहे. फळं आणि दही यामुळे छान चव येते. काकडीने फायबर मिळतं. शेंगदाणे, अक्रोड, बदाम यामुळे क्रंचीनेस येतो आणि प्रोटिन्सही वाढतात.
राजगिरा स्मूदी
साहित्य : अर्धी वाटी शिजवून घेऊन गार केलेला राजगिरा, दीड कप सोया मिल्क/नारळाचे दूध, एक टीस्पून बदाम चिरून, एक सफरचंद बारीक चिरून. बिया काढलेले दोन खजूर.
कृती : १) बदाम सोडून सर्व जिन्नस मिक्सरमधून फिरवून घ्यावेत. प्रिâजमधे ठेऊन मिश्रण गार करावं. पुरेसं गार झाल्यावर उभ्या ग्लासमधे घालून वरून बदामाने सजवून स्मूदी प्यावी.
२) खजुराने आणि सफरचंदाने या स्मूदीला नैसर्गिक गोडवा येतो.
३) नेहमीच्या गाईम्हशीच्या दुधापेक्षा इतर प्लान्ट बेस्ड मिल्क्स वापरणे डायटसाठी अधिक फायदेशीर समजले जाते.
(टीप : लेखिका आहारतज्ज्ञ नाहीत. लेखातील मते आंतरजालावरील माहितीवर व वैयक्तिक अनुभवांवर आधारित असून बहुतांश पाककृती पारंपरिक आहेत.)