सुखनिवास सोसायटीमधल्या पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यांमधून वारंवार काही ना काही वस्तू चोरीला जात असल्याच्या तक्रारी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवल्या जात होत्या. पहिल्या तक्रारीच्या वेळीच पोलिसांनी चौकशी सुरू केली होती, आजूबाजूच्या वस्तीत पाहणीही केली होती. संभाव्य चोरांच्या टोळ्यांकडे तपास करून माहिती काढायचा प्रयत्न केला होता, तरीही तक्रारी काही थांबल्या नव्हत्या. दर दोन ते तीन आठवड्यांनी एक तरी तक्रार यायची आणि पोलिसांचं काम वाढायचं. सुखनिवास ही उच्च मध्यमवर्गीय नागरिकांची, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली सोसायटी होती. राजकीय क्षेत्रातील काही व्यक्ती, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, अशा अनेक प्रकारच्या व्यक्तींची या सोसायटीत घरं असल्यामुळे पोलिसांवरही दबाव वाढत होता. सोसायटीत सीसीटीव्ही बसवून घेण्यासाठी पोलिसांनी आग्रह धरला होता, मात्र अजूनही सोसायटीतल्या अंतर्गत वादांमुळे ती कार्यवाही होत नव्हती.
“हे बघा, आत्ताच्या काळात आधुनिक यंत्रणांचाही पोलिसांना वापर करावा लागतो. तुम्ही पोलिसांना सहकार्य केलंत, तर आम्हालाही वेगाने तपास करता येईल. खरे चोर कोण आहेत, ते शोधायला मदत होईल,” इन्स्पेक्टर शानभागांनी सोसायटीच्या पदाधिकार्यांना आधी प्रेमानं, नंतर अधिकारवाणीनं सांगितलं. सुरुवातीला त्यांनी होकार दिला, पण सीसीटीव्हीचं काम एवढ्या लवकर तरी सुरू होईल, याबद्दल त्यांना स्वतःलाच खात्री नव्हती. दोन महिन्यांत पाचव्यांदा तक्रार दाखल झाली, तेव्हा मात्र शानभाग वैतागले.
“दामगुडे, यावेळी काय म्हणणं आहे सोसायटीतल्या माणसांचं? काय काय चोरीला गेलंय?” त्यांनी विचारलं.
“एक लॅपटॉप, दोन कार टेप, सीट कव्हर्स आणि गाडीतल्या काही सजावटीच्या वस्तू, परफ्यूम, अशा गोष्टी चोरीला गेल्यायत, साहेब. तीन चार गाड्यांमधून हा माल लंपास झालाय,” दामगुडेंनी माहिती दिली.
“ह्या माणसांनी अजून सीसीटीव्हीचं मनावर घेतलेलं नाही आणि पार्किंगमधल्या चोरीच्या तक्रारी करतायत. पोलिसांनी किती आणि कुठे कुठे लक्ष ठेवायचं?” शानभाग खरंतर वैतागले होते, पण चोरीची तक्रार दाखल करून घेणं आणि चोरांचा शोध लावणं, हे त्यांचं कामच होतं. त्यांनी यावेळी या तक्रारींची जरा जास्तच गांभीर्याने दखल घेतली.
“तुमचा कुणावर संशय आहे का? बाहेरून सोसायटीत येणारी माणसं, दूध पार्सल देणारे, पेपर विक्रेते, फेरीवाले, लाँड्री सेवा पुरवणारी माणसं, सोसायटीतल्या महिला कर्मचारी यांच्यापैकी कुणी?” त्यांनी तक्रार घेऊन आलेल्या सोसायटीतल्या रहिवाशांना विचारलं.
“नाही साहेब, तसा आमचा कुणावरच संशय नाही.”
“कुणाला इकडेतिकडे कारणाशिवाय फिरताना बघितलंय? कारपाशी, पार्किंगमध्ये रेंगाळताना बघितलंय?”
“नाही साहेब, तसं काहीच घडलेलं नाहा,” या उत्तरानंतर मात्र शानभाग आणखी चक्रावून गेले. रहिवाशांचा कुणावर संशय नाही, कुणाला काही संशयास्पद करताना कुणीही पाहिलेलं नाही, अशा परिस्थितीत चोरांचा माग काढणार कसा?
याच गोंधळात असताना सोसायटीतल्या राजेश मोहिते या रहिवाशाने थोडी अतिरिक्त माहिती पुरवली. त्याच्या मते, जवळच्याच झोपडपट्टीतली काही मुलं सोसायटीजवळच्या मोकळ्या जागेत खेळतात, कधी बॉल आत आला, तर भिंतीवरून उड्या टाकून आत येतात आणि काही वेळ इथेच असतात. कदाचित त्यांच्यापैकीच कुणीतरी चोर असावा किंवा ही एक टोळीच असावी, ते बॉलच्या निमित्ताने येऊन चोरी करून जात असावेत.
या गोष्टीत तथ्य होतं. शानभाग अनुभवी होते, वेगवेगळ्या प्रदेशांत अतिशय अवघड अशा गुन्ह्यांचा त्यांनी माग काढला होता. साधी साधी वाटणारी मुलंही किती सराईतपणे गुन्हे करू शकतात, याची त्यांना कल्पना होती.
“दामगुडे, जरा ह्या मुलांवर लक्ष ठेवा. ती कुठली आहेत, किती वयाची आहेत, कुठे राहतात, त्यांचे आईवडील काय करतात, दिवसभर काय उद्योग करतात, जरा बारकाईनं बघा. ही मुलं भिंतीवरून उड्या टाकून आत येऊ शकत असतील, तर वॉचमनला लक्ष ठेवायला सांगणं, भिंतीची उंची वाढवणं, या सूचना मी सोसायटीच्या माणसांना करतो,” शानभागांनी सांगितलं. दामगुडे कामाला लागले.
“ए पोरांनो, इकडं या!” सोसायटीच्या जवळच्या मैदानावर चक्कर मारून त्यांनी तिथे खेळणार्या मुलांना हाकारलं. मुलं थोडी घाबरत घाबरत त्यांच्यापाशी जमली.
“राहायला कुठं आहात तुम्ही?”
मुलांनी पलीकडच्या वस्तीकडे बोट दाखवलं. नाल्याच्या बाजूलाच वसवलेली झोपडपट्टी होती. रिकाम्या वेळेत ही मुलं मैदानावर खेळायला येत असणार. मग दामगुडेंनी एकेकाला नावं विचारली. त्यात काहीच अर्थ नव्हता, पण त्यांना थोडा धाक दाखवण्याची गरज होती.
“दिवसभर काय करता? ह्या सोसायटीत उड्या मारून जाता की नाही? आत गेल्यावर काय करता? तिथून माल कसा उडवता? काय करता त्या मालाचं पुढे?” त्यांनी एकामागोमाग एक प्रश्न विचारले. मुलं कावरीबावरी होऊन एकमेकांकडे बघायला लागली.
“साहेब, सोसायटीत आम्ही काय बी केलेलं नाही.” त्यातलं एक धीट पोरगं पुढे येऊन म्हणालं.
“काही केलेलं नाही? सोसायटीतल्या एका फ्लॅटमधूनं बराच माल चोरीला गेलाय. तुमच्यातला कुणी उचलला तो? व्ाâाय केलं त्याचं?” दामगुडेंनी पुन्हा दरडावून विचारलं. फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचं त्यांनी उगाचच सांगितलं होतं, त्या मुलांचा गोंधळ उडवण्यासाठी.
“आत जाऊन काय काय केलं, ते नीट सांगा, नाहीतर एकेकाला सोलून काढतो!” त्यांनी आवाज चढवल्यावर पोरं जरा टरकली.
“साहेब, कुठल्याच घरात शिरलेलो नाही आम्ही. आम्ही फक्त त्या कारपाशी…” एक पोरगं बोलता बोलता अचानक थांबलं. इतरांकडे घाबरून बघायला लागलं. दामगुडेंचे कान टवकारले.
“कारपाशी काय? काय केलं कारपाशी जाऊन? काच उघडून चोरी केली? काय उडवलं कारमधलं? आता सांगतोस, की….!”
“नाही साहेब, कारपाशी जाऊन ब्लेड मारलेलं फक्त.”
“काय?”
“होय साहेब. चरे पाडून ठेवलेले.”
“का?”
“त्या कारवाल्याला लई माज आहे साहेब. त्यानं एकदोनदा आमच्या अंगावर गाडी घालायला बघितली होती. कायम जोरात गाडी नेतो इथनं. चिखल उडवतो, धूळ उडवतो. म्हणून राग आलता त्याचा.” मुलानं सांगून टाकलं.
दामगुडेंना जरा विचित्रच वाटलं. सोसायटीतला कुणी रहिवासी इथून जोरात गाडी नेतो, त्याचा राग आला म्हणून या मुलांनी त्याची गाडी खराब करण्याचा प्रयत्न केला होता. याचा अर्थ त्याच्या किंवा कुणाच्याच गाडीत चोरी केली नव्हती. म्हणजे, निदान त्यांचं तरी असं म्हणणं होतं. सोसायटीतले रहिवासी मात्र याच मुलांवर संशय व्यक्त करत होते.
“साहेब, तो चौकातला टायरवाला आहे ना, त्याच्याकडचे टायर चोरून विकले होते आम्ही दोन वेळेला. तेवढं एक कबूल करतो,” त्यांच्यातला एक जरा मोठा वाटणारा मुलगा म्हणाला. दामगुडेंनी सगळ्यांचं ऐकून घेतलं. पुन्हा असे उद्योग केलेत, तर आत टाकीन, असा दम देऊन ते तिथून निघाले. त्यांनी लगेच साहेबांच्या कानावर ही सगळी माहिती घातली.
“हं… म्हणजे मुलं जास्त पोचलेली वाटत नाहीत!” सगळी हकीकत ऐकल्यावर शानभाग म्हणाले.
“असं समजू नका साहेब. एकदम विचारल्यामुळे जरा घाबरली असतील आणि कायतरी सांगायचं म्हणून त्या टायरबियरचं सांगत असतील. त्यांनी आणखी काही केलं नसेलच, असं सांगता येत नाही,“ दामगुडेंनी त्यांचा अनुभव सांगितला.
“ठीकेय, ती शक्यताही आहेच. जरा लक्ष ठेवा त्यांच्यावर. आणखी काही उद्योग करायला गेली, तर सापडतीलच.“ शानभागांनी सूचना केली.
पुढचे काही दिवस सोसायटीतून काही तक्रार आली नाही. दामगुडेंनी स्वतः या मुलांवर अधूनमधून लक्ष ठेवायचं काम केलं होतं. शिवाय एक दोन पोलिस वस्तीत जाऊनही चौकशी करून आले होते. त्यामुळे पोरांना सध्या वचक बसला होता. रोज त्या मैदानावर खेळायला येणं आणि आरडाओरडा करणंही कमी झालं होतं. सोसायटीत या मुलांचं येणंजाणं होतं, गाड्यांमधून महत्त्वाचा ऐवज लंपास झाला होता हेही खरं होतं, पण बाहेर खेळणार्या मुलांनीच ह्या चोर्या केल्या असाव्यात, असं सांगण्यासारखा ठोस पुरावाही पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
जेमतेम दोन आठवडे झाले असतील, तेवढ्यात पुन्हा सोसायटीतून एका कारमधून म्युझिक सिस्टिम चोरीला गेल्याची तक्रार आली. राजेश मोहितेने स्वतःच ही तक्रार दिली होती.
“त्या पोरांचंच काम आहे हे, साहेब. काल संध्याकाळी उशिरापर्यंत पोरं सोसायटीच्या भिंतीच्या बाहेरच दंगा करत होती. त्यांचा पतंग इकडे सोसायटीतल्या झाडाच्या फांदीला अडकला होता. मी स्वतः बघितलंय,“ त्यांनी सांगितलं. शानभागांनी यावेळी स्वतः चौकशी करायचं ठरवलं. `चोरांचा सुकाळ, पोलिसांची डोळेझाक,` `पोलिसांनी दिले चोरांना मोकळे रान` अशा पद्धतीच्या बातम्याही आल्या होत्या, त्यामुळे पोलिसांना तातडीने कारवाई करण्याची गरज होती. अनेक दिवसांचा हा चोरीचा विषय त्यांना यावेळी संपवून टाकायचा होता.
शानभागांनी चौकशीला सुरुवात केली आणि आदल्याच रात्री आणखी एका कारमधूनही काही वस्तू चोरीला गेल्याची माहिती मिळाली. कारचे मालक पोतदार हे परगावी कामासाठी गेले होते. तिथून आल्यावर सकाळी त्यांना हा प्रकार लक्षात आला होता. कारमधून वस्तू उचलणारा चोरटा सराईत होता. पट्टी, स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने कारची काच किंवा दार अलगद उघडून आतून वस्तू लंपास करण्याचं तंत्र त्याला अवगत होतं. हे करण्यासाठी जी चिकाटी आणि हातोटी लागते, तीसुद्धा त्याच्याकडे पुरेपूर असणार. यावेळी त्याचा बंदोबस्त केला नाही, तर पोलिसांची आणखी बदनामी होईल आणि त्याचेही फावेल, याची शानभागांना पूर्ण कल्पना होती.
मोहितेंनी माहिती दिल्यानुसार ती मुलं खरंच आदल्या दिवशी सोसायटीत आली होती का, हे बघणं महत्त्वाचं होतं. चौकशी केल्यावर कळलं की या माहितीत तथ्य होतं. अडकलेला पतंग काढण्यासाठी त्यांच्यातील दोनचार पोरं सोसायटीच्या भिंतीवरून नेहमीप्रमाणे उडी टाकून आत आली होती.
“तुमच्या सीसीटीव्हीचं काय झालं वानखेडे?“ शानभागांनी संतापून सोसायटीच्या सेक्रेटरीला विचारलं.
“ते मंजूर झालेत साहेब, पुढच्या महिन्यापर्यंत लागतील सगळीकडे,“ वानखेडेंनी सेक्रेटरी पदाला साजेसं उत्तर दिलं.
“अहो, तोपर्यंत सोसायटीत आणखी चोर्या होतील, त्याचं काय? आम्ही आता बाकीची कामं सोडून रोज सोसायटीत बंदोबस्ताला येऊ की काय?“ शानभागांचा पारा चढला होता.
“त्यापेक्षा त्या चोरट्या पोरांचा बंदोबस्त करा ना, साहेब! त्यांना आत टाका. उलटं टाकून फटके मारा. बरोबर कबूल करतील सगळं. पोरं आहेत म्हणून त्यांना सवलत देऊ नका!“ मोहितेही आता तावातावाने बोलत होते.
“ही काय सोसायटीतली पहिली चोरी नाही साहेब, आता तुम्हाला काहीतरी करावंच लागेल!“ त्यांनी पुन्हा सुनावलं.
“मला फक्त दोन दिवस द्या. चोरांचा कायमचा बंदोबस्त करतो.“ असं सांगून शानभाग तिथून निघाले. दोन दिवसांत त्यांनी चौकशीचा धडाका लावला. सोसायटीतल्या काही सदस्यांशी त्यांची ओळख झाली होती. त्या प्रत्येकाकडे कसून चौकशी केली. वॉचमनना बोलावून घेऊन त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आजूबाजूच्या भागात, वस्त्यांमध्ये जाऊन माहिती काढली आणि दोन दिवसांनी ते पुन्हा सुखनिवास सोसायटीत दाखल झाले.
“चोरांचा तपास लागलाय,“ त्यांनी जाहीर केलं आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं, आनंदही झाला.
“चोर बाहेरून आत येऊन चोरी करत होता, असंच सगळ्यांना, म्हणजे आम्हालाही वाटत होतं. पण चोर बाहेरचा नाही, आतलाच आहे. बाहेरच्या पोरांवर खापर फोडून स्वतःच तो सगळ्यांना गंडवत होता,“ एवढं बोलून शानभाग थांबले. एकदा सगळ्यांकडे नजर टाकून म्हणाले, “आता ह्या चोराला उलटं टांगून फटके मारायची वेळ आलेय. काय, बरोबर ना, मोहिते?“ त्यांनी मोहितेकडे रोखून पाहिलं आणि मोहिते जरा टरकल्यासारखा वाटला.
शानभागांनी सरळ पुढे येऊन त्याची कॉलर धरली.
“त्या पोरांचं नाव घेऊन तूच सगळ्या गाड्या फोडत होतास ना?“ त्यांनी दरडावून विचारल्यावर मोहितेची पुरती तंतरली. पस्तिशीतला मोहिते सोसायटीत एकटाच राहत होता. त्याचा धड असा कुठला व्यवसाय नव्हता. पैशांची गरज तर होतीच. सोसायटीत सीसीटीव्ही नाही, सिक्युरिटीही नीट नाही हे त्यानं हेरलं होतं. कधीकाळी तो मेकॅनिक म्हणून काम करताना त्याला गाड्या उघडण्याचं तंत्र अवगत झालं होतं. ते वावरून गाड्यांमधून वस्तू चोरायचं त्यानं ठरवलं. एकदा प्रयत्न यशस्वी झाला आणि मग त्यानं हा धडाकाच लावला. त्यातून सोसायटीत बाहेरच्या वस्तीतून येणारी मुलं त्यानं बघितली होती. त्यांच्यावर खापर फोडणं अगदीच सोपं होतं.
सुरुवातीला सगळं जमून गेलं, पण नंतर पोलिस सावध झाले आणि वॉचमनना विश्वासात घेऊन त्यांनी सोसायटीत सगळीकडे नीट नजर ठेवली. मोहिते कार पार्किंगमध्ये जास्त रेंगाळतो, हेही पोलिसांना कळलं होतं. समोरच्याच एका फ्लॅटमधल्या माणसाला गुपचूप शूटिंग करायला सांगून पोलिसांनी मोहितेला पुराव्यानिशी पकडलं.
“चला, आता उलटं टांगून धुरीसुद्धा द्यायची तयारी करूया. कसली धुरी द्यायची? हिरव्या मिरच्यांची की लाल?“ शानभागांनी मोहितेची गचांडी धरून त्याला गाडीत टाकताना विचारलं आणि त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला.