गेल्या पन्नास वर्षात शिवसेनेने दोन डझन महापौर मुंबापुरीला दिले. एप्रिल १९८२मध्ये भारतीय जनता पक्षाचे डॉ. प्रभाकर पै हे एकमेव महापौर झाले आहेत. त्यानंतर आजतागायत भाजपचा एकही महापौर झाला नाही. शिवसेनेबरोबरच्या युतीमुळे आणि मेहरबानीमुळे आठ ते दहा भाजपा नगरसेवकांना उपमहापौरपदाची लॉटरी लागली. हा इतिहास भाजपा सोयिस्करपणे विसरला आहे. आपल्याला हवा तसा खोटा इतिहास रचून तो खरा असण्याचा कांगावा करणे ही भाजपाची ख्याती आहे. गोबेल्स तंत्राचा वापर भाजपा खुबीने करतो. पण जनताही आता तेवढी दुधखुळी राहिली नाही.
– – –
‘जे आज सत्तेत आहेत तेच आज आणीबाणीचे, गुलामगिरीचे वातावरण निर्माण करीत आहेत. पण असे गुलामगिरीचे वातावरण तयार करणे म्हणजे हिंदुत्व नव्हे. आम्ही भाजपाला सोडलं, हिंदुत्वाला नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व असे म्हणत भाजपबरोबरच्या युतीत पंचवीस वर्षे सडली,’ याचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधताना नुकताच केला. त्यांनी आपल्या भाषणात भाजपच्या पोकळ हिंदुत्वावर घणाघात केला. त्यामुळे भाजपाचे नेते डिवचले गेले. त्यांनी थयथयाट सुरू केला. शिवसेनेवर खोटे-नाटे आरोप, खोटा इतिहास सांगण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींनी एकापाठोपाठ एक पत्रकार परिषदा घेतल्या, टीव्हीवर बाइटस् दिल्या. खोट्या आरोपांची, इतिहासाची मालिकाच सुरू केली. शिवसेनेच्या जन्माआधी मुंबईत भाजपाचे नगरसेवक निवडून आले. भाजपामुळे शिवसेना वाढली. भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्यामुळे तुम्ही निवडून आलात, आदी मुद्दे सांगून खोटेपणा रेटण्याचा प्रयत्न केला. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही भाजप नेत्यांची वृत्ती आणि संस्कृती महाराष्ट्रासमोर पुन्हा दिसली.
पण खरा इतिहास काय आहे?
भारतीय जनता पक्षाचा जन्म १९८० सालचा आहे तर शिवसेनेचा जन्म हा १९६६ सालचा. १९६८ साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत यश संपादन करून ४२ नगरसेवक पदार्पणातच निवडून आणले. दुसरे असे की, भाजपच्या जन्मापूर्वीच शिवसेनेचे आमदारही निवडून आले होते. १९७० साली झालेल्या परळ विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पहिला आमदार प्रिं. वामनराव महाडिक यांच्या रूपाने विरोधकांच्या चारीमुंड्या चीत करून निवडून आला होता. एवढेच नाही तर १९७२च्या विधानसभा निवडणुकीत तेव्हा मुंबईतील २८पैकी २४ जागा काँग्रेसने जिंकल्या. काँग्रेसच्या लाटेतही गिरगाव मतदारसंघातून शिवसेनेचे प्रमोद नवलकर निवडून आले होते. नवलकरांनी काँग्रेसच्या यमुनाबाई खाडिलकर (नवाकाळचे निळूभाऊ खाडिलकर यांच्या वहिनी) यांचा पराभव केला होता. तेव्हा कुठे होता भारतीय जनता पक्ष? मुंबई मनपा निवडणूक शिवसेनेने १९६८ साली प्रथम लढवली आणि १९७१ साली डॉ. हेमचंद्र गुप्ते हे शिवसेनेचे पहिले महापौर झाले. गेल्या पन्नास वर्षात शिवसेनेने दोन डझन महापौर मुंबापुरीला दिले. एप्रिल १९८२मध्ये भारतीय जनता पक्षाचे डॉ. प्रभाकर पै हे एकमेव महापौर झाले आहेत. त्यानंतर आजतागायत भाजपचा एकही महापौर झाला नाही. शिवसेनेबरोबरच्या युतीमुळे आणि मेहरबानीमुळे आठ ते दहा भाजपा नगरसेवकांना उपमहापौरपदाची लॉटरी लागली. हा इतिहास भाजपा सोयिस्करपणे विसरला आहे. आपल्याला हवा तसा खोटा इतिहास रचून तो खरा असण्याचा कांगावा करणे ही भाजपाची ख्याती आहे. गोबेल्स तंत्राचा वापर भाजपा खुबीने करतो. पण जनताही आता तेवढी दुधखुळी राहिली नाही.
भारतीय जनता पक्षाने शिवसेनेबरोबर युती करून १९९० साली जेव्हा निवडणूक लढवायला सुरुवात केली तेव्हापासून भाजपच्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. १९९० सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५२ आमदार तर भाजपाचे ४२ आमदार निवडून आले होते. शिवसेना नेते प्रिं. मनोहर जोशी हे विरोधी पक्षनेते होते. जनसंघाची शिवसेनेशी युती नव्हती, तेव्हा त्यांचे १९८० साली १४, तर १९८५ साली फक्त १६ आमदार निवडून आले होते. सेनेमुळे १९९० सालापासून भाजपच्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली. तरी शिवसेनेच्या आमदारांची संख्या भाजपच्या आमदारांपेक्षा जास्त होती हे भाजप विसरला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत असेही सांगितले की, १९८४ साली शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. हो! तेव्हा त्यांचा पराभव झाला. परंतु नंतर जेव्हा शिवसेनेच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा मनोहर जोशी विजयी झाले होते हे सत्य आहे.
युतीनंतर भाजपाची विधानसभा निवडणुकीतील कामगिरी
वर्ष शिवसेना भाजपा
१९९० ५२ ४२
१९९५ ७३ ६५
१९९९ ६९ ५६
२००४ ६२ ५४
२००९ ४४ ४६
शिवसेनेच्या युतीपूर्वी मुंबई महानगरपालिकेतील भाजपाची कामगिरी
वर्ष शिवसेना भाजपा
१९६८ ४२ ७
१९७३ ३९ १५
१९७८ २१ जनता पार्टी
१९८५ ७४ १३
शिवसेनेशी युती केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील भाजपाची कामगिरी
वर्ष शिवसेना भाजपा
१९९२ ७० १३
१९९७ ८२ २६
२००२ ९८ ३५
२००७ ७८ ३६
२०१२ ७५ ३१
१९६८ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे तब्बल ४२ नगरसेवक निवडून आले. प्रिं. मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, प्रिं. वामनराव महाडिक यांसारखी दिग्गज मंडळी नगरसेवक म्हणून प्रथम निवडून गेली. त्यावेळेस जनसंघाने शिवसेनेच्या प्रादेशिक अस्मितेवर घणाघाती टीका केली होती, संकुचित वृत्ती म्हणून खिल्ली उडवली होती. परंतु मुंबईच्या मराठी मतदारांवर त्याचा काहीही एक परिणाम झाला नाही. जनसंघाचे अवघे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यातील दोन तर मुलुंडमधून निवडून आले होते. मुलुंड पूर्वमधून अॅड. बाळ धारप तर मुलुंड पश्चिममधून करसनदास ठक्कर विजयी झाले होते. चेंबूरमधून हशू अडवाणी निवडून आले होते. तत्पूर्वी १९५७च्या मुंबई मनपा निवडणुकीत जनसंघाचे कोरडे व कानिटकर हे दोनच नगरसेवक निवडून आले होते. १९९०च्या दशकात शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे मुंबई मनपात भाजपाच्या नगरसेवकांची संख्या वाढू लागली तरी नगरसेवकांचा आकडा ३०च्या आसपासच राहिला. १९८५ सालापासून मुंबई मनपा निवडणूक निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर जाणवते की प्रत्येक निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकांपेक्षा तिप्पट नगरसेवकांची संख्या शिवसेनेची आहे. एक २०१७ची निवडणूक सोडली तर शिवसेना आणि भाजप नगरसेवकांच्या संख्येत बरेच अंतर आहे.
१९८५ साली शिवसेनेने खर्या अर्थाने मुंबई मनपा निवडणुकीत मुसंडी मारली. शिवसेनेचे ७४ तर भाजपाचे फक्त १३ नगरसेवक निवडून आले. शिवसेनेच्या महापौरपदी छगन भुजबळ विराजमान झाले. तेव्हापासून शिवसेनेने निवडणूक निकालाचा आलेख चढताच ठेवला. त्यानंतर तीन-चार अपवाद वगळता मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे. १९९२ साली शिवसेना ७० तर भाजपा १३ नगसेवक, १९९७ साली शिवसेना ८२ तर भाजपा २६. २००२ साली शिवसेना ९८ तर भाजपा ३५. २००७ साली शिवसेना ७८, भाजपा ३६, २०१२ साली शिवसेना ७५, तर भाजपा ३१ आणि २०१७ साली शिवसेना ८४ आणि भाजपा ८२ नगरसेवक निवडून आले होते. महानगरपालिकेच्या गेल्या ४० वर्षाच्या इतिहासात शिवसेनेचे २५च्या वर महापौर निवडून आले, तर भारतीय जनता पक्षाचा फक्त एक महापौर निवडून आला. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यांचे घोषवाक्य. पण या घोषवाक्याने कधीही जनसंघाला घवघवीत यश मिळवून दिले नाही. हिंदुत्वाच्या नावावर भाजपाने मते मागितली तरी सत्तेचा सोपान चढण्यासाठी ९०चे दशक उजाडले. कारण हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक जिंकता येते हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९८७ साली पार पाडलेल्या पार्ले विधानसभा पोटनिवडणुकीत जिंकून दाखवून दिले. त्यावेळेस शिवसेनेचा नारा होता, ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’. हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढवली तर ती जिंकता येते हे तेव्हा भाजपला पटले. मग भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेशी युती करण्याची गळ त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे घातली. तोपर्यंत त्यांनी शिवसेनेवर सतत संकुचितवादी, प्रादेशिकवादी, जातीयवादी पक्ष म्हणून टीका केली होती. महाराष्ट्रात शिवसेनेची उपयुक्तता पटली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘मातोश्री’वर भेटून शिवसेना-भाजपा युती झाली. कारण माननीय बाळासाहेबांना हिंदूंच्या मतांची विभागणी होऊ द्यायची नव्हती. त्यानंतर १९९० सालची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपाने एकत्रित लढवली, याचा निकालही चांगला लागला. महाराष्ट्राची सत्ता हाती आली नाही. परंतु शिवसेना-भाजपा युतीला ९४ जागा मिळाल्या. शिवसेनेचे ५२ तर भाजपचे ४२ आमदार निवडून आले. याआधी युतीपूर्वी भाजपा आमदारांची संख्या १५च्या आसपासच असायची. मग शिवसेनेबरोबर केलेल्या युतीमुळे त्यांच्या जागा वाढल्या. १९९५ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे १३८ आमदार निवडून आले आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकला. हे शिवसेनेमुळे शक्य झाले. कारण १९९५च्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उन्हा-तान्हाची पर्वा न करता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि शिवसेना-भाजपा युतीला घवघवीत यश मिळवून दिले. विजयश्री खेचून आणली हा खरा इतिहास आहे!
पीपल्स मेमरी इज शॉर्ट याचा गैरफायदा घेणार्या भाजपेयींना आता तरी खरा इतिहास कळला असेल!