आपल्या लोकसंख्येचा विचार करता पेपरलेस ऑफिस ही संकल्पना इतक्यात तरी भारतात रूजणे शक्य नाही. अजूनही कागदपत्रांची झेरॉक्स काढण्याची गरज संपलेली नाही. जेव्हा फॅक्स मशीन बाजारात आली, ईमेलने पत्रव्यवहार होऊ लागला तेव्हाही झेरॉक्स मशीनचा अंत आता जवळ आला आहे अशी आवई उठली होती. पण हा धंदा नवीन आव्हानांना सामोरं जात टिकून राहिला आहे आणि व्यवसायरूपी मशीनची नियमित सर्व्हिसिंग केली तर आमदनीची झेरॉक्स चांगलीच निघते.
– – –
पालघर तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेलं एक गाव शिरगाव, साल १९९०. केतन काशिनाथ मोरे हा विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परीक्षेत शाळेत पहिला आला, गावच्या पंचक्रोशीत त्याचे स्वागतसमारंभ झाले. केतनला कॉमर्स करून ‘एमबीए’ करायचं होतं. पण त्या काळात गावातील हुशार मुले डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवायला शहराकडे पाठवायची साथ सुरू होती. निम-शासकीय नोकरीतील वडिलांचं स्वप्नही मुलगा मोठा होऊन इंजिनिअर बनावा हेच होतं. मग केतन इच्छा नसतानाही सायन्सला गेला. बारावीत चांगले मार्क मिळाले. आता डिग्रीला अॅडमिशन घेऊ, असं ठरलं. परंतु, तेव्हा डिग्री कॉलेजची फी आवाक्यात नव्हती. शिवाय केतनला दोन लहान भाऊ होते, त्यांच्याही शिक्षणाचा खर्च होता, आईची तब्येत देखील नरम गरम असायची; मग खिसा तपासून वसईच्या वर्तक कॉलेजमध्ये ‘इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक‘ या विषयात डिप्लोमा इंजिनिअरिंगला अॅडमिशन घेतलं.
पालघर तालुका आदिवासीबहुल होता. इथे शिक्षणाच्या, नोकरीच्या संधी कमी, म्हणून शिक्षणासाठी मुंबईला जावं लागे. तिथे जायला सकाळी चार वाजता उठून सहाची मेल पकडणे हा इथला शिरस्ता. केतनचं रोज पहाटे चार वाजता उठून ट्रेनने वसईला जाणं सुरू झालं. कॉलेजहून परत येताना, पालघर स्टेशनला उतरल्यावर, एसटीने घरी जायला आईने दिलेले दोन रुपये खिशात शिल्लक असायचे. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने हे पैसे वाचविण्याची धडपड म्हणून पालघर ते शिरगाव असा सहा किलोमीटर पायी प्रवास अनेकदा केला जाई.
डिप्लोमा इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यावर लगेचच केतनला केबल कॉर्पोरेशन या कंपनीत इंटर्नशिप मिळाली. तिथे मन लावून काम केलं. साहेब खुश होते. सोबतच्या सहकार्यांनी तर तुलाच पर्मनंट करणार असं सांगून पार्टी मागायला सुरुवात केली होती. पण नोकरीत पर्मनंट करायची वेळ आली तेव्हा साहेबांचा मेहुणा आडवा आला आणि केतनच्या हक्काची नोकरी तो घेऊन गेला. आज मागे वळून पाहताना केतन म्हणतो, ही नोकरी मला तेव्हा मिळाली असती तर आज मी एक यशस्वी उद्योजक म्हणून तुमच्यासमोर आलो नसतो.
नोकरी हातातून गेली या कारणाने निराश झालो. लायब्ररीत बसून वर्तमानपत्रात नोकरीच्या जाहिराती धुंडाळत असताना, एका रविवारी ‘मिड डे’ वर्तमानपत्रात ‘मोदी झेरॉक्स’ या कंपनीला इंजिनिअर हवे आहेत अशी जाहिरात दिसली. लगेच अर्ज खरडला. कंपनी डिस्ट्रिब्यूटरच्या बोरिवली ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू होता. योगायोगाने तिथे कंपनीचे दोन अधिकारी उपस्थित होते. इंजिनिअरपदासाठी असणारे प्रश्न विचारून झाल्यावर या अधिकार्यांनी सहजच काही जनरल नॉलेज आणि मार्केटिंगबद्दल माहिती विचारली. केतनचा अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकांचा व्यासंग दांडगा होता. त्यामुळे प्रश्नकर्त्यांच्या प्रश्नांना त्याने अपेक्षेपेक्षा चांगली उत्तरे दिली. केतनच्या या स्मार्टनेसवर खुश होऊन कंपनीच्या अधिकार्यांनी लगेच केतनला एक अनोखी ऑफर दिली. ते म्हणाले, ‘केतन, तुझी सर्व्हिस इंजिनिअर ही नोकरी तर पक्की आहे, पण आम्ही तुझी निवड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून करत आहोत. कारण आमच्या मते तुझ्यात जुन्या मशीन दुरुस्त करण्यापेक्षा नवीन मशीन विकण्याचे स्किल जास्त चांगले आहे. तू सहा महिने सेल्समध्ये काम करून पाहा आणि हे काम नाहीच जमलं तर तुझ्यासाठी सर्व्हिस डिपार्टमेंटचे दरवाजे उघडे आहेतच.’ यावर केतनने मागचा पुढचा विचार न करता समोर दिसत असलेल्या संधीला हो म्हटलं. त्याला असं वाटत होतं की हा दिवस आयुष्याला कलाटणी देणारा आहे. परंतु, घरी आल्यावर ही बातमी केतनने वडिलांच्या कानावर घातल्यावर त्यांचा पारा चढला. ‘इंजिनिअरिंग केल्यावर तू आता दारोदारी हिंडून झेरॉक्स मशीनी विकणार का? मला तुझा हा निर्णय बिलकुल पसंत नाही,’ या शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्या मराठमोळ्या कुटुंबात नोकरी करताना देखील मुलाला मार्केटिंगचा जॉब नको, असे पालकांचे विचार असतील तर अशा घरात व्यावसायिक गुण रुजणार तरी कसे? पण केतनला माहीत होतं की वडिलांना त्याच्या भविष्याची चिंता वाटत होती म्हणून ते रागावले आहेत. त्यामुळे वडिलांशी अधिक वाद न घालता त्याने मिळालेल्या संधीचं सोनं करायचं ठरवलं.
ऑफिसचा पहिला दिवस. नवीन लागलेल्या कर्मचार्याला कंपनीचे प्रॉडक्ट नॉलेज, ग्राहकांशी काय व कसं बोलावं याबद्दल माहिती दिली जाते. तशी ती केतनला दिली गेली. एक सेल्समन त्याला ऑन साइट मार्केटिंग कॉल कसे करायचे हे दाखवायला बाहेर घेऊन गेला. पण तोंडावर गोड बोलणारा हा सेल्समन नवीन आलेला माणूस आपल्याला डोईजड होईल की काय, याची भीती बाळगून होता. त्यामुळे तो केतनला ट्रेनिंग देताना चांगले हितसंबंध असलेल्या एका ग्राहकाकडे घेऊन गेला. तिथे स्वागत होतंय, ऑर्डर घ्यायला गेल्यावर ग्राहक चहापाणी देतात, हे पाहून नुकताच नोकरीच्या बोहल्यावर चढलेला केतन खुश झाला. मनातून म्हणत होता, ‘इतकं सोपं असतं होय हे मार्केटिंगचे काम, मी उगीचच टेन्शन घेत होतो’.
ट्रेनिंग पूर्ण झालं. कंपनीनं त्याला मार्केटिंगसाठी पालघर हा एरिया दिला. नोकरीचा पहिला दिवस- स्थळ : तारापूर एमआयडीसी. हातातील बॅगेत मोदी झेरॉक्स मशीनची माहितीपत्रके घेऊन केतन एका नामांकित कंपनीच्या गेटवर पोहचला. तिथल्या वॉचमनने ‘तुम्हारे जैसे बहोत आते हैं, अभी एन्ट्री नहीं मिलेगा’ हे ऐकवून केतनला तुच्छतेने उडवून लावलं. तेव्हा ‘बरं बाबा’, असं म्हणून केतन दुसर्या ऑफिसकडे वळला. एकेक करत त्या दिवशी केतनने इतर कंपन्यांचेही उंबरठे झिजवले, पण हाती निराशाच आली. हा अपयशाचा सिलसिला अनेक दिवस सुरू होता.
ही निराशेची गाठ कशी सुटली, हे सांगताना केतन म्हणाला, कोणताही रेफरन्स न घेता एखादा सेल्समन नवीन कंपनीत वस्तू विकायला जातो, त्याला मार्केटिंगच्या भाषेत ‘कोल्ड कॉल’ असं म्हणतात. अशा ठिकाणी तुमची भविष्यातील घोडदौड रोखायला तेथील वॉचमन, प्यून, क्लार्क ही मंडळी तयारच असतात. ‘चहापेक्षा किटली गरम’ याचा प्रत्यय पदोपदी इथे मिळतो. सेल्समनला डोक्यावर बर्फ ठेवून, अपमान गिळून योग्य माणसापर्यंत पोहचावे लागतं, तेव्हा कुठे खर्या कामाला सुरुवात होते. कोणत्याही कंपनीत ऑर्डर मिळविण्यासाठी किमान नऊ वेळा नकार पचवण्याची माझी क्षमता आहे. या बाबतीत माझा नऊ नंबर लकी आहे, असं म्हणालात तरी हरकत नाही. अनेक दिवस खेटे घातल्यावर एका कंपनीच्या दारातून आत प्रवेश मिळाला. तेथील साहेबांना मी मोदी झेरॉक्सबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, खरं तर आम्हाला तीन नवीन मशीन घ्यायच्या आहेत. पण आमच्याकडे पूर्वीपासून एका कंपनीची सर्व्हिस सुरू आहे. त्यामुळे तुला मी आता ऑर्डर देऊ शकणार नाही. तू तुझा फोन नंबर देऊन जा. काही काम निघालं तर आम्ही कळवतो. (आमच्या क्षेत्रात वाटाण्याच्या अक्षता अशाच लावल्या जातात). मी ठीक आहे असं बोलून निघणार इतक्यात, त्यांच्या डिपार्टमेंटमधील एक माणूस केबिनमध्ये येऊन म्हणाला, ‘साहेब, आपल्या झेरॉक्स मशीन चार दिवस बंद आहेत. मी त्यांना दहा वेळा फोन करून झालंय’, हे ऐकताच मी म्हणालो, ‘सर, मी एक सेल्समन कम इंजिनिअर आहे. मी पाहू का? मशीनला काय झालंय ते?’ ते क्षणभर विचार करून ‘हो’ म्हणाले. माझ्या बॅगेत नेहमीच स्क्रू-ड्रायव्हरचा एक सेट असतो. तोच इथे कामी आला. अर्ध्या तासात मशिनची सर्व्हिसिंग करून त्यांना मशीन सुरू करुन दिली. हे पाहून साहेब खुश झाले. ते मला रिपेरिंगचे पैसे देऊ करत होते. पण छोट्या फायद्यासाठी कधीही मोठा फायदा मिळण्याची संधी हुकवू नये असं मी मानतो. मी त्यांना म्हणालो ‘साहेब, मी राहायला पालघरमध्येच आहे. आमची मशीन विकत घेतली तर तुम्हाला २४ तास उपलब्ध असलेला एक सर्व्हिस इंजिनिअर पॅकेजमध्ये मिळेल’. यावर साहेब हसून म्हणाले, ‘ठीक आहे केतन मी यावर विचार करतो.’
यशाला कोणताही शॉर्टकट नसतो असं म्हणतात. त्या दिवशी घेतलेली माझी मेहनत फळाला आली आणि पुढील दोन दिवसांत त्या कंपनीच्या तीन मशीनची ऑर्डर माझ्या खिशात होती. त्या दिवशी मला पटलं, कोणतंही शिक्षण वाया जात नाही. योग्य जागी, योग्य वेळेवर त्याचा वापर करून जीवनात यशस्वी होता येतं. पहिली पर्चेस ऑर्डर खिशात आल्यावर त्याची एक कलर फोटो कॉपी काढून ठेवली. नंतर सर्व ग्राहकांना ती दाखवून, मी पालघरवासी इंजिनिअर आहे, ही कॅसेट ऐकवीत फिरत होतो. सुरुवातीच्या दिवसात पाठीवर बॅग टाकून ऑर्डर मिळविण्यासाठी उन्हातान्हात फिरताना, लोकांचा नकार पचवताना, ‘लाज’ हा विषय ऑप्शनला पडला होता. लवकर मोठ्या ऑर्डर मिळाव्यात यासाठी मार्केटिंग कसं करावं याची चार पाच पुस्तकं वाचून काढली. पण प्रत्यक्षातल्या अनुभवाने मार्केटिंग कसं करावं यापेक्षा कसं करू नये हे शिकत गेलो. हळूहळू आपले ग्राहक नक्की कोण आहेत याचा अंदाज येत गेला. कामातून काम मिळत गेलं, गधामजुरी थोडी कमी झाली. अथक परिश्रमाने नोकरीच्या दुसर्याच महिन्यात मी मशीनचा रेकॉर्डब्रेक सेल केला. मला त्यावेळी पगार होता फक्त अडीच हजार रुपये. पण माझ्या चार महिन्यांत केलेल्या विक्रीचं कमिशन होतं सोळा हजार रुपये.
आजवर घरच्यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या आहेत, आता आपल्याला संधी मिळतेय तर घरासाठी काय घेता येईल हा विचार कमिशन हातात पडल्यावर मनात होता. १८ जानेवारी १९९८. वार रविवार. इंडिपेन्डन्स कप क्रिकेट मॅच. फायनलला भारत-पाकिस्तान भिडणार होते. पण घरातील टीव्ही बंद असल्याने लहान भाऊ व वडील यांची सकाळपासून चिडचड सुरू होती. मी गुपचूप घरातून बाहेर पडलो आणि दुकानातून कलर टीव्ही विकत घेऊन आलो. टीव्ही पाहून बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, ‘मी आयुष्यभर ‘ब्लॅक अँड व्हाइट स्वप्नं’ पाहिली. पण तुझी स्वप्ने ‘रंगीत’ आहेत. भरपूर मेहनत कर, मोठा हो.’ त्या दिवशी भारताने ३१५ धावांचा विश्वविक्रमी पाठलाग करत कप जिंकला आणि त्याच दिवशी मीही ठरवलं की आता यापुढे आपण मशीन दुरुस्त करून हात काळे करायचे नाहीत, तर आपल्या हाताखाली इंजिनिअर कामाला ठेवायचे.
आई-वडिलांच्या आशीर्वादाने मार्केटमध्ये माझे नाणं खणखणीत वाजू लागलं. जिंदाल कंपनीतील जनरल मॅनेजर गुलाटी साहेब, करमतरा इंजिनिअरिंगचे डायरेक्टर तन्वीर सिंग, सीरॉन फार्माचे समिर शाह, यासारख्या अधिकारी व मालकांनी माझी मेहनत आणि काम पाहून माझ्यावर विश्वास टाकला. चोख काम आणि तोंडात साखर असेल तर मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात बाजी मारू शकतो हे मी माझ्या अनुभवातून सांगतो.
मी तेव्हा मार्केटिंग कसं करायचो, तर कोणत्याही नवीन कंपनीत गेल्यावर मी तेथील साहेबांना फोन करून सांगायचो, मी तुम्हाला काही विकायला आलो नाही, तुमचे पैसे कसे वाचतील याचं सोल्युशन घेऊन आलो आहे. भले तुम्ही माझं प्रॉडक्ट घेऊ नका, फक्त मला दोन मिनिटाची भेट द्या. हे ऐकून समोरचा माणूस आत बोलावायचा. तुम्ही बाहेर झेरॉक्स काढून आणता किंवा ऑफिस प्रिंटर वापरता तेव्हा जी रक्कम खर्च होते, त्यात पंचवीस टक्के बचत तुम्ही आमची मशीन विकत घेतली तर होईल, हे सांगायचो. तेही हो ला हो म्हणायचे. विचार करून सांगतो, असं म्हणायचे. मग मी माझं ठेवणीतील मार्केटिंग अस्त्र बाहेर काढायचो. शहरापासून दूर असलेल्या पालघर भागात आफ्टर सेल्स सर्व्हिस हा मोठा प्रश्न होता. त्याचं सोल्युशन माझ्या रूपाने मिळाल्यावर ऑर्डर मिळायची. मोदी झेरॉक्स कंपनीने पालघर परिसरात इतक्या वर्षात फक्त दहा ते बारा मशीन विकल्या होत्या, तर मी अवघ्या दोन वर्षांत ६५ मशीन विकल्या.
नोकरीत सुरुवातीला अडीच हजार, सहा महिन्यांत चार हजार तर दुसर्या वर्षी आठ हजार अशी भरघोस पगारवाढ होत असताना केतनला मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं वाटत होतं. केतन म्हणतो, ‘मला वाटायचं, नोकरी ही सोन्याची बेडी आहे. मला या कंफर्ट झोनची सवय झाली की मग उद्योजक बनायचे बळ माझ्या बाहूत शिल्लक राहील, याची खात्री देता येत नाही. म्हणून मग मालकाला सांगून मी आधीची नोकरी सोडली, तेव्हा हातात ३० हजार रुपये शिल्लक होते. हाताखाली कमिशन बोलीवर एक इंजिनिअर ठेवला. चारच दिवसांत पहिली ऑर्डर मिळाली, एका दुकानदाराला मशीन हवी होती, पण त्याच्याकडे मला द्यायला पूर्ण पैसे नव्हते. मी त्याला एक ऑफर दिली, पैसे पूर्ण होईपर्यंत तू मला दर महिन्याला सहा हजार रुपये दे. धंदा लगेच चालेल की नाही हे माहीत नव्हतं, तेव्हा घरात काही रक्कम खर्चाला देता येईल यासाठी माझा हा बॅकअप प्लॅन होता.
झेरॉक्स मशीन स्पेअर पार्टचं होलसेल मार्केट फोर्ट येथील मोदी स्ट्रीटवर आहे. एकदा एका दुकानातून मशीनचे ड्रम, टोनर, इत्यादी सामान घेताना बिल झालं तीन हजार रुपये आणि केतनकडे दीडशे रुपये कमी पडत होते. तेव्हा दुकानदाराने ‘तुम्ही मराठी लोक, पैसे नाहीत तर कशाला धंदा करता रे’ असं म्हणून सामान द्यायला नकार दिला. यावर केतन त्याला म्हणाला, ‘ठेव तुझा माल तुझ्याचकडे, दीडशे रुपयांसाठी माझा अपमान करतोस काय? एक दिवस याच मार्केटमध्ये मी दोन लाख रुपयांची मालाची क्रेडिट घेऊन दाखवेन, तरच मराठी माणूस हे नाव लावेन.’ असे अनेक अनुभव गाठीशी घेत जुन्या मशीन विकणे, त्यांची सर्व्हिसिंग करणे ही कामं केतन करीत होता. नोकरी सोडून चार वर्षं उलटली तरी अजूनही धंद्यात बस्तान काही बसत नव्हतं. या काळात झेरॉक्सच्या अनेक कंपन्यांना भेटी देऊन, मला एजन्सी द्या अशी विनंती तो करायचा. पण त्याच्यापाशी गोडाऊन नाही, ऑफिस नाही, मशीनचा स्टॉक करायला भांडवल नाही या कारणाने नकार मिळायचा आणि दुसरं एक कारण म्हणजे या व्यवसायात एका ठराविक गटाची स्ट्राँग लॉबी आहे. ते सहजासहजी नवीन माणसाला या धंद्यात घुसू देत नाहीत. अनेक वर्षं स्ट्रगल केल्यावर शेवटी २००३ साली शार्प कंपनीने एक ऑफर दिली. केतन म्हणाला, कंपनीनं मला एक वर्ष एका नामांकित डीलरसोबत सब डीलर म्हणून काम करायला सांगितलं, त्यानंतर तुला डीलरशिप देतो असं आश्वासन दिलं. काहीतरी करून दाखवायची संधी मिळाली होती. भरपूर मेहनत घेऊन मी एका वर्षात शार्पच्या रेकॉर्डब्रेक मशीन विकल्या, कंपनीनं त्याबद्दल माझं कौतुकदेखील केलं; पण मिटिंगमध्ये मला डीलरशिप मिळण्याचा विषय आला तेव्हा कंपनीचे अधिकारी ‘अजून तू या धंद्यात नवीन आहेस, अगले साल देखते हैं‘ असं म्हणाले. अशीच तीन वर्ष उलटून गेली, अधिकारी बदलले, ते मला देत असलेली कारण बदलली, पण मी मात्र सब डीलरच राहिलो. या गोष्टीचा खूप त्रास होत असे. धंदा आणणार मी पण कमिशन मात्र दुसर्या माणसाला. आता ठरवलं बास झालं, हे आता चालणार नाही. पुढील वार्षिक मिटिंगला मी त्यांना सरळ सांगितलं, ‘मला दोन दिवसांत तुमची एजन्सी दिली नाहीत तर मी दुसर्या कंपनीची डीलरशिप घेतोय. माझे सगळे ग्राहक मी तिथे घेऊन जाईन.’ त्या दोन दिवसांत कंपनीत सूत्र हलली आणि मला डीलरशिप मिळाली. त्यावेळी शार्प कंपनीचा मी भारतातील सर्वात कमी वयाचा डीलर होतो. साल होतं २००७. हे झालं व्यावसायिक यश…
माझ्या आयुष्यात २००४ साली मेहनतीच्या बाबतीत माझीच झेरॉक्स कॉपी असलेली दीपाली पत्नी बनून घरात आली. वाढणार्या कामाच्या व्यापामुळे स्वतःकडे व संसाराकडे लक्ष द्यायला जराही फुरसत नव्हती. एक दिवस अचानक छातीत दुखू लागलं, अॅसिडिटी असेल म्हणून आधी दुर्लक्ष केलं, पण त्रास वाढू लागला. न्युमोनिया वाढला असून तो जीवघेणा ठरू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं. घरात रडारड सुरू झाली, पण दीपालीने सगळ्यांना धीर दिला आणि दुसर्या दिवसापासून ऑफिसची सर्व जबाबदारी तिने शिरावर घेतली.
हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो तेव्हा अनेक वर्ष सुरू असलेल्या धावपळीला ब्रेक लागला. औषध घेणे व आराम करणे हेच माझे सोबती होते. माझा व्यवसाय करण्याचा निर्णय बाबांना रुचला नव्हता हे तेव्हा आठवलं, ते म्हणाले होते, ‘धंदा करशील तो प्रामाणिकपणे कर, कोणालाही फसवू नकोस. त्यांचे हे बोल आणि आईचं संसारातील व्यवहारज्ञान हेच माझ्या आजवर मिळालेल्या यशाचं गमक आहे. माझ्या शेजारच्या बेडवर संधिवाताने आजारी असलेला एक रुग्ण होता. त्याच्याकडे पाहताना झेरॉक्स मशीनच्या जनकाची आठवण झाली, एखाद्या माणसाचा संधिवाताचा आजार पुढे जाऊन जगभरील अब्जावधी लोकांचे लिहिण्याचे कष्ट वाचवू शकतो, असं सांगितलं तर खरं वाटणार नाही. पण हा आजार असलेल्या चेस्टर कार्लसन या अमेरिकन माणसाला सरकारी कार्यालयात रोज दस्तऐवजाच्या प्रती हातानं लिहून काढाव्या लागत असत. यावर उपाय म्हणून त्याने १९३८च्या सुमारास, प्रकाशाचा वापर करून, प्रती तयार करण्याचे नवीन तंत्र स्वयंपाकघरात प्रयोग करून विकसित केले. १९४७मध्ये हॅलोईड कॉर्पोरेशन कंपनीने या तंत्राला झेरोग्राफी हे नाव देऊन (ग्रीक भाषेत- ड्राय रायटिंग) व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन केले. तसेच या फोटोकॉपी काढणार्या यंत्रांना त्यांनी ‘झेरॉक्स मशीन’ असे नाव दिले. या मशीनचा शोध लागण्यापूर्वी दस्तऐवजाची नक्कल करण्यासाठी कोर्या कागदाखाली कार्बन पेपर ठेऊन त्यावर हाताने लिहावे लागत असे आणि एका वेळेस फक्त दोन ते तीन प्रती तयार करता येत असत. झेरॉक्स मशीनमुळे कमी वेळेत आणि किफायतशीर दरात कोणत्याही कागदपत्रांची प्रत तयार करणे सोपे झाले. शाळा-कॉलेजमधील मुलांना अभ्यासाच्या नोट्स सहज उपलब्ध होऊ लागल्या.
तुम्हाला आठवत असेल, नव्वदच्या दशकात एका झेरॉक्स कॉपीला पन्नास पैसे हा दर असे, पण काही दुकानांबाहेर ‘प्रतिकॉपी तीस पैसे’ असा बोर्ड असे. या स्वस्ताईचे कारण ते दुकानदार झेरॉक्सच्या शाईमध्ये रॉकेल मिक्स करायचे हे होतं. म्हणूनच तिथे छापलेल्या कॉपीजना रॉकेलचा ऊग्र दर्प यायचा. आज नवीन टेक्नॉलॉजीमुळे तो प्रकार संपूर्णपणे बंद झाला आहे.
तब्येतीला आराम पडला आणि मी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. सुरुवातीला फोर्ट विभागात एक टेबलस्पेसचं ऑफिस घेतलं होतं. पण, हे ऑफिस तिसर्या माळ्यावर होतं. पैशाची बचत करावी म्हणून झेरॉक्स मशीन स्टाफच्या सोबतीने मी खालून वर घेऊन जायचो. आजारपणानंतर तीन माळे चढउतार आणि चर्चगेट ते पालघर या प्रवासाची दगदग वाटू लागली. मग बोरिवलीत एक ऑफिस भाड्याने घेतलं. २००७साली डीलरशिप मिळाल्यावर काम अजून जोमाने सुरू केलं. त्या वर्षात पावणे दोन कोटी रुपयांचा व्यवसाय केला. दर वर्षी सर्वोत्तम व्यवसाय करणार्या काही डीलर्सना परदेशात घेऊन जाण्याची कंपनीची एक स्कीम आहे. त्याच स्कीमअंतर्गत ऑक्टोबर २००९ साली आम्ही नवराबायको स्वित्झर्लंडमध्ये कंपनीच्या खर्चाने ‘सेकंड हनिमून‘ साजरा करत होतो. यानंतर दर वर्षी सेल्समध्ये अव्वल स्थान पटकावून परदेश दौरा जिंकत गेलो. जपान, ग्रीस, चीन असे आजवर २२ देश पादाक्रांत केले आहेत. या धंद्यात पैसे किती मिळाले यापेक्षा अवघं जग फिरायला मिळालं याचं समाधान मला जास्त आहे.
शार्प कंपनीसोबत काम सुरू असताना, २०१३ साली प्रिंटिंग व्यवसायातील जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या ‘कोनिका मिनोल्टा’ या कंपनीने स्वतःहून मला डीलरशिप देऊ केली. तेव्हा भाड्याचं ऑफिस सोडून बोरिवली येथे स्वतःचं ऑफिस घेतलं. मोदी स्ट्रीटवरील झेरॉक्स मशीन सामानाचे होलसेल दुकानदार आता स्वतःहून फोन करून कितीही रुपयांचा माल उधारीवर द्यायला तयार असतात. चांगली सर्व्हिस हा माझा यूएसपी आहे. दिवसातून किमान दोन वेळा मी ग्राहकांच्या तक्रारींचा आढावा आमच्या सर्व्हिस इंजिनिअरकडून घेत असतो. फक्त गोड गोड बोलून मशीन विकण्यापेक्षा माझा भर ग्राहकाला मशीन विकल्यावर चांगली सर्व्हिस देण्यावर असतो, याचमुळे कितीही कॉम्पिटिशन आली तरीही नवीन ऑर्डर देताना ग्राहक आमचा विचार करताना दिसतो.
काळ बदलतो तशी धंद्याची गणितं बदलतात. डिजिटलायजेशनमुळे पेपर प्रिंट निघणे कमी झाले आहे. त्यावर उपाय म्हणून वायफाय/ हार्ड डिस्क प्रिंटर, नेटवर्क प्रिंटर यांचा पर्याय देत मी व्यवसाय वाढवीत होतो. याच काळात कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये तीन वर्षाच्या कराराने एक ठराविक रक्कम घेऊन झेरॉक्स मशीन भाड्याने देत, इतर इन्कम वाढवायला सुरुवात केली.
आजघडीला पर्यावरणपूरक आणि आर्थिक बचत करणारा ‘पेपरलेस ऑफिस’ या मार्गाचा सर्वजण अवलंब करताना दिसत आहेत. तीनशे पानांची मोठी पुस्तकं असोत की एक पानाचं डॉक्युमेंट असो- पीडीएफ फॉरमॅटमध्ये इवल्याशा जागेत बसवून, ती माहिती ईमेल, व्हॉटसअपद्वारे कुठेही पाठवता येते. हाच मुद्दा घेऊन मी केतनला एक कळीचा मुद्दा विचारला, गतवैभव जपणारा हा धंदा आणखी किती काळ तग धरेल असं तुला वाटतं? केतन म्हणाला, आपल्या लोकसंख्येचा विचार करता पेपरलेस ऑफिस ही संकल्पना इतक्यात तरी भारतात रूजणे शक्य नाही. अजूनही कागदपत्रांची झेरॉक्स काढण्याची गरज संपलेली नाही. जेव्हा फॅक्स मशीन बाजारात आली, ईमेलने पत्रव्यवहार होऊ लागला तेव्हाही झेरॉक्स मशीनचा अंत आता जवळ आला आहे अशी आवई उठली होती. पण हा धंदा नवीन आव्हानांना सामोरं जात टिकून राहिला आहे आणि व्यवसायरूपी मशीनची नियमित सर्व्हिसिंग केली तर आमदनीची झेरॉक्स चांगलीच निघते.