एक सिंह म्हातारा झाला… एक कोल्हाही म्हातारा झाला… दोघांनाही शिकार जमेना… कोल्हा सिंहाकडे प्रस्ताव घेऊन गेला, म्हणाला, महाराज, मी गोड बोलून एखादा प्राणी तुमच्या टप्प्यात घेऊन येत जाईन, तुम्ही शिकार करा. दोघे मिळून खाऊ.
सिंहाला धावपळ जमत नव्हती. टप्प्यातली शिकार साधेल, असं वाटत होतं. त्यामुळे तो तयार झाला.
कोल्हा मोहिमेवर निघाला. त्याला एक गाढव भेटलं. तो गाढवाला म्हणाला, अहाहा, कितीतरी वर्षांत इतकं सुंदर, इतकं प्रमाणबद्ध, इतकं तगडं आणि इतकं शक्तिमान गाढव पाहिलं नव्हतं. झाली, तुझी निवड झाली.
गाढवाने विचारलं, कशासाठी निवड झाली? कुणी केली?
कोल्हा म्हणाला, मी केली. जंगलसम्राट सिंहराजेंचा मुख्य
बॉडीगार्ड म्हणून तुझी निवड झाली आहे. अरे, तेरी तो लाइफ बन गयी.
गोड गोड बोलत कोल्ह्याने गाढवाला सिंहाच्या टप्प्यात आणलं.
सिंहाने झुडपाबाहेर येऊन एक डरकाळी फोडून गाढवावर झेप घेतली. मात्र, गाढव जीव खाऊन चपळाईने त्याच्या पकडीच्या टप्प्याबाहेर पळून गेलं.
धापा टाकत उभ्या असलेल्या सिंहापाशी जाऊन कोल्हा म्हणाला, महाराज, आता वय झालं तुमचं. जिवंत राहायचं असेल, तर टेक्निक बदला. हे डरकाळ्या वगैरे फोडणं आता विसरा. असा आरडाओरडा केलात, तर गोगलगायीचीही शिकार जमायची नाही तुम्हाला.
कोल्ह्याने पुन्हा एकदा त्या गाढवाला गाठलं. गाढव त्याला पाहून धावू लागलं. कोल्हा म्हणाला, अरे मित्रा, आनंदाची बातमी सांगतोय. पळू नकोस. तू परीक्षा पास झालायस.
गाढवाने विचारलं, कसली परीक्षा? कुणी घेतली?
कोल्हा म्हणाला, अरे, साक्षात सिंह महाराजांनी तुझी परीक्षा घेतली आणि तू पास झालास… तू खरोखरच किती चपळ आहेस, किती ताकदवान आहेस, हे समजून घेण्यासाठी त्यांनी तुझ्यावर हल्ल्याचं नाटक केलं होतं.
गोड बोलून कोल्ह्याने गाढवाला पुन्हा सिंहापाशी आणलं. सिंहानेही त्याचं स्वागत वगैरे करून नंतर त्याला कवळा घातला आणि त्याची मान मोडून टाकली. भुकेला सिंह त्याच्यावर तुटून पडणार, तेवढ्यात कोल्हा म्हणाला, महाराज, तुमच्यावर कसलेच सुसंस्कार झालेले दिसत नाहीत. जेवणाच्या आधी स्नान करावं, प्रार्थना म्हणावी, मग जेवावं.
सिंह स्नानाला गेला आणि कोल्ह्याने गाढवाचं डोकं फोडून आपल्या आवडीचा भेजा फस्त केला.
परतल्यावर सिंहाने विचारलं, अरे, या गाढवाचा मेंदू कुठे गेला?
कोल्हा म्हणाला, महाराज, ज्याने माझ्यावर दोन वेळा विश्वास टाकला, त्या प्राण्याला मेंदू असेल का?