आदरणीय शिवसेनाप्रमुखांनी हे जिवंत भासणारे प्रत्ययकारी व्यंगचित्र रेखाटले तो काळ वृत्तपत्रांच्या कागदटंचाईचा होता. हा कागद परदेशातून यायचा. परमिट राज होतं. कोणत्या वर्तमानपत्राचा खप किती आहे, याच्या अंदाजावर कागदाचा मर्यादित पुरवठा व्हायचा. साखळी वर्तमानपत्रे नानाविध युत्तäया करून जास्त कागद पदरात पाडून घ्यायची. या कागदाचा काळाबाजारही चालायचा. त्याच्या किंमतीही रातोरात वाढायच्या. स्वतंत्र वृत्तीच्या, भांडवलशाही पाठबळ नसलेल्या आणि सरकारविरोधात आवाज उठवणार्या छोट्या वर्तमानपत्रांचं, नियतकालिकांना बेजार करण्याच्या या क्लृप्त्या असायच्या. मग नाईलाजाने किंमतवाढ करावी लागायची. साहेबांचा ‘मार्मिक’च्या वाचकांवर विश्वास इतका, त्यांचं नातं इतकं गहिरं की ही घोषणाही त्यांनी पहिल्या पानावर वृत्तपत्रसृष्टीची अवस्था चितारून केली आणि वाचकांनी अडचण समजून घ्यावी, असं विनम्र आवाहन केलं. आज कोरोना संकटानंतर वृत्तपत्रसृष्टीची अवस्था यापेक्षा वाईट झालेली आहे. कोरोना संकटाने दिलेल्या हादर्यांमधून ती सावरलेली नाही. मुंबई महानगरात वर्तमानपत्रांचे हक्काचे व्हीलरचे स्टॉल आता बटाटेवडे आणि सामोसे विकायला लागले आहेत. वर्तमानपत्रं, नियतकालिकं यांचा खप घसरला आहे, ती विकत घेऊन वाचण्याची लोकांची सवय सुटते आहे काय, अशी परिस्थिती ओढवलेली आहे. काळ बदलला, राक्षस बदलला, अधिक विक्राळ झाला आणि वृत्तपत्रसृष्टी सैरावैरा धावतेच आहे…