माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या त्या दिवशी रात्री मिठाईचे आणि फटाक्यांचे बॉक्स घेऊन घरी आला तेव्हा तो येणार याची खात्रीच होती. कारण शिवसेनेचे खासदार आणि दै. ‘सामना’चे संपादक संजय राऊत तुरुंगातून सुटल्याची बातमी हा हा म्हणता देशभरच नव्हे, तर जगभर पसरली आणि महाराष्ट्रात नव्याने दिवाळी साजरी झाली. त्याचवेळी पोक्याचा फोन आला आणि त्याने आपल्या आगमनाची वर्दी दिली. त्यामुळे पोक्याच्या स्वागताचीही जंगी तयारी आपल्या पद्धतीने करणे मला भाग होते. कारण मी जरी भाजपचा दिल्लीतला माणूस म्हणून ईडीच्या कार्यालयात काम करत असलो तरी सगळे शिवसेनावाले पूर्वीपासून आमचे मित्र. त्याला राऊत साहेबही अपवाद नाहीत. ईडीच्या कार्यालयात बोलावून विरोधी पक्षाच्या नेत्यांची कशी भंबेरी उडवतात ते मी स्वत: अनुभवले आहे. त्यात तो बोबड्या तिरकीट भुमय्या असतोच. कसले पुरावे घेऊन त्याचे पोते नाचवत फिरत असतो कोण जाणे! त्या दिवशी शिवसेना नेते संजय राऊत जामीनावर सुटल्यावर तो कुठल्या बिळात तोंड लपवून बसला होता कोण जाणे! फटाक्याच्या वातीला काडी लावायची आणि कधी धूमधडाका होतो, याची वाट पाहात बसायचे. एकदा का स्फोट झाला की, वेड लागल्यासारखे कार्यालयातच स्पीड गरबा करत उंच उंच उड्या मारत विदुषकासारखे नाचायचे एवढेच याचे काम. पण त्या दिवशी मात्र तो सकाळपासून गायब होता. एवढा महत्त्वाचा निकाल न्यायालय देणार होते आणि हा कुठे पळून गेला होता याचा शोध ईडीचे तपास अधिकारी घेत होते. पण ते सापडलाच नाही. मला ईडीच्या कार्यालयातून फोन आला की, तो बोबड्या कुठे गायब झालाय त्याचा शोध घ्या. आम्हाला त्याचे गायब होणे संशयास्पद वाटतेय. त्याच्या लपून राहण्याच्या जागा तुम्हाला ठाऊक आहेत. मी हो म्हणून ऑर्डर फाट्यावर मारून मोकळा झालो. इतक्यात शिवसेनेच्या ढाण्या वाघाला जामीन मिळाल्याची बातमी आली. घरातच विश्वचषक जिंकल्याच्या आनंदात मी एकट्यानेच डान्स सुरू केला. तेव्हाच पोक्याची आठवण येते न येते तोच पोक्या वायूवेगाने दोन्ही बॉक्स सावरत दारात हजर. आल्याबरोबर आम्ही एकमेकांना मिठ्या मारून आनंद साजरा केला. इडीवाल्यांची खाशी जिरली याचा आनंद जसा मला झाला होता तसा पोक्यासकट सार्या महाराष्ट्राला आणि देशाला झाला होता. आजपर्यंत या इडीवाल्यांनी लाखो नव्हे करोडो लोकांचे इतके शिव्याशाप खाल्ले आहेत की न्यायालयाने त्यांच्या अब्रूची लक्तरे लोंबवत त्यांचे इतके वाभाडे काढले की आजपर्यंतची त्यांची सगळी दादागिरी एका क्षणात भुईसपाट झाली होती.
ताबडतोब पोक्याने दोन्ही बॉक्स खोलले. आम्ही मिठाई एकमेकांना भरवत असतानाच पोक्याची होणारी भावी वधूही आली. मग आम्ही तिघांनी डान्सही केला आणि फटाक्यांचे बार, माळा, भुईनळे, बाटलीबाण, भुईचक्रे घेऊन बाहेर अंगणात आलो आणि अक्षरश: दिवाळी साजरी केली. आजुबाजूचे लोकही आमच्यात सामील झाले. ‘आवाज कुणाचा… शिवसेनेचा’, ‘इडीच्या बैलाला…’ अशा गगनभेदी घोषणा देऊन आम्ही तिरकीटसह भाजपचा यथेच्छ उद्धार केला. सार्या महाराष्ट्रभर तेच सुरू होतं. ‘ढाण्या वाघाची ती भव्य बाईक रॅली, ते वीरोचित स्वागत आणि रस्त्यावर दुतर्फा जमलेल्या शिवसेनाप्रेमींनी केलेला जल्लोष आम्ही टीव्हीवर पाहात होतो. न्यायालयाने न घाबरता निर्भीडपणे आपला हिसका इडीला दाखवला होता. दोन्ही थोबाडे सुजतील एवढ्या एकामागून एक कानफटात लगावल्या होत्या. सगळ्या कारस्थानांना भुईसपाट केले होते. आणि ढाण्या वाघाच्या घरी झालेले त्यांचे देवदुर्लभ स्वागत, वास्तूला केलेली रोषणाई, दारातील भल्यामोठ्या रांगोळ्या आणि आई, पत्नी, मुली यांच्या आणि असंख्य शिवसैनिकांच्या प्रेमवर्षावात न्हाऊन निघालेला ढाण्या वाघ आपल्या आणि शिवसेनेच्या अस्मितेला जागलेला सार्या जगाने पाहिला.
आम्ही तिघेही बेहद्द खूश होतो. इडीतल्या काही आमच्या मित्रांनीही मला फोन करून माझेच अभिनंदन केले. ‘शिवसेनेची मशाल भडकली, इडीची विडी विझली’ असेही एकाने सुनावले. आम्ही ताबडतोब सेलिब्रेशनची तयारी सुरू केली. पोक्याच्या भावी पत्नीने ग्लास, बर्फ, ट्रे, चकणा या सार्याचा इंतजाम केला आणि नंतर चियर्स करून आम्ही पवित्र कामाला सुरुवात केली. आज आपल्या पार्टीत आपल्याबरोबर निदान कंपनी म्हणून भिडे गुरुजी हवे होते, असे पोक्याने म्हणताच त्याच्या भावी पत्नीने त्याला झापले. म्हणाली, तू म्हणशील तो बोबड्या तिरकीट भुमय्याही हवा होता. त्यावर पोक्या बोलला, अगं तो पीत नाही. देवाशपथ. फक्त न पिता घेतल्यासारखा बोलतो आणि एक्टिंगही करतो. आता यापुढे इडी आपली अब्रू वाचवण्यासाठी काय करेल असं तुला वाटतं? पोक्याने प्रश्न विचारला. तेव्हा मी म्हटलं, हा इडीच्या नव्हे, तर भाजपच्या अब्रूचा प्रश्न आहे. त्यामुळे ते आता हळूहळू कोर्टावर दबाव आणून कोर्टाच्या निकालातील जी इडीवर ताशेरे ओढणारी कडक भाषा होती, ती सौम्य करण्याचा प्रयत्न करतील. तसे न केल्यास लोक येत्या निवडणुकीत भाजपला झोपवतील. त्यामुळे तसे करणे ही त्यांची गरज आहे. तरीही इडीची अब्रू गेल्यामुळे अर्थातच भाजपचीही गेली आहे. आता पार्श्वभागावरील फाटलेले कपडे कितीही ठिगळे लावून जोडण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी जनतेला जे दिसायचे ते दिसलेच. ‘अति तिथे माती’ यालाच म्हणतात. यावर आपण तिघांनी आणखी एकेक पेग मारून ही म्हण खोटी ठरवण्याचा प्रयत्न करूया!