□ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्दिष्टे समान : म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक रवींद्र साठे.
■ यांचा काही भरवसा नाही, हे उद्या महात्मा गांधी आणि हिटलर यांची उद्दिष्टं समान होती, असंही लिहून मोकळे होतील.
□ शिवसेना नेते संजय राऊत यांची अटक अनावश्यक आणि बेकायदा : न्यायालयाचे ईडीवर टीकास्त्र.
■ जजसाहेब, लाचार घरगड्याला बोलून काय उपयोग, मुजोर मालकाचा नक्षा उतरवा.
□ आणखी एक प्रकल्प बाहेर गेला, हे महाविकास आघाडी सरकारचं पाप : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
■ सगळं काही महाविकास आघाडीमुळेच होतंय तर तुम्ही काय जोडीने हळदी कुंकू समारंभांना हजेरी लावण्यासाठी नेमलेले आहात का?
□ राजकारणातली कटुता दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
■ अहो, राजकारणाचं काय घेऊन बसलात, तुम्ही अख्ख्या समाजात विषारी कटुता पेरली आहेत, तिचा स्फोट झाला तर सर्वांचा ‘एकत्रित’ कडेलोट होईल!
□ सरकार बदलले, आता मुंबईतही बदल होणार, महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनवणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
■ कसे? सगळे प्रकल्प गुजरातच्या ताटात वाढून? काही म्हणा, ढवळ्याशेजारी बांधल्याबरोबर पवळ्याही रेटून फेकू लागला!
□ आता तेलंगणातील मतदारांना एका कुटुंबासाठी काम करणारे सरकार (टीआरएसचे सरकार) नको असून सगळ्या कुटुंबांसाठी काम करणारे सरकार (भाजपचे सरकार) हवे आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी.
■ तेलंगणातल्या लोकांना एका कुटुंबासाठी काम करणार्या सरकारऐवजी दोन लाडक्या उद्योगपतींच्या कुटुंबांसाठी काम करणारं सरकार हवं आहे, असं खरं खरं सांगायचं ना मोदीजी!
□ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आहे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.
■ तुमच्या २५ वर्षांच्या भोंदुत्वाच्या भानामतीतून आणि गद्दारांच्या कचाट्यातून शिवसेनेची मुक्तता झाली, याबद्दल किती तडफडाट कराल!
□ न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारकडून होणारा विलंब अस्वीकारार्ह : सर्वोच्च न्यायालयाची नाराजी.
■ देशाचे सरन्यायाधीशपद भूषवल्यावर राज्यसभेच्या खासदारकीच्या बक्षिसीचे बिस्कुटही झेलायला जे झेपावतात, असे कणाहीन उमेदवार द्या, लगेच नियुक्त्या होतील.
□ आम्ही विचारांना वेग देऊन देशाच्या विकासाचा वेग वाढवला : पंतप्रधान मोदी.
■ हा वाढलेला वेग जमिनीवर कुठेच दिसत नाही, कोणत्याही निर्देशांकात त्याचं प्रतिबिंब पडत नाही… पंतप्रधान पण आपल्याच आयटी सेलचे फॉरवर्ड मेसेज वाचून त्यावर विश्वास ठेवायला लागले की काय!
□ पुण्यात एकाने मांजर समजून बिबळ्याचा बछडा पाळला!
■ एक पुणेकर आपल्याला पाळतो आहे, या आनंदाच्या भरात बिबळ्याही म्याँव करायला लागला असेल!
□ पुण्यात पाळीव मांजरांचीही नोंदणी बंधनकारक!
■ तिथे खुद्द मांजरीच नोंदणी करायला जाऊन आपलं नाव, पालकांचं नाव वगैरे माहिती भरून मनीमाऊ मासेखाऊ अशी लफ्फेदार सही ठोकताना दिसल्या तरी आश्चर्य वाटायला नको.
□ मी दररोज दोन तीन किलो शिव्या खातो : पंतप्रधान मोदी.
■ असते एकेकाची आवड!
□ रस्त्यावर पाळीव कुत्र्यांचे नैसर्गिक विधी उरकताना आढळल्यास मालकांना ५०० रुपये दंड : मुंबई महानगरपालिकेचा निर्णय.
■ सोशल मीडियावर इतरांच्या पोस्टींवर गलिच्छ कमेंटरूपी विधी करत फिरणार्यांवरही दंड लावला गेला तर झुकेरबर्ग, मस्क मालामाल होऊन जातील!