नोकरी-धंद्यासाठी शहरात आलेल्या पिढीची नाळ गावाशी जोडलेली असल्याने निवृत्तीनंतर मिळणार्या रकमेतून गावी घर बांधायचं ही एकेकाळी त्यांची इच्छा असायची. पण २०१० सालानंतर, शहरापासून जवळ आणि गावाचा लुक असणार्या ठिकाणी ‘सेकंड होम‘ची संकल्पना जोर धरू लागली. या काळात अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांनी, एनए (नॉन अॅग्रिकल्चर) प्लॉटवर बंगले बांधले किंवा विकत घेतले. सुरुवातीला महिन्यातून एकदा, नंतर वर्षातून एकदा राहायला येणार्या मालकांना काही वर्षांनी वेळेअभावी येणे शक्य होत नसे, तसेच त्यांची पुढील पिढी परदेशात स्थायिक झाल्याने किंवा इथे येण्यात इंटरेस्ट नसल्याने, या बंगल्यांचा वापर कमी झाला. वास्तूत कुणी राहणार नसेल तर मेंटेनन्सही नकोसा वाटतो. त्यामुळे बंगल्यांची दुरवस्था होऊ लागली. आज कितीतरी बंगले ओस पडलेले दिसतात. नियमित देखभाल नसलेल्या या बंगल्याना नवा साज चढवून ते बंगले पर्यटकांना उपलब्ध करून देण्याची कल्पना आलाप कोर्डे हा मराठी तरुण, मुरबाडजवळील पळू गावात, ‘वनराई‘ या नावाने राबवत आहे. लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर या नेहमीच्या पर्यटनस्थळांना ‘वनराई’मुळे वेगळा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर तो व्यवस्थापन करत असलेल्या बंगल्याच्या मालकांना देखील यातून नियमित उत्पन्न मिळतंय.
आजच्या स्टार्टअप जमान्यात सर्वांना आयडिया चटकन सुचतात, पण त्या अमलात आणायला जी चिकाटी, मेहनत लागते, ती मात्र फारशी दिसत नाही. म्हणूनच मुंबईत राहणारा हा तरुण, व्यवसाय करायला गावच्या ठिकाणी का आणि कसा आला? याबाबत मला उत्सुकता होती. आलाप म्हणाले, ‘कोकणातील घर, मुंबईपासून फक्त दोन तासांवर‘ अशी जाहिरात २०१० साली वर्तमानपत्रात आली होती. मुरबाडजवळील पळू गावातील जंगलात पाच गुंठ्यांचा एक, असे ४८ प्लॉट विकायला काढले होते. माझ्या बाबांनी त्यापैकी एक प्लॉट विकत घेतला आणि कोकणातील जांभ्या दगडाचे बांधकाम करून ‘आठवण‘ हा बंगला बांधला. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात, आमच्या बंगल्यापासून काही अंतरावर एक मोठा तलाव आणि धबधबा आहे. वेळ मिळाला की शहरी गजबजाटातून शांतता अनुभवायला आमच्यासोबत आमचे अनेक नातेवाईक आणि मित्र देखील इथे राहायला यायचे. हे सर्व बंगले मुख्य गावापासून आत, जंगलात असल्यामुळे काही अडचणी होत्या. इथे पाऊस भरपूर पडतो. मोठा पाऊस पडला की लाईट जायची. त्यावर उपाय म्हणून आम्ही इन्व्हर्टर बसवून घेतले. आम्ही राहायला जायचो तेव्हा हा बंगला आपण रेंटवर देऊ असा विचार कधी केला नव्हता. लॉकडाऊननंतर जेव्हा कोविड निर्बंध थोडे शिथिल झाले तेव्हा घरी बसून कंटाळलेले पर्यटक हॉटेलमधे गर्दीत राहण्यापेक्षा एका कुटुंबाला प्रायव्हसी मिळेल असे बंगले शोधत होते. आमच्या मित्रमंडळींनी- फॅमिलीला, मित्रांना तुमच्या आठवण बंगल्यात राहायला आणायचं आहे, तू व्यवसाय म्हणून होम स्टे सुरू का करत नाहीस, असं विचारलं. मीदेखील दुबईहून नोकरी सोडून स्वतःचा काही तरी व्यवसाय करण्यासाठी भारतात परतलो होतो. त्यामुळे व्यवसायाची समोरून चालत आलेली ही संधी मी स्वीकारायचं ठरवलं.‘
लोकांच्या राहण्या-खाण्याशी संबंधित व्यवसाय करणं ही सोपी गोष्ट नाही. यासाठी फिरण्याची आवड, विविध स्तरातील लोकांशी संवाद आणि त्या क्षेत्रातील अनुभव गाठीशी असावा लागतो. माझ्याबाबत हे जुळून आलं. माझं बालपण मुंबईत दादरमधे गेलं. आमच्या कुटुंबात सर्वांना फिरण्याची फार आवड आहे. माझे बाबा अशोक कोर्डे डॉक्टर आहेत, त्यांच्या प्रॅक्टिसमधून वेळ काढून ते सर्व कुटुंबीयांना दर शनिवार रविवारी मुंबईबाहेर फिरायला घेऊन जायचे. आमच्या गाडीने आम्ही कोडाईकॅनॉल, हैदराबाद आणि बंगलोरला देखील फिरलो आहोत. तीच आवड माझ्यातही रुजली. या व्यवसायात पडलो तर लोकांना फिरवता फिरवता स्वतःला देखील भरपूर फिरता येईल हा विचार माझ्या मनात होता, म्हणून बारावी झाल्यावर पुढील शिक्षण टुरिझममधे केलं. २००३ला डिप्लोमा पूर्ण झाला. व्यवसाय सुरू करावा असं वाटत होतं, पण मध्यमवर्गीय मानसिकता अनुभव गाठीशी नसताना व्यवसायात उडी मारण्याचा निर्णय घेऊ देत नव्हती. टुरिझममधील शिक्षणाने पुस्तकी ज्ञान तर मिळालं, पण धंद्यातील खाचाखोचा समजून घ्यायला नोकरी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (टीसीएस) या कंपनीत पहिली नोकरी मिळाली. या कंपनीच्या भारतातील विविध टूर्समधील पर्यटकांच्या विमानप्रवासाच्या बुकिंगची जबाबदारी माझ्याकडे होती. तेव्हा ई तिकीट, ऑनलाईन प्रणाली विकसित झाली नसल्यामुळे, हाताने तिकिटे लिहून देण्याचं काम करायचो. प्रवास बुकिंग झालं की मग, त्या पर्यटनस्थळाजवळील चांगली हॉटेल्स बुक करणे, वाहने बुक करणे, ही कामेही मी करायचो. हळूहळू कामाची जबाबदारी वाढत जाऊन, पर्यटक मुंबईहून निघाल्यापासून ते मुंबईत परत येईपर्यंत तेथील राहणे, खाणे, फिरणे निर्धोक कसं होईल याचं नियोजन करणं हे माझं काम होतं.
या कंपनीत दीड वर्ष काढल्यानंतर, कॉक्स अँड किंग्ज या कंपनीच्या डोमेस्टिक टूर्ससाठी असणार्या ‘भारत देखो‘ या विभागात मी जॉइन झालो. तरुण वयात नोकरी बदलताना पगारवाढ हे एक प्रमुख कारण असतं. पण माझ्या बाबतीत पगारवाढीसोबतच ही कंपनी ग्रुप टूर्स करत असल्यामुळे आपल्याला काहीतरी नवीन शिकता येईल हा विचार देखील होता. तिथे एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होता. क्रूझ, म्हणजे महाकाय बोटीवर सर्व सुखसोयींनी युक्त अशी अनेक मजली इमारत असलेलं तरंगणारं शहर. अशा बोटी भारतात फक्त ‘स्टार क्रूझ‘ ही कंपनी चालवायची आणि त्यांच भारतातील काम (लोकल हॅण्डल) कॉक्स अँड किंग्ज ही आमची कंपनी पहायची. इथे मी, बोटीवरील केबिनचे बुकिंग कसं करायचं, बोटीवर जाऊन पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाच्या जागेची पाहणी करणे, खाण्यापिण्याचे पर्याय, भरती ओहोटीच्या वेळा विचारात घेऊन आखलेले डेकवरील मनोरंजनाचे कार्यक्रम अशा विविध गोष्टी शिकलो. जमिनीवरील पर्यटनपेक्षा पाण्यावरील पर्यटन कसं वेगळं असतं हे इथे जवळून पाहता आलं. गोवा, लक्षद्वीप अशा मोठ्या टूर्स होत्या. पण ज्यांना कमी पैशात आणि कमी वेळेत या सागर सफरीचा आनंद लुटायचा आहे त्यांच्यासाठी मुंबईत ‘हाय सी’ या नावाची, एक दिवस- एक रात्र अशी टूर होती. त्यात, क्रूझ समुद्री आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत जाऊन परत येई. त्यावेळी कॉर्पोरेट बूममधे होतं. दर वीकेंडला पंचतारांकित हॉटेलात होणार्या कॉन्फरन्सेस, अवॉर्ड शोज नेहमीचे झाले होते. अशावेळी कर्मचार्यांना वेगळा अनुभव देण्यासाठी कॉर्पोरेट्स फार उत्सुक असायचे. त्यांनी क्रूझ पर्यटन उचलून धरलं, यासाठी जास्त पैसे मोजताना चांगल्या आणि वेगळ्या मनोरंजन सेवेची हमी मात्र त्यांना हवी असायची. ही नोकरी करताना काही गमतीजमती मला पाहता आल्या. रात्रभर पार्टी झाल्यावर कर्मचार्यांना, बिझनेस कॉन्फरन्ससाठी सकाळी हजर राहणं अनिवार्य असायचं. तेव्हा केबिन ठोठावून सकाळी त्यांना उठवण्याचे काम माझ्याकडे होतं. काहीजण हँगओवरमधे मला, रिक्षाने घरी सोड, माझ्यासाठी टॅक्सी बुक कर असं सांगायचे. तेव्हा त्यांना, ‘आता तुम्ही समुद्रात आहात, पाण्यावर रिक्षा चालत नाही,’ अशी गंमतशीर आठवण करून द्यावी लागायची. येणार्या प्रत्येक ग्रुपच्या खाण्याच्या आवडी निवडी वेगळ्या असायच्या. त्यावरुन सुरुवातीला तक्रार असायची. मग मी ग्रूपनुसार मेन्यू बदलायला सांगायचो- पंजाबी असतील तर छोले भटुरे, गुजराती असतील तर ढोकळा, मराठी असतील तर साबुदाणा खिचडी, पोहे- आवडीचा नाश्ता मिळायला लागल्याने पर्यटकांच्या तक्रारी कमी झाल्या. पर्यटकांशी संबंधित अनेक विभागात वैयक्तिक लक्ष घालण्याच्या माझ्या स्वभावामुळे, कॅप्टनपासून कुकपर्यंत प्रत्येकाशी माझी मैत्री जमली. काही महिन्यांनी तर, ग्रूपसोबत आलापला पाठवा अशी मागणी क्रूझवरील कर्मचारी करू लागले. आमच्या कंपनीच्या दृष्टीनेही एकच माणूस क्रूझ बुकिंगपासून इव्हेंटपर्यंत सगळेच सांभाळतो आहे हे फायद्याचं होतं. त्यामुळे मला लवकर बढती मिळत गेली. कंपनीचे भारतातील प्रत्येक लहान मोठ्या शहरात ऑफिसं होते. त्या सर्वांशी क्रूझ बुकिंगसंदर्भात फोनवरून संपर्क साधत असल्यामुळे अनेक शहरांत माझ्या ओळखी झाल्या. या सर्व कॉन्टॅक्टचा नंतर फार उपयोग झाला. भले यातील अनेकांनी नोकर्या बदलल्या असतील, पण काही मदत हवी असेल तर त्यांच्या अनुभवाचा आजही मला उपयोग होतो.
या नोकरीतील अंदमानचा प्रसंग सांगण्यासारखा आहे. क्रूझ बोटी खोल समुद्रात बांधलेल्या धक्यांवर थांबतात आणि पर्यटकांना किनार्यावर न्यायला लहान बोटी असतात. अंदमान किनार्यावर प्रवासी नेताना एके दिवशी एक लहान बोट उलटली. सुदैवानं सगळ्यांनीच लाईफ जाकीट घातले असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसर्या दिवशी मुंबईतील एका वर्तमानपत्रात बातमी आली, ‘स्टार क्रूझ समुद्रात बुडाली.’ बातमी वाचून घरी सगळेच रडू लागले. त्यांना वाटलं आता आलाप काही परत येत नाही. मला याचा काही पत्ताच नव्हता. काम संपवून रात्री एसटीडी बूथवरून घरी कॉल केला, तेव्हा घरच्यांना हायसं वाटलं. असा एखाद दुसरा प्रसंग सोडला तर क्रूझ टुरिझम जोरात सुरू होतं, पण मला मात्र कामात तोचतोचपणा जाणवत होता.
याच काळात सेंचुरी बाजार जवळील अनुभव ट्रॅव्हल्समधे नोकरीची संधी चालून आली. यांना जॉईन करण्याचं एकमेव कारण हे होतं की, ते कोणत्याही स्टाफला कायम ऑफिसला न ठेवता टूरला पाठवीत असत. आमचे मालक अरुण भट यांचे कर्नाटक हे होम स्टेट. या राज्यातील स्वतः शोधून काढलेले नवीन टुरिस्ट स्पॉट्स, सर्वोत्तम लोकल फूड आणि सौजन्यशील वृत्ती यामुळे त्यांची ‘कोस्टल कर्नाटका’ ही टूर फारच डिमांडमधे होती. मी नोकरी स्वीकारल्यावर पहिली टूर त्यांच्यासोबत करत असतानाचा प्रसंग. एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ पावसामुळे पाहता आलं नाही. बसमध्ये सगळे शांत बसून होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरांनी बस थांबवून तेथील लोकल वेफर्स आणि मिठाई सर्वांना गिफ्ट दिलं. त्याचा आस्वाद घेताना पर्यटकांच्या लक्षात आलं की हे तर आपल्या पॅकेजमध्ये नाहीये. यानंतर जादूची कांडी फिरावी तसा बसमधील पर्यटकांचा मूड बदलला. यातून टूरवर असताना वातावरण आनंदी कसं करायचं, हे मला शिकता आलं. आणि त्याचबरोबर टूरमधे झालेला एक्स्ट्रा खर्च दुसरीकडे कुठेतरी अॅडजेस्ट करायचा हेही समजलं. म्हणजे संपूर्ण टूरमध्ये आपला तोटा न होता लोक खुश राहिले पाहिजे. पर्यटक घरापासून लांब अनोळखी ठिकाणी आपल्यावर विश्वास ठेवून येत असतात, तेव्हा त्यांचा आनंद महत्वाचा. आलेला पर्यटक खुश होईल अशा दृष्टीने आम्ही नियोजन करायचो, याचाच एक भाग म्हणून टूरसोबत स्वतःचं किचन असायचं, जेणेकरून दर्जेदार जेवणाची हमी देता यावी आणि दुसरं म्हणजे आपल्याला हवा तो मेनू सेट करता येतो. फूड आणि ट्रॅव्हल ह्या दोन गोष्टी मॅच केल्या तर तुम्ही कोणतेही टुरिझम प्रॉडक्ट युनिक करू शकता. शिमल्याला जाऊन स्नोफॉल अनुभवताना जर तिथेच तुम्हाला गरमागरम बटाटवडा मिळाला तर तो अनुभव कायमचा स्मरणात राहतो.
हिमाचल प्रदेश टूर करताना, मनाली ते रोहतांग पास साधारण दोन तासांच अंतर आहे. रोहतांग पासला राहता येत नाही, बर्फात खेळून परत यावं लागतं. इथे सर्व स्टाफने जायची गरज नसल्याने, पर्यटकांसोबत सर स्वतः जायचे आणि त्या वेळात, मला इतर हॉटेलची माहिती काढायला सांगायचे. त्यातून मला नामांकित हॉटेलसोबत टायअप कसं करायचं, त्यांचे दर कमी कसे करून घ्यायचे, हे कळत गेलं.
दोन वर्षं अनुभव ट्रॅव्हल्समध्ये काढल्यानंतर काहीतरी नवीन शिकायला हवं असं प्रकर्षानं जाणवत होतं. याच दरम्यान टुरिझम इंडस्ट्रीमधेही आमूलाग्र बदल घडत होते. एयर टिकिट बुकिंग पूर्वी मॅन्युअली होत असे, ते आता ऑनलाइन सुरू झालं होतं. हेच नवीन बदल शिकण्यासाठी मी क्लियरट्रिप डॉट कॉम या अमेरिकन कंपनीत नोकरी पकडली. आधीच्या तुलनेत पगारही भरपूर होता. या कंपनीचा ऑनलाइन एयर टिकिट बुकिंग करण्यावर भर होता, पण हॉटेल बुकिंगमधे ती मागे होती. कंपनी ग्रूप मीटिंगमध्ये मी काही गोष्टी सुचवल्या, त्यावर विचार करून त्यांनी वेगळं हॉटेल डिपार्टमेंट निर्माण केलं आणि भारतातील हॉटेल्ससोबत टायअप करायचं काम माझ्याकडे सोपवलं. त्यासाठी हॉटेलची रेकी करणं हे माझं काम होतं. मी रेकी केलेल्या हॉटेलमध्ये एकूण किती सिंगल बेडरूम्स, डबल बेड रूम्स आहेत, किती कॉन्फरन्स हॉल आहेत, कोणते लोकल फूड ते पर्यटकांना देतात, प्रेक्षणीय स्थळांपासून हॉटेलच अंतर किती आहे, या सर्व गोष्टीं आमच्या टेक्निकल टीमसोबत बसून आम्ही वेबसाइटवर अपडेट करायचो. पीक सीझनमध्ये हिल स्टेशनवरील कोणती गल्ली वन वे आहे, कुठे ट्रॅफिक जॅम होतो, या सर्व गोष्टी हॉटेलसोबत टायअप करताना विचारत घ्याव्या लागतात. कंपनीत ग्राउंडवर्क केलेला मीच एकमेव कर्मचारी होतो. त्यामुळे मी केलेल्या सूचनांचा कंपनीला फायदा होत गेला. याचंच फलित म्हणून त्या वर्षीचा बेस्ट एम्प्लॉयी हा अवॉर्ड मला मिळाला.
पर्यटनक्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी बांधल्यावर असं वाटू लागलं की आता स्वतःची कंपनी सुरू करायला हवी. २०१०मध्ये मी ‘परफेक्ट हॉलिडेज‘ या नावाने स्वतःची कंपनी सुरू केली. परफेक्ट हॉलिडेजबद्दल लोकांना कळत गेलं तसं, मी केलेल्या टूर्समधील अनेक पर्यटक मला फोन करून माझ्या टूरमध्ये यायचं आहे हे सांगू लागले. मी कंपनी सुरू करत असताना अरुण भट यांच्यासोबत कॉम्पिटिशन करायची नाही किंबहुना ते करत असलेल्या टूर्सच्या ठिकाणावर आपण टूर घेऊन जायची नाही या गोष्टीची काळजी घेतली. काश्मीर, केरळ, हिमाचल, राजस्थान, कर्नाटक या टूर्स या व्यवसायात प्रस्थापित झालेल्या कंपन्या करत होत्या. म्हणून मी तेव्हा फारसं ग्लॅमर नसलेल्या मध्य प्रदेश राज्यापासून टूर्स करायला सुरुवात केली.
पहिलं ऑफिस आमच्या घरातील एका खोलीत सुरू केलं. माझे नातेवाईक मला चिडवायचे, की आम्ही जसे सकाळी घरातून कामावर जाताना बस ट्रेन असा प्रवास करतो, तसा आलाप त्याच्या ग्राहकाला भेटायला एका खोलीतून दुसर्या खोलीत प्रवास करतो. अनेक डोमेस्टिक टूर्स केल्यानंतर पहिली इंटरनॅशनल टूर मी केली ती दुबईला. २०१० ते २०१७ या कालावधीत मी दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड येथे अनेक टूर्स केल्या. त्यात सगळ्यात मोठा, १२० जणांचा ग्रुप घेऊन सिंगापूरला गेलो होतो. तेव्हा चाळीस हजार रुपयांच्या पॅकेजमध्ये मलेशिया आणि सिंगापूर अशी पाच दिवसाची टूर करायचो. इंटरनॅशनल ट्रिपचा अनुभव चांगला येत होता. माझे ग्राहक युरोप कधी करणार, अशी विचारणा करायचे, पण मी मात्र तूर्तास जिथे कॉन्फिडंट होतो तिथेच टूर्स प्लॅन करत होतो. उदाहरणार्थ, दुबईमधील कोणतं हॉटेल कोणत्या गल्लीत आहे हे मला माहित असायचं तसेच थायलंडमध्ये एखादा हॉटेलवाला मला, ‘आलाप भाई कैसे हो‘ असं म्हणायचा, तेव्हा सोबतच्या पर्यटकांना फार आश्चर्य वाटायचे. गंमत म्हणजे थायलंडमधील टूर गाईड्सना मी काही मराठी शब्द शिकवले होते, उदा. नमस्कार, परत या, कसे आहात तुम्ही? यामुळे जेव्हा ते मराठी बोलायचे तेव्हा आपले लोक चकित व्हायचे. बुकिंगपासून ते टूर रिटर्न येईपर्यंत, मी ग्रूपसोबत असायचो, त्यामुळे लोकांनाही छान वाटायचं. माझ्या टूरला एक पर्सनल टच असायचा. हे मी आजही जपतो.
आज वनराईमधे होम स्टेसाठी बुकिंग करायला माझा नंबर दिला आहे. पर्यटक इथे राहायला येतात, तेव्हा त्यांची सरबराई करायला मी जातीने हजर असतो. ‘वनराई’चं आल्हाददायक वातावरण आणि नीरव शांततेच्या प्रेमात पडलेल्या पर्यटकांना पंजाबी, चायनीजपेक्षा, मराठमोळं घरगुती जेवण मिळेल याची आम्ही काळजी घेतो. नेहमीच्या व्हेज-नॉनव्हेजसोबतच खवय्यांसाठी आम्ही पावसाळ्यात उगवणार्या रानभाज्यांचा फेस्टिवल, पुरण पोळी फेस्टिवल, पोपटी तसेच मोकळ्या अंगणात बार्बेक्यू ठेवायला सुरुवात केली. लहान मुलांना लोप पावलेल्या जुन्या खेळांचा अनुभव घेता यावा, यासाठी मातीच्या मैदानात गोट्या, बेचकी बनवून खेळणे, आंधळी कोशिंबीर, डब्बा ऐसपैस हे खेळ इथे आयोजित केले जातात.‘
आज आलाप एक यशस्वी उद्योजक होण्याच्या मार्गावर आहेत. अर्थात हे यश पाहायला त्यांना अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. २०१७मधे व्यवसायात खूप मोठा फटका बसला तेव्हा दोन पावले मागे येऊन त्यांनी नोकरी पत्करली. आलाप यांच्या या निर्णयातून नवीन उद्योजकांना बोध घेता येईल. या कठीण काळाबद्दल ते सांगतात, ‘सहा-सात वर्ष माझा इंटरनॅशनल टूरचा व्यवसाय चांगला चालत होता पण त्यानंतर नोटबंदी आणि जीएसटी यामुळे धंद्याचं गणित बिघडलं. नोटबंदीनंतर आमच्या धंद्यातील कॅश फ्लो बंद झाला. आपल्याकडे तेव्हा कॅश वापरायची टेंडन्सी होती. जे लोक कॅशमध्ये ट्रॅव्हल करायचे ते त्यावर्षी फिरायला गेलेच नाही. त्यामुळे माझा नोव्हेंबर डिसेंबरचा पीक सिझन वाया गेला. विमान तिकिटांचे प्री बुकिंगचे पैसे फुकट गेले. यात मला चार-पाच लाखाचा फटका बसला. अशी संकटं एकामागून एक येत होती. हाताशी भांडवल नाही आणि लहान व्यावसायिकांसाठी टुरिझम व्यवसाय करणे सध्या परवडणारे नाही, या कारणाने काही दिवस पुन्हा नोकरी करायची ठरवली. दुबईमधील ट्रॅव्हल टॅग या कंपनीत कामाची संधी चालून आली. तिथे मी भारतातून जे लोक दुबईत फिरायला जात, त्यांचं बुकिंग ते एक्झिटपर्यंत सगळ्या गोष्टी मॅनेज करायचो.
दुबईत राहण्यामुळे मला फायदा असा झाला की टूर नसताना मला दुबई सिटी एक्स्प्लोर करता आली. मेट्रो ट्रेनचा पास काढून मी दुबईभर फिरायचो, नवनवीन ठिकाणं शोधायचो. सगळे जण करत होते त्या टिपिकल ट्रिपपेक्षा माझ्याकडे येणार्या पर्यटकांना मी नेहमीपेक्षा वेगळी दुबई दाखवत होतो. आधी जेव्हा मी एखादा ग्रुप घेऊन दुबईला जायचो, तेव्हा गाईड सांगेल तशा पद्धतीनेच मला प्लॅन बनवावा लागत असे. पण आता मी दुबईला स्थायिक झाल्यामुळे मला अनेक नवीन अनुभव घेता आले आणि पर्यटकांना त्याचा आनंद देता आला. या कामात पगार अधिक मिळत असला तरी दुबईमध्ये राहण्याचा खर्चही जास्त होता. शिवाय या नोकरीत ग्रोथ दिसत नव्हता. त्यामुळे मी पुन्हा भारतात यायचा विचार करत होतो. योग्य वेळी निर्णय घेण्याचे फायदे असतात. फेब्रुवारीत मी भारतात आलो आणि मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाला. कोविडकाळात सर्वात मोठा फटका टूरिझम इंडस्ट्रीला बसला. सर्वच लहान मोठ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांची वाईट अवस्था झाली. मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यात ज्यांचे पगार एक लाख रुपये होते, त्यांचे दहा हजार झाले होते आणि ज्यांचे दहा हजार होते त्यांच्या तर नोकर्याच गेल्या.
माझा आजवरचा व्यावसायिक प्रवास हा ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधलाच होता. ट्रॅव्हल इंडस्ट्री गर्तेत असताना काय करावं कळत नव्हतं. या काळात आई बाबा आणि बहिणीने सपोर्ट केला. त्यांनी सांगितलं, स्वतःवर विश्वास ठेव हा कठीण काळ निघून जाईल. कोविड निर्बंध उठल्यावर, उद्याचा काही भरवसा नाही, आजच लाइफ एन्जॉय करा अशा मानसिकतेतून ‘रिव्हेंज टुरिझम’ वाढू लागले. घरी बसून कंटाळा आलेल्या लोकांनी सर्व पर्यटनस्थळांवर गर्दी करायला सुरुवात केली. पण अनेक सुज्ञ नागरिकांना मात्र संक्रमण पसरवणार्या भाऊगर्दीत सामील होण्याची इच्छा नव्हती. या पर्यटकांनी राहण्याची उत्तम सोय आणि चांगली सर्व्हिस देणारे बंगले धुंडाळायला सुरुवात केली. याच कारणांमुळे आमचा आठवण बंगला फॅमिली पिकनिकसाठी द्या अशी मागणी वाढू लागली. कोजागिरीला तर दहा वेगवेगळ्या कुटुंबांकडून विचारणा झाली. यातूनच मग स्वतःचा व्यवसाय करण्याची नवी दिशा मला मिळाली. मी ठरवलं की पर्यटनक्षेत्रात आजवर जे जे शिकलो, जे अनुभव गाठीशी बांधले त्यांचा वापर या होम स्टे पर्यटकांच्या उत्तम सेवेसाठी करायचा.
बंगला स्वतःचा असल्याने हा व्यवसाय करायला फार गुंतवणूक लागणार नव्हती. लोक पैसे देऊन बंगल्यात राहणार असल्याने पर्यटकांना ज्या सोयीसुविधा द्याव्या लागतात, त्यांची पूर्तता करून या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच या व्यवसायाला, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तो पाहून आमच्या शेजारील बंगल्यांचे मालक मला म्हणाले, आलाप आमच्याही बंगल्याचे व्यवस्थापन तू पाहा. त्यांनी शासनाच्या बेड अँड ब्रेकफास्ट योजनेअंतर्गत, पर्यटकांच्या सुविधेसाठी जे नियम आहेत त्यांची पूर्तता केल्यानंतर ते बंगले आम्ही रेंटवर द्यायला सुरुवात केली. माझ्या नवनवीन कल्पनांना, वनराईमधील प्रत्येक बंगलेमालकाने नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यांच्यामुळेच वनराई आज मोठी होत आहे. पर्यटक वाढायला लागले तसे जेवण बनवणे आणि वाढणे यासाठी स्वतंत्र जागेची निकड भासत होती. त्यासाठी आमच्या शेजारचा बंगला किचन आणि डायनिंगसाठी रेंटवर घेतला. स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून गावातील माणसे कामासाठी ठेवली.
बंगले रेंटवर देताना काही गोष्टींची आम्ही काळजी घेतो. शक्यतो फॅमिलीसाठी बुकिंग देतो. मोठ्या आवाजात गाणी वाजवणे किंवा धांगडधिंगा करून इतर पर्यटकांना त्रास होईल, शांतताभंग होईल, असे वर्तन करण्यास इथे मनाई आहे. ट्रेकिंगची आवड असणार्यांसाठी नाणे घाट आणि जीवधन किल्ला इथून जवळ आहे. निसर्गप्रेमी, चित्रकार, फोटोग्राफर, कलाकार यांच्या कलासाधनेसाठी ही जागा अगदी परफेक्ट आहे.‘
पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रकिनारे, गिरीस्थान, लेणी, सरोवर अशा पर्यटनस्थळांवर सुट्ट्यांच्या काळात हॉटेल्स, रिसॉर्ट्सना प्रचंड मागणी असते. लोक दुप्पट तिप्पट पैसे देऊन राहायला तयार असतात. मुंबई-पुण्यासारख्या शहरांत राहणार्या लोकांनी गुंतवणुकीसाठी या परिसरांत फ्लॅट्स आणि बंगले विकत घेतले आहेत. पण यातील बहुतांश बंगले/फ्लॅट्स वर्षातील दहा महिने रिकामे असतात. जागामालकांनी त्यांची जागा त्या भागातील स्थानिक मराठी तरुणांना प्रॉफिट शेअरिंगवर, रेंटने दिली, तर त्यातून दोघांसाठी रोजगारनिर्मिती होऊ शकते. यात प्रमुख अडचण अशी की, तिर्हाईत माणसाला जागा दिल्यावर त्याने गैरप्रकार केले, हिशोब दिला नाही तर…? पण आज सीसीटीव्हीमुळे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल तरी तुमचा कंट्रोल राहतो. तसेच शासनाच्या नियमावलीनुसार करार करून जागा देता येईल.
राजकारण असो की व्यवसाय- कोणत्याही ब्रँडला यशस्वी करण्यासाठी, ज्याच्यावर लोक विश्वास ठेवतील असा एक विश्वासार्ह चेहरा लागतो, ज्याला आपण ब्रँड अँबेसिडर असे म्हणतो. पण ती विश्वासार्हता आपोआप किंवा एका दिवसात तयार होत नाही. त्यासाठी तुमचं वागणं, बोलणं, तुमचा एकंदर अटिट्युड हा खूप महत्त्वाचा असतो. ‘अतिथी देवो भव‘ हे नुसतं बोलून नाही तर कृतीतून दिसायला हवं. मुलाखत आटोपल्यावर मी टेबलावरील वनराईमधे आलेल्या पर्यटकांची अभिप्राय वही उघडून पाहिली, तेव्हा प्रत्येक पानावर आलाप यांच्या हॉस्पिटॅलिटीबद्दल अनेक चांगल्या प्रतिक्रिया वाचल्या. या व्यवसायात तुम्ही शंभर टक्के लोकांना खुश करू शकत नाही. काही गोष्टी मालकाच्या हातात नसतात. कधी जेवणात एखादी भाजी आवडली नाही, तर कधी बंगल्यातील व्यवस्थेत काही कमतरता असू शकते, पण आलाप यांच्यासारखा नम्र स्वभाव, आपुलकी आणि चोवीस तास कार्यतत्परता हा गुण जर तुमच्यात असेल तर पर्यटन व्यवसायात तुमचं स्वागत आहे.