मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना मला नेहमी एक गोष्ट खटकायची. मुंबईतला आजचा सर्वात महत्वाचा भाग असलेल्या ‘दादर’चा उल्लेख कुठे यायचा नाही. मुंबई शहराचा इतिहास सांगणार्या महिकावतीच्या बखरीत वाळकेश्वर, वरळी, भायखळा, नायगांव, परळ, सायन इत्यादींचा उल्लेख आहे. ब्रिटीशकालीन इतिहासाच्या पूर्वार्धात वरील ठिकाणांसेबत कुलाबा, माहिम, माजगांव, माटुंगाही येतं, पण ‘दादर’ मात्र कुठंही लागायचं नाही. मुंबईच्या हृदयस्थानी वसलेल्या ‘दादर’सारख्या अतिमहत्वाच्या भागाचा उल्लेख इतिहासात का नाही, हा कुतूहलमिश्रित प्रश्न मला नेहेमी पडायचा. हा प्रश्न अधून मधून मला अस्वस्थ करायचा. पण, धूर दिसतोय म्हणजे आग आहे, या न्यायानं, आजचं भरभराटीला आलेलं दादर तर दिसतंय, मग ते तेव्हाही असलं पाहिजे. आणि जर ते असेल, तर मग ते कुठे आणि कोणत्या स्वरुपात, हा प्रश्नही साहजिकच समोर उभा राहतो!
या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना उपलब्ध ऐतिहासिक तथ्यांसोबत तर्कबुद्धीही वापरावी लागेल, हे हळुहळू लक्षात येऊ लागलं आणि त्यातून इतिहासातील दादरच्या अस्तित्वासंबंधी मला जे आकलन झालं, तेच आपल्यासमोर ठेवतोय…
‘दादर’ या नावाच्या प्रचलित व्युत्पत्तीपासून सुरुवात करतो. स्वत:च्या कपाळावर मुंबई क्रमांक १४ आणि २८ धारण करणार्या दादर परिसराला नाव मिळालं, ते ‘दादर म्हणजे जिना’ या अर्थामुळे, अशी एक लोकप्रिय कथा सांगितली जाते. परंतु, ही कथा पटण्यासारखी नाही.
मुंबईच्या सात बेटांमधे, चहुबाजूंनी बांध घालून समुद्राच्या दिशेने आत येणारं पाणी अडवण्यापूर्वी ही सातही बेटं सुटी सुटी आणि टेकड्यांच्या स्वरुपात होती. आजही शिवडी-परळ, वरळी, माजगांव परिसरात फिरताना मुंबई शहरातल्या कधीकाळी अस्तित्वात असलेल्या ह्या टेकड्या सौम्य स्वरुपात जाणवतात. अॅन्टॉप हिल, मलबार हिल हे परिसर तर नावातच ‘हिल’ धारण करून आहेत. टेकडी आली की चढ-उतार आलेच. त्यामुळे जुन्या मुंबईच्या प्रत्येक बेटरुपी टेकडीवर चढ-उतार असणारच. चढ-उतार करणं सोपं जावं म्हणून प्रत्येक किंवा काही महत्वाच्या टेकड्यांच्या उतारावर पायर्या खोदलेल्या असणारच.
उदाहरणार्थ, मलबार हिलच्या पूर्व उतारावर, गिरगाव चौपाटीच्यानजीक एक रस्ता ‘सिरी रोड’ हे नाव धारण करुन अस्तित्वात आहे. या नावातला ‘सिरी’ शब्द ‘शिडी’ या अर्थाने आलेला आहे. मलबार हिल हा त्या काळातही बड्या सरकारी अधिकार्यांच्या आणि कुबेरपुत्र/कन्यांच्या निवासाचा परिसर होता. त्याही पूर्वी मलबार हिलवरचं वाळकेश्वर हे हिंदूंचं प्रसिद्ध तीर्थस्थळ होतं. आजही तिकडची अनेक देवळं आणि बाणगंगेचा तलाव याची साक्ष देत खडे आहेत. थोडक्यात मुसलमान राजवट, नंतरची पोर्तुगीज सत्ता आणि त्या नंतरच्या ब्रिटिश काळातही मलबार हिल हे अत्यंत महत्वाचं ठिकाण होतं. त्यामुळे त्या परिसरात लोकांची सातत्याने ये-जा असे. मलबार हिलवर ये जा करणं किंवा चढ-उतार करणं सोपं जावं म्हणून, टेकडीच्या उतारावर पायर्या खणलेल्या होत्या. या पायर्यांना लोकबोलीतील ‘शिडी’ असं साधं, सोपं आणि कुणालाही चटकन बोध होईल, असं नाव दिलेलं होतं. काळाच्या ओघात पायर्या लुप्त झाल्या आणि त्या जागी वर चढत जाणारी प्रथम कच्ची आणि मग पक्की सडक झाली. तिथल्या ‘शिड्या’ आता नसल्या तरी, आताचा रस्ताही आपल्या नावात ‘सिरी’, अर्थात ‘शिडी’ बाळगून आहे. असं असताना, जुन्या काळातल्या दादरचं अस्तित्व नेमकं कुठे होतं, हेच जिथे ठामपणे सांगता येत नाही, अशा ठिकाणच्या जिन्यांना किंवा दादरांना महत्व मिळून त्या ठिकाणचं नावच ‘जिन्यां’वरून आलंय, ही व्युत्पत्ती पटण्यासारखी नाही.
आणखीही एक कारण आहे. दादर नावाची आणखीही काही ठिकाणं आहेत. एक दादर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात पेण शहरापासून साधारणत: सात किमी अंतरावर आहे. दुसरं एक दादर अलिबाग तालुक्यात चौल गावानजीक आहे. ह्या दादरला ‘चौल-दादर’ असं म्हणतात. नावात ‘दादर’ धारण करणारा एक ‘दादरपाडा’ उरणनजीक आहे, तर दुसरा पालघर जिल्ह्यातील केळवे-माहिमजवळ आहे. याशिवाय, महाराष्ट्र-गुजरात सीमेवरच्या दमणगंगा नदीच्या दक्षिण तीरावरचा ‘दादरा-नगर हवेली’ हा केंद्रशासित प्रदेश तर प्रसिद्धच आहे. ही सर्व ठिकाण नावात दादर धारण करुन आहेत. इथे शिडीचा काही संदर्भच नसताना ‘दादर’ नाव कसं पडलं, या प्रश्नाचं उत्तर ‘जिना-दादर’ ह्या व्युत्पत्तीत सापडत नाही.
आता, जिना अथवा पायर्यांमुळे मुंबई-दादर नामक स्थानाचा उगम झाला ही व्युत्पत्ती खोडून काढल्यावर एकच शक्यता उरते; ती म्हणजे इतिहासातही आजचं दादर, नगण्य स्वरुपात का होईना अस्तित्वात होतं, ही. इतिहासात दडलेल्या दादरचा वर्तमानकाळात शोध घेताना मी ‘महिकावतीची बखर’ या इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा संदर्भ म्हणून उपयोग केला आहे. ह्या बखरीत उल्लेख केलेल्या प्रमुख घटना जरी इ.स. ११३८ ते इ.स. १३४८ अशा साधारण २१० वर्षांच्या कालावधीत घडलेल्या असल्या तरी ही बखर त्यानंतरच्या वेगवेगळ्या काळांत लिहिली गेली आहे. इ.स.१९२४मध्ये इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंनी त्यावर भाष्य केलं आहे. या बखरीत उल्लेख केलेल्या स्थळांचा आणि स्थलनामांचा वर्तमानातील मुंबई शहराशी दाट संबंध आहे. बखरीत उल्लेखलेली सात-आठशे वर्षांपूर्वीच्या मुंबई शहरातील व उपनगरातील ठिकाणं, त्यांच्या नावांत किंचितसा अपभ्रंश होऊन आजही मुंबई शहरात नांदताना दिसतात. उदा. वाळुकेश्वर, भाईखळे, जुहू, आंधेरी इत्यादी. यामधे आजच्या मुंबई शहरातील माहीमव्यतिरिक्त, वाळुकेश्वर आणि भाईखळे अशी केवळ दोन नावं आहेत, इतर सर्व नावं साष्टीतली आहेत.
बखरीत या नावांचा उल्लेख आहे याचा अर्थ ती नावं बखरपूर्व काळापासून अस्तित्वात आहेत असा होतो. बखरीत दादरचा उल्लेख नाही, पण आजच्या दादरच्या आजूबाजूची काही ठिकाणं त्यात आहेत आणि म्हणून केवळ याचसाठी महिकावतीची बखर आधारभूत म्हणून घेतली आहे.
त्यासाठी आता मुंबईचा राजा ‘प्रताप बिंबा’च्या काळाचा थोडक्यात आढावा घेऊ. गुजरातेतल्या अनहिलवाडच्या चालुक्याचा मंडलिक असलेल्या चांपानेरचा राजा गोवर्धन बिंबाचा भाऊ प्रताप बिंब, शके १०६०, म्हणजे इसवी सन ११३८मध्ये पैठणमार्गे उत्तर कोकणवर स्वारी करून आला. उत्तर कोकण म्हणजे साधारणत: नर्मदेच्या दक्षिण तीरावरल्या, गुजरातेतल्या, दमणपासून मुंबईच्या मलबार हिलपर्यंतचा प्रदेश. इसवी सन ११४०मध्ये प्रताप बिंबाने दमणवर स्वारी करुन, दमणसहित चिंचणी-तारापूर, पालघर, केळवे-माहिम, वसईपर्यंतचा प्रदेश अधिपत्याखाली घेतला. नव्याने काबिज केलेल्या प्रदेशात आपल्या मूळ देशातून, म्हणजे गुजरातेहून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी इत्यादी कुळांना आणून वसवलं. पैठणहून काही लोकांना या परिसरात वास्तव्यासाठी निमंत्रण धाडलं. थोडं स्थिरस्थावर झाल्यावर प्रताप बिंब यांने केळवे-माहिमला नवीन राजधानी वसवली आणि इसवी सन ११४२मध्ये पुढच्या मोहिमेस, म्हणजे वालुकेश्वरापर्यंतचा प्रदेश सर करण्यास जाण्याची सेनापतीस आज्ञा केली. प्रताप बिंबाच्या आज्ञेनुसार सेनापतीने वालुकेश्वरापर्यंतचा प्रदेश काबिज केल्यावर राजा मुंबईतल्या माहिम बेटावर पोहोचला आणि तिथे त्याने राजधानी स्थापन केली आणि या राजधानीस त्याने ‘माहिम’ अर्थात महिकावती असं नाव दिलं. आपण आज जो भाग ‘माहिम’ म्हणून ओळखतो, त्याचा ‘माहिम (महिकावती)’ ह्या नावाचा पहिला उल्लेख इथेच सापडतो.
बिंब राजा इथे येण्यापूर्वीही मुंबईची बेटं अस्तित्वात होती, निरनिराळ्या काळात अनेक राजघराण्यांनी मुंबई बेटांवर कमी-अधिक काळ राज्यही केलं होतं. परंतु त्या काळात मुंबईच्या सात बेटांची नावं काय होती, त्याची नोंद मला तरी कुठे सापडली नाही. प्रताप बिंबाने माहिम बेटावर राजधानी केल्यावर नवीन राजधानीच्या ठिकाणी वस्ती करण्यासाठी, केळवे-माहीम परिसरातील सोमवंशी-सूर्यवंशी कुळातील अनेक कुटुंबं आणली आणि त्यांना माहिम बेटावर वसवलं. आजही माहिममधे अद्याप टिकून असलेल्या अनेक जुन्या माहिमकरांची गाव आणि नातेसंबंध केळवे-माहिम-पालघर-चिंचणी आणि परिसरात सापडतात, ते यामुळेच.नंतरच्या काळातही केळवे-माहिम परिसरातून लोक इथे वस्ती करण्यासाठी येत असावेत. आपापल्या मूळ गावाशी घट्ट नाळ जुळलेल्या या लोकांनी केळवे-माहिम येथील मूळ गावांची आणि तेथील दैवतांची नावंही सोबत आणली आणि ती नव्या ठिकाणच्या वस्त्यांना दिली असावीत. ती नावं आजही टिकून आहेत. केळव्याच्या माहीमप्रमाणेच मुंबईचं माहीमही समुद्राच्या जवळ आहे. इथून जवळच ‘धारावी’ आहे, जी विरारपलिकडच्या प्रदेशातही सापडते. तिकडचं ‘नायगांव’ मुंबईतही पाहायला मिळतं. राजा बिंबाची कुलदेवता श्री शाकंबरी, अर्थात श्री प्रभादेवी मुंबई-माहिमात होती. केळवे-माहिम परिसरातली श्री शितळादेवी मुंबई-माहिमलाही आहे. ह्या उदाहरणांवरून, मुंबई-माहिम परिसर ही केळवे-माहिम परिसराची प्रतिकृती (रेप्लिका) होती किंवा आहे, असं अनुमान काढल्यास ते फारसं चुकणार नाही.
पूर्वीच्या राज्यकर्त्यांची ही पद्धतच असावी. एखाद्या राजाने नवीन ठिकाणी राज्य वसवलं की जुन्या ठिकाणची आणि देवतांची नावं नव्या ठिकाणी वस्ती करताना देण्याची प्रथा असावी. म्हणून तर एकाच नावाची अनेक ठिकाणं वेगवेगळ्या जागी पाहायला मिळण्याचा अनुभव येतो. उदा. सुप्रसिद्ध पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात आहे. त्याच नावाचं एक गाव औरंगाबादमधील वाळूंजजवळही आहे. ‘नांदगाव’ ह्या नावाची बरीच ठिकाणं महाराष्ट्रात आहेत.
प्रताप बिंबाच्या केळवे माहिम-पालघर परिसरात ‘दादरपाडा’ नावाचा भाग आहे. ह्या दादरपाड्याचं स्थान मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे. किनारपट्टीवर वर उत्तरेला माहिमचा समुद्रकिनारा आणि दक्षिणेला केळव्याचा किनारा यांच्या बरोबर मध्ये, समुद्राची एक लहानशी खाडी आत येते, या खाडीच्या किनार्यावरच दादरपाडा वसलेला आहे आणि या खाडीला ‘दादरपाडा खाडी’ असं नांव आहे. इथून नजिक मांगेलवाडा आहे आणि तिथून थोड्या अंतरावर खालच्या बाजूला श्री शितळादेवीचं मंदिरही आहे. दादरपाडा माहिम आणि केळवा या दोन ठिकाणांच्या सीमेवर आहे. नेमकी अशीच भौगोलिक ठेवण आणि हीच वैशिष्ट्ये मुंबई-माहिमच्या परिसरात असलेली दिसतात आणि मग याच परिसरात कुठेतरी मुंबईतलं मूळ दादर असावं, ह्या तर्काला पुष्टी मिळते.
या दादर पाडा भागातील किंवा त्या परिसरातील काही लोक राजा बिंबाच्या काळात त्याच्या सोबत आले असावेत व ते माहीम बेटाच्या दक्षिणेच्या टोकाला, म्हणजे आजच्या प्रभादेवी परिसरात वसले असावेत. मुंबई-माहिमचा समुद्रकिनारा आणि शेजारीच असलेली, माहिम आणि वरळी बेटांच्या मधली खाडी, नजिकच असलेलं शितळादेवीचं मंदिर आणि मुंबई-माहिममधे असलेला मांगेलवाडा (आता याचं नांव मांगेलवाडी असं झालं आहे) पाहून, त्यांना या भागाचं, आपल्या मूळ स्थानाशी साम्य दिसलं असावं आणि आपल्या इथल्या वस्तीला, ‘दादर पाडा’ असं आपल्या जुनंच नाव दिलं असावं आणि काळाच्या ओघात, त्या नांवातला ‘पाडा’ गळून आजचं ‘दादर’ झालं असावं, असं म्हटलं तर चुकू नये. मुख्य माहिमच्या वरळीकडच्या दक्षिण सीमेवर वसलेली ही लहानशी पाडा स्वरुपातली दादरची वस्ती असावी असा अंदाज बांधता येतो.
पूर्वी हा मुख्य माहिम बेटाचाच भाग असल्याने त्याला स्वतंत्र अस्तित्व नसावं. या वस्तीचं आजचं नेमकं ठिकाण सांगायचं तर, कबुतरखाना-पोर्तुगीज चर्च ते कीर्ती कॉलेजच्या किनारपट्टीच्या आसपासचा किंवा दरम्यानचा हा भाग असावा. इथून अगदी जवळच जवळपास हजार वर्षांचा इतिहास असणारं प्रभादेवीचं स्थान आहे. याच परिसरात पोर्तुगीज चर्च आहे. स्मशानभूमीही जवळच, समुद्रकिनार्यावर आहे. देवालयांचं किंवा स्मशानाचं स्थान वस्तीच्या काहीसं दूर, गावच्या सीमेवर असतं, हा भाग लक्षात घेतला तर, इथे माहिमची सीमा संपत असावी आणि त्याच्या आसपासच बिंबाच्या काळात नवीन ‘दादर पाडा’ वसला असावा, असा अंदाज करता येतो. आजच्या एकविसाव्या शतकातही हा परिसर आपलं जुनं स्वरुप बरचसं टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.
दादर हे माहिममधलं गाव किंवा पाडा किंवा वाडी वर सांगितलेल्या ठिकाणीच वसलेलं असावं, याचा पुरावा इथल्या रेल्वे स्टेशनच्या नावातही मिळतो. मध्य रेल्वे सुरू झाली ती १८५३मध्ये. पश्चिम रेल्वे तर त्यानंतर दहा-पंधरा वर्षांनंतर सुरू झाली. दादरची पश्चिम आणि मध्य रेल्वेवरची दोन्ही स्थानकं ‘दादर’ नाव लेवूनच उभी आहेत. रेल्वे स्थानकांना नावं देण्याची रेल्वे खात्याची विशिष्ट पद्धत लक्षात घेतली तर, दादर वर लिहिलेल्या ठिकाणी(च) होतं, या अनुमानाला पुष्टी मिळते. रेल्वे स्टेशनांना नाव देताना, ते स्टेशन एखाद्या गावाच्या कुशीतच वसलं असेल, तर त्या स्टेशनला सरळ त्या गावाचं नाव दिलं जातं. उदा. विलेपार्ले, अंधेरी, ठाणे, भायखळा किंवा माहिम इत्यादी. त्या परिसरातलं मुख्य गाव रेल्वे स्टेशनपासून दूर असेल तर त्या स्टेशनला नाव देताना त्या गावाचं नाव आणि सोबत ‘रोड’ असा शब्द लिहिण्याची प्रथा आहे. उदा. पश्चिम रेल्वेवरचं ‘माटुंगा रोड’ किंवा ‘खार रोड’ स्टेशन. मध्य रेल्वेवर ‘माटुंगा’ याच नावाचं स्टेशनही आहे, कारण ते माटुंगा गावातच उभं आहे. पश्चिमेला माहिम येतं आणि पश्चिम रेल्वेवर माहिमचं, त्याच नावाचं स्वतंत्र स्टेशनही आहे आणि ते मूळ माहिमच्या कुशीतच वसलेलं आहे. म्हणून पश्चिम रेल्वेवरच्या माहिमनंतरच्या स्टेशनचं नाव ‘माटुंगा रोड’ असं देण्यात आलं आहे. याचा अर्थ ह्या स्टेशनपासून माटुंगा गावाकडे जाण्याचा रस्ता आहे, असा होतो.
माटुंगा रोडनंतर पश्चिम रेल्वेवर दादर येतं. मध्य रेल्वे मार्गावरही दादरच येतं. याचा अर्थ ही स्टेशनं माहिम बेटावरील दादर गावाच्या कुशीतच वसलेली आहेत. आणि ही कूस अर्थातच कबुतरखान्याच्या आसपासच येते. म्हणजे मूळचं दादर कबुतरखाना, पोर्तुगीज चर्च ते कीर्ती कॉलेजच्या परिसरात वसलेलं असावं, ह्या अनुमानाला दुजोराच मिळतो.